सेंद्रिय शब्दाचा खरा अर्थ स-इंद्रिय! आपल्या सर्व इंद्रियांचा आधार, उपयोग करत निसर्गाच्या सर्व इंद्रियांची म्हणजेच महत्वाच्या घटकांची देखभाल, जपणूक करत केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती! आणि शेती म्हणजे अन्न पिकवण्याची कृती. मग शेतीमुळे ज्यांचं ज्यांचं पोट भरतं त्या सर्व ग्राहकांना म्हणजे शेती न करणार्या सामान्य माणसांना, त्यांच्या पोटासाठी आवश्यक असलेल्या शेतीबद्दल माहिती, सन्मानपूर्वक जाणीव देण्याची संधी म्हणजे कृषी पर्यटन! कृषी पर्यटनाला असा मोलाचा अर्थ मिळवून देणार्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आनंदाचं शेत कृषी पर्यटन प्रकल्पाची ही आनंददायी ओळख.
जाहिरात क्षेत्रात करिअरला सुरुवात
मुंबई मध्ये जन्म झालेल्या राहुल कुळकर्णी यांनी मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या महाविद्यालयातून 1992 साली अप्लाइड आर्ट या विषयामधील पदवी शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जाहिरात क्षेत्रांमध्ये करिअर सुरुवात करून आपल्या व्यवसायिक आयुष्यामधील अनेक यशस्वी टप्पे पार करत नामवंत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम केले.
आयुष्य जगताना आनंद मिळण्यासाठी शोध
जाहिरात क्षेत्रातील करिअर निवडल्यानंतर व्यावसायिक आयुष्यातील दबाव, मुंबई सारख्या ठिकाणी झगमगीत आयुष्य जगण्याच्या मागे करावी दगदग या व्यतिरिक्त अनेक सुख सोयींचा उपभोग घेण्यासाठी मोजल्या जाणार्या किंमतीचे क्षणोक्षणी ओझे घेऊन जगावे लागते. यासाठी लागणारा पैसा कमविण्यासाठी मात्र खूप खस्ता खाव्या लागतात. अनेक वेळी कामाच्या ठिकाणी मनाला न पटणार्या गोष्टी सुद्धा कराव्या लागतात तसेच व्यवसायामध्ये सुद्धा कधी कधी न आवडणारे निर्णय घ्यावे लागतात. कारण या सर्वासाठी पैसा हे सर्वात महत्त्वाचे माध्यम असते.
आज आपण ज्या पदावर आहोत त्याही पेक्षा मोठे पद, पैसा, प्रतिष्ठा भविष्यात मिळेलही पण त्यामुळे हा प्रश्न सुटेल का? सतत हाच एक प्रश्न मनाला छळत होता की हे सगळं करताना खरोखरच मला आनंद मिळत आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी राहुल कुळकर्णी यांना पुढील प्रवास घडून आला. त्यादृष्टीने आपण आपल्या कोकणातील गावात काहीतरी करू शकतो का? हा विचार मनात येऊ लागला.
पत्नीची साथ
राहुल कुळकर्णी यांनी आपल्या मनातले आयुष्य जगताना आनंद मिळवण्या संदर्भातली निर्माण झालेली घालमेल त्यांची पत्नी व अभिनय क्षेत्रामध्ये आपला अभिनयाने वेगळा ठसा उमटवणार्या संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांच्याकडे बोलून दाखवली. त्यांनीही आपल्या पतीच्या आनंद मिळवण्याच्या या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत या निर्णयाला पाठिंबा दिला.
गावी काय करू शकतो? हा निर्माण झाला प्रश्न
कोकणातील प्रत्येक गाव हे निसर्गरम्य, सुंदरतेने नटलेले आहे, पण म्हणून काय ते शिमला, कुलू-मनाली इतके प्रसिद्धही नाही. पण गावी आल्यानंतर मिळणारी सुख, शांती समाधान, मेंदूला मिळणारा निवांतपणा हवाहवासा वाटतो. मग यामध्ये कृषी पर्यटनाचा कोणता प्रकार आपण करू शकतो यांचा अभ्यास करण्यासाठी राहुल कुळकर्णी व संपदा जोगळेकर-कुळकर्णी या उभयतांनी निरनिराळ्या ठिकाणा वरील कृषी पर्यटन केंद्रांना भेट देणे सुरू केले.
चंद्रशेखर भडसावळे यांच्याकडून मिळाली प्रेरणा
रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील स्वतः शेती करणारे कृषीभूषण चंद्रशेखर भडसावळे यांनी स्थापन केलेल्या सगुना बाग या कृषी पर्यटन केंद्रामध्ये मध्ये यांच्या 2 दिवसाच्या सानिध्यात राहिल्या नंतर आम्हा दोघा उभयतांना कसे वाटले की, होय! तरुणांनी शेतीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. त्याच बरोबर जागतिक अन्नसुरक्षा हे कायम आपल्यावर संकट उभे ठाकलेले आहे. मग असे असताना आपल्या गावी असणार्या जमिनीवर अन्न न उगवता शहरांमध्ये लाखो रुपये कमवत राहणे हे काही योग्य नाही, किंबहुना त्याला काही किंमतही नाही. तर मग आपला गावाकडच्या त्या जमिनीमध्ये काय करता येईल? आम्ही कधीच शेती केलेली नसल्यामुळे नोकरी न करता शेतीवर आधारित जीवनशैली जगायची हे आव्हान कसं निभवायचं हा एक नवा प्रश्न निर्माण झाला.
सड्यावरच्या पडीक माळरानावर केली सुरुवात
कुलकर्णी या उभयतांनी सन 2007 पासून आपल्या वडिलोपार्जित जमिनी मध्ये शेतीचे काहीच वातावरण नसलेल्या जंगली परिसरामध्ये असलेल्या, दगड-धोंडे यांच्या जागी शेतीचे नियोजन सुरू केले.येथे राहायचे झाले तर आपल्याला घर हवं, यासाठी अगदी विहीर खोदण्यापासून ते घर बांधण्या पर्यंतचा अनुभव 2007 ते 2013 या 7 वर्षाच्या काळामध्ये घेतला. मुंबई मधील व्यवसायिक आयुष्यामधील आठवड्याच्या कामाचा कितीही दबाव असला तरी दर शनिवारी, रविवारी न चुकता कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस या आपल्या गावी यायचा हा जणू काही राहुल कुळकर्णी यांचा क्रम बनला होता.
नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊन सुरू केले कृषी पर्यटन केंद्र
वेगवेगळ्या कृषी पर्यटन प्रकल्पांमधील संकल्पनांचा अभ्यास केल्यानंतर घर बांधतानाच आपल्याच घरामध्ये काही पर्यटक राहू शकतील अश्या काही खोल्यांच्या नियोजनासह घराचे बांधकाम केले. शेती करणार्या कुटुंबाबरोबर त्यांच्या घरातच राहण्याचा, त्यांचं काम, विचार यांचा अनुभव घेण्याकरता ही होम स्टेची योजना आहे. आमच्या या कृषी पर्यटन केंद्रामध्ये येणार्या पर्यटकांना कटाक्षाने कोणत्याही प्रकारची आधुनिक करमणुकीची साधने उपलब्ध करून द्यायची नव्हती आणि मुख्य म्हणजे फक्त करमणूक किंवा रंजन करायला येणारा पर्यटक आम्हास नको होता.
आम्ही शेती करत असताना आम्हाला जे पटले, जे रूचले त्यामध्ये उत्सुकता असणारा, आम्हाला शेती करत असताना पडलेल्या प्रश्नांच्या आम्हाला मिळालेल्या उत्तरांमध्ये रस घेणार्या पर्यटक हवा होता. मात्र अशा पर्यटकांपर्यंत पोहोचण्या साठी काहीसा काळ नक्की जाणार होता. आज आपण कृषी पर्यटन सुरू केले म्हणून काही लगेचच त्याला प्रसिद्धी मिळून पर्यटकांचा ओघ काही सुरू होणार नव्हता. आणि आम्हाला याच्या जाहिराती साठी कोणताही खर्च करायचा नव्हता.स्वांतसुखाय असे, कमी खर्चातले आयुष्य आम्ही जगण्याचा प्रयत्न करत होतो. घराचे बांधकाम व स्वतः शिकून शेती करण्यामध्ये सुमारे 8 वर्षाचा कालावधी गेला त्यामध्ये आम्ही कोणताही बँकेकडून कर्ज घेतलेले नाही. आमच्या आवडी-निवडी, छंद याचे बलिदान करून त्यांना लागणार पैसा हा आम्ही घर आणि शेती कडे वळविला आणि ही दोन्ही कामे पूर्णत्वास दिली असे राहुल कुळकर्णी सांगतात.
खाद्य संस्कृतीची मिळती जुळती शेती
शेती मध्ये कोणती व्यवसायिक शेती करायची नाही. आमचे येथील सहकारी त्यांच्या शेतातून काय पिकवतात त्याचे सुरुवातीला आम्ही धडे घेतले. शेतीची पदवी घेऊन गावीच शेती करणार्या चुलत भावाचं म्हणजे मारुती कुळकर्णी याचं मोलाचं अनुभवी मार्गदर्शन, कुटुंबातल्या मोठयांचा सल्ला, अनेक स्थानिक शेतकर्यांना भेटी देऊन त्यांच्या शेतीचा बारकाईने केलेला अभ्यास , यांच्या आधारावर शेतीचे आणीनंत्यावर आधारित व्यावसायिक आयुष्याचे फायदे तोटे सुद्धा जाणून घेतले. मग या सर्वाचा तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करताना आम्हाला अशी एक जीवन पद्धती ठरवली ज्यात शेतमाल विकून अर्थार्जन करण्याऐवजी आपण आपल्या साठी शेती करायची. व ती का करायची याचे ठोस कारण ही आपल्याला माहीत असल्यानं, त्याची प्रक्रिया व त्या मागचे शास्त्रीय कारण हे येथे येणार्या पर्यटकांना स-उदाहरण पर्यटकांना दाखवणारं, अनुभव देणारं, जाणीव देणारं कृषी पर्यटन हे फक्त व्यवसाय म्हणून नाही तर एक महत्वाचं काम म्हणून हातात घ्यायचं ठरवलं.
आम्ही करत असलेल्या शेती चे प्रमाण मर्यादित स्वरूपाचे असल्यामुळे आम्हाला जास्तीची गरज लागल्यास आम्ही आपल्या आजूबाजूकडडील स्थानिक लोकांकडूनच पिकवलेला भाजीपाला तसेच अन्नधान्य, कडधान्य घेतो. त्यामुळे आपली शेती आणि खाद्य संस्कृती सुद्धा वृदिंगत होण्यास मदत होते. या शेतीमुळेच माझा खाद्य संस्कृती वरील विश्वास पुन्हा वाढला असे राहुल कुळकर्णी अभिमानाने सांगतात. या स्थानिक खाद्य संस्कृतीला धरूनच आनंदाच्या शेता वरील दिवसाचा मेनू ठरलेला असतो.
पर्यटकांकडूनच होऊ लागली जाहिरात
अमराठी, देश विदेशातल्या पर्यटकांनाही नाव आणि त्याचा अर्थ सहज कळावा यासाठी फार्म ऑफ हॅपिनेस हे इंग्रजी नाव आनंदाच्या शेतानं धारण केलं. सुरुवातीला आलेल्या थोड्या पर्यटकांकडूनच पुणे,मुंबईत तसेच इतर शहरातल्या अनेक पर्यटकांना आनंदाच्या शेता ची माहिती मिळू लागली. सन 2017-18 साली खर्या अर्थाने पर्यटकांचा ओघ सुरू होऊन आम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हायला लागले. सुदैवाने एवढ्या वर्षाचा अविरत प्रयत्न, मूळ संकल्पनेला, धरून अगदी मनापासून, प्रामाणिकपणे केलेल्या शेती बद्दलच्या या विवेचनाचा असा एक फायदा झाला की, असा एक वेगळा पर्यटक वर्ग आहे ज्यांना हा वेगळेपणा भावला, त्यांनी याचे मना पासून प्रचंड कौतुक केले.
या पर्यटकांना एक असं कृषी पर्यटन स्थळ मिळालं की जिथे मातीत हात घालायला मिळतील. भात, नाचणी, तीळ, कारळे, आंबा, काजू, हळद, कंद, भाज्या, रानभाज्या, नारळ, केळी, अननस आशा सगळ्या ऋतूंमधल्या शेतीचा म्हणजेच एका अन्न संस्कृतीचा अनुभव घेता येईल. त्याची शेतीतली कामं बघता येतील, अनुभवता येतील. त्यांच्या डोक्यात असणारे या संबंधीच्या असंख्य प्रश्नांना शास्त्रीय पद्धतीने उत्तर मिळण्याचे एक स्थान निर्माण झाले ते म्हणजे आनंदाचं शेत अर्थात फार्म ऑफ हॅपिनेस ऍग्रो टुरिझम होम स्टे.
शेतकर्याला सन्मानाची संधी
ग्राहकाला म्हणजेच पर्यटकाला आपल्या ताटातल्या अन्ना बद्दल विचार करायला लावणारी परिस्थिती निर्माण करणे. शेती म्हणजे काही चिखलात काम करण्याची कृती नाही. शेती म्हणजे आज शालेय पुस्तकांतून, कवितांतून आढळणारे डुकरे, कोंबड्या, घोडे, यांचं फार्म हाऊस नसून शेती म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांच्या ताटामध्ये जे अन्न मिळत आहे ते उगवण्याची कृती. त्यासाठी कोणीतरी कष्ट घेतोय, कोणतरी शास्त्रीय पद्धतीने मेहनत करून जीवाचे रान करतोय, मातीचा कस सुधारण्यासाठी काही धडपड करतोय, अख्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शेताच्या आजू बाजूला जी काही प्रक्रिया करावी लागतेय म्हणून ही पिके आपल्याला मिळतात.
नैसर्गिक रित्या मिळणार्या ऋतूमध्येच काही पिके आम्हाला खाता येतील याचे महत्त्व जोपर्यंत ग्राहकाला कळत नाही तोपर्यंत शेतकर्याची फरफट चालूच राहणार आहे. यांचे महत्व व्हिडिओ फीत तयार करून किंवा लेक्चर घेऊन अधोरेखित होऊ शकणार नाही तर यासाठी कृषी पर्यटन केंद्रा मधून मिळालेल्या अनुभवाची सांगड घालून त्याचे स्पष्टीकरण देऊन प्रात्यक्षिका सहित प्रत्यक्ष कृती होणे अपेक्षित आहे. यामुळेच शेतीला, शेतकर्याला व त्याच्या बरोबर काम करणार्या व्यक्तीला सन्मान मिळणार आहे.
स्थानिक व्यक्तींना पूर्णवेळ रोजगार
आनंदाचे शेताच्या माध्यमातून 15 स्थानिक महिला तसेच पुरुषांना पूर्णवेळ रोजगार उपलब्ध होतो. पण जेव्हा अधिक मनुष्यबळाची आवश्यकता असते त्यावेळी इतर व्यक्तींना सुध्दा हंगामी स्वरूपाची रोजगार ची निर्मिती होते. या सर्व महिला व पुरुष यांचा उल्लेख राहुल कुलकर्णी हे मसहकारीफ म्हणून करतात. घर बांधण्यापासून विहीर खोदणे,शेती करणे ते जेवण बनवणे, स्वच्छता, पाहुण्या पर्यटकांची व्यवस्था या कृषी पर्यटनाच्या या ज्या वेळोवेळी निर्माण होणार्या गरजा आहेत, त्या सर्व गरजा यांच्याकडूनच पूर्ण केल्या जातात.
वर्षभर पर्यटकांचा ओघ
शेती ही कोणत्या ही फक्त ठराविक ऋतूमध्ये होत नसून ती वर्षाच्या बाराही महिने चालणारी एक प्रक्रिया आहे आहे. प्रत्येक ऋतूचा आनंद घेण्यासाठी आनंदाचे शेत येथे पर्यटक पुन्हा पुन्हा आवर्जून येतात व पावसाळा,हिवाळा व उन्हाळा या तीन ऋतूंमध्ये चालणार्या शेतीच्या प्रक्रियेमध्ये ते कुटुंबासह सहभागी होतात याचा कुळकर्णी या उभयतांना आनंद व समाधान मिळते.
कृषी पर्यटनासोबतच इतर अनेक गोष्टींचा आनंद
निसर्गाची जवळीक साधता येणार्या या कृषी पर्यटन होम स्टेमध्ये आपल्याला चकचकीत टाईल्स किंवा मारबाच्या जमिनी दिसणार नाहीत. शेणाने सारवलेल्या स्वच्छ व टापटीप रूम ज्यामध्ये स्वतंत्ररीत्या बाथरूमची रचना असून चार व्यक्ती वास्तव्य करू शकतील या आकाराच्या रूमची व्यवस्था केलेली असते. शेतीसाठी उपयोगी असलेल्या देशी गाय,बैल, म्हैस युक्त गोठा, देशी कोंबड्यांचे खुराडे पर्यटकांना पहावयास मिळतात.
नांगर धरणे, भात झोडणे, नाचणी खूडणे, भरडणे, कुळीथ, पावटे यांसारख्या कडधान्यांची काढणी झोडणी सारख्या प्रक्रिया, शेतीच्या परिसरात आणि गावातल्या दर्याखोरयांमध्ये पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी दुर्बिणीच्या माध्यमातून आकाश दर्शन, काजवे पाहणे तसेच झाडाझझुडुपांची, मधमाश्या, फुलपाखरांची जैवविविधता आणि या सगळ्याचा शेतीशी संबंध सुद्धा पर्यटकांना अनुभवता येते.आलेल्या प्रत्येक पर्यटका कडे या उभतांकडून व्यक्तिगत लक्ष देऊन आतिथ्य केले जाते. आणि कृषी पर्यटना बरोबरच होम स्टेचा म्हणजेच घरगुती आदरातिथ्याचाही अनुभव दिला जातो.
इतर शेतकर्यांना काय सल्ला द्याल
तुम्ही शेतकरी आहात,शेती करता, याची लाज बाळगू नका. या देशातली जेमतेम 20 टक्के जनता शेती करत्येय ज्यावर बाकी सर्वांचं पोट भरत्येय याची सन्मानपूर्वक जाणीव बाळगा आणि ती जाणीव नम्रतेनं पाहुण्या पर्यटकांना द्या. शेती परवडत नाही म्हणून कृषी पर्यटनाचा जोडधंदा करतोय अस न समजता, न सांगता, कुटुंबाच्या, देशाच्या पोटाची, स्वास्थ्याची जबाबदारी आपण अभ्यासपूर्वक कष्टानं निभावतो आहोत याची पर्यटकांना माहिती करून द्या! पर्यटक आणि आणि हा देव आहे हे जरी खरे असलं तरी त्याला खुश करण्याकरता स्वतःच्या आनंदाचा, स्वतःच्या कष्टांचा, सकस अन्नाचा बळी देऊन, मद्यपान, बाजारू पदार्थांचं जेवण अशा गोष्टींना आपल्या शेतात स्थान देऊ नका! मी करतोय ते बरोबर आहे या गोष्टीचा अभिमान बाळगा.
कृषी पर्यटन केंद्र म्हणजे सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असलेले हॉटेल नसून शेतकर्यांनी आपल्या घरी बाहेरून आलेल्या पाहुण्यांचे पारंपारिक पद्धतीने संस्कृतीला अनुसरून आदरतिथ्य करणे होय. तुमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना स्वच्छ निवास द्या, संडास बाथरूम ची नीट साफसफाई ठेवा, तुम्ही तुमच्याच घरामध्ये पर्यटकांसाठी ज्या काही दोन खोल्या बांधल्या आहेत त्यामध्ये त्यांचे आथित्य करताना कमतरता ठेऊ नका, त्यांना हसतमुखाने सामोरे जा, इंग्रजी आले नाही तरीही चालेल तुमच्या बोलीभाषेतून किंव्हा तुम्हाला जसे वेडेवाकडे बोलता येते त्या हिंदी भाषेतुन सुध्दा जे काही तुम्ही करत आहात त्या गोष्टीला शास्त्रीय दृष्ट्या पटवून द्या. यशस्वी शेती ही फक्त शेतकर्याचीच जबाबदारी नसून ती जबाबदार समंजस ग्राहक वर्गाची पण आवश्यकता आणि जबाबदारी आहे हा मुद्दा लक्षात घेऊन कृषी पर्यटनाच्या संधीचं भविष्यासाठी सोनं करुयात.
खर्या अर्थाने शेतीला सुरुवात केली
राहुल कुलळकर्णी यांनी आपल्या शेतामध्ये हळद,भाज्या, पालेभाज्या,अन्नधान्य,नाचणी, वरी तसेच काही दिवसांनी भात यासारख्या लागवडीची प्रत्यक्ष सुरुवात केली. पहिल्या सात आठ वर्षांच्या शेतीसंबंधीच्या आकलनानंतर शेतीचे हळूहळू नियोजन वाढवले. आधी शेती मगच कृषी पर्यटन या संकल्पनेला अनुसरून पहिली स्वतः शेती करायची आणि मग येणार्या पर्यटकांना शेती बद्दल ची माहीत द्यायची हा ध्यास अंगीकारला.
सन्मानास पात्र ठरले आनंदाचं शेत
आनंदाचे शेत या कृषी पर्यटन केंद्राने कृषी क्षेत्रामध्ये एका संकल्पनेची कास धरून जिद्दीने, मेहनतीने, प्रामाणिकपणे येथील स्थानिक सहकार्यांच्या सहभागाने उल्लेखनीय काम केल्यामुळे याची अल्पावधीतच दखल घेऊन 2016 साली नॅशनल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड मिळाला. 2017 साली नॅशनल जिओग्राफिक ट्रॅव्हलर सारख्या नामांकित मॅगझिनने स्टोरी कव्हर केली.तसेच लोनली प्लॅनेट या इंटरनॅशनल टुरिझम मॅगझिनने फ्रान्स, इजिप्त च्या बरोबरीने कोकणातील रत्नागिरीतल्या फुणगुस येथील छोट्याशा ठिकाणी असणार्या आनंदाचं शेत या कृषी पर्यटन केंद्राची दखल घेतली. इंटरनॅशनल पातळीच्या मॅगझिनसने अशी एखाद्या कृषी पर्यटन केंद्राची दखल घेणे हा भारतीय पर्यटन क्षेत्रा मधील सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवण्या सारखा क्षण आहे.