मागील हंगामात असलेला दुष्काळ व विविध संस्थानी दिलेला हवामानाचा नकारात्मक अंदाज लक्षात घेत महाराष्ट्र सरकारने कृत्रिम पाऊस पडण्यासाठी (एरियल क्लाऊड सीडिंग) 30 कोटी रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी औरंगाबाद येथे सी बॅन्ड डॉपलर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात आली आहे. काय आहे हे तंत्रज्ञान, कसा पाडला जातो कृत्रिम पाउस या बद्दल जाणून घेवूया या अंकात ..
‘मान्सून’ या एका शब्दावर भारतातील शेती, उद्योग यांच्यासह देशाची एकूण अर्थव्यवस्था आणि लोकसंस्कृती अवलंबून आहे. अरबी भाषेतील मौसिम या शब्दापासून मान्सून हा शब्द आला आहे. मौसिम या शब्दाचा अरबी भाषेत अर्थ ‘ऋतू’ असा होतो. जागतिक हवामान बदल व इतरही काही घटकामुळे सध्याचे पाऊसमान लहरी व अनिश्चित झाले आहे. त्यामुळे एकंदरीतच शेती व त्यानिगडीत सर्व घटक प्रभावित होऊन त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. नवनवीन संशोधनाच्या जोरावर कृत्रिमरीत्या पाऊस पाडून हा परिणाम काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न काही देशात होतांना दिसतो. यालाच क्लाऊड सीडिंग (कृत्रिम पाऊस) असे म्हटले जाते.
साऊथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरम (सॅसकॉफ) यांची काठमांडु येथे नुकतीच परिषद झाली़. त्यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पश्चिम किनारा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा काही भाग येथे सरासरीपेक्षा जवळपास 40 टक्के कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे़. चार महिन्यासाठीचा हा अंदाज व्यक्त केला आहे़. म्हणजे यावर्षीसुद्धा खालीलप्रमाणे पावसाची परिस्थिती राहील असे दिसते
ढगांचा मृदंग नाही
विजेची टाळी नाही
बेडकाचा आर्जव नाही
ना खळाळते झरे.
दवांचे मोती नाहीत हल्ली
ओल्या पानांवर पहुडलेले..
मागील हंगामात असलेला दुष्काळ व विविध संस्थानी दिलेला हवामानाचा नकारात्मक अंदाज लक्षात घेत महाराष्ट्र सरकारने कृत्रिम पाऊस पडण्यासाठी (एरियल क्लाऊड सीडिंग) प्रयत्न सुरु केले आहे
नैसर्गिकरीत्या पाऊस कसा पडतो ?
वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे (बाष्पयुक्त) वारे म्हणजे मान्सून ढग असतात. मकर संक्रात तसंच होळीच्या वेळी सूर्य कर्कवृत्तावरून मकरवृत्तावर आणि मकरवृत्तावरून कर्कवृत्तावर येतो. या दोन रेषांवर तो फिरत असतो. साधारणत मान्सूनच्या वेळी सूर्याचं संक्रमण दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात होतं. आपला देश उत्तर गोलार्धात आहे, त्यामुळे जमीन आणि समुद्राचं पाणी तापतं. त्यामुळे मान्सूनला अनुकूल वातावरण तयार होते. दिवसा जमीन ही समुद्रापेक्षा लवकर तापते त्यामुळे सायंकाळी जमिनीचे तापमान समुद्रापेक्षा जास्त असते. त्या जास्त तापमानामुळे तेथे हवेचा दाब कमी असतो. वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. त्यामुळे दुपारी वारे हळूहळू जास्त दाबाकडून कमी दाबाकडे अर्थात समुद्रावरून जमिनीकडे वाहू लागतात. किनारीप्रदेशात ही प्रक्रिया रोज घडत असते. परंतु, ही प्रक्रिया जेव्हा मोठ्या प्रमाणात घडते. तेव्हा वारे दक्षिण गोलार्धातील सागराकडून तापलेल्या उत्तर गोलार्धातील जमिनीकडे वाहू लागतात. साहजिकच समुद्रावरून येणारे वारे आपल्यासोबत मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून आणतात. या वार्यांची दिशा भारताची नैऋत्य बाजू आहे. त्यामुळेच याला ‘नैऋत्य मोसमी वारे’ असेही म्हणतात. या वार्यांमुळे भारतात व इतर काही शेजारील देशात पाऊस पडतो. परंतु काही घडामोडी मुळे भारतातील पाऊस हा प्रभावित होतो यामध्ये ‘अल निनो’ आणि ’ला नीनाचा’ व इतर काही वादळांचा प्रभाव तसेच कमी दाबाचा पट्टा हे घटक नैऋत्य मान्सून वार्यांवर प्रभाव टाकतात यामुळे भारताच्या मान्सूनवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे सरासरीपेक्षा पर्जन्यमान घटू शकते.
कृत्रिम पाऊस कसा पडतो
वरीलप्रमाणे पाऊस अनिश्चित आहे असे हवामान खात्याने जर अंदाज व्यक्त केला, तर कृत्रिम पाऊस हा पर्याय अलीकडे प्रचलित झाला आहे. कृत्रिम पाऊस कसा होतो ते पाहूया. पाऊस पाडण्यासाठी ढगांमधल्या बाष्पाची क्षमता, तापमान, वार्याची दिशा आणि वेग असे अनेक घटक आवश्यक असतात. यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते. अशावेळी ढगांमधलं बाष्पाचं प्रमाण वाढवून ते विशिष्ट तापमानाला थंड केलं की त्याचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं. काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने (सिल्व्हर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड, कोरडे बर्फ स्वरूपात कार्बन डायऑक्साइड, प्रोपेन, कॅल्शियम कार्बाइड, अमोनियम नायट्रेट, सोडियम क्लोराईड, रासायनिक फॉर्मूला सीएच 4 एन 2 ओ सह कार्बामाइड इ. रसायने ) फवारून पाऊस पाडणे, म्हणजेच कृत्रिम पाऊस. हा पाउस पाडण्यासाठी उंच टेकडीवर सयंत्र बसवून त्याद्वारे रसायने फवारणी केली जाते किंवा क्षेपणास्त्रे डागून, विमानाने रसायने फवारून किंवा ड्रोन द्वारा हा प्रयोग केला जातो.,
ढगांवर रसायने फवारून पाऊस पाडण्याप्रमाणेच गारांचा आकार कमी करण्यासाठीसुद्धा या प्रयोगांचा उपयोग केला जातो. हवेतले बाष्प एकत्र येऊन पावसाचा थेंब बनण्यासाठी एखाद्या लहानशा कणाची आवश्यकता असते. एखादा सूक्ष्म कण हा पावसाच्या थेंबाच्या केंद्राची भूमिका बजावतो. या केंद्रावर बाष्प जमा होत जाते आणि त्याचा आकार वाढला की तो पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडतो. पण ही पावसाच्या थेंबाची निर्मिती नैसर्गिकरीत्या थांबते, तेव्हा ती कृत्रिम रित्या घडवून आणावी लागते. त्यासाठी काळ्या ढगांवर सोडियम क्लोराईड म्हणजेच मिठाचे कण फवारले जातात. मिठाच्या पाणी शोषण्याच्या गुणधर्मामुळे या कणांभोवती ढगातील बाष्प जमा होते. त्याचा आकार वाढला की बाष्प पावसाचे थेंब म्हणून खाली पडते. एकदा ही क्रिया सुरू झाली की पाऊस पडायला सुरुवात होते. काळ्या ढगांप्रमाणेच अधिक उंचीवर असलेल्या पांढर्या ढगांमधूनही पाऊस पाडता येतो. त्यासाठी सिल्व्हर आयोडाईड फवारले जाते. अमेरिका, इस्रायल, चीन, कॅनडा, रशिया, आफ्रिकेतील काही देश आणि युरोपीय देशांमध्येसुद्धा असे प्रयोग केले जातात. चीन येथे ओलम्पिक पूर्वी तर रशिया तही असा प्रयोग झाला होता. अमेरिका, कॅनडासारख्या ठिकाणी गारांचा आकार फार मोठा असतो. तिथेसुद्धा सोडियम आयोडाईडचे ‘कण’ फवारले की गारांची संख्या वाढते, पण त्यांचा आकार कमी होऊ शकतो.
उष्ण ढगांत 14 मायक्रॉन आकाराचे मेघ-बिंदू/बाष्प जेव्हा नसते, त्यावेळेस ते तयार होण्यासाठी त्या ढगांत सोडियम क्लोराइड म्हणजेच मिठाच्या 4-10 मायक्रॉन आकाराच्या पावडरचा ढगांच्या पायांमधील उर्ध्व स्रोत असलेल्या भागात फवारणी करतात. मिठाला पाण्याचे आकर्षण असते. हे फवारलेले मिठाचे कण ढगात पसरतात. त्यामुळे ढगातील बाष्प शोषून त्यांचा आकार 14 मायक्रॉनपेक्षा वाढतो. यामुळे ढगांतून पाऊस पडायला सुरवात होते. थंड ढगात जेंव्हा हिम कण तयार होण्यासाठी लागणार्या केंद्र बिंदूंचा अभाव असतो त्यावेळेस त्या ढगावर वरून सिल्व्हर आयोडाइडच्या कणांचा फवारा केला जातो. या कणांचा आकार हिम स्फटिकासारखा असतो. त्यामुळे त्यावर हिम कण वेगाने तयार होवून वाढू लागतात. त्यांचा आकार पुरेसा वाढला की ते खाली जमिनीकडे झेपावतात. अशा रीतीने जो ढग पाऊस देण्यास असमर्थ होता, त्याच ढगातून या पद्धतीमुळे पाऊस पडता येतो. ढगांत एका ठरावीक आकाराचे मिठाचे कण किंवा सिल्व्हर आयोडाइडचे कण फवारणे म्हणजे कृत्रिम पाऊस पडण्याची सुरुवात आहे. त्यासाठी उंच डोंगरावर सयंत्र लावून ,रॉकेट अथवा विमानातून रसायने फवारून हे कण त्या ढगांत थांबलेली नैसर्गिकरित्या पाऊस पडण्याची प्रक्रिया उत्तेजित करतात व पाऊस पडला जातो.
पावसाची शाश्वती
विमानाने कृत्रिम पाऊस पडण्याचा प्रयोग मान्सून पूर्व आणि मान्सूनोत्तर काळात करणे अतिशय धोकादायक आहे. वातावरणात असणारी अस्थिरता आणि हवेचा ऊर्ध्व झोत यामुळे विमान अपघात होण्याची शक्यता असते. तसेच योग्य ठिकाणी बीजारोपण न झाल्याने प्रयोग वाया जाण्याचीच शक्यता जास्त असते. कृत्रिम पावसाच्या प्रयोगात रासायनिक फवारणी जास्त झाल्यास ढग नष्ट होतात आणि पाऊस देखील पडत नाही. परिणामी सर्व प्रयोग वाया जातो. तसेच हे ढग नष्ट झाल्याने वार्यांच्या दिशेने पुढच्या प्रदेशासाठी देखील ते उपलब्ध होत नाही परिणामी एक प्रकारे या प्रदेशातील ढगांची चोरीच घडते.
दरम्यान हवामान खात्याने यंदाच्या पावसाचा दिलेला अंदाज आणि मराठवाडा आणि विदर्भातील सध्याची आणि संभाव्य दुष्काळाची स्थिती लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने मंत्रीमंडळात 30 कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली. विमानाद्वारे हा कृत्रिम पाऊस (-शीळरश्र उर्श्रेीव डशशवळपस) पाडला जाणार आहे.
कृत्रिम पाऊस पाडण्याचे दुष्परिणाम
कृत्रिम पाऊस पाडण्याचे अनेक दुष्परिणाम असून त्यामुळे शेती आणि मातीचे नुकसान होण्यासोबतच नैसर्गिक ढग विरण्याचीही शक्यता असते. हे लक्षात घेऊन ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत या प्रयोगांवर बंदी आहे. चीनमध्ये या प्रकारचे प्रयोग यशस्वी असले तरी त्याचा ‘फॉर्म्युला’ चीनने कुणाला दिलेला नाही. तसेच ते जमिनीवरून ढगांवर अग्निबाणांचा मारा करतात. मात्र आपल्याकडे विमानद्वारे ढगांवर अग्निबाणांचा मारा केला जातो. हे हवामानाच्या घातक असल्याची भीती हवामान आणि पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
ढगांची चोरी अथवा कृत्रिम पावसाच्या प्रयोगात ढग खर्ची पडल्याने पुढील भागात ढग जात नाहीत आणि त्यामुळे पुढील प्रदेशात पाऊस न झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ शकते. इतकेच नव्हे तर ढगामध्ये फवारणी करण्यात येणारे रसायन प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात फवारले गेले तर असलेले ढग देखील विरून जाऊन नष्ट होतात आणि नैसर्गिक होणार पाऊस देखील मग होत नाही.
याशिवाय कृत्रिम पावसाच्या प्रयोगात वापरले जाणार सिल्व्हर आयोडाइड हे रसायन विषारी असल्याने पर्यावरण आणि सस्तन प्राण्यांसाठी घातक आहे. शेत जमिनीतील मातीत मिसळल्यामुळे मृदा प्रदूषण होऊन पिकांसाठी देखील घातक ठरते. सिल्व्हर आयोडाइड हे विषारी असल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचते. या कारणास्तव ऑस्ट्रेलियामध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर बंदी आहे.
प्रत्येक उड्डाणाला लाखाचा खर्च
कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी एजन्सी नेमणे, परदेशातून डॉप्लर रडार घेणे. खाजगी विमान, तसेच विमानाचे कोणत्याही वेळेस करण्यात येणारे टेकऑफ, विमानाची पार्किंग, कृत्रिम पावसासाठी आवश्यक असलेल्या फ्लेअर्सच अन्य रासायनिक पदार्थ ठेवण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाची परवानगीचीही आवश्यकता असते. विमानतळामध्ये विमान उतरविणे किंवा उड्डाण घेणे यांपासून विमानाला माहिती देण्यापर्यंतच्या कामासाठी दर आकारले जाते. याशिवाय विमानतळ परिसरात वस्तू ठेवण्याबाबतही भाडे आकारण्यात येते. विमानाच्या प्रत्येक उड्डाणासाठी 70 हजार ते एक लाख रुपये खर्च येतो.
जागतिक इतिहास
4 जुलै 1906 रोजी अमेरिकेत जन्मलेल्या केमिस्ट आणि हवामानशास्त्रज्ञ असलेल्या विन्सेंट जोसेफ श्फेफर यांना कृत्रिम पाऊस पडण्याच्या प्रयोगाचे श्रेय जाते. हवामानशास्त्र व हवामान नियंत्रणातील क्लाउड बीडिंगच्या संशोधनासाठी शेफेर यांना ओळखले जाते. 13 नोव्हें 1946 रोजी त्यांनी मॅसॅच्युसेट्स मधील माउंट ग्रीलॉकवर (घन कार्बन डायऑक्साईड) फवारणी करून यशस्वी प्रयोग केला. यानंतर या पद्धतीमध्ये विविध बदल होत जाऊन नवनवीन तंत्र विकसित झाले.
चीन
कृत्रिम पाऊस पडण्याच्या बाबतीत चीन हा देश सर्वात आघाडीवर आहे. 2008 ओलंपिकच्या आधीच बीजिंगमध्ये प्रदूषण वायू स्वच्छ करण्यासाठी क्लाउड बीडिंगचा वापर केला गेला. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना मध्ये जगातील सर्वात मोठी सर्वात मोठी क्लाउड सिडींग प्रणाली आहे. पावसाची गरज असलेल्या स्थळावर आकाशात चांदीच्या आयोडाईड रॉकेट्सचा वर्षाव करुन पावसाची गरज भागवली गेली त्यांच्या या प्रयोगामुळे राजधानी बीजिंगसह अनेक वाढत्या शुष्क प्रदेशांवर पावसाचे प्रमाण वाढविले. चीनने ऑलंपिक हंगामासाठी 2008 मध्ये बीजिंगमध्ये क्लाउड सिडींग प्रणाली वापरली गेली. फेब्रुवारी 2009 मध्ये, चीनने चार महिन्यांच्या दुष्काळानंतर कृत्रिमरित्या हिमवादळ तयार करण्यात आले. चीनच्या दाव्यानुसार त्यांनी सर्व प्रथम 1987 पासून क्लाउड सिडींग पद्धतीने सर्वात आधी पहिला हिमवर्षाव केला आहे.
भारत
भारतात 1983, 84, 87, 93, 94 या काळात गंभीर दुष्काळामुळे तमिळनाडु सरकारने क्लाउड सिडींग ऑपरेशन केले होते. 2003 मध्ये कर्नाटक, 2003, 2004 मध्ये महाराष्ट्रात, 2003- 2007 आंध्र प्रदेशात असे प्रयोग अमेरिकन कंपनी द्वारा करण्यात आले. तसेच दुसरा प्रयोग पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटरीऑलॉजी (आयआयटीएम) या संस्थेच्या अधिपत्याखाली 2009-2011 मध्ये राबविण्यात आला.
त्याच वर्षी महाराष्ट्र राज्यात देखील हा प्रयोग करण्यात आला. 2008 मध्ये आंध्रप्रदेशच्या 12 जिल्ह्यांसाठी हि योजना राबविली गेली. महाराष्ट्रात 2015 साली औरंगाबाद येथे खयाती क्लायमॅट मॉडिफिकेशन या खाजगी कंपनीकडून सी-बँड डॉप्लर रडार बसवण्यात आले होते. या रडारच्या माध्यमातून वैमानिकाला ढगांची स्थिती, घनता, आद्रतेचे प्रमाण, अक्षांक्ष व रेखांश आदींची माहिती देण्यात आली. विमान व रडारच्या माध्यमातून तब्बल 90 दिवस प्रयोग करण्यात येणार होता मात्र, वातावरणात पाऊस पाडण्यासाठी उपयुक्त ढगच नसल्यामुळे प्रयोगाला ग्रहण लागले.
4 ऑगस्ट ते नोव्हेंबर 2015 च्या अखेपर्यंत सोडियम क्लोराइडच्या साहाय्याने कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग 34 दिवस झाला. त्यातून भुरभुर पावसाच्या पलिकडे हाती काही लागले नाही.
2015 मधील ऑगस्टमधील सरासरी पावसाची नोंद
एकूण पाऊस = 290.3 मि.मी.
ऑगस्ट = 7.26 मि.मी.
सप्टेंबर = 19.47 मि.मी.
ऑक्टोबर = 21.42 मि.मी.
नोव्हेंबरच्या अखेपर्यंत = 21.42 मि.मी.
4 ते 31 ऑगस्ट 2015 या कालावधीत 11 वेळा ढगांवर रसायनांची फवारणी करण्यात आली होती.
जिल्हा एकूण गांव
औरंगाबाद = 14
जालना = 4
परभणी = 6
लातूर = 7
उस्मानाबाद = 15
बीड = 27
अहमदनगर = 19
बुलढाणा = 3 गावांमध्ये, कमीत कमी एक मि.मी. आणि सर्वाधिक 34 मि.मी. पावसाची नोंद झालेली होती.
सप्टेंबरमध्ये 11 वेळा प्रयोग झाले.
अहमदनगर = 37 गावांमध्ये पाऊस पडला होता. तेव्हा कमीत कमी तीन मि.मी. आणि सर्वाधिक 99 मि.मी. एवढा पाऊस पडला होता. जालना जिल्ह्यातील सहा, बीड जिल्ह्यातील 18, उस्मानाबाद जिल्ह्यातील 25 गावांमध्ये दोन मि.मी. ते सर्वाधिक 26 मि.मी.पर्यंत पाऊस झाला होता. जळगाव, धुळे, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही प्रयोग करण्यात आले.
युरोप
1950 च्या दशकादरम्यान फ्रान्स, जर्मनीमध्ये याचे प्रयोग करण्यात आले.
ऑस्ट्रेलिया
1960 पासून मध्य आणि पश्चिम तास्मानियावर यशस्वी प्रयोग झाल्याचे दिसून आले. त्यामुळे काही भागात 30 टक्के पाऊस वाढ झाली.
संयुक्त अरब अमीरात
येथील सरकारने 2010 मध्ये 11 दशलक्ष डॉलर खर्चून दुबई आणि अबू धाबी येथे पावसाचे वादळ तयार करण्यात यशस्वी झाले आहे. आबू धाबीमध्ये 136 मिमी पावसाचा वर्षाव झाला होता.
प्रयोगाच्या सुरुवातील उंच टेकडीवरून ढगावर रसायने फवारणे त्यांनतर विमानातून व क्षेपणास्त्रे डागून आणि आता ड्रोनद्वारे हा प्रयोग राबविला जातो. याप्रमाणे होत असलेले नवनवीन संशोधन व तंत्रज्ञान यामुळे दुष्काळ घालविण्यासाठी वापरण्यात येणारा कृत्रिम पाऊस का पर्याय भविष्यात दोन देशातील युद्धात सुद्धा उपयोगात आणला तर आश्चर्य वाटू नये इथपर्यंत यात संशोधन झाले आहे. 2018 मध्ये इराणचे ब्रिगेडियर जनरल आणि सिव्हील डिफेंस ऑर्गनाइजेशन के प्रमुख गुलाम रजा जलाली यांनी इस्राईल देशावर ढग चोरीचा आरोप केला होता. याआधी सुद्धा 2011 मध्ये पूर्व राष्ट्रपति महमूद अहमदीनेजाद यांनी युरोपीय देशावर अशाच प्रकारचा आरोप केला होता. यावरून भविष्यातील तिसरे महायुद्ध हे फक्त पाण्यासाठी होईल हि भविष्यवाणी खरी ठरते काय असे वाटायला लागले आहे.
देश प्रयोगाचे वर्ष
अमेरिका 1948
इंग्लंड 1949
थायलंड 1950
फ्रान्स 1950
स्पेन 1950
इस्रायल 1950
बल्गेरिया 1960
ऑस्ट्रेलिया 1960
चीन 1987
भारत 1983
इंडोनेशिया 2013
स्लोव्हेनिया 1983
आफ्रिका 1985
कॅनडा 2006
रशिया 2006
दुबई 2010
मलेशिया 2015
जर्मनी 2015
श्रीलंका 2019 (मार्च)
आतापर्यंत हवामान खात्याने पावसाचा दिलेला अंदाज व प्रत्यक्ष मान्सून आगमन दिनांक
वर्ष प्रत्यक्ष मान्सून आगमन तारीख अंदाज वर्तवलेली तारीख
2005 7 जून 10 जून
2006 26 मे 30 मे
2007 28 मे 24 मे
2008 31 मे 29 मे
2009 23 मे 26 मे
2010 31 मे 30 मे
2011 29 मे 31 मे
2012 5 जून 1 जून
2013 1 जून 3 जून
2014 6 जून 5 जून
2015 31 मे 5 जून
2016 8 जून 7 जून
2017 30 मे 30 मे
2018 29 मे 29 मे