शेतकऱ्यांनो सावधान, अफगाणिस्तानात यंदा भयंकर टोळधाड दिसू लागली आहे. या टोळधाडीचा हल्ला (Locusts Attack) भारतात होणार का, हा चिंतेचा विषय आहे. यापूर्वी 2020 मध्ये अफगाणिस्तानातून आलेल्या टोळधाडीचा भारतात उपद्रव झाला होता. अगदी महाराष्ट्रातही नुकसान झाले होते.
यादवीने पिचलेल्या अफगाणिस्तानात आधीच बहुसंख्य जनता अर्धपोटी राहतेय. आधीच अन्नटंचाईने ग्रासलेले शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या असहाय नजरा आता उत्तर अफगाणिस्तानात आलेल्या टोळधाडीवर आहेत. अफगाणिस्तानमधील मुख्य पीक उत्पादक क्षेत्र (ब्रेडबास्केट) असलेल्या प्रांतांपैकी आठ प्रांत सध्या टोळधाडीने प्रभावित झाले आहेत.
हंगामात कापणीच्या वेळी ही धाड आली. पुरेशा उपाययोजना करूनही टोळधाड अंडी घालते. आता त्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. गहू, वाटाणे, तीळ, हिरवी पीके याला मोठा धोका उभा राहिला आहे. मोरोक्कन, आफ्रिकन भागातून ही धाड अफगाणिस्तानात येते. अफगाण शेतकरी जाळींच्या साहाय्याने टोळ पकडून जमिनीत पुरतात. तरीही त्यांची संख्या अजूनही वाढत आहे.
12 लाख टन गहू नष्ट होऊ शकतो – संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज
या वर्षीच्या टोळधाड उद्रेकामुळे अफगाणिस्तानात 12 लाख टन गहू नष्ट होऊ शकतो, अशी भीती आहे. वार्षिक कापणीच्या एक चतुर्थांश आणि 48 कोटी अमेरिकी डॉलरपर्यंतचे नुकसान होऊ शकते, असा संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे. यंदा अफगाणिस्तानला सलग तिसर्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. तिकडे मार्चपासून पाऊस पडलेला नाही. पाऊस झाला असता तर अंडी वाहून जाऊ शकले असते आणि धाड नियंत्रणात येऊ शकली असती.
पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाला, कसे ओळखाल..? । Sufficient rain for sowing।
https://youtu.be/xpqvjEGSWT0
यंदा गेल्या तीन वर्षातील सर्वोत्तम पीक आले असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाचे अफगाणिस्तानमधील प्रतिनिधी रिचर्ड ट्रेन्चार्ड यांनी दिली आहे. मात्र, टोळधाड उद्रेकामुळे बहुतांश पीक नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे या वर्षाच्या उत्तरार्धात आणि पुढील वर्षात अन्न असुरक्षिततेची परिस्थिती बिघडण्याची भीती आहे. अफगाणिस्तानातील दुष्काळ स्थिती, पाऊस-पाण्याची कमतरता आणि अत्यंत मर्यादित नियंत्रण उपायांमुळे तो टोळांसाठी परिस्थिती वाढीला अनुकूल झाली आहे.
ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर अफगाणिस्तानला मिळणारी अब्जावधी डॉलर्सची आंतरराष्ट्रीय मदत थांबली आहे. अनेक दशकांच्या युद्धामुळे आधीच पिचलेल्या अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताज्या अहवालानुसार, आर्थिक उत्पादन कमालीचे घसरले असून सुमारे 85 टक्के जनता दारिद्र्यात राहत आहे. पूर्वी अफगाणिस्तानमध्ये एक अतिशय मजबूत टोळ नियंत्रण प्रणाली होती, परंतु गेल्या दोन वर्षांत तालिबानची सरकार ही व्यवस्था नसल्याने ते नियंत्रण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.
अन्यथा टोळांची संख्या 100 पट वाढेल
योग्य उपायांअभावी टोळधाड अशीच अनियंत्रित राहिल्यास, पुढील वर्षी टोळांची लोकसंख्या 100 पट वाढू शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी कार्यक्रम शाखेने दिला आहे.
भारतात 2020 मध्ये अफगाणिस्तानातून पाकिस्तानमार्गे टोळधाड राजस्थानात पोहोचली होती. त्यानंतर मध्यप्रदेश आणि विदर्भात टोळधाड आली होती. भाजीपाल्यासह मोसंबी आणि संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. तशा भारतात अगदी पुरातन काळापासून टोळधाडी येत असल्याचे नमूद आहे. अफगाणनंतर पाकिस्तानातून पावसाळ्याच्या अखेरीस राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात टोळधाड शिरते. या भागात अंडी घातली जातात, उत्पत्ती वाढल्यानंतर परिपक्व टोळ तयार होतात. त्यांचे थवे एकत्रित पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात येतात. 1960 मध्ये महाराष्ट्रात सर्वात नुकसानकारक टोळधाड येऊन गेल्याचे सांगितले जाते.
टोळ म्हणजे अर्थपटेरा वर्गातील कीटक आहे. आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर टोळधाड म्हणजे अत्यंत घातक असे कीड आहे. जगभरातील कृषी क्षेत्राला त्यांचा फटका बसतो कारण मोठ्या संख्येने हे टोळ एका देशातून लगतच्या दुसऱ्या देशात जात असतात. हिरवीगार पीके खाऊन टोळधाड सारा परिसर ओसाड करते. त्यामुळे अन्न-धान्य उत्पादन खालावून अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. सरकार अस्तित्त्वात नसलेल्या तालिबान व्यवस्थेच्या आकलनापलीकडील असा हा प्रश्न आहे. अफगाणिस्तानात टोळ नियंत्रण न झाल्यास यंदाच्या पावसाळा हंगामाअखेर भारताला टोळधाडीचा मोठा धोका होऊ शकतो. हाती आलेले पीक उद्ध्वस्त होण्याची भीती त्यामुळे राहील.