- डॉ. गोपाल मंजुळकर
वाळलेला चारा, हिरवा चारा आणि पेंड हे घटक जनावरांच्या आहारात खूप महत्त्वाचे आहेत. जर चारा लागवडीचे योग्य नियोजन केले तर हिरवा व वाळलेला चारा जनावरांना वर्षभर उपलब्ध होतो. यामुळे पेंडीवरचा खर्च कमी करता येऊ शकतो. कमी पडणार्या चार्याची पूर्तता करण्यासाठी चार्याचा राखीव साठा करावा. वाळलेला चारा साठवून किंवा मुरघास किंवा त्यावर प्रक्रिया करून वापर करावा, कारण गरजेनुसार हा चारा लगेच वापरता येतो. अशा प्रकारचा गवताचा साठा दुष्काळी प्रदेशासाठी वरदान आहे. गव्हाचे काड, सोयाबीन भुसा यापासून सकस चारा तयार येतो. कमी खर्चात गव्हाच्या काडांवर युरिया प्रक्रिया करून जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरणे शक्य आहे.
चारा प्रक्रियेसाठी साहित्य
* गव्हाचे काड किंवा भुसा - 1 हजार किलो
* युरीया - 8 किलो.
* पाणी - 200 लिटर
* ताडपत्री, स्प्रे.पंप,फावडे
युरीया प्रक्रिया पद्धत
- सर्वप्रथम जवळपास 1 हजार किलो गव्हाचे काड किंवा भुसा गोळा करावा. यानंतर 4 किलो युरिया 200 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थितरीत्या मिसळावा. द्रावण काठीने हलवावे आणि ढवळताना त्यात हात घालू नये.
- सावलीच्या ठिकाणी जमिनीवर ताडपत्री पसरावी. त्यावर 100 किलो गव्हाचे काड पसरावे. त्यावर झारीच्या साह्याने व्यवस्थितरीत्या 20 लिटर युरियाचे द्रावण शिंपडावे. त्यानंतर दुसरा 100 किलो गव्हाच्या काडाचा थर टाकावा. त्यावर पुन्हा 20 लिटर युरियाचे द्रावण झारीने शिंपडावे. त्यानंतर तिसरा, चौथा व पाचवा गव्हाच्या काडाचा थर टाकावा. प्रत्येक थरावर 20 लिटर युरियाचे द्रावण झारीच्या साह्याने शिंपडावेव ते फावडे किवा दाताळे यांनी चांगले मिसळावे.
- यानंतर हे सर्व गव्हाचे काड ताडपत्रीने हवाबंद करून ठेवावे. शक्य झाल्यास स्वच्छ मोठी प्लॅस्टिक बागमध्ये मध्ये हवाबंद करून ठेवावा व 21 दिवसानंतर आवशक्यतेनुसार काढून जनावरांना द्यावा.
- गव्हाचे काड 21 दिवस हवाबंद स्थितीत ठेवावे. 21 दिवसांनंतर ताडपत्री उघडावी. या काळात युरियाचे अमोनियात रूपांतर होते. चारा चांगल्या प्रकारे मुरतो. चार्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढते. ताडपत्री काढल्यानंतर गव्हाच्या काडाचे थर एकमेकांत चांगले मिसळून घ्यावेत. हा ढीग चार तास तसाच ठेवावा. त्यामुळे त्यात तयार झालेला अमोनियाचा वास निघून जाईल. त्यानंतर गरजेनुसार हे काड जनावरांच्या खाद्यासाठी वापरावे.
युरीया प्रक्रियेचे फायदे - गव्हाचा वाळलेल्या काडाच्या प्रथिनांत तिपटीने वाढ होते.
- तंतुमय पदार्थांची पचनीयता वाढते.
- निकृष्ट चार्यापासून सकस व उकृष्ट चारा तयार होतो.
- उन्हाळ्यातील चाराटंचाईवर मात करणे शक्य आहे.
- अतिरिक्त खाद्यावरील खर्च कमी होऊनही जनावरांची जोपासना योग्य होते.
- जनावरांचे कुपोषण टाळता येते. निकृष्ट चारा व वाया जाणारा चारा वापरात आणता येऊ शकतो.
प्रक्रियायुक्त चारा देतानाची काळजी - युरियाचे पाण्यासोबत मिश्रण काळजीपूर्वक एकजीव करावे. कोणत्याही परिस्थितीत युरियाचे प्रमाण अधिक होऊ देऊ नये. (100 लिटर पाण्यात जास्तीत जास्त 4 किलो युरीया मिसळावा.)
- युरीया प्रक्रिया केलेल्या वाळलेल्या काडाचा जनावरांच्या दैनंदिन आहारामध्ये हळूहळू समावेश करावा आणि त्यानंतर प्रमाण वाढवावे.
- सुरवातीला पाव किलो प्रक्रिया केलेले काड जनावरास एकावेळी खाद्य म्हणून द्यावे. त्याच बरोबरीने हिरवी वैरणदेखील द्यावी. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जास्तीत जास्त दीड किलो प्रति दिन हे काड जनावरांना हिरव्या चार्याबरोबरीने द्यावे.
- गव्हाचे काड जनावरांना खाण्यास दिल्यानंतर भरपूर पाणी पाजावे.
- सहा महिन्यांपेक्षा लहान जनावरांना प्रक्रिया केलेले गव्हाचे काड खाद्य म्हणून देऊ नये.
मो.नं.9922431923