शेतकऱ्यांना कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाना सामोरे जावे लागते. मात्र, या संकटातून देखील शेतकरी मार्ग काढून पिकातून भरघोस उत्पादन घेत आहे. अशाच एका शेतकऱ्याने कोथिंबिरीचे चांगले उत्पादन घेऊन या शेतीतून चांगला नफा मिळवला आहे. रमाकांत वळके -पाटील असे या शेतकऱ्याचे नाव असून ते लातूर जिल्ह्यातील आशिव गावचे रहिवासी आहेत.
सुरुवातीला रमाकांत वळके -पाटील यांनी द्राक्ष, ऊस यासारख्या फळबागांचे आपल्या शेतात प्रयोग केले. मात्र, खर्च वजा जात नफा हाती न येता निराशाच येत होती. शेती कशी फायदेशीर करायची ? यासाठी रमाकांत यांनी शेती व्यवसायासह पीक पद्धतीचा अभ्यास केला. आणि पुन्हा शेतीत वेगळा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले. चांगला नफा हा फक्त फळबागेतूनच होतो असे नाही पालेभाज्या लागवडीतून देखील होऊ शकतो हे रमाकांत वळके -पाटील यांनी करून दाखवून दिले आहे. रमाकांत यांनी पीक पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर फळबाग क्षेत्रावर कोथिंबिरीची शेती करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांची कोथिंबिरीची शेती बहरली आहे. गेल्या पाच वर्षांपासून रमाकांत हे कोथिंबिरीच्या शेतीतून चांगले उत्पादन घेत आहेत. यातून त्यांना वर्षाकाठी लाखोंचा नफा मिळू लागला आहे.
एकरी 20 हजार रुपये खर्च
रमाकांत वळके -पाटील एकूण 20 एकर शेतजमीन आहे. यापैकी त्यांनी फक्त पाच एकर क्षेत्रात कोथिंबिरीची लागवड केली आहे. कोथिंबीर लागवडीकडे त्यांनी लक्ष वळवले. आज रमाकांत यांच्या शेतीचे आर्थिक गणित पूर्णपणे बदलले आहे. लाखो रुपये लावून त्यांनी द्राक्ष बाग जोपासली होती. मात्र, त्यात मोठा आर्थिक फटका त्यांना बसला. आर्थिक गणित चुकणे ही नित्याची बाब होती. मात्र, कोथिंबीर लागवड केल्यानंतर निघालेल्या उत्पादनातून त्यांना पहिल्याच वर्षी लाखो रुपयांचा नफा मिळाला. 2023 मध्ये या पिकातून त्यांनी 16 लाख रुपये कमवले. यातून खर्च वजा जाता 14 लाख रुपये त्यांना निव्वळ नफा झाला आहे. मागील चार वर्षापासून सातत्याने ते कोथिंबीरचे पिक योग्यवेळी नियोजन करत घेत असतात. यातून त्यांनी एक कोटीपेक्षा जास्त नफा कमवला आहे. कोथिंबीर लागवडीतून आलेल्या पैशातूनच त्यांनी लातूरला घर घेतले आहे.