मच्छिंद्र चौधरी यांचे दोन शेततळ्यावर सिंचन नियोजन
राज्यातील अनेक भागात सध्या दुष्काळ असून शेती धोक्यात आली आहे. मात्र शेततळे व अन्य स्त्रोतातून पाणी उपलब्धता केली आणि त्याचे योग्य नियोजन केले तर शेती यशस्वी करता येते हे अहमदनगर जिल्ह्यामधील आंभोळ (ता.अकोले) येथील मच्छिंद्र रामनाथ चौधरी या उच्चशिक्षित तरुणांने दाखवून दिले आहे. त्यांनी माळरानावर जिरॅनियम, पालमोरोजा, लेमनग्रास (गवती चहा) व वेटीवर (वाळा) या सुगंधी वनस्पतीची सतरा एकरावर लागवड केली आहे. या पिकांना पाणी देण्यासाठी शेजारीच दीड एकर क्षेत्रावर दोन शेततळे केले आहे. त्यातील पाणी ते ठिबकद्वारे पिकांना देतात. सुंगधी वनस्पतीपासून सुंगधी तेल काढत आहेत. सौदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी वापर केला जाणार्या सुंगधी तेलाला देशभरातून मागणी आहे.
अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील आंभोळ गावांतील चौधरी सर्वसाधारण परिवार. फळबाग, भाजीपाल्यासह वेगवेगळे पारंपारिक पिके घेत. मात्र त्यात झालेला खर्च निघत नव्हता. मच्छिंद्र चौधरी यांचे एमएस्सी केमेस्ट्री, तर धाकटे बंधू अनिल चौधरी यांचे एमए झालेले. मच्छिंद्र हे गेल्या 22 वर्षांपासून मुंबईत सांडपाणी व्यवस्थापनाचे (वेस्ट वॉटर ट्रीटमेंट) काम करतात. त्यांची स्वतःची रुबीकॉन वॉटर इंजिनिअरिंग ही कंपनी आहे. कंपनीतून बाहेर पडणार्या सांडपाण्याला उग्र वास येतो. मात्र सुंगधी तेलावर प्रक्रिया करणार्या मुंबईतील एका कंपनीतून बाहेर पडणार्या सांडपाण्याचा सुगंध यायचा. आपले काम सुरु ठेवत त्या पाण्याचा मच्छिंद्र यांनी अभ्यास केला. राज्यात आणि देशात सुंगधी तेलाची मागणी किती आणि उत्पादन किती आणि दर किती मिळतो याची माहिती घेतली. येथूनच त्यांनी जिरॅनियम, पालमोरोजा, लेमनग्रास (गवती चहा) व वेटीवर (वाळा) या सुगंधी वनस्पतीची शेतात लागवड करण्याचे ठरवले. तत्त्पूर्वी आपल्या भागातील जमीनीत या सुंगधी वनस्पतीचे उत्पादन होईल का? याची चाचपणी केली.
सुंगधी वनस्पती लागवड
सुगंधी वनस्पतीचे उत्पादन घ्यायचे निश्चित केल्यानंतर चार वर्षापूर्वी दीड एकरावर जिरॅनियम आणि इतर अर्ध्या एकरावर लेमनग्रास, वेटीवर, पालमोरोजाची लागवड केली. त्यांनी जिरेनियमची रोपे मुंबईतील केव्हा फ्लेवर कंपनीचे प्रतिनिधी सुकेश सिन्हा यांच्याकडून घेतली. वेटीवरची रोपे लखनौवरुन आणली. वाळाची रोपे नागपुरवरुन आणली. सुरवातीला उत्पादन घेण्यात तांत्रिक अडचणी आल्या, मात्र त्यावर मात करत पीक यशस्वी केले. सुरवातीला दोन एकरावर लागवड केली, मात्र नंतर चार वर्षात लागवड क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ करत ती आता सतरा एकरावर नेली आहे. पहिल्या वर्षी सुगंधी तेल काढण्याचे प्रात्यक्षिक घेतले. त्यात यशस्वी झाल्यानंतर आता दोन वर्षापासून नियमित सुंगधी तेल उत्पादित केले जाते. शेताच्या बांधाचाही पेटीवर (गवती चहा) लागवडीसाठी वापर केला आहे.
शेतीचे व्यवस्थापन
सुंगधी वनस्पती लागवडीसोबत त्यांनी पाणी व्यवस्थापनालाही महत्व दिले आहे. सर्व सतरा एकर क्षेत्राला ठिंबक सिंचनचा वापर केला जात आहे. मच्छिंद्र यांच्या प्रयत्नांना त्यांचे बंधू अनिल चौधरी आणि त्यांचे नातेवाईक युवराज कुटे यांची साथ मिळते. युवराज कुटे हे शेतीचे सर्व व्यवस्थापन पाहतात. त्यांचे बीएस्सी अॅग्री, एमबीए झालेले असून त्यांचे मंचर (जि.पुणे) येथे कृषी केंद्र आहे. दुकान संभाळून ते चौधरी यांच्या शेतीचे व्यवस्थापन पाहतात. कुटे यांची कृषी शक्ती फुडस् ऍण्ड डेव्हेरेजेस कृषी संलग्न व्यवसाय कंपनी असून त्यामार्फत हे काम चालते. जिरॅनियम, पालमोरोजा, लेमनग्रास, व वेटीवर या सुगंधी वनस्पतीची लागवड केल्यावर उन्हाळ्यात पिकाला सावली मिळावी यासाठी सुंगधी वनस्पतीत शेवग्याची लागवड केलेली आहे. त्यातूनही त्यांना शेवग्याच्या शेंगाचे उत्पादन मिळते. शिवाय आता जिरॅनियमच्या रोपाची ते आपल्याच शेतीत निर्मिती करतात. त्यासाठी त्यांनी रोपवाटिका उभारली आहे. दरवर्षाला दोन लाख रोपे तयार करतात. राज्यासह देशभरातून रोपांना मागणी आहे. मच्छिंद्र यांच्या सुंगधी वनस्पती शेतीला आतापर्यत राज्यासह देशभरातून दोन हजारापेक्षा जास्ती शेतकर्यांनी भेट दिलेली आहे. त्यांना माहिती देण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती केलेली असून सर्व बाबीची मोफत माहिती दिली जाते.
दीड एकरावर दोन शेततळे
अकोले तालुक्याचा हा दुर्गम भाग आहे. आंभोळ गावापासून मुळा नदी वाहत असल्याने पाण्याची बर्यापैकी उपलब्धता असली तरी ऐनवेळी अडचण येऊ नये यासाठी चौधरी यांनी सहा वर्षापूर्वी दीड एकरावर प्रत्येकी दोन कोटी लिटर क्षमतेचे दोन शेततळे केले आहेत. त्याच भरलेले पाणी गरजेच्यावेळी वापरले जाते. पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. शेततळ्यातील पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत नाही.
तेल काढणी प्रक्रिया
औषधी वनस्पतीचे तेल काढण्यासाठी पाचशे किलो क्षमतेची टाकी केली आहे. त्यात वरून 9 इंचापर्यत पाणी असते. त्यावर जाळी बसवलेली असते. त्यावर पाचशे किलो सुंगधी वनस्पतीचा टाकला जातो. पाण्याची वाफ तयार होऊन सुंगधी वनस्पतीमधील अर्क काढून तो बाष्पीभवन प्रक्रियेद्वारे कंडेशेशनद्वारे वाफेचे रुपांतर पाण्यात केले जाते. त्यासाठी शेजारी टाकी बसवलेली आहे. नंतर फनेलचा वापर करून तेल व पाणी वेगळे केले जाते. वेगळे झालेले तेल कॅनमध्ये साठवले जाते. सुगंधी तेल काढण्याच्या कामासह शेतीत साधारण दररोज दहा मजूर काम करतात. सुंगधी तेल काढण्यासाठी सध्या साध्या प्रकारचे एक लाख रुपये खर्च करून मशीन बसवलेले आहे. आता लवकरच दोन लाख रुपयाचे अधुनिक मशीन बसवण्याची तयारी आहे. त्या मशीनमुळे इंधनात आणि खर्चात बचत होईल.
इतर शेतकर्यांना प्रोत्साहन
जास्तीचा सुगंध असलेला रोझ डमॉक्सा या विदेशी गुलाबाची लागवड करुन त्याचे गुलाब पाणी, तेल काढायचे आहे. त्यासाठी लखनौ येथून 120 गुलाबाची रोपे आणली आहेत. परिसरात सुंगधी वनस्पती लागवड वाढीसाठी ते प्रयत्न करणार आहेत. लागवड क्षेत्र वाढले तर सुगंधी तेल काढण्यासाठी ट्रकवर मोबाईल युनीट उभारण्याचा संकल्प आहे. शेती परवडत नाही, असे म्हणणार्या प्रत्येक शेतकर्यांसाठी ही लागवड फायदेशीर आहे. याची माहिती देण्यासाठी मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करणार मार्गदर्शन केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी तीन वेगवेगळी पीके घेण्यासाठी थ्री लेयर फार्मिंगचा प्रयोग मच्छिंद्र चौधरी राबवत आहेत. यासाठी केवळ दीड लाखात पॉलीहाऊस उभारणार आहेत. बाजारात सरासरी तीनशे रुपये किलोचा दर असलेले तुळसी, वाळा यापासून तयार होणारे आयुर्वेदिक हर्बल वॉटर सामान्य लोकांना पन्नास रुपये दराने मिळावे यासाठी ते तयार करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी तुळशीची दोन एकरावर लागवड करणार आहे. रोजमेरी याची दोन एकरावर लागवड केली जाणार आहे. हायड्रोपॉनिक्स, हर्बल उत्पादनाचे करण्याचे त्यांचे नियोजन.
उत्पादन, उत्पन्नाचे गणित
जिरॅनियम या सुंगधी वनस्पती लागवडीसाठी मध्यम प्रतीची जमीन लागते. माळरानावरही हे पीक घेता येते. चार महिन्यात पाल्यापासून तेल काढता येते. वर्षभरात सरासरी 40 टन पाला निघतो. एक टनापासून एक किलो तेल निघते. तीन वर्ष हे पीक घेता येते. बाजारात सरासरी साडेबारा हजार रुपये प्रती किलो दर मिळत आहे. पहिल्या वर्षी दीड लाख रुपये व नंतर प्रती वर्षी सरासरी 50 हजार रुपये खर्च येतो. पालमोरोजा या सुंगधी वनस्पतीला सर्वसाधारण कोणतीही जमीन चालते. तीन महिन्यात तेल काढता येते. वर्षाला प्रती एकरी 30 टन पाल्याचे उत्पादन निघते. प्रती टनाला सरासरी तीन किलो तेल निघते. बाजारात सरासरी अडीच हजार रुपये किलोला दर असून अडीच ते तीन लाख रुपयाचे एकरी उत्पादन मिळते. लेमनग्रास या सुंगधी वनस्पतीला साधारण जमीन लागते. बांधावरही हे पीक येते. तीन महिन्यात तेल काढता येते. वर्षभरात एकरी शंभर टन उत्पादन मिळते. एक टन चहापासून सरासरी चार किलो तेल मिळते. बाजारात सरासरी दीड हजार रुपये प्रती किलोला दर मिळत आहे. पहिल्या वर्षी एकरी सरासरी 20 हजार रुपये व नंतर प्रत्येक वर्षी 10 हजाराचा खर्च येतो. वेटीवर या सुंगंधी वनस्पतीसाठी भुसभुसीत जमीन लागते. या वनस्पतीच्या मुळ्यापासून तेल काढले जाते. साधारण अठरा महिन्यात तेल काढता येते. एकरी दोन टन मुळ्या निघतात. एक टन मुळ्यापासून सरासरी पंधरा किलो तेल निघते. बाजारात याला साधारण पंचवीस ते पस्तीस हजार रुपये प्रती किलोला दर आहे. काढणीनंतर एक महिन्यापर्यंत मुळीचे तेल काढता येते. याशिवाय मच्छिंद्र चौधरी यांनी त्यांच्या शेतात ऑलस्पाईसेस, मलेशियन चिंच, दुबई खजूर, बारा जातीच्या वेगवेगळ्या तुळशी, गुलाब, शंभर आंबे, वीस चिकू, पंधरा नारळ, हिमाचल हळद, कप्पा बटाटे आदी झांडांचीही लागवड केली आहे. जगभरात सुमारे एक लाख 20 हजार कोटींची सुंगधी तेलापासून उलाढाल होते. त्यात आपल्या देशाचा वाटा फक्त तीन टक्के आहे. बाकी तेल बाहेर देशातून आयात करावे लागत असल्याची स्थिती आहे, असे विजय चौधरी यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
अभ्या करून शेती करा!
शेतीत शाश्वत उत्पन्न घ्यायचे असेल तर मागणी कशाला आहे याचा अभ्यास करून शेती करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. देशाला लागणार्या सुंगधी तेलाच्या तुलनेत फक्त पाच टक्के तेल भारतात तयार होते. 95 टक्के तेल बाहेरुन आयात करावे लागते. यामुळे या शेतीला आपल्याकडे वाव आहे. नियोजनातून मी शेती केली आणि यशस्वी झालो.
मच्छिंद्र चौधरी,
रा.आंभोळ, ता.अकोले, जि.अ.नगर
मो.नं. 9322405581