तमाम भारतीयांसाठी एक आनंदाची अन् दिलासादायक बातमी आली आहे. आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन क्लायमेट सेंटरने (APEC) भारतासाठी पहिला मान्सून अहवाल प्रसिद्ध केला आहे. एपीएसीच्या अंदाजानुसार, ला-नीना स्थिती परत आल्याने यंदा मान्सूनच्या काळात भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये कमकुवत आणि असमान मान्सूननंतर, हा अंदाज खूपच आशादायक दिसत आहे.
दरवर्षी भारतीय हवामान खात्याकडून (आयएमडी) एप्रिलमध्ये मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर होतो. त्यात महिनानिहाय पावसाचे सरासरी अनुमान सांगितले जाते. साधारणत: याच सुमारास स्कायमेटसारख्या खासगी हवामान संस्थाही मान्सूनचा अंदाज वर्तवत असतात. यंदा, त्यापूर्वीच आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन क्लायमेट सेंटरचा हा मान्सून अंदाज आला आहे. यात “ला-नीना”मुळे भारतात सामान्य सरासरीपेक्षा जास्त असा मान्सूनचा मुबलक पाऊस सूचित केला आहे. “आयएमडी”च्या पहिल्या अंदाजातून अधिक तपशील मिळू शकतील.
दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा 100 टक्क्यांहून अधिक पाऊस
एपीएसी क्लायमेट सेंटरचा अहवाल म्हणजे 2024 च्या एप्रिल-सप्टेंबर कालावधीसाठीचा जागतिक अंदाज आहे. त्यानुसार, भारतासाठी 1 जून रोजी सुरू होणाऱ्या मान्सूनमध्ये सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. एपीएसीच्या अहवालावर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी अनुकूल मत दर्शविले आहे. यंदा मान्सूनदरम्यान भारतातील पाऊस हा दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 100 टक्क्यांहून अधिक असेल, असे या सूत्रांनी वैयक्तिकरित्या सांगितले. “आयएमडी”चा अधिकृत अंदाज लवकरच येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ला-निना स्थितीमुळे नेमके होणार काय?
एल निनो-सदर्न ऑसिलेशन (ENSO) ॲलर्ट सिस्टम अपडेटवर आधारित एपीएसीचा अहवाल आहे. त्यानुसार, यंदा भारतात एल-निनो ते ला-निना संक्रमण दिसेल. एल-निनो स्थितीत पॅसिफिक महासागराचे तापमान वाढते, तर ला-निना स्थितीत पॅसिफिक समुद्राचे पाणी थंड होते. ला-निना सामान्यत: चांगल्या मान्सूनच्या पावसाशी संबंधित आहे. हे मध्य आणि पूर्व-मध्य विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या थंड तापमानाचे निदर्शक आहे. एल-निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) सायकलचा थंड टप्पा म्हणून आपण ला-निना स्थितीकडे पाहू शकतो. जूनपासून ही परिस्थिती भारतात दिसू शकते. तथापि, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ती अधिक प्रबळ होऊन मान्सूनच्या पावसाला अनुकूल ठरेल.
आफ्रिका, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियातही चांगला पाऊस
एपीसीसीने जारी केलेल्या निवेदनानुसार, पूर्व आफ्रिका ते अरबी समुद्र, भारत, बंगालचा उपसागर आणि इंडोनेशिया, कॅरिबियन समुद्र, उष्णकटिबंधीय उत्तर अटलांटिक, दक्षिण ऑस्ट्रेलियापर्यंत पसरलेल्या प्रदेशासाठी सामान्यपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टीची वाढीव संभाव्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, दक्षिण पॅसिफिक, पूर्व आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियातील काही प्रदेशांमध्येही सामान्यपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी अपेक्षित आहे.
यंदा चांगल्या पावसाळ्यापूर्वी कडक उन्हाळ्याचा तडाखा
आगामी मान्सून आश्वासक दिसत असताना, या वेळी उन्हाळा मात्र अतिशय कठीण असेल. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अलीकडील अहवालानुसार, एल-निनो परिस्थितीमुळे यंदा उन्हाळी हंगामात तीव्र उष्णता आणण्याची शक्यता आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्राचा काही भाग आणि ओडिशामध्ये अधिक उष्णतेच्या लाटेसह प्रचलित एल-निनो परिस्थिती दिसून येईल.
गेल्यावर्षी “एल-निनो”मुळेच भारतात कमी पाऊस
गेल्यावर्षी एल-निनो स्थितीचा उदय झाल्यापासून भारतात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळेच आशियातील दुष्काळ आणि अनेक देशात दीर्घकाळ कोरडा काळ राहिला. आता बहुसंख्य मॉडेल्स असे सूचित करतात की, एल-निनो मार्च ते मे 2024 पर्यंत टिकून राहील. नंतर एप्रिल ते जून 2024 दरम्यान ENSO- न्यूट्रलमध्ये संक्रमण होईल. ENSO तटस्थ परिस्थितीच्या थोड्या कालावधीनंतर, जुलै-सप्टेंबरच्या आसपास “ला-नीना”मध्ये संक्रमण सूचित करतात, असे यूएस नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनची (एनओएए) शाखा असलेल्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) म्हटले आहे.