- बारमाही भाजीपाला पीकवणारे युवा शेतकरी.
- वांगे भरीत विक्रीतून होतेय अधिकची कमाई.
- उपवासाच्या राजगीराचे चांगले उत्पादन.
- मिश्र पिकांची अनोखी शेती
मिश्र पिकांची अनोखी शेती
पडिंत थोरातांचे आवश्यकनुसार शेतमाल उत्पादन
कापूस, सोयाबीन या मुख्य पिकासह पालक, मेथी, कोथंबीर, भेंडी, वांगी, मुळा, वाल, गाजर, कांदा, काशीफळ, डांगर, पडवळ, दोडके आणि विशेष म्हणजे राजगीरा आणि झेंडू या सर्वच पिकांचे खानापूर (ता.जि. परभणी) येथील पंडित थोरात हे उत्पादन घेतात. आता तर त्यांना जळगावच्या प्रसिद्ध भरीत वांग्याचे आणि भरीताचे उत्पादन सुरू केले आहे. सर्वच शेतमालाची ते स्वतः विक्री करत असल्याने दोन पैसे त्यांना अधिकचे मिळतात. यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सहज चालतो आहे.
परभणी शहराला लागूनच पूर्व दिशेस खानापूर गाव आहे. या गावातच दहावी पर्यंत शिक्षण घेतलेले शेतकरी पंडित नथुराम थोरात यांची वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. इतर एका शेतकर्याची तीन एकर शेती ते प्रती एकर दहा हजार रुपये ठोक्याने घेवून कसत असतात.यापैकी प्रत्येकी 2 एकर सोयाबीन, कापूस व 2 एकारवर बारमाही राहील अशा सर्वच वाणाच्या भाजीपाल्याची लागवड करतात. भाजीपाल्याचे उत्पादन हे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनेच घेतात. शेतात एक विहिर आणि एक बोअरवेल सिंचनासाठी आहे. त्यास बर्यापैकी पाणी आहे. भाजीपाला पिकासाठी थोरात यांना वनामकृ विद्यापिठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ.यु.न.आळसे,प्रा.डॉ.डी.डी.पटाईत आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे,प्रभाकर बनसोडे, के.एम.जाधव यांचे मार्गदर्शन मिळते.यंदा त्यांनी जळगाव भरीत वांगे लागवड करून त्यापासून भरीत निर्मिती सुरू केली आहे.विक्रीसाठी सोशियल मिडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे.मागणीप्रमाणे भरीत व सोबत बाजरी व ज्वारीची भाकरी हा मेनू डब्यात पॅकिंग करुन इच्छूक ग्राहकांना घरपोच सेवा देत आहेत. वांग्याच्या विक्री बरोबरच भरीत विक्रीतून दोन पैसे अधिकचे मिळत आहेत.
थोरातांची पीक पद्धती
पंडित थोरात हे खरीप हंगामात 2 एकर सोयाबीन आणि 2 एकर कापसाची लागवड करतात. उर्वरित 2 एकरात पालक, मेथी, कोथंबीर, भेंडी, गॅलनचे काळे वांगे, स्थानीक गावरान वांगे, मुळा, वाल, गाजर, कांदा, काशीफळ, डांगर, पडवळ, दोडके असे सर्वच भाजीपाल्याचे बाराही महिने बदल पद्धतीने पिकवतात. दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर महत्व असणारे झेंडू फूलांची देखील लागवड करतात. खरीप हंगामात 2 एकरा सरासरी 20 क्विंट्टल कापसाचे उत्पादन घेतात. अलिकडच्या काळात बोंडअळीच्या प्रार्दूभावामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. दोन एकरात सोयाबीनचे त्यांना 12 क्विंट्टल उत्पादन होते.
भरीताचे वांगे उत्पादन
स्थानिक गावरान व गॅलनच्या काळ्या वांग्या बरोबरच ते स्वादिष्ट चवदार भरीतासाठी प्रसिद्ध असलेले जळगाव वांग्याची देखील वर्ष 2016 पासून लागवड करीत आहेत. पहिल्या साली दोनच ओळी लावल्या होत्या. उत्पादन अनुभव चांगला आल्याने वर्ष 2017 ला 10 गुंठ्ठे आणि यावर्षी अर्धा एकरात वांगी लागवड केली आहे. जमिनीची चांगली मशागत केल्यावर जळगाव येथून कुरीयरने वांग्याचे बियाणे मागवून वाफ्यात रोपे तयार करून घेतले. यानंतर जमिनीत दोन क्विंट्टल गांडूळ खत टाकून 4 बाय दीड फूटाचे सरी वरंबे तयार केले. वरंब्याच्या पोटाला दीड फूट अंतरावर 2 जूलै 2018 रोजी रोपाची लागवड केली. रोग पडू नाही म्हणून प्लॉटच्या चारी बाजूने मका लावली. वाफसा प्रमाणे पाणी पाळ्या देण्यात येतात. लागवडी पासून तीन महिन्याला फळ धारणा होवून तोडणीस आले. आतापर्यंत 8 क्विंट्टल सलग वांग्याची प्रती किलो 30 रुपये प्रमाणे विक्री करण्यात आली असून त्यातून 30 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.
रुचकर भरीत निर्मिती
गत एक महिन्यापासून वांगे चुलीवर खाद्य तेल लावून भाजून भरीत तयार केले जात आहे. चुलीवर कढईत तेल गरम करुन हे भरीत भाजले जाते. त्यात ठेचा, जिरे, मीठ, आले, लसून, कांदा, कोथंबीर, खोबरं, शेंगदाणे, कांदे पात असे विविध पदार्थ टाकून रुचकर भरीत तयार होते. सोबत मागणीप्रमाणे बाजरी व ज्वारीची भाकरी देखील दिली जाते. मागणीनुसार ग्राहकांना भरीत डब्बा 60 रुपये आणि भाकरी 10 रुपये याप्रमाणे घरपोच पोहचवले जाते. भरीत विक्रीतून दोन पैसे अधिकचे मिळू लागले आहेत. परभणी शहरात नोकरी निमित्ताने वास्तव्यास खान्देशातील बरेच नागरिक राहतात. त्यांच्या बरोबरच स्थानिकाकडूनही ऑर्डर मिळू लागल्या आहेत. आजतागायत 50 भरीत डब्बे विक्री झाले आहेत. त्यातून 8 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. अजून ते पुढे चालूच राहणार आहे.
लसूण उत्पादन
वर्ष 2015 ला त्यांनी आपल्या शेतीत 30 गुंठ्ठे जमिनीची ऑक्टोबर महिन्यात नांगरटी करून चांगली मशागत करुन घेतली. नांगरणी झाल्यावर शंभर किलो गांडूळ खत शिंपून कुळवाची पाळी दिली. यानंतर 120 किलो गावरान लसून बेणे खरेदी करून ते 1 नोव्हेंबर रोजी समप्रमाणात जमिनीवर टाकून पून्हा वखर पाळी मारून बेणे मातीत बूजवले. यानंतर 5 बाय 5 फूटावर पट्टे तयार केले. पंधरा दिवस आड करून तीन महिन्यात 6 पाणी देण्यात आले. लसनावर कोणताही रोग येवू नये म्हणून 30 गुंठ्ठे क्षेत्राच्या चोहूबाजू किनार्यावर दोन तास मका पेरली. मक्यामुळे रसशोषक व इतर किडींचा प्रार्दूभाव मुख्य पिकावर होत नाही, असा त्यांचा अनुभव आहे. त्यासाली त्यांना 30 गुंठ्ठे जमीनीत 8 क्विंट्टल गावरान लसूनाचे उत्पादन झाले. गावरान असल्याने त्यास 120 रुपये प्रती किलो दर मिळाला. 8 क्वि ंटल लसून विक्रीतून 96 हजार रुपये उत्पन्न झाले. त्यातून गांडूळ खत 1 हजार 600 रुपये, बेणे 14 हजार 400 रुपये असा एकूण 16 हजार रुपये एकूण खर्च वजा जाता 80 हजार रुपये उत्पन्न मिळाले. यामुळे 2015 पासून लसनाचे उत्पादन घेत आहेत.
भोपळ्याचे उत्पादन
गावरान लसून या मसाला पिका बरोबरच ते वर्ष 2016 पासून भोपळा (काशीफळ) पिकाचीही लागवड करून सातत्याने उत्पादन घेतात. वर्ष 2016 ला त्यांनी महिको पमकिन वाणाच्या भोपळ्याची अर्धा एकरात लागवड केली. जमिनीची मशागत करून त्यात दोन ट्रॉल्या शेणखत विकत आणून मिसळवले आणि 5 बाय दीड फूट अंतरावर बेड तयार करून त्यावर कमी खर्चाचे साधे ठिबक सिंचन के ले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरुन 25 एप्रिल रोजी लागवड केली होती. किडरोगाच्या नियंत्रणासाठी बाजूने मका लावली. वेलींना दररोज सायंकाळी 10 मिनिटे ठिबकने पाणी सोडण्यात आले. रोपे उगवणीनंतर साडेतीन महिन्याला फळे परिपक्व होवून काढणीस आली. अर्ध्या एकरात 40 क्विंट्टल उत्पादन झाले. त्यास प्रति किलो 40 रुपये दर मिळाला. फळे विक्रीतून 1 लाख 60 साठ हजार रुपये उत्पन्न आले. त्यातून बियाणे खरेदी 540 रुपये, शेणखत 6 हजार रुपये, ठिबक 8 हजार 400 रुपये, 4 हजार रुपये मल्चिंग पेपर असा एकूण 18 हजार 940 रुपये उत्पादन खर्च वगळता 1 लाख 41 रुपये नफा मिळाला.
दोडके, डांगर उत्पादन
थोरात यांनी गत वर्षी 20 मार्च 2018 ला 10 गुंठ्ठे जमिनीत महिको सिडस् कंपनीच्या दोडके पिकाची देखील लागवड केली होती. त्यांना दोडक्याचे 4 क्विंट्टल उत्पादन झाले. प्रती किलोस 40 रुपये दर मिळाला. विक्रीतून 16 हजार रुपये आले, तर बियाणे खते आदी उत्पादन खर्च 3 हजार रु वजा जाता 13 हजार रुपये उत्पन्न मिळाले. महालक्ष्मी सणाला डांगर फळ पुजनास लागत असते. गत काही वर्षांपासून खरिपात 15 ते 20 गुंठ्यात डांगराची लागवड करीत आहेत. पिकावर रोग येवू नये यासाठी काठावर मका, अंबाडी, एरंडाची लागवड करतात. डांगराचे 5 ते 6 क्विंट्टल उत्पादन होते. 30 रुपये किलो प्रमाणे विक्री करतात.
दसरा, दिवाळीत झेंडू
बारमाही भाजीपाला पिकाबरोबरच सणाचे औचित्य साधत बाजारात कधी काय विकते, याचा अंदाज घेऊन थोरात उत्पादन घेतात. याच अनुषंगाने ते झेंडूची लागवड करून दसरा दिवाळीत फुलांची विक्री करतात. दरवर्षी आपल्या शेतीत ते कधी 10, तर कधी 20 गुंठ्ठे झेंडूची लागवड करतात. त्यापैकी काही दसरा सणास तर काही दिवाळीत तोडणीस यावेत या फरकाने झेंडूची लागवड करतात.
उपवासासाठी राजगीरा उत्पादन
गत तीन वर्षांपासून ते उपवासाचा राजगीरा पीक देखील घेत आहेत. गत वर्षी त्यांनी फूले कार्तिकी वाणाच्या राजगीरा वाणाची 33 गुंठ्ठे क्षेत्रात पेरणी केली होती. त्यातून त्यांना 5 क्विंट्टल उत्पादन झाले होते. कमीत कमी 60 ते 80 रुपये किलो प्रमाणे विक्री केली. यातून 30 हजार रुपये आले आणि खर्च 9 हजार रुपये जाता 21 हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. यंदा रब्बी हंगाम 2018-19 मध्ये 1 एकरावर राजगीराची पेरणी करण्यात आली होती. यासाठी जमीनीची मशागत केल्यावर 4 क्विंट्टल गांडूळ खत टाकले. एक क्विंटल खतात 2 किलो राजगिरा बियाणे समप्रमणात मिसळवून ते जमिनीवर शिंपून दिले. या नंतर 5 बाय 6 फूटाच्या पट्ट्या पाडून दांड पाडले. दर 15 दिवसाआड साडेतीन महिने पाणी देण्यात आले. आता हे पीक कापणी करून मळणी करण्यात आले आहे. 7 क्विंट्टल उत्पादन झाले असून त्याची 80 ते 100 रुपये प्रती किलो प्रमाणे कृषी विद्यापीठ गेटसमोर आणि आठवडी बाजार विक्री करण्यात येत आहे. शिवाय त्याचे दळून पीठही विकण्यात येणार आहे. यातून उत्पादन खर्च जाता 50 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
भाजीपाला विक्री व्यवस्थापन
पंडित थोरात हे आपल्या शेतीत उत्पादित केलेला सर्वच भाजीपाला दररोज सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत कृषी विद्यापिठाच्या गेटसमोर व आठवडी बाजारात बसून स्वतः विक्री करतात. त्यामुळे अधिक चा भाव मिळतो. तसेच त्यांच्याकडे दर्जेदार विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला मिळतो म्हणून ग्राहकांचे अन् त्यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. थोरात कुटुंबीय पिकाच्या लागवडी पासून उत्पादन ते विक्रीपश्चात सर्वच बाबीवर दररोज विचार व सल्लामसलत करतात. शेतीची कामे एक दिलाने केली जातात. शेतीकामात त्यांची आई प्रयागबाई, पत्नी अर्चना पंडीत यांची मोलाची साथ मिळते.
प्रतिक्रिया
शेतकर्यांनी स्वतः शेतमाल विकावा
ज्यांच्याकडे थोडेफार पाणी आहे, अशा शेतकर्यांनी भाजीपाल्याची लागवड केली पाहिजे. यामुळे दररोज पैसा मिळून रोजचा उदर्निवाह भागतो. तरुणांनी व्यसनाधीन न बनता शेतीत केल्यास शेती नक्की साथ देत, हा माझा अनुभव आहे. आपण कष्टाने पिकवलेला भाजीपाला किंवा धान्य स्वतः बसून विकले तर दोन पैसे अधिकचे मिळतात. पंडित थोरात
रा. खानापूर, ता.जि.परभणी.
मो.नं. 8087944361