नेहा बाविस्कर
आपल्या घराच्या गच्चीवर निसर्गाची छोटीशी जादू निर्माण करणे हे एक वेगळंच समाधान देणारा अनुभव आहे. घराच्या गच्चीवर भाजीपाल्याची लागवड, फुलांच्या रंगीबेरंगी बगिच्यांमधून जीवनाची नवी सुरुवात करणे, आणि शहरी जीवनात सेंद्रिय शेतीचा स्पर्श आणणे – हे सर्व म्हणजे ‘टेरेस गार्डनिंग’ चं अद्भुत जादू. या प्रवासाची सुरूवात केल्यावर, निसर्गाशी असलेला सुसंगत सहवास, त्याच्या गोड फळांचे स्वाद आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याचा घेतलेला आनंद – हेच आपल्या घरात एक नवा श्वास निर्माण करतात. अशीच एक महिला जिने निसर्गाचा आणि पर्यावरणाचा असलेला सुसंगत सहवास अनुभवाला आणि आपल्या घरच्या परसबागेत तसेच गच्चीवर व्हेजिटेबल गार्डनिंग केले. आज जळगावातील अनेक बागप्रेमींनी त्यांच्याशी चर्चा करून आपल्या गच्चीवर भाजीपाला लागवड तसेच कंपोस्टिंगला सुरवात केली आहे.
सुंदर वस्तू आणि चहुबाजूने मस्त फुललेली बाग, शोभेची झाडे, फळझाडे आणि प्रत्येक झाडाला मुलांप्रमाणेच जपणारे आई-बाबा– हे सगळे जुईली शामसुंदर कलभंडे या लहानपणापासून अनुभवत होत्या. वेगवेगळी फुले, फुलपाखरं बघणे, त्यांचे फोटो काढणे, आणि घरातल्या आंब्यांवर, सिताफळांवर ताव मारणे एवढाच त्यांचा प्रारंभिक सहभाग होता. पूर्वी, रोझ सोसायटीतर्फे फुलांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यायचे, आणि ते प्रदर्शन जुईली यांना फार आवडायचे. त्यावेळी बागेतील रंग, सुगंध आणि विविध फुलांचे सौंदर्य पाहणे खूप आनंददायक होते. पण प्रत्यक्षात, बागकामाची सुरुवात जुईली यांनी खूप उशिरा केली. त्या सुरुवातीच्या क्षणांची आठवण आजही त्यांच्या मनात जिवंत आहे.
शहरी शेतकरी बनण्याचा प्रवास
साधारणपणे २०१६-१७ मध्ये, जुईली कलभंडे यांच्या एका मावशीने सौ. दीपिका चांदोरकर यांना टेरेस गार्डनिंगच्या ग्रुपमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव दिला आणि ग्रुप मध्ये समाविष्ट करून घेतले आणि ते त्यांच्या शहरी शेतकरी होण्याच्या प्रवासाचे पहिले पाऊल ठरले. हे सर्व सुरू झाले ‘टेरेस व्हेजिटेबल गार्डन’ नावाच्या ग्रुपमधून. या ग्रुपचा प्रारंभ शेतकरी आणि शहरी शेतकरी मार्गदर्शक, जितेंद्र पाटील आणि हेमंत पाटील यांच्या कडून झाला. या ग्रुपच्या माध्यमातून विविध शहरी शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचा उद्देश होता, ज्यांना घरच्या गच्चीवर तसेच परसबागेत भाजीपाल्याची लागवड करायची होती. जशी ग्रुपवर सदस्यांची ओळख होत गेली, तसं बागांना भेटी देणे, चर्चा करणे आणि इतरांच्या अनुभवांपासून शिकणे सुरू झाले. हळूहळू, त्यांनाही घराच्या गच्चीवर भाजीपाल्याच्या लागवडीची इच्छा होऊ लागली. रोपे आणणे, बिया लावणे, आणि विविध पद्धतींनी लागवड करण्याचा विचार सुरू झाला. एक दिवस, ‘हिरवा कोपरा’ पुस्तकाचे लेखक, मंदार वैद्य, नाशिक यांची कार्यशाळा अटेंड करण्याची संधी मिळाली. या कार्यशाळेत, गांडूळ खत, निमपेड, नीमार्क इत्यादी शेतकरी साधनांची माहिती मिळाली आणि शहरी शेतकरी बनण्याच्या मार्गावरचे अनेक नवे दरवाजे उघडले. हेमंत पाटील यांनी दिलेल्या टोमॅटोच्या रोपांची लागवड त्यांनी थर्माकोलच्या डब्यात केली. काही काळाने, छोटे छोटे टोमॅटो लाल होऊन पिकले. त्या विषमुक्त टोमॅटोची चव, अप्रतिम होती!
नवनवीन प्रयोग करण्याचा आनंद
तिथून मग जुईली यांनी विविध भाज्यांच्या लागवडीचे प्रयोग सुरू केले. नवनवीन ओळखी होऊ लागल्या, रोपांची आणि बियांची देवाण-घेवाण सुरू झाली. या प्रक्रियेत, ‘टेरेस व्हेजिटेबल गार्डन’ (TVG) ग्रुपने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचले – फळझाडे, फुलझाडे आणि बोन्सायची स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करण्यात आले. आणि त्या प्रदर्शनात,त्यांच्या फायकसच्या बोन्सायला प्रथम पारितोषिक मिळाले. यामुळे कामाच्या उत्साहाला अगदी एक वेगळीच उंची मिळाली. खरंच, हा प्रवास एक प्रकारची प्रयोगशाळाच बनली आहे. रोज काहीतरी नवीन शिकायला मिळते आणि अनुभवांची मोठी शाळाच जणू. एक विशेष आनंद देणारा अनुभव म्हणजे कुंडीत ‘अननसाची लागवड’. हेमंत पाटील यांनी पुण्याहून आणलेली अननसाची टिशू रोपे जुईली यांना देखील दिली. प्रयोग म्हणून, पाच रोपे लावली पण त्यातली दोनच रुजली आणि वाढली. रोपांची काळजी, पाण्याचा योग्य वापर, खताचे प्रमाण – समजून घेऊन अननस धरणार की नाही याची वाट बघणे सुरू झाले. अननस हे खूपच हळूहळू वाढणारे फळ आहे. फळ धरल्यापासून, पूर्ण विकसित होऊन गोड अननस तयार होण्यास सहा महिने लागतात. पण म्हणतात ना, “सब्र का फल मीठा होता है.” आणि खरोखर, त्या सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर, एक छोटासा गोल्डन अननस तयार झाला – अत्यंत गोड चवीचा आणि अजिबात चरचरीत नसलेला अननस तोही घरच्या परसबागेतला. तो अनुभव नक्कीच प्रत्येकाने घ्यावा.
निसर्गाच्या संगतीने मातीशिवाय शेतीचा प्रयोग
या सर्व प्रयोगांच्या बरोबरच पालेभाज्या लावणे, विविध पोटिंग मिक्स वापरून पाहाणे, हे सर्व सुरू होतचे. एकीकडे प्रयोग करत होतो, आणि दुसरीकडे मनात सतत हाच विचार चालू होता – मातीचा कमीत कमी वापर करून किंवा माती न वापरता भाजीपाला लागवड करता येईल का? कारण शेवटी माती कुठून ना कुठून आणलीच जाते आणि जी तयार होण्यासाठी शेकडो वर्षं लागतात. त्यामुळे माती आणून निसर्गाला त्रास देतो आहोत हा विचार मनात घोळत होता. याच दरम्यान, नाशिकचे संदीप चव्हाण यांची कार्यशाळा जळगावला अटेंड करण्याची संधी मिळाली. त्यावेळी, त्यांनी ८०% पालापाचोळ्याचा वापर करून कुंडी कशी भरायची आणि भाज्यांची लागवड कशी करायची, याबद्दलची महत्त्वाची माहिती दिली. यामुळे मला एक नवा दृष्टिकोन मिळाला आणि लगेचच सोसायटीच्या बागेतील पालापाचोळा गोळा करून कुंड्या भरायची प्रक्रिया सुरू केली. हे करत असताना झाडावर पडणाऱ्या तसेच मातीत असलेल्या विविध किंडींशी ओळख होऊ लागली. गांडूळ आवडायला लागली आणि कंपोस्टिंग करणे खूप सोप्पं झालं. मित्र किडे जवळचे वाटायला लागले. पान खाणारी प्रत्येक आळी किडा नसते, तर सुरवंटही असू शकते, हे समजायला लागले. निरीक्षण वाढले आणि किड्यांची माहीती मिळवण्यात खूप मजा यायला लागली. शत्रु कीड – जसे मावा, तुडतुडे इत्यादी आणि मित्र कीड – जसे लेडी बीटल, फुलपाखरू, प्रार्थना कीटक यांच्यातला फरक शिकायला मिळाला. खरंतर, हा प्रवास एक विलक्षण आनंद देणारा ठरला. निसर्गाच्या या जवळीकतेत, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत शिकायला मिळाले आणि एक वेगळाच आनंद घेतला, असे जुईली यांनी ॲग्रोवर्ल्डशी बोलताना सांगितले.
निसर्गाचा अभ्यास आणि आपली जबाबदारी
अंड्यापासून ते कोशातून बाहेर पडणाऱ्या फुलपाखराच्या प्रवासाने खूप काही शिकवल. तेव्हा पासून, मागची किमान ७-८ वर्षे तरी, बागेतल्या फुलपाखराच्या आणि पतंगाच्या अळ्यांना आम्ही मारत नाही. कारण, निसर्गचक्रात आपण हस्तक्षेप करायला नको. निसर्गाचं चक्र उत्तम रीत्या सुरू असताना, प्रत्येक जीव आपली जबाबदारी चोख पार करत असतो. जुईली यांना समजले की, आपल्याला फक्त धीर ठेवावा लागतो, पेशंस ठेवावा लागतो आणि निसर्गाच्या आपल्या कामकाजात हस्तक्षेप न करता त्याच्याशी एकसंध होऊन राहायचे. तेव्हा निसर्गाने आपल्यासाठी तयार केलेली समतोल आणि शांती अनुभवता येते.
निसर्गाशी सुसंगत सहवास
२०१७ मध्ये, नाशिक भाग प्रेमी ग्रुप तर्फे जुईली यांच्या आई-वडिलांना बोन्साय या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. त्या वेळी, ग्रुपच्या स्वप्निल दादा जोशी आणि संपूर्ण ग्रुपने त्यांना तुतीच्या झाडाची रोपं गिफ्ट दिली. पैकी एक झाड कुंडीत ठेवले, तर दुसर्या झाडाची गेल्या वर्षी जमिनीत लागवड केली. दरवर्षी घरच्या तुतीचा आनंद घेता येतो, ही खूपच सुखद गोष्ट ठरली. गच्चीवर आणि परसबागेत पालेभाज्या, फळझाडे आणि फळभाज्यांची लागवड थोड्या प्रमाणात सुरू होती. पण काही कारणामुळे त्यात खंड पडला. त्या काळात, भाज्यांच्या लागवडीवरून जुईली यांचे लक्ष अधिक प्रमाणात घरात कंपोस्ट तयार करण्यावर, इतरांना माहिती देण्यावर, आणि फळांच्या सालींच्या वापरातून बायो एन्जाइम्स तयार करण्यावर केंद्रीत झाले. याचबरोबर, घरात जीवामृत तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. घरातल्या ओल्या कचर्याचा उपयोग करून त्याला जिरवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांवर काम सुरु केले. यामध्ये साळुंखे काकांची जुईली यांना मदत झाली. ते माळीकाका नसले तरी, बागकामात त्यांची खूपच मदत व्हायची आम्हाला.या सर्व प्रक्रियांमध्ये भाज्या लावण्याचा ‘किडा’ शांत बसायला तयार नव्हता. म्हणून, एक प्रयोग म्हणून सुरणाची लागवड केली.
अशी केली सुरणाची लागवड
36*24*12 इंची कापडी ग्रो बॅगमध्ये, पहिल्यांदा आठ ते दहा किलो सुरणाचे कंद काढले होते. याही वर्षी, एक मोठ सुरण (७ किलो ८०० ग्राम वजनाचे) घेतले. सुरणाची लागवड करताना, उत्तम खतमिश्रित पॉंटिंग मिक्समध्ये लावावे. सुरण लावण्याचा सर्वोत्तम कालावधी साधारणपणे पहिला पाऊस झाल्यानंतर असतो. पावसाळा संपेपर्यंत, सुरणाला भरपूर पाणी मिळते आणि त्याची वाढ छान होते. जून किंवा जुलै महिन्यात सुरण लावल्यास, साधारणतः डिसेंबर महिन्यात सुरण तयार होते. सुरणाचं झाडही खूप छान आणि आकर्षक दिसते. सुरुवातीला बाजारातून छोटे सुरण आणून बाजूला ठेवावे, त्याला कोंब फुटल्यावर मग, पहिल्या पावसानंतर, त्या सुरणाची लागवड करा.
व्हेजिटेबल गार्डन मधला सहभाग, विचार जसा जसा वाढत गेला तशा काही गोष्टी आम्ही सगळे कटाक्षाने पाळत गेलो. त्या म्हणजे –
घरातून निघणारा ओला कचरा घरातच जिरवला गेला पाहिजे.
उत्पादन जास्त मिळण्यासाठी किंवा कीड नियंत्रणासाठी केमिकलचा वापर करायचा नाही.
प्लास्टिकच्या कुंड्या शक्यतो टाळायच्या
जीवामृत, बायो एन्झाईम, गोमूत्र, निमार्क, राख, भात, तांदूळ धान्य धुतलेले पाणी इ. सारख्या जैविक गोष्टींचा वापर करायचा.
घरी तयार केलेला चिकट सापळा वापरायचा
पाचोळा जाळायचा नाही. त्यापासून खत करायचे.
पतंग आणि फुलपाखरांच्या अळ्या मारायच्या नाहीत.
लागवडीसाठी देशी बियाण्यांचा वापर – अशा अनेक गोष्टी आम्ही गेली काही वर्ष पाळत आलो आहोत.
फक्त स्वतःसाठी करण्यापेक्षा इतरांसाठीही करावे या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून एक्सपोर्ट कॉलिटीची स्ट्रॉबेरीची रोप जळगाव, पाचोरा, चोपडा, देऊळगावराजा इ.ठिकाणच्या बागप्रेमींसाठी उपलब्ध करून देत आहोत आणि घरच्या स्ट्रॉबेरीचा आनंद बऱ्याच जणांना घेता येतो आहे. याचा निश्चितच आनंद आहे. याचबरोबर एक्सपोर्ट कॉलिटीची गुलाबाची रोपही उपलब्ध करून देतो आहोत. बाग कामासाठी स्पेशली गच्चीवरच्या बागेसाठी वजनाने हलक्या सच्छिद्र फॅब्रिक सुद्धा आमच्याकडे असतात. ज्या साधारणपणे आठ ते दहा वर्ष टिकतात. मागील दोन वर्षांपासून सोलापूरची विषमुक्त ,अत्यंत गोड चवीची आणि पातळसालीची द्राक्ष सुद्धा जळगावकरांसाठी उपलब्ध करून देत आहोत. जोडीला केशर आंबा, हापूस आंबा आणि पायरी आंबा आहेतच.

आदर्श परसबाग पुरस्काराने सन्मानित !
हा सगळा प्रवास खूप काही शिकवून जाणारा ठरला. हे शिकणं कायमच सुरू राहणार हेही तितकंच खरं. हे सगळं करताना अगदी सहजतेने सगळे केले जात होते आजही केले जातय. कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता. पण कोणीतरी आपल्यालाही नकळतपणे आपल्या कामाची दखल घेऊन एक सुखद धक्का देत तेव्हा मात्र “दिल गार्डन गार्डन हो जाता है”. असाच सुखद धक्का जुईली यांना मिळाला ज्यावेळी “ॲग्रोवर्ल्डचे” तर्फे आदर्श परसबाग पुरस्कार 2024 या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांची निवड केली गेली. माझ्या या कामाची दखल घेतल्याबद्दल ॲग्रोवर्ल्डचे शैलेंद्र चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण टीमची मी अत्यंत ऋणी आहे. या पुरस्काराने नक्कीच वाढलेल्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे, असे जुईली म्हणाल्या.
संघर्ष, पाठिंबा आणि मार्गदर्शन
या सगळ्या प्रवासात एकटीने चालणे सोपे नव्हते. पण माझ्या संपूर्ण कुटुंबाचा, आई-वडिलांचा आणि मोठ्या भावाचा संपूर्ण पाठिंबा त्यांना मिळाला. त्याचप्रमाणे, उत्साह वाढवणारे नातेवाईक, आणि या प्रवासात मला मिळालेल्या सर्व बागप्रेमी मित्र-मैत्रिणींची साथही अनमोल आहे. तसेच, ॲग्रोवर्ल्डचे शैलेंद्र चव्हाण, अनिल भोकरे (माजी प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी विभाग, जळगाव), जयंत साठे (बीड), जयंत खरमाळे पाटील (अहिल्यानगर), निर्मला लाठी मॅडम (पुणे), दिलीप दामले काका (पुणे), गच्चीवरील बाग (नाशिक) चे संदीप चव्हाण, प्रकाश वाघुळदे (कानळदा), जळगावातील यौगिक शेतीचे राधेश्याम मुंदडा आणि अशा अनेक जाणकार व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे त्या या मार्गावर अधिक आत्मविश्वासाने आणि कणखरपणे चालत राहिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे सर्व शक्य झाले. त्यांच्या सहकार्यानेच जुईली यांच्या प्रत्येक प्रयत्नाला एक नवीन दिशा मिळाली, आणि हा प्रवास आणखी सोपा झाला.
संपर्क :
जुईली कलभंडे
मो. नं. – 9860029801
