अम्मानच्या हॉटेल मेनामध्ये मी पहाटे पाच वाजताच उठलो. नित्यकर्म आटोपून सहा वाजता बाहेर आलो. रात्री झालेल्या हलक्या पावसामुळे थंडगार वारा सुरू होता. हा पहाटवारा झेलत झेलत मी दूरवर फिरून परतलो. आम्हाला तेल अवीव शहरात दर तीन वर्षांनी भरणारे जागतिक कृषी प्रदर्शन (अॅग्रीटेक 2018) पाहायचे होते. संगणकाचा जमिनीतील घटक द्रव्ये मोजण्यासाठी वापर, ड्रोनच्या साहाय्याने पेरणी, फवारणी, मोबाईलच्या साहाय्याने वापरता येईल असा व्हॉल्व्ह, स्वयंचलित डोसिंग या बाबी नव्याने पाहता आल्या.
आम्ही सहा जणांव्यतिरिक्त यात्रा डॉटकॉम कंपनीमार्फत भारतातून इस्त्राईल दौर्यावर आलेले 70 जण रात्री उशिरा याच हॉटेलमध्ये थांबले होते. सकाळची न्याहरी घ्यावी, अशी सूचना आल्याने आम्ही तिकडे वळलो. न्याहरी आटोपल्यावर आम्ही सर्व सामान घेऊन ट्रॅव्हल्स बसमध्ये बसलो. भारतातून रात्री उशिरा आलेल्या यात्रेकरुंमधला बंगलोरचा एक प्रवासी न्याहरी करून सामान घ्यायला त्याच्या रुममध्ये गेला. रात्री उशिरा झोपल्याने आणखी पाच मिनिटे पडू, असा विचार करून तो पुन्हा झोपला. इकडे दोन्ही बस फुल्ल झाल्या होत्या. मात्र, आमची टूर मॅनेजर पारूल चोप्रा बसमधील प्रवासी पुन्हा पुन्हा मोजत होती. कोणीतरी एक जण कमी असल्याचे ती सांगत होती. आमचे सर्वांचे मोबाईल बंद असल्याने त्या यात्रेकरुशी संपर्क साधता येत नव्हता. वेळ होत असल्याने इतर यात्रेकरू संताप व्यक्त करत होते. अखेर ते महाशय लगबगीने हातात बॅगा घेऊन बसमध्ये चढले. बसमधील यात्रेकरुंनी टाळ्या वाजवून त्यांचे उपहासात्मक स्वागत केले.
अम्मानहून आमच्या दोन्ही बस इस्राईलकडे निघाल्या. सारा प्रदेश वाळवंटी होता. जॉर्डनची सीमा ओलांडून आम्ही इस्राईलमध्ये प्रवेश करण्याआधी आमच्या पासपोर्टची तपासणी झाली. तेथून आमच्या बसने इस्राईलच्या सीमेत प्रवेश केला. सीमेवर सशस्त्र जवानांचा पहारा होता. तपासणी नाक्याजवळ आम्हाला उतरविण्यात आले. तिथे विचारण्यात येणार्या संभाव्य प्रश्नांची माहिती टूर मॅनेजरने दिली. इस्राईलच्या विदेशी विभागाच्या अधिकारी महिलेने इंग्रजीतून नाव, व्यवसाय, कुठून आलात? परत केव्हा जाणार? असे प्रश्न विचारले. काहीशा तणावातच मी त्या प्रश्नांची उत्तरे दिली. शेवटी हसून तिने वेलकम म्हटले. इतर सहकारीही या प्रक्रियेतून बाहेर पडले. पण बीड जिल्ह्यातील मनोज झांबड नावाच्या युवकाला आणि एका मुस्लीम यात्रेकरुला तेथील अधिकार्यांनी बसवून ठेवले. आधी त्यांची चौकशी त्या महिलेने केली आणि नंतर वरिष्ठ अधिकार्यांनीही. इकडे आमचा वेळ जातोय म्हणून पुन्हा घालमेल सुरू झाली. अखेर एक बस पुढे नेण्याचा निर्णय टूर मॅनेजर सतवीर यादवने घेतला. दुर्दैवाने आम्ही दुसर्या गाडीत होतो. वेळ असल्याने आम्ही त्या परिसरात फिरलो. सभोवताली बोडक्या टेकड्या होत्या. मात्र, विदेशी विभागाच्या कार्यालयाबाहेर हिरवेगार लॉन, गुलमोहरची झाडे दिसली. त्यांना ठिबक सिंचन संचाने पाणी देण्याची व्यवस्था होती. इस्राईलच्या कृषी क्रांतीची जणू काही ही चुणूक होती. जॉर्डनपेक्षा इस्राईलमध्ये खूपच कडक तपासणी झाली. आमच्या पासपोर्टवर जॉर्डनमध्ये प्रवेश केल्याची नोंद होती. मात्र, इस्राईलची नोंद करू नये, त्या ऐवजी वेगळा पास द्यावा, अशी विनंती आमच्या टूर मॅनेजरने केली होती. कारण इस्राईलमध्ये जाऊन आलेल्या प्रवाशांना अरब देशात प्रवेश करण्यावर खूपच कडक बंधने आहेत. आमच्यापैकी कोणी भविष्यात अरब देशात गेल्यास अडचण येऊ नये, म्हणून असे केल्याची माहिती आम्हाला देण्यात आली. अखेर तीन तासांनी त्या दोघांची सुटका झाली आणि आमची गाडी पुढे निघाली.
आम्ही इस्राईलमधील सर्वात जास्त लांबीच्या महामार्गावरून (470 कि.मी.) प्रवास करीत असल्याचे आम्हाला गाईडने सांगितले. आता आम्हाला ठिकठिकाणी पॉलिहाऊसेस मोठ्या प्रमाणावर दिसले. रस्त्याच्या एकीकडे वाळवंट तर दुसरीकडे खजुराची हिरवीगार बाग दिसली. इस्रायली लोकांनी वाळवंटात आपल्या मेहनतीने, तंत्रज्ञानाने कमी पावसावर मात करून केलेल्या प्रगतीची ती झलक होती. आम्ही एका खजुराच्या बागेला आणि खजूर पॅकेजिंग हाऊसला भेट दिली. तिथून आम्ही मुक्काम असलेल्या अॅशदोद या शहराकडे निघालो. आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पॉलिहाऊसेसची संख्या खूपच वाढली होती. नजर जाईल तिथे पॉलिहाऊसेस दिसत होते. सायंकाळी जेरुसलेम शहराचे बाहेरून दर्शन घेत आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहचलो. फ्रेश होऊन आम्ही भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. दुसर्या दिवशी आम्हाला तेल अवीव शहरात दर तीन वर्षांनी भरणारे जागतिक कृषी प्रदर्शन (अॅग्रीटेक 2018) पाहायचे होते. त्या उत्सूकतेत झोप केव्हा लागली ते कळालेच नाही. 8 मे रोजी दिवसभर आम्हाला कृषी प्रदर्शन पाहायचे होते. आम्ही मुक्कामी असलेल्या अॅशदोद शहरापासून तासभर प्रवास करून आम्ही तेल अवीवला पोहोचलो. कृषी प्रदर्शन असलेल्या हॉलकडे जाण्यासाठी आम्ही एक उड्डाणपूल पायी ओलांडला. प्रदर्शनात प्रवेशासाठी मोठी रांग होती. रांगेतच आम्हाला रावेर तालुक्यातील विशाल अग्रवाल, प्रशांत महाजन, मनोज महाजन, सुनील पाटील आणि मुक्ताईनगरचे अतुल बाविस्कर भेटले. दिवसभर आम्ही बरोबरच होतो. दुपारी आम्हाला साडेबारा ते दोन या वेळेत जेवायला बाहेर जायचे होते पण वेळ वाया जाऊ नये, म्हणून कोणीही जेवायला बाहेर आले नाही.
संगणकाचा जमिनीतील घटक द्रव्ये मोजण्यासाठी वापर, ड्रोनच्या साहाय्याने पेरणी, फवारणी, पिकांचे फोटो काढून रोगाचे निदान करणे आणि पुन्हा ड्रोनच्या साहाय्याने फवारणी, घरच्या घरी बसून मोबाईलच्या साहाय्याने वापरता येईल असा व्हॉल्व्ह, जैविक कीडनाशके, स्वयंचलित डोसिंग पंप (खते देण्यासाठी) या बाबी नव्याने पाहता आल्या. या जागतिक पातळीवरील कृषी प्रदर्शनात अमेरिका, रशिया आणि युरोपातील देशांचा सहभाग होता. पण इस्त्राईलमधील उपकरणे जास्त होती. या प्रदर्शनाचे वेगळेपण म्हणजे त्यात एकही खाद्यपदार्थ्यांचा स्टॉल नव्हता. कृषी प्रदर्शनाला भेट देणारे शेतकरीही स्टॉल्सवरील माहितीपत्रके फक्त पुढे घेऊन जात नव्हते तर माहिती समजून घेत होते. अनेक शेतकरी टिपणे काढत होते. तर काही मोबाईलमध्ये प्रात्यक्षिके टिपून घेत होते. एका स्टॉलवर मला महाराष्ट्रीयन साड्या घातलेल्या आणि मराठी बोलणार्या महिलांचा घोळका दिसला. आपल्या देशाचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या नेतृत्त्वाखाली नागपूरचे 45 जण येथे आले होते. इस्त्राईलच्या शेतकर्यांशी चर्चा करताना तेथील शेतीशी निगडीत बर्याच बाबी समजल्या. पाण्याचा पुनर्वापर, पाण्याचे काटेकोर नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, यांत्रिकीकरण, उत्कृष्ट उत्पादनाबरोबरच काढणी पश्चात तंत्रज्ञान, संगणकावर आधारित ठिबक आणि तुषार सिंचन संच, पॉलिहाऊसेसचा वापर, वेळेचा सदुपयोग ही तेथील शेतीची वैशिष्ट्ये आहेत. जळगावातील जैन इरिगेशन कंपनीचा स्टॉल या जागतिक पातळीवरील कृषी प्रदर्शनात सर्वात मोठा आणि मध्यवर्ती भागात होता, याचा अभिमान वाटत होता. भारतातून आलेले अनेक शेतकरी जैन इरिगेशनचे ज्येष्ठ पदाधिकारी अतुल जैन यांच्यासोबत फोटो काढत होते. मी ओळख देताच त्यांनी त्यांच्या सहकार्यांना मला आवश्यक ती माहिती देण्यास सांगितले. जैन इरिगेशनने 2012 मध्ये खरेदी केलेल्या आणि 150 देशात शाखा असलेल्या नानदान जैनच्या कार्याची माहिती आम्हाला इथे मिळाली. सायंकाळी आम्ही तेल अवीवचा समुद्र किनारा पाहायला गेलो. दुसर्या दिवशी आम्हाला मृत समुद्र पाहण्यासाठी जायचे होते. खोल समुद्रात पडूनही माणूस बुडत नाही, असा हा समुद्र पाहण्याची उत्सुकता होतीच. (क्रमशः)
मो.नं. 965771305
(लेखक हे रावेर, जि. जळगाव येथील
दैनिक सकाळचे बातमीदार आहेत)