मुंबई : ‘झूम शेती’ हा शेती प्रकार हजारो वर्षे अस्तित्वात आहे. केवळ ईशान्य भारतीयच नाही, तर दक्षिण अमेरिका ते आफ्रिका ते दक्षिण-पूर्व आशिया या सर्व उष्ण कटिबंधातील स्थानिक समुदायांद्वारे शेतीचा हा प्रकार केला जातो. भारतात इतरही अनेक ठिकाणी ‘झूम’ पद्धतीने शेती केली जाते. तेव्हा, ईशान्य भारतात ‘झूम खेती’ नावाने ज्याप्रकारे शेती केली जाते.
‘स्थलांतरित शेती’ किंवा ‘झूम’ ही एक अशी कृषीप्रणाली आहे, ज्यात जंगलाचा एक भाग साफ केला जातो. त्यावर काही वर्षे लागवड केली जाते आणि नंतर तिथल्या मातीची पोषक द्रव्ये पुनर्प्राप्त करण्यासाठी आणि झाडे पुन्हा वाढण्यासाठी ती जमीन पुढील काही वर्षांसाठी पडीक ठेवली जाते. ईशान्य भारतातील सुमारे पाच लक्ष कुटुंबे सुमारे पाच हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर झुम पद्धतीची शेती करतात.
कशी केली जाते ‘झूम’ पद्धतीने शेती?
या पद्धतीत शेतकरी समुदाय जंगल जमिनीचा काही भाग नियंत्रित पद्धतीने जाळून टाकतात. या मोकळ्या झालेल्या जमिनीवर ते एक-दोन वर्षांसाठी आपली पिके घेतात. नंतर तो भूभाग पुढील काही वर्षांसाठी सोडून देतात. त्या काळात ते दुसर्या जमिनीची सफाई करून तिथे पिके काढतात. अशाप्रकारे परत पहिल्या जागेवर शेती करायची वर्षे येईपर्यंत बराच काळ लोटलेला असतो. ‘झूम’ हा पारंपरिक कृषी प्रकार पर्यावरशास्त्रदृष्ट्या विचार केलेला शेती प्रकार आहे. ज्यामध्ये पर्यावरणाशी सर्वात सुसंवादीपणे संवाद साधण्यासाठी हजारो वर्षांच्या निरीक्षणातून प्राप्त झालेल्या अनुभवांचा वापर करून तयार केलेल्या पद्धतींचा समावेश आहे.
या शास्त्रीय पद्धतींनी येथील जनजातीय समाजांमध्ये परंपरा, रीतिरिवाजांचे आणि विधींचे रूप धारण केलेले आपल्याला आजच्या काळात दिसते. या पारंपरिक पद्धतींद्वारे शेती सांस्कृतिक आणि शाश्वत पद्धतीने नियंत्रित केली जाते. जरी जमीन नियंत्रित अग्नीद्वारे साफ केली जात असली तरी वृक्षाच्छादित वनस्पतींचे वर्चस्व राहण्याइतपत ‘नैसर्गिक फॉलो फेज’ म्हणजेच जमीन पडीक ठेवण्याचा काळ धरलेला असतो.
पिकांची गुणवत्ता व अधिक उत्पादनासाठी कृषिसम्राटचे रिवार्ड | Reword |
स्थलांतरित लागवडीमध्ये जंगले साफ करणे समाविष्ट असल्यामुळे ही प्रथा बर्याचदा पर्यावरणीयदृष्ट्या हानिकारक मानली जाते. कारण यातील मोठे चित्र पाहण्याऐवजी, मृदा संशोधक आणि पर्यावरणवाद्यांचा कल त्यातील जंगलतोड इतक्याच भागावर सगळे लक्ष केंद्रित करतात आणि ‘जंगलतोड हा केवळ बदलत्या लागवडीतील एक महत्त्वाचा पण छोटासा पैलू आहे,’ या बाबीकडे जाणूनबुजून किंवा अनावधानाने दुर्लक्ष करतात. अनेक लोक ‘झूम’ शेतीचा नव्याने अभ्यास करू लागले आहेत. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, अनेक वर्षे पडीक ठेवलेल्या जमिनीच्या तुकड्यात नायट्रोजन आणि फॉस्फरसचे प्रमाण उच्च प्रतीचे असते.
झूम खेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर
पिकांच्या उत्तम वाढीसाठी ते महत्त्वपूर्ण असतात. या अभ्यासात असेही आढळून आले आहे की, सर्वात जास्त काळ पडीक असलेल्या जमिनीतील सेंद्रिय पदार्थ हे अजिबात न कापलेल्या जंगलात आढळणार्या जमिनीपेक्षा फारसे वेगळे नाहीत. याचाच अर्थ नैसर्गिकपणे जंगल लवकरात लवकर आपली मूळस्थिती प्राप्त करून घेते. त्यामुळेच अधिक काळ जमीन पडीक ठेवून केलेली ‘झूम’ शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असते. त्यामुळेच ती शाश्वतही होते. यातला महत्त्वाचा भाग असा की, हजारो वर्षे ‘झूम’ शेती करणार्या या लाखो कुटुंबांकडे बदलत्या लागवडीतील(झूम) विस्तृत कृषी ज्ञानप्रणाली आणि जमीन व्यवस्थापन तंत्र आहे आणि पूर्वापार चालत आलेल्या आपल्या ज्ञानाचा वापर ते अतिशय नियोजित पद्धतीने करीत असतात. याचे एक सुंदर उदाहरण घेऊ.
‘आदि’ जनजाती ही अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक लोकसंख्या असलेली जनजाती आहे. हे लोक लोअर दिबांग खोरे, पूर्व, पश्चिम आणि अप्पर सियांग या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहेत. शतकानुशतके ते जवळजवळ संपूर्णपणे शिकार आणि ‘झूम’ शेतीवर अवलंबून आहेत. अनेक कुटुंबे एकत्र येऊन साफसफाई आणि मशागत करतात. सामाजिकदृष्ट्या ‘झूम’ शेती पद्धती लोकांना एकत्र ठेवते, ते एकमेकांना मदत करतात आणि ‘झूम’ शेतीतील विविध कामानुसार आपले पारंपरिक सण साजरे करतात. आदि समुदायाच्या मातीच्या ज्ञानाचे दस्तावेजीकरण करण्यासाठी, अप्पर सियांग जिल्ह्यामधील बोमडो गावातील अनुभवी शेतकर्यांची मुलाखत घेतली गेली. त्या मुलाखतीदरम्यान त्यांनी मातीचे प्रकार, रंग आणि पोत, विशिष्ट प्रकारच्या जमिनींसाठीचे स्थानिक नामांकन, भिन्न प्रकारच्या माती आढळणारी वेगवेगळी क्षेत्रे, लागवडीसाठी प्राधान्य दिली गेलेली क्षेत्रे, त्यामागची शास्त्रीय कारणे विभिन्न प्रकारच्या जमिनीत पिकणारी वेगवेगळी पिके अशी अनेक प्रकारची आश्चर्यकारक माहिती दिली.
आदि समुदायाच्या नृवंशविज्ञानविषयक ज्ञानाचे दस्तावेजीकरण केले गेले. त्यात असे आढळले की, आदि लोक नऊ प्रकारच्या माती ओळखतात आणि मातीच्या गुणधर्मानुसार पिके घेतात. त्यांचा कल केवळ जमिनीतील पोषक तत्वे ओरबाडून अधिकाधिक पीक घेण्याकडे नसून, निसर्गाचे संगोपन व संरक्षण हाही त्यांच्या जीवनमूल्यांचा महत्त्वाचा भाग आहे. तांदूळ आणि बाजरी ही मुख्य पिके आहेत. परंतु, जंगल आणि इतर शेतीच्या भूखंडाला लागून शेत असल्यास कोणती पिके घ्यावीत हे आदि लोकांना माहीत आहे. जेव्हा एखादे शेत दुसर्या शेताला लागून असते तेव्हा बीन्स, तारो (कोलोकेशियाचे विविध प्रकार), वांगी यांची लागवड ते शेताच्या बांधावर करतात. जर शेत जंगलाच्या शेजारी असेल, तर भोपळा आणि लांब सोयाबीनच्या जाती उगवल्या जातात. कारण, आदि लोक असे मानतात की, ते जमिनीची सुपीकता कमी करतात. कोणत्या पिकांना कोणती पोषक तत्वे लागतात आणि ती कोणत्या जमिनीत असतात, याचे संपूर्ण ज्ञान आदी लोकांना आहे.
झाडे ही पोषक तत्वांची बँक
हे चक्र ज्याप्रकारे चालते, त्यानुसार सुरुवातीला जेव्हा जंगलाचा एक भाग साफ केला जातो आणि जाळला जातो, तेव्हा जमिनीतील पोषक द्रव्ये वाढतात. कारण, वृक्षाच्छादित वनस्पतींची राख त्या जमिनीत मिसळते. पण नंतर, पिकांच्या पोषणकाळात, पिकांद्वारे पोषक तत्वांचा वापर केला जातो आणि जमिनीची पोषकता कमी होते. कमी झालेली पोषक द्रव्ये नंतर जमिनीत भरून काढली जातात. कारण, झाडे जमीन पडीक ठेवण्याच्या काळात पुन्हा वाढतात. झाडे खोल जमिनीत मुळांद्वारे उत्खनन करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे पीक प्रणालीच्या मूळ क्षेत्रामध्ये अतिरिक्त पोषक द्रव्ये आणू शकतात. झाडे ही पोषक तत्वांची बँक आहे, जोपर्यंत शेतकरी पीक काढण्यासाठी त्या जमिनीत परतत नाहीत, तोपर्यंत ही पोषणमूल्ये जमिनीत जमा होत राहतात. झाडे मातीला पाणी शोषून घेण्यास मदत करतात, माती आणि पोषक घटकांचे प्रवाह रोखतात.
आता या संदर्भात जे विविध अभ्यास केले जात आहेत, त्यानुसार आदि समुदायाप्रमाणे पद्धतशीरपणे ‘झूम’ शेती केली, तर ‘झूम’चा फायदा केवळ मातीलाच होत नाही, तर सगळ्या समाजाला त्यांचे भूदृश्य व्यवस्थापित करण्यासाठी एक ठोस आणि शाश्वत दिशा मिळते, अशा पारंपरिक पद्धती कदाचित हवामान बदल आणि जंगलाचा नाश यासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी उपयोगी पडतील. आधी ‘झूम’ शेती पद्धत बंद करवणारी सरकारेही आता या पद्धतीचा नव्याने अभ्यास करू लागली आहेत.