नवी दिल्ली : शेती क्षेत्रात मोठ्या झपाट्याने बदल होत असून नवनवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांकडून माती शिवाय शेती, एकाच झाडाला एका पेक्षा जास्त पिके यासारखी आधुनिक शेती केली जात आहे. मात्र आता शेती क्षेत्राने या पेक्षाही पुढे पाऊल टाकले असून चक्क समुद्रात काही फूट खोल पाण्यात शेती केली जात आहे. ‘निमाेज गार्डन’ असे या शेतीचे नाव असून १०० पेक्षा जास्त प्रकारच्या भाज्या आणि फुलांचे उत्पादन या ठिकाणी घेतले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून वातावरणात झालेले बदल, कमी किंवा जास्तीचा पाऊस यासारख्या कारणांमुळे अनेक शेतकरी शेतीपासून लांब जात असतांना कृषी संशोधकांनी केलेल्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे सुशिक्षित तरुण शेतीकडे वाळू लागला आहे. एरोपॉनिक, हायड्रोपोनिक यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून मर्यादित जागेत फळे आणि भाजीपाला लागवड केला जात आहे. इटलीतील लिग्युरिया भागातील नाेली या गावातील सर्जिओ गॅम्बेरिनी या शेतकऱ्याने तर या पेक्षाही पुढे पाऊल टाकत जगातील पहिली पाण्याखालची शेती केली आहे. त्यामुळे ही शेती जगभरात चर्चेचा विषय बनली आहे.
अशी होतेय ‘निमाेज गार्डन’ शेती
इटलीतील लिग्युरिया भागातील नाेली या गावातील सुंदर समुद्राच्या पाण्यात काही फूट खाली ही शेती केली जात असून ‘निमाेज गार्डन’ असे या शेतीचे नाव आहे. ही शेती जगातील पहिली पाण्याखालची शेती ठरली असून सध्या या शेतात 100 पेक्षा अधिक प्रकारच्या भाज्या आणि फुलांचे उत्पादन घेतले जात आहे. समुद्राखाली तापमान स्थिर असते, कार्बन डायऑक्साइड शाेषून घेणे आणि नैसर्गिक पेस्ट कंट्राेल या अनुकूल घटकांमुळे येथे पिकांचा उत्तम विकास हाेताे. या ठिकाणी भाजीपाला हवाबंद वातावरणात पिकवला जाताे. बागेतील सहा अॅक्रेलिक बायाेम्स समुद्रसपाटीपासून खाली जमिनीवर बांधलेले आहेत आणि दाेन हजार लिटर हवा धारण करतात. या बायाेम्समध्ये 90 प्लँट बसवण्यात आले आहेत. समुद्राचे पाणी घनीभूत हाेऊन या वनस्पतींवर पडते. त्यामुळे त्यांचे पाेषण हाेते. या बागेत पिकवलेल्या भाज्यांमध्ये अधिक पाेषक तत्त्वे आढळून आली आहेत. या शेतीसाठी सुमारे 18 काेटी रुपये खर्च आला असल्याचे गॅम्बेरिनी सांगतात.
अधिक पौष्टिक फळे
निमोज गार्डन शेतीमध्ये औषधी वनस्पतींसह सॅलड ग्रीन्स, बीन्स आणि स्ट्राॅबेरीसारखी फळेही पिकवली जात आहेत. ही फळे जमिनीवर पिकणाऱ्या फळांच्या तुलनेत अधिक पाैष्टिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे समुद्रतटावरील रहिवाशांना देखील पौष्टिक भाज्या, फुले, फळे उपलब्ध होणार आहेत. बेल्जियम आणि फ्लाेरिडात या शेतीसाठी सिमेन्स डिजिटल इंडस्ट्रीजचे साॅफ्टवेअर वापरण्यात आले आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्याने आता ही संकल्पना आणि तंत्रज्ञान विकण्यातही येत आहे. या तंत्रज्ञानावर आधारित शेती बेल्जियम आणि फ्लाेरिडामध्येही करण्यात येणार आहे. सध्या या सर्व प्रकल्पात खर्च खाली आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
वाढत्या लोकसंख्येला ठरेल आधार
पृथ्वीवरील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत शेत जमीन कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात खाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी समुद्राखालची शेती ही अन्न पुरवठ्यासाठी आधारभूत ठरणार शकते. नवनवीन तंत्रज्ञानामुळे करण्यात येत असलेल्या शेतीमुळे कमी पडत असलेल्या जमिनीची गरज भागून निघणार आहे.