कापूस हे महाराष्ट्रातील प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा व खानदेशातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे नगदी पीक आहे. सन 2002 साली बोंडअळीच्या प्रतिबंधासाठी बीटी कापूस लागवडीस सुरुवात झाल्यापासून कपाशीचे क्षेत्र व उत्पादनामध्ये भरीव वाढ झाली आहे. त्याचबरोबर नवीन किडी, पावसाचा लहरीपणा, वातावरणातील बदल, किंडीचे बदलते स्वरूप, किडीमध्ये रासायनिक कीटकनाशके व बीटी जनूकासंबंधी निर्माण होत असलेली प्रतिकारशक्ती अशा अनेक कारणामुळे कपाशीचे अपेक्षित शाश्वत उत्पादन मिळत नाही. सध्या बीटी कपाशीवर सर्वात ज्वलंत समस्या शेंदरी बोंडअळी तसेच कायिकवाढीच्या काळात रस शोषण करणाऱ्या किडींचा आहे.
गुलाबी बोंडअळीची ओळख व जीवनक्रम
शेंदरीबोंड अळीचे शास्त्रीय नाव पेक्टीनोफोरा गॉसिपियाला (PectinophoragossypiellaL) आहे. ही अळी मूळची भारत आणि पाकिस्तान या देशातील असल्याचे आढळून येते. गुलाबी बोंडअळीच्या जीवनक्रमामध्ये एकूण चार अवस्था आढळून येतात.
अंडी
मादी पतंग फुलावर, नवीन बोंडावर, देठावर आणि कोवळ्या पानाच्या खालच्या बाजूस शंभर ते दीडशे अंडी एक-एक किंवा (आठ ते दहा अंडी) लहान अंडीपुंज घालते. अंडी सूक्ष्म असून पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राचा वापर करावा लागतो. अंडी लांबट व चपटी असून रंगाने मोत्यासारखी चकचकीत पांढरी असतात.
अळी
हवामानानुसार अंड्यातून तीन ते पाच दिवसात बारीक पांढुरकी अळीबाहेर आल्यानंतर (एक ते तीन दिवसात) बीज कोशात किंवा छोट्या बोंडामध्ये ताबडतोब शिरते. अंड्यातून बाहेर आलेली अळी पांढुरकी तर पूर्ण वाढ झालेली अळी शेंदरी किंवा गुलाबी रंगाची असते. ही अळी पंधरा ते वीस मि. मी. लांब असून डोके गडद रंगाचे असते. गडद सेंद्रिय रंग हा सरकीवर उपजीविका केल्याने येतो.
कोष
अळीही सरकीमध्ये, बोंडामध्ये, उमललेल्या बोंडातील कापसामध्ये किंवा अळी अवस्था पूर्ण झाल्यानंतर बोंडाला गोल छिद्र करून बाहेर पडते आणि जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यात मातीच्या ढेकळाखाली कोशावस्थेत जाते. अळी चार अवस्था मधून जाते व त्या पूर्ण होण्यास 12 ते 21 दिवस लागतात. तर कोष अवस्था सहा ते वीस दिवसांची असते.
पतंग
रेशमी आवरणातील कोश दहा मि.मी.लांब तर पतंग गर्द बदामी रंगाचा किंवा राखट करड्या रंगाचा 5 ते 10 मि.मी.लांबीचा असून पंखावर बारीक काळे ठिपके असतात. साधारणतः नर व मादी एकास एक या प्रमाणात तयार होतात व 2 ते 3 दिवसानंतर समागम होतो. जीवनक्रम 3 ते 6 आठवड्यात पूर्ण होतो. शेंदरी बोंडअळी हिवाळ्यात सुप्तावस्थेत जाते.
प्रादुर्भावाची कारणे
– दीर्घकाळ वाढणाऱ्या संकरित वाणाची लागवड केल्याने शेंदरीबोंडअळीच्या वाढीसाठी सतत पोषक वातावरण निर्माण होते.
– पूर्व हंगामी (एप्रिल- मे) लागवड केलेल्या कापसाचा फुलोरा जून- जुलै मध्ये येणाऱ्या कमी तीव्रतेच्या गुलाबी बोंडअळीसाठी लाभदायक ठरतो.
– गुलाबीबोंडअळीने क्राय 1 एसी आणि क्राय 2 एबी या दोन्ही जनूकाप्रती प्रतिकार निर्माण केला आहे. त्यामुळे त्या बोल गार्ड 2 वरती सहजपणे जगू शकतात.
– कपाशीचे पीक नोव्हेंबर नंतर किंवा काही शेतामध्ये एप्रिल- मे पर्यंत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीला वर्षभर निरंतर खाद्य पुरवठा होत राहतो.
– गैर बीटी कपाशीचा रेफ्युजी आश्रय पीक म्हणून वापर न करणे.
– सुरुवातीच्या काळात रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस, फिप्रोनील किंवा ऍसिफेट यासारख्या कीटकनाशकांची तीन ते चार वेळा बीटी कपाशीवर फवारणी केल्याने हिरव्या पानांची पुन्हा वाढ होते तर फुले व बोंडांची वाढ खुंटते. अशा कीटकनाशकांची एकत्रितपणे फवारणी केल्याने हिरव्या व फुटलेल्या बोंडामध्ये दुसऱ्या वेचणीत शेंदरीबोंड आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
नुकसानीचा प्रकार
डोमकळी
प्रादुर्भावग्रस्त फुल
निकास छिद्र
प्रादुर्भावग्रस्त कापूस
– अंड्यातून निघालेली अळी ताबडतोब पाते, कळ्या, फुले व बोंडांना छोटे छिद्र करून आत शिरते.
– सुरुवातीला अळ्या पाते, कळ्या, फुलावर उपजीविका करतात.
– प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखे दिसतात अशा कळ्यांना डोमकळ्या म्हणतात.
– प्रादुर्भावग्रस्त पाते,बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात.
– बोंडामध्ये अळी शिरली की तिची विष्ठा व बोंडाचे बारीक कण यांच्या साह्याने छिद्र बंद करते.
– अळी बोंडातील बिया खाते. त्याचबरोबर रुई कातरून नुकसान करते.
एकात्मिक व्यवस्थापन
1.मशागत पद्धती
– स्वच्छता मोहीम आणि मार्च एप्रिल महिन्यात खोल नांगरणी करावी.
– काळ्या मध्यम आणि भारी जमिनीमध्ये 180 दिवसापेक्षा कमी कालावधीच्या रस शोषक किडींना सहनशील संकरित बीटी वाणाची लागवड करावी.
– सध्या संकरित बीटी वाणाच्या पिशवीमध्ये 5 % नॉन बीटी रेफ्युजी मिश्रित बियाणे असल्यामुळेकपाशीच्या सभोवती नॉन बीटी रेफ्युजी कपाशीची लागवड करायची गरज भासत नाही. तसेच कपाशीवरील किंडीच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मुंग, झेंडू व एरंडी या मिश्र सापळा पिकांची एक ओळ लावावी.
– डिसेंबर किंवा जानेवारी दरम्यान कपाशीचे पीक पूर्णपणे काढून टाकावे व त्यापुढे खोडवा किंवा फरदर घेऊ नये.
2. भौतिक /यांत्रिक पद्धती
-बोंड आळी ग्रस्त डोमकळ्या तोडून अळीसहित नष्ट कराव्यात.
-कापूस लागवडीच्या 45 दिवसापासून पुढे सर्वेक्षणासाठी पिकात हेक्टरी 5 तर मोठ्या प्रमाणावर पतंग पकडण्यासाठी हेक्ट्री 20 कामगंध सापळे लावावे व त्यात अडकलेल्या पतंग वेळेच्या वेळी नष्ट करावेत.
3. जैविक पद्धती
– पिक उगवल्यानंतर 60 ते 90 दिवसांनी ट्रायकोग्रामा बॅकटरी अथवा ट्रायकोग्रामा चीलोणीस यापरोपजीवी कीटकांची 1.5 लक्ष अंडी प्रती हेक्टर या प्रमाणात प्रसारित करावीत
– गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतात पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा, अझाडीरेक्टीन 1000 पीपीएम 1 मिली किंवा 1500 पीपीएम 2.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
– बिहेरिया बेसियाना 1.15% विद्राव्य घटक असलेली भुकटी (2 किलो प्रति हेक्टर) 40 ते 50 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून वातावरणात आद्रता असताना फवारावी
4. रासायनिक पद्धती:
-शेंदरी बोंडअळीच्या पतंगाकरिता सर्वेक्षण पाहणी करावी प्रत्येक दिवशी शेतात प्रतिसापळा 8 पेक्षा जास्त पतंग सलग तीन दिवस आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेसमजून खालील कीटकनाशकाची फवारणी करावी व ऑक्टोबरच्या मध्यापासून नोव्हेंबर पर्यंत क्लोरोपायरीफॉस किंवा क्युनोलफॉसची एखादी फवारणी घ्यावी.
-नोव्हेंबर पूर्वी गुलाबी बोंड आळीच्या व्यवस्थापनाकरिता सिंथेटिक पायरेथ्राईडचा वापर कटाक्षाने टाळावा जेणेकरून पांढऱ्या माशीचा उद्रेक होणार नाही.
-किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर क़्विनॉलफॉस 20 इसी 20 मिली 10 लिटर पाणी किंवा क्लोरोपायरीफॉस 20 इसी 25 मिली 10 लिटर पाणी किंवा प्रोफेनोफॉस 50 सीसी 20 मिली 10 लिटर पाणी यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
श्री. प्रदीप मोरे (वरिष्ठ व्यवस्थापक)
मो. नं. :- 9921773999
श्री. समाधान पवार (वनस्पती रोगशास्त्रज्ञ)
मो. नं. :- 7776030109
अजीत सीड्स प्रा.लि., औरंगाबाद (छ. संभाजीनगर)