स्ट्रॉबेरी! नुसते नाव जरी उच्चारले तरी तोंडाला पाणी सुटते. थंड हवामान आणि लाल मातीच्या प्रदेशात स्ट्रॉबेरी पिकते. स्ट्रॉबेरी, हे बेरी वर्गीय फळ आहे. लालचुटूक दिसणारी… आपल्या अंबूस गोड चवीने भुरळ घालणारी… स्ट्रॉबेरी आवडत नाही; अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. टाटा उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष जमशेदजी टाटा यांनी 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात स्ट्रॉबेरी भारतात आणली. सह्याद्री पर्वतरांगांमधील मुख्य थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर तसेच पाचगणी, वाई या परिसरात स्ट्रॉबेरीची शेती रुजवण्याचे खरे श्रेय जमशेदजींनाच जाते. पोषक हवामान असल्याने या परिसरात स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन होते. आज संपूर्ण देशात स्ट्रॉबेरीचे जेवढे उत्पादन होते, त्यापैकी सुमारे 85 टक्के उत्पादन महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई परिसरात होते.
गिरणी हा टाटा समुहातला महत्त्वाचा उद्योग होता. स्वदेशी मानला जाणारा हा उद्योग वाचावा म्हणून जमशेदजींनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. उद्योग समुहाची धुरा यशस्वीरित्या सांभाळत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकीची कास सोडली नाही, हे विशेष. जमशेदजींनी पाचगणीला जागा घेऊन ठेवली होती. त्याठिकाणी पारशी मंडळांसाठी आरोग्य केंद्र उभारण्याचा त्यांचा मनोदय होता. त्या कामासाठी जागेची पाहणी करावी म्हणून ते पाचगणीला गेले. तेव्हा पुढच्या काही वर्षात या परिसराला अतोनात महत्व येणार, याचा अंदाज त्यांना तेव्हाच आला होता. त्यामुळे त्यांनी अजून मोठ्या प्रमाणावर जागा घेऊन ठेवल्या. हॉटेल्स वगैरे उभारायची, जागा भाड्याने द्यायचा उद्योग सुरू करायचा, असा फुसका विचार त्यांनी कधीच केला नाही. जमशेदजी जग हिंडलेले होते. कोणत्या परिसरात कोणत्या प्रकारचे हवामान आहे, तिथे काय पिकते, कोणत्या बाबींना तेथे वाव आहे, यासारख्या गोष्टींचा सगळा आलेख त्यांच्या डोक्यात तयारच असायचा. उद्योगाचे भान कायम त्यांच्या डोक्यात असायचे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. इजिप्तसारखे हवामान आताच्या पाकिस्तानातल्या वायव्य सरहद्द प्रांतात आहे. तेव्हा इजिप्तसारखा उत्तम दर्जाचा कापूस तिथे पिकेल, असे त्यांना वाटत होते. मग त्यांनी हजारभर शेतकरी तयार केले. त्यांना स्वत:च्या खर्चाने इजिप्शियन कॉटनची उत्तम रोपं दिली. त्यांना त्याची उस्तवारी कशी करायची, याचीही माहिती दिली. दुर्दैवाने या प्रयोगात त्यांना फारसे यश आले नाही. मात्र, तरीही ते नाउमेद झाले नाहीत. त्यानंतर त्यांनी पाचगणीला असाच काहीतरी प्रयोग करून बघायचा असे ठरवले. महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई हा डोंगराळ भाग. या भागाच्या हवामानाचा आणि शेतीचा त्यांनी अभ्यास केला. येथे स्ट्रॉबेरी किंवा कॉफीचे पीक उत्तम होईल, असा निष्कर्ष त्यांनी अभ्यासाअंती काढला. त्यानंतर कॉफी आणि स्ट्रॉबेरीची रोपे घेऊन पाचगणीला बर्याच फेर्या मारल्या. काही कारणास्तव कॉफीचा प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. परंतु, स्ट्रॉबेरी रुजविण्यात त्यांना यश आले. परिसरातील थंड हवामान आणि लाल माती या दोन प्रमुख बाबींमुळे स्ट्रॉबेरी रुजण्यास मदत झाली.
हाल-अपेष्टाही सोसल्या
स्ट्रॉबेरी रुजावी म्हणून जमशेदजींनी खूप हाल-अपेष्टा सोसल्या आहेत. महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई या भागात जाणे हा आता आनंदाचा भाग झाला आहे. त्याकाळी तसा तो नव्हता. बरीच कसरत केल्यावर तिकडे जाता यायचे. मुळात रेल्वे आतासारखी सातारा-कोल्हापूरपर्यंत नव्हती. पहिली गाडी होती ती फक्त पुण्यापर्यंत. ती सुद्धा दुपारी. ती रात्री नऊ वाजेच्या आसपास पुण्याला पोचायची. मग दुसरी गाडी पकडायची. वाठारला मध्यरात्री उतरायचे. त्यानंतर रात्र तिथेच स्थानकावर घालवायची. मग पहाट झाल्यावर टांगा पकडून पाचगणीचा प्रवास सुरू करायचा. 28 किलोमीटरचा घाट चढायला पाच तास लागायचे. घाटावर तीव्र चढ असल्याने टांग्यासाठी घोड्याच्या दोन जोड्या लागायच्या. एकाच्या तोंडाला फेस आला की दुसरी जोडी. असं सव्यापसव्य करीत पाचगणीला जायला दुपार उजाडायची. तरीही जमशेदजी स्ट्रॉबेरी रुजावी म्हणून उत्साहाने जमेल तेव्हा पाचगणीला जायचेच. या माणसाला इतके पुढचे दिसायचे की एकदा का पक्के रस्ते बनले की या भागाचा कायापालट होणार याची त्यांना पक्की खात्री होती. म्हणून त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. पाचगणीला जमशेदजींची 43 एकराची मालमत्ता होती. मात्र, दान-धर्म करण्यातही पुढे असल्याने विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांनी ती सगळी मालमत्ता देऊन टाकली. तत्पूर्वी त्यांनी पाचगणीत स्ट्रॉबेरी रुजवण्याची किमया करून दाखवली होती.
महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला जीआय मानांकन
महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हा प्रदेश डोंगराळ असल्याने शेतजमीन लाल मातीची आहे. शिवाय येथील वातावरण थंड असल्याने स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. देशभरात स्ट्रॉबेरीचे जेवढे उत्पादन होते, त्यापैकी 85 टक्के वाटा या प्रदेशाचा आहे. उर्वरित 15 टक्के स्ट्रॉबेरी ही हिमाचल प्रदेश तसेच जम्मू आणि काश्मिरातून उत्पादित होते. महाबळेश्वर परिसरात रास्पबेरी, मलबेरी आणि गुसबेरी प्रकारच्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. स्ट्रॉबेरी शेती रुजल्यानंतर ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रोअर असोसिएशनने भौगोलिक निर्देशांकाच्या वस्तू अधिनियम 1999 अंतर्गत महाबळेश्वर स्ट्रॉबेरीची नोंदणी करण्यासाठी प्रस्ताव सादर केला. त्यानुसार, 2010 मध्ये महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला भौगोलिक निर्देशांकानुसार जीआय मानांकन प्राप्त झाले.
3 हजार एकरावर ÷उत्पादन
ब्रिटीश काळात महाबळेश्वर ही ब्रिटिशांची (बॉम्बे प्रेसिडेन्सी) उन्हाळी राजधानी होती. त्याकाळी महाबळेश्वरच्या काही शेतकर्यांनी स्ट्रॉबेरीची खास प्रजाती रुजवता येईल का, या बाजूने विचार करत महाबळेश्वर स्ट्रॉबेरी ही प्रजाती विकसित केली. आज ही प्रजाती अतिशय लोकप्रिय आहे. महाबळेश्वर, पाचगणी, वाई येथे सुमारे 3 हजार एकरावर महाबळेश्वर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. वर्षाकाठी या परिसरात स्ट्रॉबेरीचे सुमारे 30 हजार मेट्रीक टन उत्पादन होते. स्ट्रॉबेरी हे मोसमी फळ आहे. स्ट्रॉबेरी लागवडीसाठी दरवर्षी जून महिन्यात कॅलिफोर्नियातून मूळ रोपे आयात केली जातात. वातावरणाशी सुसंगत व्हावी म्हणून त्यांना रोपवाटिकेत ठेवले जाते. त्यानंतर रोपांची लागवड होते. हिवाळ्यात म्हणजेच, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात उत्पादन निघते. ते टप्प्याटप्प्याने मार्चपर्यंत सुरू असते. महाबळेश्वर परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीचे जेवढे क्षेत्र आहे त्यापैकी निम्म्या क्षेत्रावर कॅलिफोर्नियातील स्वीट चार्ली प्रकारातील स्ट्रॉबेरी लागवड होते. त्या खालोखाल रानिया, नबीला या वाणांचीही लागवड होत असल्याची माहिती मिळाली.
परदेशात निर्यात
महाळेश्वरात उत्पादित होणार्या स्ट्रॉबेरीचा वापर विविध अन्नपदार्थांमध्ये केला जातो. फळांचा रस, जॅम, आईस्क्रिम, मिल्कशेक, चॉकलेट्स यात स्ट्रॉबेरी फ्लेवर म्हणून वापरली जाते. याशिवाय अवीट गोड आणि रसरसीत फळ म्हणून खाण्यासाठीही स्ट्रॉबेरीला मोठी पसंती लाभते. महाबळेश्वर स्ट्रॉबेरीची परदेशात निर्यात होते. फ्रान्स, बेल्जियम, मलेशिया तसेच मध्यपूर्व आशियातील काही देशांमध्ये महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे. महाबळेश्वरात उत्पादित होणार्या स्ट्रॉबेरीची 50 टक्के विक्री थेट पर्यटकांच्या माध्यमातून होते. उर्वरित 50 टक्के स्ट्रॉबेरी देशांतर्गत बाजारपेठ आणि परदेशात निर्यात केली जाते. मुंबई, पुणे या स्ट्रॉबेरी विक्रीसाठी मोठ्या बाजारपेठात आहेत. अलीकडे चेन्नई, बंगळुरू, गोवा यासारख्या नव्या बाजारपेठाही उदयास आल्या आहेत. त्याठिकाणी हंगामात दररोज कंटेनर मोठ्या संख्येने पाठवले जातात.
लागवडीवर होतोय परिणाम
अलीकडच्या काळात स्ट्रॉबेरी लागवडीवर विविध घटकांचा परिणाम होत आहे. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात अनियमित हवामान, वाढता मजुरी खर्च ही प्रमुख आव्हाने आहेत. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या लागवडीवर विपरित परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी हे नाशवंत उत्पादन असल्याने ते दूरवरच्या बाजारपेठेत पाठवणे खूपच आव्हानात्मक असते. ही देखील प्रमुख अडचण स्ट्रॉबेरीच्या विक्री प्रक्रियेत असल्याचे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकर्यांनी सांगितले. प्रत्येक आव्हानांना समर्थपणे तोंड देत स्ट्रॉबेरी लागवडीची परंपरा येथील शेतकर्यांनी जपली आहे, हे विशेष. नोव्हेंबर ते मार्च हा स्ट्रॉबेरीचा मुख्य हंगाम मानला जातो. स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असल्याने निर्यातीला मोठी संधी आहे. त्यासाठी शासकीय पातळीवरून स्ट्रॉबेरी उत्पादकांसाठी पाठबळ मिळावे, अशी अपेक्षाही शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
मार्केटिंगसाठी महोत्सवांचे आयोजन
स्ट्रॉबेरीचे मार्केटिंग व्हावे, लोकांना एकत्र आणून उत्पादित होणार्या स्ट्रॉबेरीची थेट विक्री करता यावी तसेच स्ट्रॉबेरी शेतीसंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रोअर असोसिएशनच्यावतीने दरवर्षी स्ट्रॉबेरी महोत्सवांचे आयोजन केले जाते. या महोत्सवांच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीचे जोरदार मार्केटिंग करण्यात असोसिएशनला यश आले आहे. असोसिएशनच्या मदतीने अन्य खासगी संस्था, संघटनादेखील आता स्ट्रॉबेरी महोत्सवांचे आयोजन करत आहेत. त्यामुळे महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात पर्यटनवृद्धी होण्यास चालना मिळाली आहे. या महोत्सवांमध्ये महाराष्ट्रासह देशभरातून पर्यटक सहभागी होतात. महाबळेश्वर जवळ असलेल्या भिलार येथील स्ट्रॉबेरी महोत्सव खूपच लोकप्रिय झाला आहे. या महोत्सवात स्ट्रॉबेरीच्या मार्केटिंगसह विविध उपक्रम राबविले जातात. पर्यटकांसाठी हा महोत्सव पर्वणी ठरत आहे. उत्पादित झालेल्या स्ट्रॉबेरीची अल्पदरात विक्री, गाणी-नृत्याच्या माध्यमातून मनोरंजन, बच्चे कंपनीसाठी विविध उपक्रम या महोत्सवात राबविले जातात. पूर्वी पुस्तकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्या भिलारची ओळख आता स्ट्रॉबेरी महोत्सवाचे गाव म्हणून झाली आहे.
फ्लोरिडातही होतो स्ट्रॉबेरी महोत्सव
फ्लोरिडातील प्लांट सिटी येथेही दरवर्षी स्ट्रॉबेरी महोत्सव आयोजित केला जातो. हा महोत्सव फ्लोरिडा स्ट्रॉबेरी महोत्सव म्हणून जगप्रसिद्ध आहे. स्थानिक लायन्स क्लबच्या पुढाकाराने 1930 मध्ये या वार्षिक स्ट्रॉबेरी महोत्सवाला सुरुवात झाली. फ्लोरिडात उत्पादित होणार्या स्ट्रॉबेरीचा प्रसार करणे, हा त्या मागचा मूळ उद्देश होता. लायन्स क्लबच्या सदस्यांनी 1929 मध्ये या महोत्सवाची संकल्पना मांडली होती. वर्षभरातच या संकल्पनेला मूर्त रूप देण्यात आले. तब्बल 11 दिवस हा महोत्सव चालतो. त्यात मध्यवर्ती फ्लोरिडासह शेजारील बड्या राष्ट्रांमधील सुमारे अर्धा दशलक्ष लोकांचा सहभाग असल्याची माहिती आहे.
स्ट्रॉबेरीविषयी रंजक माहिती
स्ट्रॉबेरी हे फळ मूळचे कुठले? या विषयी बरेच तर्कवितर्क आहेत. उत्तर अमेरिकेतील नागरिक हे फळ त्यांच्याकडचे असल्याचा दावा करतात. तर काहींच्या मते स्ट्रॉबेरी फ्रान्समधील आहे. प्राचीन रोमन साहित्यात स्ट्रॉबेरी फळाचा उल्लेख त्याच्या औषधी वापरासंदर्भात करण्यात आला आहे. 14 व्या शतकात फे्ंरच नागरिकांनी जंगलातून स्ट्रॉबेरी थेट बागेत आणल्याचे मानले जाते. फ्रान्सचा राजा चार्लस् व्ही याने 1364 ते 1380 या कालावधीत त्याच्या रॉयल गार्डनमध्ये 1200 स्ट्रॉबेरीच्या वनस्पती लावल्या होत्या, अशी नोंद इतिहासात आहे. 15 व्या शतकाच्या सुरुवातीला पाश्चिमात्य युरोपियन भिक्षू जंगलातील स्ट्रॉबेरीचा वापर करत असल्याची नोंद त्यांनी प्रकाशित केलेल्या पांडुलिपीत आढळते. इटालियन, फ्लेमिश आणि जर्मन कलेसह इंग्रजी लघुपटांमध्येही स्ट्रॉबेरीचा उल्लेख आहे. 16 व्या शतकात स्ट्रॉबेरीची लागवड सर्वसामान्य झाली. त्यानंतर लोकांनी स्ट्रॉबेरीचा वापर तिच्या औषधी गुणधर्मासाठी करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी वनस्पतीशास्त्रातील तज्ज्ञांनी स्ट्रॉबेरीच्या विविध प्रजाती शोधून काढल्या. 16 व्या शतकाच्या मध्यात इंग्लंडमध्ये स्ट्रॉबेरीची शेती केली जाऊ लागली. 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रान्समधील ब्रिटॅनी येथे प्रथमच गार्डन स्ट्रॉबेरी उगविण्यात आली. पुढच्या काळात स्ट्रॉबेरी फळ म्हणून तसेच विविध अन्नपदार्थांमध्ये फ्लेवर म्हणून लोकप्रिय झाली.