गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील प्रयोगशील युवा शेतकरी राहुल कुलकर्णी गेल्या चार वर्षांपासून आपल्या उसाच्या शेतात पाच कुजवण्याचा प्रयोग करत आहे. पाचट कुजवल्यामुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहून उसाचे उत्पादन वाढले आहे. पाचटामुळे बाष्पीभवन टळत असल्याने पाण्याची बचत होत आहे. पाचट न जाळल्यामुळे वातावरण स्वच्छ ठेवता येत असल्याने पर्यावरण संवर्धन कार्यास देखील हातभार लागत आहे.
गंगापूर तालुक्यातील गोदावरी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पादन घेतले जाते. सातत्याने उसाचे पीक आणि अति सिंचनामुळे परिसरातील जमिनीचा पोत खराब होत आहे. यामुळे जमिनीत पाला-पाचोळा कुजवणे, शेणखत किंवा कम्पोस्ट खतांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी गव्हाचे काड किंवा उसाचे पाचट जमिनीत कुजवणे देखील योग्य उपाय आहे. मात्र येथील शेतकरी गहू काढणी झाल्यावर काड आणि उसाची तोडणी झाल्यावर पाचट पेटून देतात. जाळल्यामुळे जमिनीला उपयुक्त घटक नष्ट होतात आणि वातावरण देखील प्रदूषित होते.
जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि वातावरणाचे प्रदूषण टाळण्यासाठी कायगावातील प्रयोगशील युवा शेतकरी राहुल कुलकर्णी हे गेल्या चार वर्षांपासून ऊस तोडणीनंतर पाचट जाळून न टाकता त्याची मशिनद्वारे कुट्टी करून जमिनीत कुजवण्याचा प्रयोग करत आहे. यामुळे जमिनीचा पोत सुधारल्यानेे उत्पादनात वाढ झाली आहे. ऊस पिकात पाचटाचे आच्छादनामुळे उन्हाळ्यात होणारे पाण्याचे पाष्पीभवन रोखले जात असल्याने पाण्याची बचत होते. पाचट आच्छादनामुळे तणाचे देखील नियंत्रण होते. पाचट जमिनीत कुजवल्याने जमीन सुपिकतेसाठी उपयुक्त गांडूळ आणि इतर जीवजंतूचे संवर्धन होत आहे. यामुळे जमीन सुपीक होऊन सेंद्रिय कर्ब देखील वाढले आहे.
दरवर्षी ऊस तोडून गेल्यानंतर राहुल कुलकर्णी हे शेतातील पाचट व्यवस्थित पसरवून घेतात. ट्रॅक्टरच्या साह्याने मशिनद्वारे पाचटाची कुट्टी करतात. कुट्टी पाचटाला कुजवण्यासाठी त्यावर युरिया आणि सुपर फॉस्फेट खत टाकून पाणी देतात. त्याला एक पाणी दिल्यानंतर बगल्या फोडून पाचट माती आड केले जाते. यानंतर साधारण तीन ते चार पाणी दिल्यावर पाचट जवळपास कुजते. यात छोट्या ट्रॅक्टरच्या साह्याने रोटोव्हेटर फिरवल्याने पाचट मातीत मिळसले जाते. यानंतर पिकाला मातीची भर लावली जाते.
ऊस तोडणीवेळी पाचटात थोड्याफार प्रमाणात उसाचे कांडे पडलेले असल्याने त्याची रोपे तयार होतात. उसात ज्या ठिकाणी तोडे (विरळ) पडलेले असतात तिथे या रोपांची लागवड ते करतात. पिकात आवश्यक तेवढी रोपांची संख्या राखल्याने उत्पादन वाढीस हातभार लागतो. पाचट न जाळल्याने खोडवा पिकातील फूटवे (कोंब) सशक्त राहतात. त्यांच्या वाढीला ताबडतोब चालना मिळत, असल्याचे राहुल कुलकर्णी यांनी सांगितले.
आपण काळ्या आईची काळजी घेतली पाहिजे!
आपण शेत जमिनीला काळी आई म्हणतो. ही काळी आई आपले पोट भरते, मग आपण देखील या काळ्या आईची काळजी घेतली पाहिजे. शेतजमिनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आम्ही गेल्या चार वर्षांपासून जमिनीत उसाचे पाचट कुजवत आहे. याचे चांगले परिणाम मिळाले असून जमिनीची सुपिकता टिकण्यास मदत होऊन उत्पादनात वाढ झाली आहे. पाचटामुळे पिकात तणांचा पादुर्भाव कमी होत असल्याने पिकाला आवश्यक घटक जास्त प्रमाणात मिळतात. पाचटामुळे जमिनीत आवश्यक सूक्ष्म जीवाणू, गांडूळ वाढल्याने मातीचा जीवंतपणा टिकण्यास मदत होत आहे.
– राहुल कुलकर्णी, प्रयोगशील शेतकरी, कायगाव
———
पाचट कुजवण्याचे अनेक फायदे आहेत
एक हेक्टर क्षेत्रात साधारण 8 ते 10 टन पाचट मिळते. या पाचटातून 0.5 टक्के नत्र, 0.2 टक्के स्फूरद, 0.7 ते 1.0 टक्के पालाश आणि 32 ते 40 टक्के सेंद्रिय कर्ब मिळते. अर्थात यातून 40 ते 50 किलो नत्र, 20 ते 30 किलो स्फूरद आणि 75 ते 100 किलो पालाश मिळते. सोबतच जमिनीच्या सुपिकतेसाठी आणि पिकांच्या वाढीसाठी असणारे 3 ते 4 हजार किलो सेंद्रिय कर्ब उपलब्ध होते. सेंद्रिय पदार्थ कुजत असल्याने कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडून तो पिकाला कर्बग्रहण कार्यात साह्यरून ठरतो. यामुळे उसाचे पाचट जाळून न टाकता जमिनीत कुजवणे फायद्याचे आहे.
– डॉ. सूर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद