मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) देशभरातील दीर्घ कालावधीची पावसाची सरासरी (Average RainFall) काल, 27 जून रोजी जाहीर केली. जून महिन्यातील 1 ते 27 जून या कालावधीतील पावसाची ही आकडेवारी आहे. त्यानुसार, यापूर्वी जाहीर केलेल्या 1 ते 15 जून या मान्सूनच्या पहिल्या दोन आठवड्यातील सरासरीपेक्षा देशभरातील पाऊसमान चांगलेच सुधारले आहे. मान्सून नव्याने सक्रीय झाल्यानंतर, गेल्या 3-4 दिवसात देशभर होत असलेल्या दमदार पावसाने ही सरासरी स्थिती सुधारली आहे. मात्र, नाशिकसह उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अजूनही पावसाची मोठी तूट असल्याचे दिसून येत आहे.
भारतातील चालू मान्सून हंगामाच्या पावसात सुधारणा झाल्याचे “आयएमडी”ने म्हटले आहे. 1 ते 27 जून 2023 या कालावधीसाठी संपूर्ण भारतातील पावसात सरासरी 19% तूट दिसत आहे. 1 जून ते 15 जून 2023 या कालावधीसाठी ही तूट तब्बल 51% इतकी होती. याचाच अर्थ, 3-4 दिवसातील पावसाने देशभरातील तूट 30 टक्क्यांनी कमी केली आहे.
महाराष्ट्राच्या निम्म्या भागात पेरणीसाठी आवश्यक पुरेसा पाऊस नाही
एकीकडे कोकण, मुंबई ठाण्यासह विदर्भात आणि देशभर जोरदार पाऊस होत आहे. मात्र, महाराष्ट्राच्या निम्म्या भागात पेरणीसाठी आवश्यक पुरेसा पाऊस नाही, असे दुर्दैवी चित्र अजूनही दिसत आहे. पेरणीसाठी त्या भागात किमान 75 ते 100 मिलिमीटर पाऊस होणे गरजेचे आहे. मराठवाड्यात 1 ते 15 जून या कालावधीत पावसाची पावसाची तूट 88 टक्के होती. 1 ते 27 जूनच्या कालावधीत ती अजूनही 80 टक्के इतकी आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रात पावसाची 80 टक्के असलेली तूट अजूनही 70 टक्क्यांवर आली आहे. विदर्भात मात्र पावसाची तूट 86% वरून 52 टक्क्यांवर आली आहे. या बातमीसोबतचे 1 ते 15 जॉईन आणि 1 ते 27 जून या कालावधीतील दोन्ही छायाचित्रे पाहिल्यास आपल्याला बदललेले पाऊसमान लक्षात येईल. उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर पाऊस अजूनही रुसलेला असल्याचेही त्यातून दिसेल. आता आजपासून येत्या 2-4 दिवसात या तहानलेल्या भागातही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
(छायाचित्रातील पिवळा भाग म्हणजे पावसाची 60 टक्क्यांहून अधिक मोठी तूट असलेला प्रदेश. लाल भागात पावसाची तूट 29 ते 59% इतकी आहे. हिरव्या भागात सरासरीइतका पाऊस आहे. निळ्या भागात सरासरीपेक्षा 20 ते 59 टक्के अधिक पाऊस आहे. गडद हिरव्या भागात नियमित सरासरीच्या 60 टक्क्यांहून अधिक पाऊस झालेला आहे.)
पुणे साताऱ्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज दुपारी चांगल्या पावसाची शक्यता
आज, बुधवार, 28 जून रोजी दुपारी 12.30 वाजेच्या नवीनतम उपग्रह छायाचित्रात दिसल्याप्रमाणे अरबी समुद्रानजीकच्या पश्चिम किनारपट्टी प्रदेशातील मान्सूनच्या जोरदार वाऱ्यांचा मजबूत प्रवाह महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही पोहोचताना दिसत आहे. त्यामुळे आज दुपारी गोव्यासह कोकण, मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेचे प्रमुख हवामान शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी म्हटले आहे. याशिवाय, पुणे, साताऱ्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्रातही काही भागांमध्ये दमदार पाऊस होऊ शकेल. तूर्तास उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी चांगल्या पावसाची चिन्हे दिसत आहेत. उर्वरित भागात आकाश ढगाळ राहील.
मान्सून सक्रियच; पालघर, ठाणे, मुंबईसह कोकणात पुढील 2-3 तास अतिमुसळधार इशारा
“आयएमडी”चे प्रादेशिक प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी सध्या राज्यात मान्सून जोरदाररित्या सक्रियच असल्याचे सांगितले. आज यापुढील 2-4 तास म्हणजे साधारणतः 4-5 वाजेपर्यंत पालघर, ठाणे, मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार, मुंबईसह ठाणे,पालघर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील तीन चार तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील घाट भागातील तसेच कोकणातील पाऊस कमी होण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काम असल्याशिवाय या पावसाचा इशारा असलेल्या भागात जाणे टाळावे, असे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.
विदर्भात ऑरेंज, नाशिकला यलो अलर्ट
आज पुणे-मुंबईसह सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, जिल्ह्याला ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्धा, अमरावती,अकोला, नांदेड, जालना, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांना आज यलो अलर्ट दिला गेला आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
“आयएमडी”चा मंगळवारचा ऑरेंज अलर्ट का फसला?
“आयएमडी”ने पालघर, ठाण्यासह मुंबईत काल, मंगळवारसाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. मात्र, प्रत्यक्षात काल दिवसभरात या भागात फारसा पाऊसच झाला नाही. सकाळी तर मस्त ऊन पडले होते. त्यामुळे हवामान खात्याची सोशल मीडियात चांगलीच खिल्ली उडविण्यात आली. हवामान विभागाने मात्र हा अलर्ट योग्यच असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. बंगालच्या उपसागरातील प्रणालीने छत्तीसगड व लगतच्या प्रदेशात निर्माण केलेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम आणि वायव्य दिशेने प्रवास करण्याची शक्यता होती. त्यातून मोठी दुर्घटना घडू नये आणि जनतेने सावध राहावे, या हेतूने हा इशारा दिल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. छत्तीसगड व लगतच्या भागातील हा कमी दाबाचा पट्टा आता अधिक तीव्र झाला आहे, असे “आयएमडी”ने जाहीर केले आहे. येत्या दोन दिवसात हा कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशच्या वायव्येकडे सरकणार आहे. त्यामुळेच आज राज्यातील रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिकमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघरसह मुंबई-ठाण्यातही हा इशारा आहे. याशिवाय, राज्यातील घाट भागात व लगतच्या परिसरात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.