भूषण वडनेरे
धुळे : तालुक्यातील रतनपूरा येथील भारती नरेंद्र पाटील यांनी सुरवातीला काही वर्षे बचतगट चालविला. मात्र, नवीन काहीतरी करण्याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आपल्यासोबतच आपल्या ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक उन्नती झाली पाहीजे, या विचारातून त्यांनी धुळे जिल्हयातील पहिली वहिली महिला शेतकरी उत्पादक कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. अन अवघ्या तीन लाखांच्या भागभांडवलावर त्यांनी ऑगस्ट 2019 ला कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. आता या कंपनीची उलाढाल एक कोटीच्या घरात गेली असून कंपनीमार्फत शेतकरी सभासदांना माफक दरात खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन दिली जात आहेत. आजमितीस कंपनीची सभासद संख्या 389 झाली असून परिसरातील एकूण 8 गावांमध्ये कंपनीचे काम सुरु आहे.
FPC (फार्मर प्रोड्युसर कंपनी) ला ₹ 10 कोटींपर्यंतचे कर्ज.. 3 कोटींपासून 6 कोटींपर्यंत अनुदानाच्या योजना
https://eagroworld.in/loan-up-to-%e2%82%b9-10-crore-to-fpc-farmer-producer-company/
रतनपुरा येथील भारती नरेंद्र पाटील यांचा सुरवातीला बचत होता. यावेळी त्या लुपीन फाउंडेशनमध्ये क्लस्टर काउंन्सलर म्हणूनही त्या काम करत. त्यातूनच त्यांना महिला उदयोजिका होण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे शिक्षण केवळ 12वी पर्यंत झाले असले तरी त्यांनी उराशी मोठे स्वप्न बाळगले. शेतकर्यांसाठी काहीतरी करण्याची तळमळ त्यांची अंगी होती. कारण वडीलांची शेती असल्यामुळे शेतकर्यांना येणार्या अडचणी त्या जाणून होत्या. बाहेरील व्यापार्यांकडून शेतकर्यांची होत असलेली पिळवणूक त्यांनी जवळून पाहीली होती. त्यामूळे कृषी निविष्ठा क्षेत्रात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बचतगटातील महिलांना त्यांनी आपला निर्णय बोलून दाखवला.
ग्रामीण भागातील महिलांनीही व्यापार-व्यवसायात उतरुन स्वावलंबी झाले पाहीजे, त्यांना रोजगार मिळाला पाहीजे, या विचाराने त्या झपाटून गेल्या होत्या. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी लुपिन फाउंडेशन, नाबार्ड, कृषी विभाग यांची मोलाची मदत मिळाली. सुरुवातीला केवळ दहा महिलांना सोबत घेवून त्यांनी ऑगस्ट 2019 मध्ये महिला खान्देशी शेतकरी उत्पादक कंपनी लि. रतनपूरा ता.धुळे या कंपनीची स्थापना केली. आणि कंपनीचे काम केवळ शेतीपुरताच मर्यादीत न ठेवता ग्रामीण भागातील युवतींना प्रशिक्षित करणे, त्यांना रोजगार मिळवून देणे, महिला सशक्तीकरण, सबलीकरणास प्राधान्य देणे इ. कामेही सुरु केली. त्यामुळे पहाता पहाता कंपनीची लोकप्रियता व सभासद संख्याही झपाटयाने वाढू लागली.
शेतकर्यांचा उत्स़फूर्त प्रतिसाद
कंपनीची स्थापना केल्यानंतर गावातीलच 70 बाय 30 फुट पत्र्याचे शेड असलेल्या गोडाउनमध्ये कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून कंपनीचे काम सुरु केले. या केंद्राच्या माध्यमातून शेतकर्याना कमी खर्चात दर्जेदार बी-बियाणे, खते, मान्यता प्राप्त कंपनीचे कीटकनाशके, रोगनाशके इत्यादी निविष्ठा उपलब्ध करून देण्यात आले. बाजार पेठेपेक्षा कमी दरात खते, बियाणे उपलब्ध होवू लागल्यामुळे त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर करोना महामारीमुळे लॉकडाउन लागले. तथापि, करोना काळातही शेती सुरुच होती. त्यामुळे कंपनीच्या व्यवसायावर फारक जाणवला नाही. त्यामुळेच सन 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीचा टर्नओव्हर 98 लाखांवर गेला. त्यातून कंपनीला सुमारे 8 लाखांचा निव्वळ नफा झाला.
निर्मल बायो संजीवनी । Bio Sanjivani।
जैन इरिगेशन कंपनीशी करार
सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणार्या शेतकर्यांना जैन सूक्ष्म सिंचन प्रणाली ड्रीप संच अल्प नफा तत्वावर उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल, या विचारातून कंपनीने सन 2022 मध्ये जळगाव येथील जैन इरिगेशन कंपनीशी करार केला. त्यामुळे भागातील शेतकर्यांना परवडणार्या दरात सुक्ष्म सिंचन प्रणाली ड्रिप संच उपलब्ध झाला. विशेष म्हणजे कंपनीने पहिल्या आठ महिन्यात एक कोटींचा माल विक्री केला. त्यामुळे सन 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 1.10 कोटी रुपयांवर गेला. यातून कंपनीला सुमारे पंधरा लाखांचा निव्वळ नफा झाला.
शेतीवरील खर्च कमी करण्यास प्राधान्य
कंपनीची स्थापना मुळातच शेतकर्यांच्या कल्याणासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी हित डोळयासमोर ठेवूनच कंपनीची वाटचाल सुरु आहे. त्यासाठी कंपनी शेतकर्यांना कमी खर्चात दर्जेदार बी-बियाणे, खते, मान्यता प्राप्त कंपनीचे कीटकनाशके, रोगनाशके इत्यादी निविष्ठा उपलब्ध करून देते.त्यामुळे शेतीवरील उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत आहे. शिवाय कंपनीकडून एकात्मिक शेती पद्धती बरोबर शाश्वत शेती उत्पादनाला प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची मोठी मदत होत आहे.
कृषी विज्ञान केंद्राचे मोलाचे सहकार्य लाभले – भारती पाटील
खान्देशी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सभासद शेतकर्यांना बाजारापेक्षा कमी दरात खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात येतात. कंपनीच्या उभारणीसाठी नाबार्ड व लुपीन फाउंडेशनची मोठी मदत झाली. तसेच धुळयातील कृषी विज्ञान केंद्राचेही मोलाचे सहकार्य लाभले. कंपनीचा टर्नओव्हर आता कोटीच्या घरात गेला आहे. धुळे जिल्हयात आमची पहिलीच महिला शेतकरी उत्पादक कंपनी आहे. महिलांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम आम्ही राबवितो. तसेच शेतकर्यांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कंपनी स्थापन करण्यासाठी पतीसह कुटूंबाचेही मोठे पाठबळ मिळाले. त्यामुळे हे सर्व शक्य झाले.
– भारती पाटील, अध्यक्षा
महिला खान्देशी शेतकरी उत्पादक कंपनी लि.,
रतनपुरा, ता. जि. धुळे.