पुणे : जुलै महिन्यात अतिवृष्टीचा मार झेलत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी बातमी आहे. यंदाच्या खरीप हंगामात राज्यात प्रथमच सोयाबीन पीकावर पिवळा मोझॅक विषाणूचा म्हणजेच यलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील 80 ते 90 एकरवरील सोयाबीन पीकावर या पिवळ्या मोझॅक विषाणूचा हल्ला झालेला दिसून येत आहे. यालाच काही भागात पीलिया रोग किंवा पीला वायरस असेही म्हटले जाते.
(Yellow Mosaic Virus Attack on Soybean in Shirol Kolhapur)
शिरोळमध्ये मोठी सोयाबीन पेरणी
शिरोळ तालुक्यात तब्बल 910 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी चांगले भाव मिळाल्याने यंदा सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. सोयाबीनचा प्रत्यक्ष हंगाम सुरू होण्याच्या खूप अगोदर त्याची बहुतांश भागात पेरणी झाली. हंगामात लवकर पेरणी केल्याने वाढीसाठी आणि उत्पादनासाठी अनुकूल हवामानाची हमी मिळते, म्हणून शेतकरी तसे करतात.
कृषी अधिकाऱ्यांनी दिली भेट
शिरोळ तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सोमवारी प्रादुर्भाव झालेल्या सोयाबीन शेतीला भेट दिली. हा बहुधा पिवळा मोझॅक विषाणूचाच हल्ला दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रादुर्भावाची तपासणी करण्यासाठी कृषी विभागाने कोल्हापुरातील कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांना पत्र लिहिले आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या पिवळा मोझॅक प्रादुर्भावामुळे टरफल्यांमधील सोयाबीनची परिपक्वता थांबली आहे.
शिरोळमध्ये प्रथमच सोयाबीन पीकावर पिवळा मोझॅक
शिरोळ तालुक्यात हा प्रादुर्भाव दुर्मीळ असून अलीकडच्या वर्षांत पहिल्यांदाच तो तालुक्यात आढळून आला आहे, असे शिरोळ तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सांगितले. ते म्हणाले, “आम्ही शेताला भेट दिली, 80 ते 90 एकरात पसरलेल्या सोयाबीन पीकावर पिवळा मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे मला वाटते. परंतु शेतकऱ्यांना नेमके उपाय सुचवण्यासाठी तज्ञांनी त्याची पुष्टी केली पाहिजे. ज्या शेतात हा प्रादुर्भाव आढळून आला आहे त्या बहुतेक शेतात पूर्वी सोयाबीन पीकाची लागवड झाली होती. पिकांची फेरपालट होतच नाही. खरेतर, पीक रोटेशन, फेरपालट यामुळे पीक विशिष्ट प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते.”
यलो मोझॅक, पीलिया रोग लक्षणे
हा रोग मूगबीन यलो मोझॅक विषाणू आणि मूगबीन यलो मोझॅक इंडिया या विषाणूच्या प्रजातीमुळे होतो. यात सोयाबीन पीक क्षेत्रात शेंड्याकडून पाने पिवळी पडून संपूर्ण झाडच पिवळे पडते. काही वेळा झाडाच्या पानावर त्रिकोणी व चौकोनी आकाराचे तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. अर्धे हिरवी पिवळी पाने असलेले झाड दुरून ओळखता येते. प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ खुंटते. पाने लहान, आखूड, जाडसर व सुरकुतलेली होतात. अशा झाडांना शेंगाही कमी येतात. निरोगी झाडावर या रोगाचा प्रादुर्भाव मावा व पांढऱ्या माशीव्दारे होतो. उबदार तापमानात या वाहक पांढऱ्या माशींची संख्या वेगाने वाढते. याशिवाय, अतिदाट पेरणी आणि नत्राचा अधिक वापर यामुळेही रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. पिवळा मोझॅक रोगाचे विषाणू बियाण्यामधूनच पसरल्याचीही शक्यता व्यक्त होते.निर्मिती करताना काही कंपन्या योग्य ती काळजी घेत नाहीत, त्यामुळे निकृष्ट दर्जाचे बियाणे प्रादुर्भावाला चटकन बळी पडते. अनेक शेतकरी घरीच बियाणे तयार करतात. त्यातूनही पुरेशी काळजी न घेतली गेल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
सोयाबीन उत्पादन घटण्याची भीती
रोगग्रस्त बियाणे तसेच झाडांच्या रोगट कचऱ्याची विल्हेवाट न लावता ते झाडाचे अवशेष तसेच पडून राहिल्यास पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. काही दिवसांनी पानावर काळी सूक्ष्म बुरशीही दिसून येऊ शकते. पिवळा मोझॅक म्हणजे यलो मोझॅक किंवा पीलिया रोग हा विषाणूजन्य रोेग पिकांवरील इतर कोणत्याही रोगांपेक्षा जास्त हानीकारक असतो. त्यामुळे सोयाबीन पीक उत्पन्नात 50 ते 90 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते बियाणे निकृष्ट असल्यास सोयाबीन बियांची उगवण देखील कमी होऊ शकते. सततचा पाऊस, रोगट वातावरण, हिरवी अळी, पानावर ठिबक्यांचा जिवाणूजन्य रोग व रोगट बियाण्यांमुळे हा विषाणूजन्य मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव उद्भवतो.
असे करावे सोयाबीन पीक व्यवस्थापन
पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उत्तम पीक व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. रोगप्रतिकारक आणि सहनशील जातींची शक्यतोवर पेरणी करावी. रोगाची लक्षणे असलेली झाडे दिसून येताच त्वरीत उपटून जाळावी, तणाचा बंदोबस्त करावा. खताची संतुलित मात्रा शिफारशीनुसार द्यावी. नत्रयुक्त खतांचा अधिक वापर टाळावा. त्यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि पर्यायाने त्यांच्याद्वारे पिवळा मोझॅक रोगाचा प्रसारही वाढतो. पांढरी माशी व अन्य रसशोषक किडींच्या देखरेखीकरता पिवळे चिकट सापळे लावावेत. सुरवातीच्या काळात 5 टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी. मावा व पांढरी माशी या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी क्विनॉलफॉस किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के 25 मिली किंवा अॅसीफेट 75 टक्के 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
बटाट्याचे 90 दिवसात तयार होणारे वाण विकसित; गहू-तांदूळ हंगामादरम्यान घेता येईल तिसरे पीक
कापसाच्या भावाने पुन्हा गाठला उच्चांक….. हंगामाच्या शेवटी दिवसाकाठी होतेय दरात वाढ
Comments 1