जनतेच्या हितासाठी, विशेषत:खास शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असतात. त्यातीलच एक खास अशी योजना आहे कन्या वन समृद्धी योजना. महाराष्ट्र राज्य सरकारकडून ही योजना राबविली जाते. यामुळे मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत होईल, असा सरकारला विश्वास आहे. त्याचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना घेता येईल? कसा घेता येईल? हे सारे काही आपण जाणून घेऊ …
एकाच वेळी दोन समस्या सोडवणारी ही खास योजना महाराष्ट्रात राबवली जात आहे. महिला सक्षमीकरणासोबतच वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी कन्या वन समृद्धी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत, ज्या शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला येते, त्या कुटुंबांना राज्य सरकार वृक्षारोपण करण्यासाठी मदत करत आहे. यामध्ये सागाची 5 रोपे, आंब्याची 2 आणि फणस, ब्लॅक बेरी व चिंचेची प्रत्येकी एक रोप समाविष्ट आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत-जास्त कुटुंबांना देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे.
शेतकऱ्याच्या घरात मुलगी जन्माला आल्यास ….
या योजनेंतर्गत कोणत्याही शेतकऱ्याच्या घरात मुलगी जन्माला आल्यास, त्या मुलीच्या नावाने रोप लावण्यासाठी सरकार मदत करते. योजनेंतर्गत कुटुंबाला 10 रोपे मोफत दिली जातात. या योजनेचा लाभ 2 मुलींच्या जन्मापर्यंत उपलब्ध आहे.
काय आहे या योजनेचे उद्दिष्ट?
वनक्षेत्राव्यतिरिक्त, अधिकाधिक वनेतर क्षेत्र वनाखाली आणणे, हा त्याचा उद्देश आहे. ज्यामध्ये मुलीच्या जन्मानंतर शेतकरी दाम्पत्याला 10 रोपे मोफत देऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे. वर्तमान आणि भावी पिढ्यांना पर्यावरण, वृक्षारोपण, झाडांची निगा आणि संवर्धन, जैवविविधता इत्यादींबद्दल आवड निर्माण केली जाणार आहे. अशा योजनांच्या माध्यमातून मुलगा-मुलगी समान असून महिला सक्षमीकरणाचा सामाजिक संदेश दिला जात आहे. अशा योजनांच्या माध्यमातून मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे, यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे.
ॲग्रोवर्ल्ड बुलेटिन 11 एप्रिल । राज्यात 3 दिवस पावसाचे; गारपिटीचा इशारा, रेड अलर्ट!
योजनेच्या लाभासाठी अशी आहे अर्जाची प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलीच्या पालकांनी, मुलीच्या जन्मानंतर संबंधित ग्रामपंचायतीमध्ये मुलीच्या नावाची नोंदणी करून घ्यावी. त्यानंतर योजनेच्या लाभाचा विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल. ज्या शेतकरी दाम्पत्याला मुलगी आहे, त्यांनी मुलीच्या जन्मानंतर पहिल्या पावसाळ्यात 1ते 7 जुलै या कालावधीत 40 झाडे लावण्यासाठी विहित नमुन्यात संमती द्यावी लागेल.
अर्जात भरावयाचा तपशील
अर्जामध्ये मुलीचे पूर्ण नाव, पालकाचे पूर्ण नाव, संपर्काचा संपूर्ण पत्ता आणि आधार कार्ड क्रमांक इत्यादी नमूद करणे आवश्यक आहे. मुलीच्या जन्मानंतर पहिल्या पावसापूर्वी 10 खड्डे खणून लागवडीसाठी तयार करावेत. ग्रामपंचायतीमार्फत नजीकच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेतून 10 रोपे मोफत उपलब्ध करून दिली जातील.
लागवड केल्याचा पुरावा आवश्यक
एकूण 10 रोपांची लागवड पूर्ण झाल्यानंतर, लागवड केलेल्या जागेचा तपशील आणि रोपांचा फोटो संबंधित शेतकऱ्यामार्फत मोबाईल फोन किंवा कॅमेराद्वारे ग्रामपंचायतीला सादर केला जाईल. ही माहिती ग्रामपंचायतीमार्फत संकलित करून दरवर्षी 31 जुलैपर्यंत तालुकास्तरीय वनीकरण अधिकारी व सामाजिक वनीकरण यांना पाठवली जाईल. 1 जुलै रोजी त्याच दिवशी रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.