कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन या शेतीपूरक व्यवसायातून फारशी चांगली कमाई होत नाही, असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे. पण असे काही नाही. आजची तरुण पिढी शेतीपूरक व्यवसायांकडे वळत आहेत. यामुळे या व्यवसायातून तरुण पिढी चांगली कमाई करत आहे. आज आपण अशा तरुणाविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले. त्यानंतर चांगल्या कंपनीत नोकरी करण्याऐवजी कुक्कुटपालन सुरु केले. एमबीए झालेला हा तरुण कडकनाथ आणि बटेर पालनातून वर्षाला लाखो रुपये कमावत आहे.
कडकनाथ या कोंबड्याने जगभरात आपली खास ओळख निर्माण केली आहे. भारतातील या कोंबड्याच्या व्यवसायाचे मुख्य केंद्र मध्य प्रदेशातील झाबुआ हे आहे. मध्य प्रदेशातील कडकनाथ कोंबडीलाही जीआय टॅग मिळाला आहे. पण, आता हळूहळू देशातील इतर राज्यातील लोक देखील कडकनाथ कोंबडी पालनाकडे वळू लागले आहेत. कडकनाथ कोंबडीची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती पूर्णपणे काळी असते. एवढेच नाही तर तिचे मास आणि रक्त देखील काळे असते. बिहारमधील गया जिल्ह्यातही कडकनाथ कोंबड्या पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. गया जिल्ह्यातील परैया येथील कुमार गौतम या तरुणाने एमबीएचे शिक्षण घेऊन गेल्या 3 वर्षांपासून हा व्यवसाय करत आहे.
कुमार गौतम हे एबीएमधून पदव्युत्तर पदवीधर आहेत. एमबीए चायवाला नंतर सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आलेले MBA कोंबडीवाला म्हणजेच कुमार गौतम हे बिहारच्या गया जिल्ह्यातील परैया बाजार येथील रहिवासी आहे. बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले आहे. सध्या कुमार गौतम हे महमदपूर गावात असलेल्या महमदपूर मिडल स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. एमबीएचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले कुमार गौतम सध्या मुलांना शिकवण्यासोबतच घराजवळ कडकनाथ कोंबड्या, बटेर पक्षी पाळत आहेत. यातून त्यांना वर्षाला लाखो रुपयांचा नफा मिळत आहे.
वर्षाला लाखो रुपयांची कमाई
जेव्हा कडकनाथ कोंबडीला भौगोलिक संकेत (GI) टॅगिंग मिळाले. तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी देखील कडकनाथ कोंबडी पाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोकांमध्ये कोंबडी पाळण्याची प्रथा वाढली. लोक आता कडकनाथ कोंबड्या मोठ्या चवीने खायला लागल्या आहेत. आज गावात कुमार गौतम कडकनाथ कोंबडी 800 रुपये किलो दराने विक्री करत आहेत. गयामध्ये या कोंबडीची किंमत 1000 रुपये किलोवर पोहोचली आहे. त्याचवेळी दिल्ली, मुंबई, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कडकनाथ कोंबडीची किंमत 1800 रुपये किलोवर पोहोचली आहे. ठिकाण बदलले की, कोंबड्यांचे भाव कमी- जास्त होत असतात. याशिवाय कडकनाथ कोंबडीच्या अंड्यालाही मागणी जास्त आहे. गया येथे 35 ते 40 रुपये प्रतिकिलो दराने अंडी विकली जातात. एमबीए झालेला कुमार गौतम कडकनाथ कोंबडीचे पालन करून महिन्याला 20 ते 25 हजार रुपये असून वर्षाला लाखो रुपये कमवत आहेत.
कडकनाथ कोंबड्यांची पिल्ले आणली मध्यप्रदेशातून
कुमार गौतम यांनी मध्य प्रदेशातून 55 रुपयाला एक पिल्लू याप्रमाणे कडकनाथ कोंबडीची पिल्ले आणली. विशेष म्हणजे कडकनाथ 35 ते 40 दिवसात तयार होतो. आणि या कोंबड्याना बाजारात चांगली मागणी असून यांची चांगल्या दराने विक्री होते. त्याचप्रमाणे लहान पक्षी (तीतर) अंड्यांसोबत विकली जातात. एक लहान पक्षी 40 ते 45 रुपये दराने उपलब्ध असून, ते 45 दिवसांत तयार होते. ते तयार झाल्यानंतर त्याची विक्री केली जाते. कुमार गौतम सांगतात की, 1995 मध्ये गया जिल्ह्यातील परैया ब्लॉक नक्षल दहशतीच्या छायेत होता. त्यांच्या भीतीने अनेक गावकरी गाव सोडून गेले आणि जे राहिले ते राहिले. त्यांनी शेतीशिवाय दुसरा कोणताही व्यवसाय केला नाही. मात्र, 1997 नंतर येथील परिस्थिती बदलली. येथे राहणारे स्थानिक लोक शेतीशिवाय इतर विविध प्रकारचे व्यवसाय करू लागले. याचा त्यांना चांगला फायदाही होत आहे.