३ ते ६ जुलै दरम्यान वादळी पावसाची शक्यता.
पुणे (प्रतिनिधी) – राज्यात मागील पंधरा दिवसांपासून मान्सूनच्या लपंडावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात दोन दिवसापासून तुरळक ठिकाणी सुरु असलेल्या पावसाचा जोर देखील ओसरला होता. राज्यातील काही भाग वगळता इतरत्र बाष्प नसलेले फक्त ढगाळ वातावरण होते. परंतु, हवामान विभागाने कोकण, विदर्भ व मध्य महाराष्ट्राला आजपासून ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात देखील वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.
यंदा मॉन्सून हंगामाची सुरुवात दमदार झाली असून मॉन्सूनचा पहिला महिना जूनमध्ये दमदार पाऊस झाला. मॉन्सूनच्या पहिल्या महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाने सांगितले. मॉन्सून राज्यात दाखल झाल्यानंतर साधरण दोन आठवडा पावसाने विश्रांती घेतली असली तरी पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. राज्यात २५१.४ मिलीमीटर पाऊस झाला असून दुष्काळग्रस्त जिल्हे म्हणून ओळख असलेल्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पूर्ण राज्य चार दिवसात व्यापल्यानंतर मॉन्सूनला पुन्हा ब्रेक लागला. त्यानंतर २३ जून रोजी पुन्हा आपली वाटचाल सुरू करत मॉन्सूनने पुढील चार दिवसात संपूर्ण देश व्यापला.
३ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार
कर्नाटक किनारपट्टीवर समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा व अरबी समुद्रावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे यामुळे नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रीय झाले असून राज्यात नाशिक, पुणे, मुंबई व विदर्भात ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, धुळे नंदुरबार, नगर,बीड, उस्मानाबाद, लातूर व नांदेड या ठिकाणी यलो आणि उर्वरित राज्यात ग्रीन अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे. ऑरेंज अलर्ट भागात ११० ते २०० मीमी पाऊस तर येलो अलर्ट भागात ६० ते ११० मिमी पाऊस पडण्याची सूचना देण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ३ ते ६ जुलै दरम्यान वरील विभागात मेघगर्जना व विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
Thank you very much Team eagroworld about sending rains falls information