जीवन जगतांना माणसाला अनेक संकटांचा सामना करावा लागत असतो. जीवनात कधी, काय, कशी वेळ येईल हे सांगता येत नाही. एखादे संकट आल्यानंतर कोणी त्याचा नेटाने सामना करतो तर कोणी खचतो. मात्र, जो अशा परिस्थितीचा सामना करतो तो विजयी होतोच हे नक्की. असेच नोकरी गमविण्याचे संकट राजस्थानमधील रसलपुर येथील एका शिक्षकावर कोरोना माहामारीच्या काळात आले. मात्र, या शिक्षकाने हार न मानता शेतीकडे वळले आणि पहिल्याच प्रयत्नात निव्वळ अडीच लाखांचा नफा मिळविला.
राजस्थान राज्यातील अजमेर जिल्ह्यात रसलपूर येथील 41 वर्षीय रजा मोहम्मद हे कोरोना महामारीच्या आगोदरपर्यंत गावातीलच त्यांच्या स्वत:च्या शाळेत मुलांना शिकविण्याचे काम करीत होते. परंतु, कोरोना काळात ती शाळा बंद पडून त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन हिरावले गेले. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी ते रोजगाराच्या शोधात होते. त्यांच्याकडे वडीलोपर्जित दोन बिघे शेती असून त्यात ते ऋतुनूसार पिके घेतात. परंतु, त्यात त्यांना जास्त नफा मिळत नव्हता. यादरम्यान, त्यांना मोतीच्या शेतीविषयी माहिती मिळाली.
किशनगढ येथील मोती उत्पादक नरेंद्र गरवा यांच्या विषयी त्यांना माहिती मिळाली. गरवा यांनी देखील काम बंद पडल्यानंतर मोतीची शेती करायला सुरुवात केली होती. नरेंद्र यांची शेती पाहून रजा इतके प्रभावित झाले की, त्यांनी देखील मोत्याची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादिशेने वाटचाल देखील सुरु केली. एक दिवसाच्या प्रशिक्षणानंतर त्यांनी त्यांच्याच शेतात दहा बाय पंचवीसच्या जागेत एक छोटासा तलाव तयार केला. त्यावर ताडपत्री टाकून मोत्याची शेती करायला सुरुवात केली. त्यासाठी आवश्यक असलेल्या औषधी, अमोनिया मिटर, पीएच मिटर, थर्मामिटर, एंटीबायोटिक्स, माउथ ओपनर, पर्ल न्यूक्लियस यासारखी साधने खरेदी केली. त्यानंतर त्यांनी सीपसाठी अन्न (शेण, यूरिया और सुपरफॉस्फेट पासून शेवाळ) तयार केले.
एका सीपमधून दोन मोती
रजा यांनी त्यांच्या तलावात नक्षिदार मोतीचे न्युक्लियस किमान 1 हजार सीपमध्ये लावले होते. प्रत्येक एक सीप मे न्यूक्लियस टाकून सोडून द्यावे लागते आणि त्याचे अन्न आणि वाढ यावर लक्ष द्यावे लागले. सर्व व्यवस्थित राहीले तर एका सीपमधून दोन मोती मिळतात. मोतीच्या शेतीविषयी बोलतांना रजा मोहम्मद सांगतात की, मोतीचे उत्पादन येण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी लागतो.
शेतीच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी मी 60 ते 70 हजार रुपयांचा खर्च केला होता. यातून अडीच लाखांचा नफा होण्याची आशा असल्याचेही ते सांगतात. त्यांना दिवसातून फक्त एक तास शेतीसाठी खर्च करावा लागतो. जर तुम्ही दुसरे काम करत असाल, तरी देखील तुम्ही मोत्याची शेती करू शकता. दिवसातून एकदा पाण्याचा पीएच आणि अमोनिया यांची पातळी पाहावी लागते. आठवड्यातून एक वेळा सीपची तपासणी करावी लागते. यात पाण्याचा पीएच स्तर 7-8 च्या मध्ये ठेवावा लागतो. प्रत्येक जागेचे तापमान वेगवेगळे असते, त्यामुळे कधी-कधी यामध्ये कमी जास्त वेळ लागू शकतो, असेही ते सांगतात.
थोडक्यात महत्वाचे
कोरोना काळात उत्पन्नाचे साधन हिरावले
मोत्यांच्या शेतीविषयी माहिती मिळाली
किसनगढ येथून प्रशिक्षण घेऊन शेती करायला सुरुवात केली
शेतातच तयार केला तलाव
शेतीतून अडीच लाखांचा नफा
तलावासाठी अतिरिक्त खर्च नाही
रजा सांगतात की, तलावाच्या देखभालीसाठी कोणताच खर्च येत नाही. परंतु, पाण्याची पातळी, सीपचे आरोग्य, शेवाळ याची उपस्थिती आदीची खात्री करावी लागते आणि तत्पर राहावे लागते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला एक वर्षांपर्यंत धीर ठेवावा लागेल. मोती तयार झाल्यानंतर त्याला तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाते. त्यानंतर गुणवत्तेच्या आधारे एका मोतीची किंमत 200 रुपयांपासून ते 1,000 रुपयांपर्यंत मिळते. रजा मोहम्मद हे मोत्याची शेती करुन इतके खुश आहेत की, यावर्षी ते या शेतीत मोठी वाढ करण्याच्या तयारीत आहेत.