मुंबई : अंडी उत्पादनात भारत जगात तिसऱ्या स्थानी, तर मांस उत्पादनात देशाचा आठवा क्रमांक आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस (FAOSTAT) उत्पादन डेटातून ही माहिती मिळाली आहे. पशुधन गणनेनुसार, भारतात 31 कोटी गोवंश, 7 कोटी मेंढ्या, 15 कोटी शेळ्या, 90 लाख डुकरे आणि 80 कोटी कोंबड्यांचा आहेत. दूध उत्पादनात जगात पहिल्या स्थानी असलेल्या भारतात दुधाची प्रतिदिन दरडोई उपलब्धता जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.
केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने भारतातील पशुधन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे, असा दावा केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी नुकताच केला आहे. विभागाच्या गेल्या नऊ वर्षांतील कामगिरी आणि उपक्रमांसंदर्भात प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना त्यांनी हा दावा केला.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
रूपाला म्हणाले, की पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने प्रमुख पशुधन रोगांचे नियंत्रण आणि निर्मूलन तसेच पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम राबवले आहेत. हे उपक्रम प्रति-प्राणी उत्पादकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, ज्यामुळे देशांतर्गत वापर आणि निर्यात दोन्हीसाठी दूध, मांस आणि इतर पशुधन उत्पादनांचे उत्पादन वाढत आहे. पशुधन क्षेत्राद्वारे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करण्यासाठी विभागाने इतर मंत्रालये आणि भागधारकांसोबतही सहकार्य केले आहे.
वर्षाला सरासरी प्रत्येक भारतीयासाठी 95 अंडी इतके उत्पादन
देशातील अंडी उत्पादन 2014-15 मधील 78 अब्ज वरून 2021-22 मध्ये 130 अब्ज झाले आहे, जे साडेसात टक्के चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर्शविते. अंड्यांची दरडोई उपलब्धता वार्षिक 95 अंडी आहे. मांस उत्पादन 2014-15 मध्ये 70 लाख टनांवरून 2021-22 मध्ये 90 लाख टन इतके वाढले आहे.
भारताच्या पशुधन क्षेत्राने 2014-15 ते 2020-21 पर्यंत 8 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीसह लक्षणीय मजल मारली आहे. एकूण कृषी आणि संलग्न क्षेत्रातील सकल मूल्यवर्धित (GVA) मध्ये पशुधन क्षेत्राचे योगदान 2014-15 मधील 24 टक्क्यांवरून 2020-21 मध्ये 31 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 2020-21 मध्ये, पशुधन क्षेत्राचे योगदान एकूण GVA च्या 6 टक्के होते.
दूध उत्पादनात 51 टक्के वाढ
भारतीय अर्थव्यवस्थेत दुग्धव्यवसाय क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत त्याचे 5 टक्के योगदान आहे. यातून 8 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना थेट रोजगार मिळतो. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून, जागतिक दूध उत्पादनात 23 टक्के वाटा आहे. गेल्या आठ वर्षांत, दुधाचे उत्पादन 51 टक्क्यांनी वाढले आहे. 2021-22 मध्ये ते 20 कोटी टनांवर पोहोचले आहे. भारतातील दुधाची दरडोई उपलब्धता 444 ग्रॅम प्रतिदिन आहे. जागतिक सरासरी 394 ग्रॅम प्रतिदिन पेक्षा भारतातील दूध उपलब्धता जास्त आहे.