परभणी : काळानुरूप बदलले पाहिजे, हा निसर्गाचा नियम आहे. हा नियम सर्व क्षेत्रांना लागू होतो, अगदी कृषी क्षेत्राला देखील. ज्यांनी बदल स्वीकारला त्यांच्या आयुष्यात बदल झाल्याशिवाय राहत नाही. त्याचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास परभणी जिल्ह्यातील संदलापूर येथील प्रयोगशील शेतकरी विठ्ठल काकडे यांचे देता येईल. काकडे यांनी जे विकते ते पिकविण्याशिवाय पर्याय नसल्याचे समजून घेत व पारंपरिक शेतीला फाटा देत पीक पद्धतीत बदल केला. या बदलाने त्यांच्या आयुष्यात देखील बदल घडवून आणला आहे. आज ते भाजीपाला व मिश्र शेती पद्धतीतून पाच लाखांहून अधिक नफा कमावत आहेत.
विठ्ठल गणेशराव काकडे हे परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील संदलापूर येथील रहिवासी आहेत. शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. त्यांच्याकडे अडीच एकर शेतजमीन असून त्यावर ते पारंपरिक शेती करीत होते. मात्र, यातून त्यांना नफा कमी आणि तोटाच अधिक सहन करावा लागत होता. काकडे यांनी कृषी प्रदर्शन, कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन तसेच कृषी विभागाशी संपर्क साधून नवनवीन माहिती जाणून घेतली. या सर्वांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी शेतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात ते यशस्वी देखील झाले आहेत.
सिंचनाची केली सोय
शेतीत बदल करायचा म्हटल्यावर सर्वात आधी सिंचनाची सोय होणे गरजेचे असल्याने काकडे यांनी सर्वात आधी सिंचनाची सोय करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला. या योजनेतून त्यांना सौर कृषी पंप मिळाला. यामुळे लोडशेडींगपासून सुटका होवून शाश्वत सिंचनाची सोय झाली.
पिकांची गुणवत्ता व अधिक उत्पादनासाठी कृषिसम्राटचे रिवार्ड | Reword |
पारंपरिक पीक पद्धतीला फाटा
सिंचनाची सोय झाल्यानंतर काकडे यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे ठरविले. त्यांनी जे विकते, तेच पिकविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी आपल्या शेतात कारले, दोडके, टोमॅटो, कोबी, कांदा, लसूण अशा प्रकारचा भाजीपाला पिकाची लागवड केली. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळवता येईल याबरोबरच रासायनिक खतांचा कमीत-कमी वापर व्हावा, याकडे ते विशेष लक्ष देत असतात.
मिश्र दुहेरी पीक
काकडे यांनी भाजीपाला लागवडीतून आतापर्यंत पाच लाखांहून अधिक नफा कमावला आहे. यात कारले पिकातून एक लाख 12 हजार रुपये, दोडके पिकातून दीड लाख तर टोमॅटो पिकातून दीड लाख खर्च वगळता अडीच लाख रुपयांचे निव्वळ नफा मिळाला. सध्या त्यांनी त्यांच्या दीड एकर शेतात कारले लागवड केली असून, वांग्यामध्ये कोबी तर कांद्यामध्ये मिरची लागवड करुन मिश्र दुहेरी पीक घेतले आहे.
स्वत: विक्री करतात शेतमाल
काकडे यांना यावर्षी एकरी 200 कट्टा कांद्याचे उत्पादन अपेक्षित असून ते कांद्याची व्यापार्याकडे विक्री न करता स्वत: खेडोपाडी जाऊन कांदे विक्री करतात. या कांदा विक्रीतून चांगला नफा मिळत असल्याचेही काकडे सांगतात. शेतकर्यांनी उत्पन्नात वाढ करण्यासाठी पारंपरिक शेतीला पूरक अशी फळबाग, भाजीपाला यासह नफा मिळवून देणारी आधुनिक शेती करावी. शेतीमध्ये नवनवीन प्रयोगांचा अवलंब करावा, असेही ते सांगतात.
मार्गदर्शनाला प्रयोगाची जोड
काकडे यांनी शेती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे पूर्णा तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. ते दरवर्षी त्यांच्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. यासोबतच कृषी विभागाच्या विविध योजनांचा देखील ते लाभ असतात. कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सवाला भेटी देणे, कृषी विषयक विविध कार्यशाळांमध्ये सहभागी होत असतात. कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे ते नेहमी मार्गदर्शन घेत असतात. कृषी विभागाकडूनही वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन लाभत असल्याचे काकडे सांगतात.