जळगाव : Gulab fulsheti… बाराही महिने भरपूर मागणी असलेले फुल म्हणजेच ‘गुलाब(Rose). गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे. प्रत्येक लग्नसमारंभ असो किंवा वाढदिवस, सभा, गणपती सणवार अशा अनेक कार्यक्रमासाठी गुलाबाची मागणी ही मोठ्या प्रमाणावर होत असते. व्हॅलेंटाईन डे ला तर गुलाबाला उच्चांकी दर मिळत असतो. गुलकंद, अत्तर, गुलाबजल यासाठी देखील गुलाबाच्या फुलांची मागणी होत असते. भारतामध्ये 3000 क्षेत्राखाली गुलाब शेती केली जाते. युरोपात तर गुलाबाला खूप मागणी असते. जगभरात होणाऱ्या फुलांच्या उलाढालीत एकट्या गुलाबाचा वाटा हा 35 ते 40 टक्के आहे.
गुलाब लागवडीसाठी माती
गुलाबाची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत करता येते, जर माती सुपीक असेल आणि त्यात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असेल. वालुकामय चिकणमातीमध्ये केल्यास त्याचा भरपूर फायदा होतो. गुलाबाच्या फुलांची लागवड नेहमी पाण्याचा निचरा असलेल्या जमिनीत करावी. पण लक्षात ठेवा की मातीचे pH मूल्य 6.5 ते 7.5 दरम्यान असावे. या pH ची माती गुलाबाच्या फुलांसाठी चांगली मानली जाते.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
गुलाब लागवडीसाठी हवामान
गुलाब ही समशीतोष्ण हवामानाची वनस्पती आहे. त्याला खूप उष्ण हवामान आवश्यक नाही. हे थंड हवामानात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यासाठी 15 अंश सेंटीग्रेड ते 25 सेंटीग्रेड तापमान योग्य आहे. भारतात याची लागवड सर्व राज्यांमध्ये करता येते. ग्रीनहाऊस आणि पॉली हाऊसमध्ये तुम्ही वर्षभर त्याची लागवड करू शकता.
गुलाब लागवडीसाठी जमीन कशी असावी
गुलाब लागवडीसाठी जमीन ही अति भारी किंवा अति हलकी नसावी. मध्यम स्वरूपाची असावी कि जेणेकरून अतिपाऊस झाला तरी पाण्याचा निचरा झाला पाहिजे. जमिनीचा सामू हा 6 ते 7.5 असायला पाहिजे. गुलाब हे झुडूप वर्गीय असल्याने एकदा लागवड केल्यानंतर 5 ते 6 वर्ष सहज टिकते. गुलाब हे बाराही महिने येणारे पीक आहे त्यामुळे तुम्ही केव्हाही त्याची लागवड करू शकता.
जमिनीची मशागत
जमिनीच्या वरच्या (30 से.मी.) व खालच्या (31-60 से.मी.) थरांचे रासायनिक पृथक्करण करून घ्यावे म्हणजे जमिनीतील क्षारांचे प्रमाण व अन्न द्रव्यांची उपलब्धता लक्षात येईल. त्यानंतर जमिनीचा सामू जर जास्त असेल तर तो योग्य प्रमाणावर आणावा. हलक्या जमिनीत शेणखत, पीट मिसळून त्या जमिनीचा कस वाढवावा, असे करण्याने, अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तर भारी जमिनीतून पाण्याचा निचरा होतो. कोंबडी खत हॉर्न मिलचा वापर टाळावा. लागवडीपूर्वी जमिनीचे निर्जंतूकीकरण करून घ्यावे. त्यासाठी फॉर्मलीन 0.2 टक्के प्रमाणात वापरावे.
गुलाबाच्या जाती
जवळपास गुलाबाच्या 20 हजार जाती आहेत. आपण राहत असलेल्या हवामानानुसार, जमिनीत चांगली वाढणारी टपोरी, सुवासिक व दर्जेदार फुलांचे उत्पादन देणारी जात निवडावी. बाजारात मुख्यत्वे ग्लॅडिएटर, अर्जन, सुपरफास्ट, ब्लू मून, लेडी एक्स, अमेरिका हेरिटेज, लॅडोस, रक्तगंध, बोर्डीक्स या जातीच्या फुलांची मागणी आहे.
लागवडीची पद्धत
गुलाबाची रोपे महागडी असल्यामुळे व ती एकाच जागी 5-6 वर्षे राहणार असल्यामुळे सुरुवातीस लागवड करताना काळजी घ्यावी. लागवडीपूर्वी 24 तास अगोदर रोपांना पाणी दयावे. जमिनीत रोपांसाठी खडडा घ्यावा व त्यात रोपे लावावित. रोपांची मुळे दुमडु नयेत. डोळे भरलेला भाग जमिनीवर 2-3 से.मी. राहील याची काळजी घ्यावी. जास्त खोलवर लावलेल्या रोपांना मूळ कुजव्या रोग होतो व रोपांची वाढ व्यवस्थित होत नाही. रोपांना दररोज व्यवस्थित पाणी दयावे. प्रतिबंधक उपाय म्हणून बुरशीनाशकांच्या एक दोन फवारण्या कराव्यात.
झाडांना वळण देणे वाढणाऱ्या झाडाला जर लगेच फुले येऊ दिली तर झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. झाडाचा आकार नीट राहत नाही. झाडांच्या वाढीच्या काळात वाटाण्याच्या आकाराच्या कळ्या झाल्यावर त्या काढून टाकाव्यात, झाडांची वाढ व्यवथित झाल्यावर मग मोठ्या फांद्या जमिनीपासून 20-30 सें. मी. अंतरावर छाटाव्यात मग त्यावर फुले घेण्यास सुरुवात करावी. फांद्या छाटण्याऐवजी यू आकारात जमिनीलगत वाकविल्या तरी चालतात. त्यामुळे झाडाला जास्तीचा अन्नपुरवठा मिळतो व फुलेही जास्त मिळतात.
खते
जवळजवळ भारतातील सर्वच जमिनीत अन्नद्रव्यांची कमतरता आहे. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी खतांची आवश्यकता भासते. लागवडीपूर्वी व लागवडीनंतर माती परीक्षण खताच्या मात्रा द्याव्यात. लागवडीच्या वेळेस 2 किलो सुपर फॉस्फेट 1 किलो कॅल्शियम अमोनियम नायट्रेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति चौ. मी. द्यावे. तसेच शेणखत, पीत व भूसाही जमिनीत मिसळून द्यावा. एकाच वेळेस खते देण्याएवजी वेगवेगळ्या हफ्त्यात ती विभागून द्यावीत. हरितगृहात द्रवरूप खते पाण्यात मिसळून दिली जातात. प्रत्येकी 200 पीपीएम नत्र व पालाश पाण्यातून रोपांना दिले जाते. त्यासाठी 85 ग्रॅम पोटँशिअम नायट्रेट व 80 ग्रॅम अमोनियम नायट्रेट प्रथम प्रति लिटर पाण्यात घेऊन ते नंतर 200 लिटर पाण्यात मिसळून झाडांना दिले जाते.
आंतरमशागत
नियमित खुरपणी करून तणे काढावीत. मुळयाजवळील माती मोकळी करणे महत्वाचे आहे. तसेच खुंटावरील फूट वेळोवेळी काढावी. पावसाळ्यात आळयामध्ये पाणी साचू देऊ नये.
महत्वाच्या किडी व त्यांचे व्यवस्थापन
खवलेकिड :
ही अतिशय शुक्ष्म कीड असून ती स्वत:भोवती मेणासारख्या चिकट पदार्थाचे कवच तयार करून त्यामध्ये राहते. ही कीड फांद्यावर किंवा पानांवर सतत एकाच ठिकाणी राहून अन्नरस शोषण करते. या कीडीचा प्रादुर्भाव झाल्यास फांदया आणि पाने सुकून जातात.
नियंत्रण –
खवलेकिडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 25 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मावा :
या किडीची पिवळसर हिरवट रंगाची पिल्ले तसेच काळसर तपकिरी रंगाचे प्रौढ किडे कोवळे शेंडे, कळ्या आणि पानांच्या मागील बाजूस पुंजक्याने राहून अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पाने, शेंडे आणि कळ्या निस्तेज होऊन त्यांची वाढ खुंटते. पाने पिवळी पडून वाळतात.
नियंत्रण – या कीडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 33 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
महत्वाचे रोग व त्यांचे व्यवस्थापन
भुरी :
(पावडरी मिल्ड्यु) हा बुरशीजन्य रोग असून गुलाबाच्या झाडांवर सर्वत्र आढळून येतो. या रोगांमुळे गुलाबाचे कोवळे शेंडे, पाने, कळ्या आणि त्यांचे देठ यावर पांढरट रंगाच्या बुरशीची वाढ दिसून येते. बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या भागाची वाढ खुंटते आणि पुढे ते भाग सुकून वाळतात. या रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः हिवाळ्यात जास्त प्रमाणात होतो.
नियंत्रण – या रोगांच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक 20 ग्रॅम किंवा कॅरोथेन (48%) भुकटी 10 ग्रॅम 10 लीटर पाण्यात मिसळून 10-15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
काळे ठिपके :
(ब्लॅक स्पॉट) या बुरशीजन्य रोगामुळे गुलाबाच्या पानांवर गोलाकार, 2-5 मि.ली. आकाराचे काळे, किंवा काळसर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. या रोगामुळे पाने पिवळी होऊन गळून पडतात आणि झाडाची वाढ थांबते. भारी जमीन, अति पाणी असलेल्या जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो.
फुलांची काढणी आणि उत्पादन
गुलाबाची फुले काढतांना ती पुर्णपणे वाढ झालेली असावी. मात्र उमललेली नसावीत. साधारणपणे गुलाबाची छाटणी केल्यापासुन सहा ते आठ आठवड्यांनी फुले तयार होतात. फुलांची काढणी बाजारपेठेनुसार करावी. जसे लांबच्या बाजारपेठेसाठी एक पाकळी उमललेल्या अवस्थेत तर स्थानिक बाजारपेठेकरिता पहिल्या दोन पाकळ्या उमललेली फुले व परदेशी बाजारपेठेत पाठविण्यासाठी बंद कळीच्या अवस्थेत असतांना काढणी करावी. तसेच हार तयार करण्यासाठी, अत्तर तयार करण्यासाठी, देवाला वाहण्यासाठी अथवा गुलकंदसारखे पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी करावी.
फुलांची काढणी सकाळी अथवा संध्याकाळी करावी. काढणी करताना फुलांच्या दांडयाची लांबी साधारणपणे स्थानिक बाजारपेठेसाठी 20-30 से.मी., लांबच्या बाजारपेठेसाठी 30-45 से.मी., अति लांबच्या बाजारपेठेसाठी 45-60 से.मी. तर परदेशी बाजारपेठेसाठी 60 से.मी. पेक्षा जास्त असावी. फुलांचा दांडा जेवढा लांब तेवढे फुलांचे काढणी नंतरचे आयुष्य जास्त असते. गुलाबाचे जाती, वय व अंतरानुसार प्रती झाड प्रती वर्ष 50-60 फुलांचे उत्पन्न मिळते. एक वर्षानंतर गुलाबाचे हेक्टरी 3 लाख, दोन वर्षानंतर 6 लाख आणि 3 वर्षांनंतर 8 लाख फुले मिळतात.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇