शेळगावकर्यांचे स्वच्छता, विकास कार्यात योगदान
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी येथील गावकर्यांनी स्वच्छता व विकासात प्रभावीपणे कार्य केले आहे. गावाचा सर्वांगीण विकास साधत इतर गावांसमोर ‘रोल मॉडेल’ उभे केले आहे. गावचा विकास घडवून आणण्यासाठी येथील गावकर्यांना अथक परिश्रमाची पराकष्ठा करावी लागली. शेळगाव गौरी गावाला आदर्श गाव म्हणून तालुका स्तरापासून केंद्रिय स्तरावरचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
नांदेड ते देगलूर रोडवरील नायगाव शंकरनगर पासून शेळगाव गौरी हे गाव पश्चिमेस 3 किलोमीटर तर नांदेडवरुन 60 किलोमीटर अंतरावर टेकडीवर वसलेले गाव आहे. गावची लोकसंख्या एकूण 1 हजार 761 आहे. बहूतांश नागरीकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. एके काळी मानार प्रकल्पाचे पाणी गावातील शिवारास सिंचनाकरीता मिळायचे परंतु, त्याच्यावरच्या भागाला काही तळ्यांची निर्मिती झाल्याने या प्रकल्पात पाणी येत नाही. शिवाय अलिकडच्या काही वर्षापासून पर्जन्यमान कमी होत असल्याने सुद्धा ऊस, केळी पिकात घट झाली आहे. काही प्रमाणात आता बागायती पीके ही ज्यांच्या विहीर बोअलवेलला चांगले पाणी आहे अशाच शेतकर्यांकडे आहेत. बाकी सर्व शेतकरी कोरडवाहूच पीके घेतात.
विविध विकास कामे
या गावात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा लागवड केलेले फुलांचे वृक्ष लक्ष वेधून घेतात. गावांतर्गत रस्ते सिमेंट कॉक्रेटची आहेत. गावातील नागरीकांच्या घरांची रचना अतिशय सुटसुटीत असून एकसमान आहे. बहूतांश घरे ही कौलारुंची आहेत. सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम केले आहे. प्रत्येक घरी शौचालय असून नागरीक त्याचा नित्य वापर करतात. अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. गावात सर्व धर्माचे लोक कोणताही भेदभाव न करता गुण्या गोविंदाने नांदतात. ग्रामविकास कामात सर्वजण एकदिलाने लोकसहभाग नोंदवतात. पूर्वी विकासकामात अडथळे आणाले जायचे परंतू, त्याचा दुष्परिणाम गावच्या विकासावर होतो. याची जाणीव झाल्यानंतर आता विकास कामात नागरिक अडथळा आणत नाहीत. पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली असून दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. गावात नळ योजना कार्यान्वित आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प असून 5 रुपयात 20 लिटर पिण्याचे शुद्ध पाणी मिळते. या गावात या पद्धतीने ग्राम विकास कामे बघायला मिळतात.
कपडे धुण्यासाठी धोबीघाट
महिलांना कपडे धुण्यासाठी गावातच एका ठिकाणी मोठा धोबीघाट बांधला असून त्यावर लोखंडी एंगल बसवून मोठे शेड उभारले आहे. यामुळे उन्हाळ्यात उन्हापासून तर पावसाळ्यात पाऊसापासून सरंक्षण होते. धोबीघाटालगतच असलेल्या नाल्यातून धुण्याचे पाणी गावाबाहेर वाहून जाते. ते पाणी बांध घालून पाझर तलावात मुरवले आहे. तसेच प्रत्येक घरावरील पाऊसाचे पाणी शोषखड्ड्यात सोडून जिरवले जाते. धोबीघाटावर कपडे धुणी करण्यासाठी लागूनच छोटा पाणतलाव आहे. या तलावात पाणीपुरवठा योजनेच्या विहीर व बोअरवेलचे पाणी सोडले जाते. या तलावातील पाण्याचा उपयोग कपडे धुण्यासाठी होतो.
लहानग्यांसाठी उद्यान
गावातील शालेय विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी शहाजी पाटील उद्यान उभारण्यात आले आहे. यात विविध खेळांचे साहित्य बसवण्यात आले आहे. या उद्यानात विद्यार्थी सकाळ सायंकाळी खेळण्या बागडण्याचा मनमुराद आनंद लुटतात. धोबीघाटा शेजारी राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांचा सुबक असा पुतळा बसवण्यात आला आहे. गाडेगाबाबांच्या प्रेरणेतून श्रमदानातून कचर्याची साफ-सफाई केली जाते.
पर्यावरणाचे जतन
या गावातील प्रमुख व उपरस्त्याच्या किनार्यावर गत काही वर्षाखाली एक व्यक्ती दोन झाड या प्रमाणे नागरिकांनी वृक्षारोपण केले आहे. त्यापैकी 85 टक्के वृक्ष जींवत असून ती मोठी झाली आहेत. गावकरी या वृक्षांना नेहमीच पाणी घालून स्वतःच्या लेकराप्रमाणे काळजी घेत संगोपन करतात. यामुळे गावात पर्यावरणाचे जतन होते. वृक्षसंगोपन करुन प्रर्यावरण जोपासल्यामुळे तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गावाला पुरस्कार देवून गौरविले आहे.
मंगल कार्यालयाची उभारणी
नागरिकांना कोणतेही कौटुंबीक किंवा सामाजिक सोहळा करता यावा, यासाठी गावात एक मोठे सर्वसोयीयुक्त असे छ. राजश्री शाहू महाराज मंगल कार्यालय सभागृह बांधण्यात आले आहे. त्याला लागूनच मारोती मंदीरही सुरेख असे उभारलेय. या मंगल कार्यालयात सर्व धर्मिय समाजाचे लग्न कार्य व इतर शुभ कार्य, बैठका साजर्या होतात.
वाचनालयामुळे वाचना ची गोडी
गत काही वर्षाखाली गावात सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले आहे. यात सर्व दैनिक वृत्तमानपत्रे, मराठीसह हिंदी, इंग्रजी भाषेतील मासिके, पाक्षिके, साहित्यीक पुस्तके, विविध कादंबरी, कविता संग्रह, थोरांची पुस्तके अशी नानाविध प्रकारची असंख्य पुस्तके उपलब्ध असल्याने गावातील नागरिक, विद्यार्थी हे सकाळ संध्याकाळ वाचनालयात वाचनासाठी येतात. वाचनालयामुळे अनेकांना वाचनाची गोडी लागली आहे.
अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांना फायदा
सरपंच माधवराव पाटील यांचा मुलगा शहाजी पाटील यांनी काही वर्षापूर्वी गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाठी अभ्यासिका चालू केली आहे. त्यात माध्यमिक पासून उच्चस्तरीय शिक्षणासाठी विविध विषयांची पुस्तके आहेत. अभ्यासाच्या वातारणामुळे गावातील 17 विद्यार्थी अभियंता, तर 7 विद्यार्थी डॉक्टर झाले आहेत.
बचत गटातून महिलांना रोजगार
गावात महिलांचे 11 बचत गट असून 1 पुरुषाचा गट कार्यान्वीत आहे. बचत गटातील अनेक महिलांनी शिवणकलेचे प्रशिक्षण घेवून विविध शिवन काम करतात. काहींनी परसबागेतील कुक्कूटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, पापड शेवय्या निर्मिती आदी स्वंयरोजगार उभारल्याने त्यांना उदरनिर्वाहासाठी कायम रोजगार उपलब्ध झाला आहे. गावातील ज्या महिलांना कन्यारत्न प्राप्त होते, अशा महिलांचा ग्रामपंचायतीतर्फे सन्मान करून पाच हजार रुपये आर्थिक साह्यतेचा धनादेश देण्यात येतो.
अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय
येथील ग्रामपंचायत कार्यालय इमारत ही आधुनिक पद्धतीने बांधली आहे. हे कार्यालने इंटरनेटमुळे इतर शासकीय कार्यालयाशी जोडलेले आहे. कार्यालयात वेगवेगळे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेत. यामध्ये ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच, तलाठी, कृषी साह्यक, पुरुष, महिला व विश्रामगृह, स्वंयपाकगृह आदी स्वतंत्र कक्ष आहेत. महिला व पुरुषासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. दर महिन्याला गावात ग्रामसभा घेवून त्यात सर्वानुमते विकास कामाचे निर्णय घेवून त्याची तात्काळ अमलबजावणी केली जाते. विकास कामात कोणीही कुचराई करीत नाही. कार्यालयातील आवारात शोभिवंत फुले व अन्य वृक्षांची लागवड आहे. फुलझाडे व वृक्षामुळे हे कार्यालय रमनीय आणि मनमोहक असेच आहे. गावात ठिकठिकाणी भिंतीवर स्वच्छता, आरोग्य, कृषी, आदी विषया सबंधी उपदेशपर म्हणी लिहिल्या आहेत.
आदर्श गाव म्हणून ख्याती
शेळगावात गेल्यावर येथे कोणत्या बाबीची उणीव आहे, असे वाटतच नाही. स्वच्छ सुंदर आणि टुमदार देखणे व रमणीय असे हे गाव आहे. ह्या गावाला आदर्शाकडे नेण्यासाठी सरपंच माधवराव पाटील यांच्या नेतृत्वात गावकर्यांनी अनेक वर्ष पर्यत्नाची पराकष्ठा केली. तेंव्हा कुठे हे गाव सर्वांगीण विकासात देशाच्या ग्रामविकास नकाशा पटलावर झळकले. याची दखल घेत राज्य व केंद्र शासनाने या गावाला अनेक पुरस्काराने सन्मानीत केले आहे. गाव पाहण्यासाठी राज्यासह परप्रांतातूनही अनेक जण नेहमीच येत असतात.
प्रतिक्रिया
स्वच्छतेसाठी भेद विसरून कार्य करावे
गाव स्वच्छ असेल तरच त्या गावची शोभा आहे. जेंव्हा आपण आपल्या घरी महागाड्या चैनीच्या वस्तू विकत आणतोत, तेव्हा त्यासाठी काय सरकार पैसे देते का? आपल्याच पैशातून खरेदी करतोत. मग आपल्याच उपयोगासाठी घरी शौचालय बांधण्याकरीता शासनाच्या मदतीची आपण वाट का पाहतोत? हे चुकीच असून प्रत्येकाच्या घरी शौचालय असणे गरजेचे आहे. अन्यथा उघड्यावरील शौचाने सर्वांचे आरोग्य बिघडते. आम्ही आमच्या गावात प्रत्येकाच्या घरी शौचालय बांधून पहिले गाव हगंदरीमुक्त केले. त्यानंतर क्रमाक्रमाने गावाचा सर्वांगीण विकास केला. स्वच्छतेशिवाय देशाची समृद्धी होणे अशक्य आहे. मानवाकरीता सार्वजनिक स्वच्छता ही स्वातंत्र्यासारखीच अती महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छतेच्या कार्यात सर्वांनी विविध भेद विसरून कार्य करावे.
- माधवराव रामचंद्र पाटील
अध्यक्ष, स्वच्छता समिती, महाराष्ट्र शासन
रा. शेळगाव गौरी,
ता. नायगाव, जि.नांदेड.
मो.नं. 9923528797.