ऐश्वर्या सोनवणे
एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन : उन्हाळी कांद्याची लागवड योग्य पद्धतीने केली तर अधिक उत्पादन मिळवता येईल आणि नफा देखील चांगला मिळवता येईल. जास्त तर कांद्याची लागवड ही उन्हाळा लागण्याच्या आधी किंवा उन्हाळा लागल्यानंतर केली जाते.
पाणी व्यवस्थापन
कोणतेही पीक घ्यायचे असल्यास पाणी व्यवस्थापनाचा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. तसचे कांदा पिकाला नियमित पाणी दिले पाहिजे, विशेषत मार्च, एप्रिल महिन्यात जेव्हा उन्हाची तीव्रता वाढते. उन्हाळी, रब्बी हंगामात कांद्याला 6 ते 8 दिवसात पाणी द्यावे लागते. तर खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाणी दिले गेले पाहिजे, जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.
खत व्यवस्थापन
नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे योग्य प्रमाणात खतांची फवारणी करावी. सामान्यत 50 किलो नायट्रोजन वापरावे, 25 किलो फॉस्फरस आणि 25 किलो पोटॅशियम प्रति एकर लागवडीसाठी वापरावे. सेंद्रिय खतांचा वापर देखील पिकाच्या वाढीसाठी चांगला आहे. यामुळे मातीचा pH सुधारतो आणि पिकाला आवश्यक पोषण मिळते.
तणनाशक
रोपे लागवडीपूर्वी कोरड्या वाफ्यात 15 मि.ली. ऑक्सिफ्लोरफेन किंवा पेंडीमिथॅलीन 30 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तणनाशक फवारणीसाठी विशिष्ट प्रकारच्या नोझलचा वापर करणे गरजेचे आहे. फवारणीनंतर लगेच पाणी देऊन लागवड करावी. लागवडीनंतरसुद्धा 2 ते 3 दिवसांत ओल्या वाफ्यात किंवा लागवडीनंतर 8 ते 10 दिवसापर्यंत तणनाशकाची फवारणी करता येते.
कांदा काढणी व नफा
कांद्याची काढणी ही जून- जुलै व ऑगस्टमध्ये देखील केली जाते. कांद्याची काढणी केली जात असताना, कांद्याच्या शेंड्या पिवळ्या होतात आणि कांदा कडक होतो. कांद्याचे पिक माना पडू लागल्याबरोबर काढण्यापूर्वी 15 ते 20 दिवस आधी पाणी देणे बंद करावे. त्यामुळे कांदा परीपक्व होण्यास मदत मिळते. कांदे घट्ट होतात, वरचा पापुद्रा सुकून कांद्याला काढणीच्या वेळेस इजा होत नाही. साठवणूकीचा विचार करत योग्य जातीची निवड करणे आवश्यक आहे. चांगली सुकवणीकरून शिफारस केलेल्या चाळीत कांदा साठवावा. कांदा पिकातून एकरी उत्पादन 150 ते 200 क्विंटल मिळते. त्यामुळे कांदा पिकाचा नफाही जास्त होतो.