ऐश्वर्या सोनवणे –
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. शेती फायदेशीर व शाश्वत होऊ लागली आहे. शेतीचे तंत्र अधिकाधिक समजावून घेतल्याने अनावश्यक खर्च टाळता येऊन शेतीचा विकास घडवून आणता आला. आता शेतीत आधुनिक यंत्राचा वापर करण्याकडे शेतकरी कुटुंबाचा कल देखील वाढला आहे. असेच एका 49 वर्षीय शेतकऱ्याने पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीची कास धरली. आता ते 14 एकर शेतीत फळ व भाजीपाल्याची लागवड करून वर्षाला 10 लाख रुपये नफा कमवत आहे. चला तर जाणून घेऊया या शेतकऱ्याची यशोगाथा..
नांदेड जिल्ह्यामधील बारड गावातील रहिवासी, माधव गणेशराव लोमटे हे गेल्या 25 वर्षापासून वडिलोपार्जित शेती करत आहेत. त्यांच्याकडे एकूण 14 एकर शेती आहे. पारंपरिक पद्धतीने ते काही पिकांची लागवड करत होते. यात ते केळी, ऊस लागवड करत होते. केळी, ऊस हे बारामाही पिक असल्यामुळे हवे तसे उत्पन्न मिळत नव्हते. यामुळे त्यांना रोजच्या जीवनात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. दैनंदिन गरजांना तोंड द्यावे लागत होते. यानंतर माधव यांनी पिकात बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला. माधव यांनी ठरवले की, त्यांना शेती करण्याचा एक नवा मार्ग शोधावा लागेल. तीन ते सहा महिन्यात चांगले उत्पादन मिळवणाऱ्या हंगामी व बिगर हंगामी जसे की, फळपिके व भाजीपाला लागवडीच्या निर्णयावर त्यांनी जास्त भर दिला. शेतामध्ये त्यांनी भाजीपाला उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. तीन ते सहा महिन्याच्या पीक लागवडीची माहिती नसल्यामुळे सुरुवातीला त्यांना थोडे कठीण वाटले, पण त्यांनी हिंमत सोडली नाही. त्यांनी सोप्या पद्धतीने, आपल्या शेतात विविध प्रकारच्या भाज्या- टोमॅटो, मिरची, फळ – पपई, टरबूज, खरबूज आणि इत्यादी अशा पिकांचे उत्पादन घ्यायला सुरू केले.
मित्राकडून घेतला सल्ला
माधव यांना तीन ते सहा महिन्याच्या या लागवडीमधून वेळोवेळी त्यांना चांगले उत्पादन मिळेल अशी खात्रीच नव्हे तर विश्वास होता. माधव यांनी त्यांच्या मित्राकडून चांगला सल्ला घेऊन पीक लागवडीसाठी सुरुवात केली. हळूहळू त्यांनी शेतात टरबूज, खरबूज, टोमॅटो, मिरची, पपई या सगळ्या पिकांची लागवड करायला सुरुवात केली. सोबत केळी व ऊस ही पिके सुद्धा असू दिली. माधव लोमटे हे गेल्या आठ ते दहा वर्षापासून फळ पिके व भाजीपाल्याची लागवड करत आहेत. ते या 14 एकर शेतात वर्षभरामध्ये उन्हाळी आणि हिवाळी हंगामात खरबूज, टरबूज, टोमॅटो, मिरची, अशा पिकांची लागवड करतात.
वार्षिक 10 लाख रुपये नफा
माधव लोमटे हे शेतातुन काढलेला भाजीपाला हा तालुका स्तराला पोहोचवतात. माधव यांनी खरबुजाची दोन ते तीन एकरमध्ये लागवड केली आहे. यातून त्यांना हिवाळ्यात एकरी 12 ते 15 टन तर उन्हाळ्यात एकरी 15 ते 19 टन उत्पादन मिळते. माधव यांना खरबूज लागवडीचा खर्च हा 80 हजार ते 1 लाख एकरी येत असतो, तर खरबुजाचे उत्पन्न हे एकरी 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत येत असते. माधव यांनी मागील वर्षी टोमॅटोची लागवड ही दोन एकरमध्ये केली होती. तसेच टोमॅटोचा खर्च तारकाठी असल्यामुळे हा जास्तीत जास्त एकरी खर्च दीड लाख रुपये येत असतो. टोमॅटोचा खर्च काढून उत्पन्न हे 8 ते 10 लाख रुपयांपर्यंत येते. एकंदरीत 14 एकर शेतीतून माधव लोमटे यांना वार्षिक 12 लाख रुपये उत्पन्न मिळते. यातून शेतीत लागलेला खर्च वजा करून निव्वळ नफा त्यांना 10 लाख रुपये होतो.
संपर्क :-
माधव लोमटे
मो. 9923161248