मुंबई : Pik Karj Breaking… शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना सिबिल स्कोरची अट लागू राहणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांकडून तसेच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वारंवार शासनाकडे पीक कर्जासाठी असलेली सिबिलची अट रद्द केली जावी या संदर्भात मागणी केली जात होती.
विशेष म्हणजे शासनाने या संदर्भात शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी हमी देखील दिली होती. मात्र शासनाने हमी दिल्यानंतरही अनेक बँका शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिल विचारत घेत होते. मात्र आता सहकार आयुक्तांकडून एक मोठा आदेश निर्गमित झाला आहे. पीक कर्ज घेण्यासाठीच्या जाचक अटीतून आता शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे.
सिबिल अट संदर्भात अनिल कवडे यांनी राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीला पाठवले पत्र
यापुढे कोणतीच बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिलची अट लावणार नाही. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पाठवलेल्या एका पत्रात तत्सम आदेश दिले आहेत. या पत्रात नमूद केल आहे की, “पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांनी ‘सिबिल’ अथवा ‘सिबिल स्कोअर’चे बंधन घालू नये. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशात त्यासंबंधीचे कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांनी सिबिल स्कोअरची अट न लावता शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे, असे पत्र सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीला पाठवले आहे.
निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यात तीळमात्र देखील शंका नाही. वास्तविकता शेती हा सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. जर निसर्गाची कृपादृष्टी शेतकऱ्यांवर कायम राहिली वेळेवर पाऊस झाला, अतिवृष्टी झाली नाही, गारपीट झाली नाही, दुष्काळ पडला नाही, तर शेतीतून चांगली कमाई शेतकऱ्यांना होत असते. यामुळे शेतकरी स्वतःचे पोट भरू शकतो आणि पुढील हंगामासाठी पीक पेरणी हेतू पैशांची सोय देखील करू शकतो. शेतकरी बांधवांना कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, कधी ढगाळ हवामान, कधी भीषण दुष्काळ यांसारख्या परिस्थितींचा मोठा फटका बसतो.
आता सिबिलमधून शेतकऱ्यांची मुक्तता होणार
शेतकरी पीक कर्ज घेतात आणि त्या पीक कर्जातून शेतात पेरणी केली जाते आणि या पिकातून आलेल्या पैशांमधून ते पिक कर्जाची परतफेड करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकाला बँकेत तारण ठेवलेलं असतं. त्यामुळे पीक कर्जाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीची गॅरंटी लागत नाही. तरी देखील बॅंका शेतकऱ्याचे सिबिल पाहूनच त्यांना कर्ज देत असत. दरम्यान, पिक चांगले आले नाही तर कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांचे सिबिल खराब होते आणि त्यांना बँकेतून कर्ज मिळत नाही. परंतु, आता या सिबिलमधून शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे.
सीबिल म्हणजे नेमकं काय?
सिबिल, म्हणजे ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड ही खाजगी कंपनी सिबिलचा स्कोर तयार करत असते. त्यानुसार बँका पीक कर्ज व इतर कर्ज वितरण करण्यापूर्वी कर्जदारांचे सिबिल तपासतात. सिबीलचा स्कोर व्यवस्थित असला तरच त्या कर्जदारास कर्ज पुरवठा करण्यास संमती दिल्या जातात. अन्यथा सिबिलचा स्कोर व्यवस्थित नसल्याचे कारण पुढे करून त्या कर्जदाराचे कर्ज मागणी अर्ज रद्द करण्यात येतो.
असा गणला जातो सिबिल स्कोर
सिबिल स्कोर हा 300 ते 900 मध्ये गणला जातो. सिबिल स्कोर क्रेडिट हिस्टरीची माहिती दर्शवतो. 300 स्कोर हा अतिशय कमी मानला जातो तर 900 स्कोर असेल तर तो चांगला गणला जातो. 900 स्कोअर असलेले ग्राहक कर्जाची परतफेड करू शकतात असे मानले जाते. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना वेगवेगळ्या बँकांचे नो ड्युज घेतले जाते. याचा अर्थ की, शेतकऱ्यांनी केवळ एकाच बँकेतून कर्ज घ्यावे असा उद्देश या बँक व्यवस्थेचा असतो. परंतु, शेतकऱ्याकडे नेमक्या कोणत्या बँकांचे पूर्वीचे कर्ज आहे अथवा त्या शेतकऱ्याकडे थकीत कर्जाची माहिती बघण्यासाठीच बँका प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या सिबिलची माहिती घेत असतात.