मुंबई : Samudayik Shettale… शेती करतांना पाणी हे सर्वात महत्वाचे साधन आहे. शेतकर्यांची पाण्याची समस्या दूर होवून उत्पादन वाढावे, यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार, शेततळे यासारख्या विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. अशीच एक योजना शासनाने हाती घेतलेली आहे. या योजनेंतर्गत सामुदायिक शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान मिळणार आहे. शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास शेतकर्यांची पाण्याची समस्या दूर होवून उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. चला तर मग जाणून घेवू काय आहे योजना व निकष, कोण घेवू शकतो लाभ.
राज्यातील कोरडवाहू शेतीची जलसंधारणाच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत (पोकरा अंतर्गत) सामुदायिक शेततळ्यासाठी अनुदानाची योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे शेतकर्याचे उत्पादनात वाढ होऊन शेतकर्याचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. शेतकर्यांना पाणी टंचाईच्या काळात पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत जागतिक बँक अर्थसहाय्यित नवीन पाणी साठवण म्हणजेच सामुदायिक शेततळे घटक राबविणे प्रस्तावित केले आहे.
आवश्यक कागदपत्रे कोणती व अर्ज कुठे करावा?
सामुदायिक शेततळे नोंदणीसाठी 7/12 उतारा, 8-अ प्रमाणपत्र आवश्यक असते. तसेच इच्छुक शेतकर्यांनी https://mahapocra.gov.in/ या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येईल.
पात्रता व अटी कोणत्या?
ग्राम कृषि संजीवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी समूह या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असणार आहे. सामुदायिक शेततळे हे दोन किंवा अधिक शेतकरी लाभार्थ्याने करणे आवश्यक असणार आहे.
लाभार्थी समूहाकडे जेवढे क्षेत्र असेल, तेवढ्या क्षेत्रासाठी आवश्यक क्षमतेचे सामुदायिक शेततळ्याचा लाभ त्या संबंधित शेतकरी समूहाला घेता येईल.
सामुदायिक शेततळ्यातील पाणी वापराबद्दल तसेच शेततळ्याच्या जमिनीबद्दल शेतकरी लाभार्थींमध्ये आपसामध्ये सामंजस्याचा करार करणे आवश्यक असणार आहे.
लाभ घेण्यासाठी अर्ज करणारे शेतकरी संयुक्त कुटुंबातील नसावेत, ते वेगवेगळ्या कुटुंबातील असावेत. त्यांचे जमीन धारणेबाबतचे खाते उतारे स्वतंत्र असणे आवश्यक आहेत.
कशी असणार अंमलबजावणीची कार्यपद्धती ?
शेतकरी समूहाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी https://mahapocra.gov.in/ या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. पूर्वसंमती मिळाल्यापासून 60 दिवसाच्या आत काम पूर्णकरून घ्यावे लागेल अन्यथा पूर्वसंमती आपोआप रद्द होईल याची नोंद घ्यावी. तसेच कृषी सहाय्य्क किंवा कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून शेततळे उभारण्याच्या निकषाबद्दल सूचनांचे मार्गदर्शन घेतल्यानंतरच कामाला सुरुवात करायची आहे. लाभार्थी समूहाने स्वतः स्वखर्चाने प्रथम शेततळ्याचे काम मार्गदर्शक सूचना मध्ये दिलेल्या आराखड्याप्रमाणे व तांत्रिक निकषाप्रमाणे प्रकल्पाचे काम पूर्ण करून घ्यावे. तसेच कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
खोदकाम झाल्यावर प्लास्टिक अस्तरीकरण शेततळ्याच्या आतील बाजूने शेतकरी समूहाने करून घ्यावे. सेवा पुरवठा दाराकडे बिलाच्या छायांकित प्रति शेतकर्याने स्वतःची स्वाक्षरी करून साक्षांकित करून अपलोड ऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड कराव्यात. मंजूर आकारमानापेक्षा मोठे शेततळे शेतकर्याने केल्यास त्याच्या खुदाई आणि अस्तरीकरणाचा खर्च त्या शेतकरीला समूहाला स्वतः करावा लागेल. मंजूर आकारमानाचाच खर्च अनुदानित रकमेत देण्यात येईल.