अविनाश पाटील
रासायनिक खतांचा होत असलेला वापर व त्यामुळे होणारा खर्च तसेच सुपीक असणार्या शेत जमिनीत होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी गांडूळ खत हा उत्तम व फायदेशीर ठरू शकतो. ही बाब लक्षात घेऊन निफाड तालुक्यातील दिंडोरी गावातील कृषीधारा सेंद्रिय शेतकरी गटातील महिलांनी गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला असून त्यांचे हे अनेक महिला शेतकर्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
निफाड तालुक्यातील दिंडोरी येथील महिलांनी उमेद अंतर्गत स्वयं सहाय्यता गटाची स्थापना केली. दहा ते बारा महिलांनी एकत्र येऊन बचत गट सुरू केला. गटाच्या माध्यमातून महिला दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करतात. गटातील महिलेला कर्ज हवे असेल तर ते या पैशातून दिले जाते आणि त्यावर किती टक्के व्याज आकारायचे हेही गटातील महिला एकत्रितपणे ठरवतात. व्याजाच्या स्वरूपात मिळणारी रक्कम म्हणजे बचत गटातील महिलांना फायदा होतो. पापड, लोणचं हे घरगुती व्यवसाय अनेक महिला करतात. मात्र, गटातील महिलांनी काहीतरी वेगळं करावं, असं या महिलांना नेहमीच वाटायचे. नंतर महिलांनी सेंद्रिय खत निर्मिती तयार करण्याचा विचार केला. यानंतर महिलांना सेंद्रिय खत निर्मिती करण्याबाबत पंचायत समितीतून माहिती मिळाली.
बडोदा बँकेत एक बँक सखी म्हणून काम करणार्या वंदना खरे यांनी 10 महिलांचा एक गट तयार करायला सांगितले. वंदना खरे यांनी गावात सभा घेऊन एक गट कसे कार्य करते यासंर्दभात महिलांना माहिती दिली. यातूनच महिलांनी ठरवलं की, आपण फक्त पैशांची बचत न करता व्यवसाय सुरु केला पाहिजे. यानंतर गटातून एका महिलेची उद्योग सखी म्हणून निवड करण्यात आली. सुवर्णा तास्कर यांची उद्योग सखी म्हणून निवड झाल्यानंतर त्या उद्योग सखीच्या बैठकीत गेल्या. इथून त्यांनी माहिती घेऊन शेतकरी गट स्थापना केला. या गटाला कृषी धारा सेंद्रिय शेतकरी गट असे नाव दिले. या गटाची स्थापना 2022 ला करण्यात आली. या गटात पल्लवी सागर गांगुर्डे (अध्यक्षा), रुपाली तास्कर, सुवर्णा तास्कर (उद्योग सखी), पूजा तास्कर, सुजाता तास्कर, सुनंदा तास्कर, रंजना तास्कर, रोहिणी तास्कर, पूनम तास्कर, आशा तास्कर या दहा महिलांचा समावेश आहे.
महिलांनी घेतले गांडूळ खताचे प्रशिक्षण
गांडूळ खत कसे तयार करायचे?, त्यासाठी लागणारे साहित्य कुठे मिळेल?, अशी अनेक प्रश्न महिलांच्या समोर होती. मात्र, महिलांनी एकच ध्येय निश्चित केलं आणि गांडूळ खताची निर्मिती करण्यासाठी गावातील पंचायत समितीकडे हा विषय मांडला. महिलांना महाबँक आरसीटीतर्फे गांडूळ खताचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. गटातील महिलांनी 8 दिवसांचे प्रशिक्षण घेतले. गांडूळ खत तयार करण्यासाठी सर्वात आधी शेड तयार कसे करायचे याचे प्रशिक्षण महिलांना दिले, असं पूजा तास्कर यांनी ॲग्रोवर्ल्डशी बोलताना सांगितले. गांडुळाला उन्हापासून त्रास होतो म्हणून त्याला सावली पाहिजे. ती छपराने सुद्धा देता येते. साधे कुडाचे शेड जरी केले तरी गांडूळ खत तयार करण्यात काही अडचण येत नाही. या छपराखाली गादी वाफा तयार करावी आणि त्यात गांडूळ सोडून द्यावेत. म्हणजे त्या वाफ्यावरच त्या खाल्लेल्या वस्तूपासून गांडुळे खत तयार होईल. या वाफ्यावरच्या गांडुळाला खायला काय दिले पाहिजे ?, बेड कसे तयार करायचे?, आधुनिक पद्धतीने महिलांना प्रशिक्षण मिळाले.
थोडक्यात महत्त्वाचे
२०२१ ला शेतकरी गटाची स्थापना.
सेंद्रिय खत तयार करण्याचा निर्णय .
महाबँक आरसीटीकडून प्रशिक्षण.
महिलांनी स्व:खर्चातून गांडूळ खत प्रकल्प उभारला.
प्रल्पाच्या माध्यमातून महिलांना मिळतोय रोजगार.
सेंद्रिय शेती वाढावी यासाठी प्रकल्पात वाढ करणार.
अनेक अडचणी आल्या, पण…
प्रकल्प उभारण्यासाठी महिलांना सर्वात आधी जागेची अडचण आली. प्रकल्प उभारायचा कुठं ? यासाठी महिलांनी ग्रामपंचायतीकडे मदत मागितली. मात्र, ग्रामपंचायतला गावठाण नसल्यामुळे जागेचे निराकरण झाले नाही. गटातील एका महिलेने पुढाकार घेत स्वतःची जागा या प्रकल्पासाठी दिली. शेणखतासाठी देखील महिलांना अडचणी आल्या. या अडचणी देखील गटातील महिलांनी सोडवल्या. प्रकल्प उभारणीसाठी महिलांना घरून विरोध होता पण, महिलांनी जिद्दीने हा प्रकल्प उभारला.
स्व:खर्चातून उभारला प्रकल्प
महिलांनी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ न घेता हा पूर्ण प्रकल्प स्व:खर्चातून उभारला आहे. गांडूळ खताच्या निर्मितीसाठी लागणारे साहित्य देखील महिलांनी खरेदी केले. दर्शन किनगे यांच्या मदतीमुळे महिलांना गांडूळ खतासाठी लागणारे साहित्य कोल्हापूर येथून चांगल्या दरात मिळाले. गोळा केलेल्या माहितीच्या आधारे व्यवसायाची सविस्तर आखणी महिलांनी करून घेतली. या गांडूळ खतासाठी महिलांनी 5 बेड तयार केले आहेत. बेड भरण्यासाठी आवश्यक असलेले कुजलेले शेणखताची देखील व्यवस्था केली. कल्चर, बेड, जाळी, पत्रे इत्यादी सामान महिलांनी खरेदी केला असून गांडूळ खत प्रकल्पासाठी 1 लाख रुपयेपर्यंतचा खर्च महिलांनी केला आहे.
महिलांना मिळाले नवे ध्येय
गटातील प्रत्येक महिलेला गांडूळ खत प्रकल्पाच्या माध्यमातून आत्मविश्वास प्राप्त होऊन एक नवे ध्येय मिळाले असून आम्हाला गांडूळ खत प्रकल्प पुढे घेऊन जायचा आहे. सध्या सेंद्रिय शेतीकडे कल वाढत असून सेंद्रिय खताची देखील मागणी वाढत आहे. शेतकर्यांची ही गरज ओळखून शेतकरी गटाच्या माध्यमातून खत निर्मिती सुरु केली आहे. शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळायला हवा. हा कृषीधारा सेंद्रिय शेतकरी गटाचा उद्देश आहे.
– पल्लवी सागर गांगुर्डे,
अध्यक्षा, कृषीधारा सेंद्रिय शेतकरी गट