ज्ञानेश उगले, नाशिक
महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आता शेतीमध्ये नाविन्यपूर्ण असा प्रयोग राबवत आहेत. विशेषता पीक पद्धतीत मोठा बदल केला जात आहे. नगदी तसेच फळबाग वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. अशातच एका तरुण शेतकऱ्याने द्राक्ष शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम उत्पादन घेतले आहे. चला तर जाणून घेऊया त्यांची प्रेरणादायी यशोगाथा.
शेती समोर आव्हाने नेहमीच आहे, शेतकरी म्हणून आपण सतत सावध असले पाहिजे. काटेकोर शिस्तीची सवय असेल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर असेल तरच शेतीत टिकून राहणे आणि प्रगती करणे शक्य आहे. असे नवनाथ गाढवे सांगतात. त्यांचे शेतीतील प्रयोग ही त्यांच्या वरील उक्तीची साक्ष देतात. नाशिक ते पेठ महामार्गालगत प्रसिद्ध रामशेज, देहरगड या ऐतिहासिक किल्ल्यांच्या जवळ रासेगाव वसलेले आहे. रासेगाव फाट्यावरुन कच्च्या सडकेने ३ – ४ किमी अंतर पार केल्यावर गाढवे वस्ती लागते. याच ठिकाणी नवनाथ वाळू गाढवे या तरुण शेतकऱ्याची द्राक्षशेती नजरेत भरते.
नवनाथ यांच्या रासेगाव परिसरातील वातावरण, जमीन आदी स्थिती पाहता द्राक्षशेती करणे हेच मोठे आव्हान होते. द्राक्षांतील जुने वाण हे तर सगळ्यात मोठे आव्हान होते. दरवर्षी पक्वतेच्या अवस्थेत पाऊस, थंडी यामुळे मणी क्रॅकींग, गळकूज, घड जिरणे या समस्या नेहमीच्याच होत्या. वर्षाच्या शेवटी कमी उत्पादन आणि वाढीव खर्च या दुष्टचक्रात शेती सापडली होती. अशा स्थितीत हार मानून थांबणे हा नवनाथ यांचा स्वभाव नव्हता. एक दिवस ते मामांच्या द्राक्षबागेत पाहणी करीत फिरत असतांना त्यांना काही ठिकाणी रोगग्रस्त पाने व घड आढळून आले. ते त्यांनी मामांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मामा उत्तर दिले की, हा सर्व बाग निर्यातीसाठी असून निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतांना किडनाशकांचा वापर अत्यंत मर्यादित करावा लागतो. म्हणून कीडरोग नियंत्रण ही बाब अवघड बनते. दरवर्षी निर्यातक्षम उत्पादन घेणाऱ्या मामांना द्राक्ष शेतीतून तुलनेने चांगले उत्पन्न मिळत होते. नवनाथ यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेत निर्यातक्षम उत्पादन घ्यायचे ठरविले.
सर्वोत्तमाचा ध्यास
वर्ष २०१६ च्या हंगामाच्या वेळी नवनाथ ‘सह्याद्री फार्म्स’च्या संपर्कात आले. द्राक्षतज्ज्ञ मंगेश भास्कर, सचिन वाळुंज, प्रवीण ठाकरे यांचे तांत्रिक मार्गदर्शन त्यांना मिळू लागले. ‘सह्याद्री फार्म्स’ मध्ये येणाऱ्या चिली, द. अफ्रिका येथील जागतिक शास्त्रज्ञांचे मार्गदर्शनही मिळत होते. याचा लाभ अर्थातच द्राक्ष उत्पादन व्यवस्थापनासाठी होत होता. याच काळात ‘सह्याद्री फार्म्स’ने भारतात प्रथमच आयात केलेल्या पेटंट द्राक्षवाणांविषयी त्यांना माहिती मिळाली. द्राक्ष शेती पुढील नैसर्गिक आव्हानांमुळे हतबल झालेल्या नवनाथ यांना या नव्या वाणांच्या रुपाने एक आशेचा किरण सापडला.
नव्या वाणांचे धाडस
द्राक्षाच्या नव्या पेटंट वाणांच्या लागवडीसाठी लागवड अंतरात बदल करण्याची एक अट होती. जुन्या स्वरुपाच्या द्राक्षबागेतील अंतरात एकदम बदल करणे ही बाब अवघड होती. मात्र नवनाथ यांनी हे धाडस करायचे ठरविले. जुनी द्राक्षबाग काढून तिथे नव्याने नव्या वाणांची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावर वर्षभर सर्व बाजूंनी मेहनत घेतली. वर्ष २०२२ मध्ये त्यांच्या या प्रयत्नांना फळ आले. नव्या आरा- १५ वाणाचा बहर सर्वांना आकर्षित करणारा ठरला. त्यांच्या दीड एकराच्या द्राक्षबागेतील ९९ टक्के फळ हे निर्यातीसाठी निवडले गेले व त्यावर्षीचा उच्चांकी दर त्यांना मिळाला. ही घटना त्यांचा हुरुप वाढविणारी होती. त्यानंतरच्या दुसऱ्या वर्षीही त्यांनी उत्तम व्यवस्थापन करीत उत्पादकता, गुणवत्ता यात सातत्य मिळविले. २०२३-२४ च्या हंगामात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतल्याबद्दल त्यांना सह्याद्री फार्म्स कडून ‘सह्याद्री फार्मर ऑफ द ईयर‘ या मानपत्र व रोख १ लाख रुपयांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. नवनाथ यांनी जुन्या पारंपारिक वाणांना बदलून पूर्ण नव्या वाणांकडे वळविण्याचा निर्णय घेतला आहे. आरा- १५ या वाणाच्या यशस्वी उत्पादनानंतर त्यांनी मागील वर्षी २०२३ मध्ये एआरडी ३५ व एआरडी ३६ या नवीन पेटंटेड रंगीत द्राक्ष वाणांची लागवड केली आहे.
उत्तम व्यवस्थापन
पाणी, अन्नद्रव्य, कॅनोपी व किडरोग व्यवस्थापन ही कुठल्याही फळपिक व्यवस्थापनातील महत्वाची अंगे आहेत. या सर्व बाजू महत्वाच्या आहेत. किंबहुना यातील एकही बाजू चुकली तरी आपले शंभर टक्के नुकसान होऊ शकते असे नवनाथ सांगतात. ‘द्राक्षशेतीत १०० पैकी १०० गुण मिळविण्याचा ध्यासच महत्वाचा आहे. इथल्या परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकही प्रश्न ‘ऑप्शन’ला टाकता येत नाही. ‘‘द्राक्षशेतीत बरीच वर्षे आव्हानात्मक स्थितीतून गेल्यानंतर मागील ३-४ वर्षांनी काही प्रमाणात यश दिले आहे. त्यामुळे नवनाथ यांचा हुरुप वाढला आहे.
संपर्क :-
नवनाथ वाळू गाढवे
रासेगाव, जि. नाशिक.,
मो. – 7588015784