आच्छादनाचा वापर
जमिनीतील पाणी बाष्पीभवनाद्वारे, तर झाडातील पाणी पानामधून होणार्या उत्सर्जन क्रीयेमुळे झपाट्याने कमी होते. या दोन्ही क्रीयांना प्रतिबंध करण्यासाठी आच्छादनाचा वापर करणे फायदेशीर ठरते. जमिनीतील ओलावा राखण्यासाठी आच्छादनाचा फायदा होतो. आच्छादनासाठी पॉलिथीन फिल्म़चा किंवा सेंद्रिय पदार्थाचा वापर केला जातो. उपलब्धतेप्रमाणे 80 ते 100 मायक्रॉन जाडीची फिल्म आच्छादनासाठी वापरल्यास अतिशय फायघाचे ठरते. सेंद्रिय स्वरुपाचे आच्छादने वापरल्यास खर्चात बचत आणि जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
सेंद्रिय अच्छादने
सेद्रिंय आच्छादनासाठी वाळलेले गवत, लाकडी भुसा, ऊसाचे पाचट, पालापाचोळा, गव्हाचे काड,भाताची काड, गिरीपुष्प आदींचा फळझाडाच्या ड्रिपखाली 4 ते 6 इंच जाडीचा आच्छादनाचा थर घावा. त्या ठिकाणी तंतूमय मुळ्या पसरलेले असतात. सेद्रिंय आच्छादन करण्यापूर्वी वाळवीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून त्यावर/त्याखाली फॉलीडॉल अथवा लिंडेन पावडरची भुकटी धुरळावी.
मडका सिंचन
फळझाडासाठी मडका सिंचनाचा वापर करता येतो. कमी खर्चीक आणि पाण्याचा कार्यक्षमरित्या वापर होणार्या या पद्धतीत कमी वयाच्या लहान फळझाडासाठी 5 ते 6 लिटर क्षमतेचे तर मोठ्या झाडाच्या झाडासाठी 15 लिटर क्षमतेचे मडके निवडावे. त्याच्या तळाशी लहानशे छिद्र पाडून त्यात कापडाची चिंधी बसवून मडक्याचे तोंड जमीनीच्या वर राहील अश्या़ बेताने मडके झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत पुरावे व ते पाण्याने भरुन मडक्याच्या तोंडावर झाकण ठेवावे. मडक्याच्या सच्छिद्र रचनेमुळे ते पाझरते व त्यातील पाने हळूहळू पसरुन जमिनीत ओलावा तयार होतो. त्यामुळे झाडांच्या मुळाना सातत्याने आवश्यकते एवढा पाण्याचा पुरवठा संथ गतीने होऊ शकतो. मडके रिकामे झाल्यानंतर पुन्हा पाणी भरावे.
मडक्याची काळजी
- आंतर मशागत करतांना मडके फुटणार नाही याची काळजी घावी.
- शेतामध्ये जनावरे मडके तुडवणार नाही याची दक्षता घ्यावी.
- मडके सच्छिद्र असावे.
सलाईन बाटल्यांचा वापर
ठिबक सिंचनासारखे थोडेथोडे पाणी कार्यक्षमतेने वापरण्यासाठी आणि अगदी थेट झाडाच्या मुळ्याजवळ देण्यासाठी सलाईनच्या बाटल्या वापरता येतील. पाणी पडण्याचा वेग सलाईनप्रमाणे कमी-जास्त करता येईल. सलाईनच्या प्लॅस्टिक बाटल्यामध्ये पाणी भरुन फांदीच्या आधाराने बाटली झाडाजवळ टांगावी. बाटलीची नळी झाडाच्या मुळाजवळ जमिनीच्या वरच्या थरात ठेवावी.
बाटलीची काळजी - पाणी वेळोवेळी मुळांजवळ पडते किवा नाही याची तपासणी करावी.
- कचरायुक्त/गढूळ पाणी सलाईन बाटलीमध्ये वापरु नये.
खोडास बोर्डोपेस्ट लावणे
उन्हाळ्याच्या दिवसात देखील पाण्याचे दुर्भीक्ष असलेल्या काळात मोसंबी खोडास बोर्डोपेस्ट लावणे अत्यंत फायद्याचे ठरू शकते. यासाठी फळझांडाच्या खोडास (1 किलो मोरचूद, 1 किलो कळीचा चुना, 10 लिटर पाणी) बोर्डोपेस्ट़चा लेप घावा. त्यामुळे खोडाचे उष्णतेपासून सरंक्षण होईल.
बोर्डोपेस्ट व्यवस्थापन - खोडास बोर्डोपेस्ट लावतांना स्वच्छ़ ब्रशचा वापर करावा.
- बोर्डोपेस्टची शक्ती मिश्रणाच्या तीव्रतेवर व सामूवर अवलंबून असल्यामूळे योग्य त्या प्रमाणातच वापर करावा.
- तयार मिश्रणात निळा लिटमस पेपर अथवा लोखंडी खिळा वा चाकू बुडविला असता त्यावर तांबट थर दिसणार नाही याची काळजी घ्यावी.
- तांबट थर दिसल्यास मिश्रणात मोरचूदाचे प्रमाणा जास्त असते अशावेळी त्या मिश्रणात चुन्याचे द्रावण ओतावे.
- बोर्डोपेस्ट प्लॅस्टीकच्या/मातीच्या भांड्यातच स्वंतत्रपणे तयार करावी. (लोखंडी बादली वापरु नये)
झाडाचा पानोळा/फळ संख्या कमी करणे
झाडावरील पानामधून देखील पाण्याचे उत्सर्जन होत असते. पानावरील पर्णरंध्रे पाणी बाहेर टाकत असतात. त्यामुळे झाडांची हलकीशी छाटणी करुन पानांची/फळांची संख्या कमी केल्यास पानामधून निघून जाणारे पाण्याचे प्रमाण कमी करता येवू शकते. मोसंबीवरील पानसोट काढून टाकावे. कमी ओलीत असल्यास पाण्याचे नियोजन करून फळसंख्या मर्यादित ठेवावी. मोसंबी झांडावरील पानसोट(वाटरशुट) मोठ्या प्रमाणावर वाढविले असता त्याची वेळेवर छाटणी करून काढल्यास झाड सशक्त़ राहून पाण्याची बचत होईल.
छाटणी करताना काळजी - हलकी छाटणी करण्यासाठी अथवा पानोळा कमी करण्यासाठी तीक्ष्ण वा धारदार सिकेटरचा/कात्रीचा वापर करावा.
- छाटणी करतांना फांदी पिचणार नाही याची काळजी घ्यावी.
- मर्यादेपेक्षा जास्त़ पानोळा छाटणी करू नये अन्यथा झाडावर विपरित परिणाम होतो. छाटणी केलेल्या ठिकाणी बोर्डोपेस्ट लावावी.
बाष्परोधकाचा वापर
पानाच्या पर्णरंध्रातून होणारे पाण्याचे उत्सर्जन नियंत्रण करणेसाठी व प्रकाश संश्लेषणाचा वेग योग्य तो राखण्यासाठी 6 ते 8 टक्के केवोलीन बाष्परोधकाची (600 ते 800 ग्रॅम 10 लिटर पाण्यात) फवारणी 15 दिवसाच्या अंतराने 1 ते 2 वेळा करावी.
बाष्परोधक वापरता काळजी - दोन वा तीन फवारण्यापेक्षा जादा फवारणी करू नये.
- खोडास गवत/बारदाना बांधणे
पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे तसेच सूर्याचा प्रखर प्रकाश खेाडावर पडत असल्यामुळे खोडास इजा पोहचू शकते. तसेच खोड तडकण्याची शक्यता देखील नाकरता येत नाही. त्यासाठी गवत अथवा बारदाना सुतळीच्या साहाय्याने खेाडाच्या संपुर्ण भागावर घट्टपणे बांधावा. यामुळे झाडाच्या खोडाचे प्रखर सूर्य प्रकाशापासून सरंक्षण होवू शकते व खोडास/सालीस इजा पोहचू शकत नाही.
काळजी - फळबागामध्ये बिडी/सिगारेट पिऊ नये.
- शेतात गवताच्या गंजीस/पाचटास आग लावू नये.
- गवत बांधण्यापुर्वी खोडावर लिडेंन अथवा कार्बारिल भुकटी टाका.
- गवत/बारदाना घट्ट बांधावा जेणेकरुन वार्यामुळे उडून जाणार नाही.
कलमी/रोपावर शेडनेटची सावली करणे
रोपावर शेडनेटची सावली करुन झाडे रोपे ठेवली असता ऊसर्जनाचा दर कमी होवून कमी पाण्यावर जगविता येतात.
काळजी - शेडनेट फाटलेली नसावी.
- शेडनेटमध्ये फॉगर्स असल्यास अधुनमधून त्याचा वापर करून तापमान नियंत्रित ठेवता येते.
ठिबक सिंचनाचा वापर
उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. ओलीताच्या गंभीर टंचाईमुळे ठिबक सिंचन पद्धतीकडे लोकांचा कल वाढत आहे. ठिबक सिंचनामुळे मोसंबी फळांचे अधिक व दर्जेदार उत्पन्न मिळविता येते. आवश्यक तेवढी पाण्याची मात्रा झाडाच्या थेट सूक्ष्म मुळाशीच पुरविली जाते. तसेच पाण्यात विरघळणारी खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये याद्वारे देता येतात. पाण्याचा थेंब न थेंब वाया न जावू देता कमी पाण्यात जास्त ओलीत करण्यासाठी ठिबक सिंचन ही काळाची गरज आहे.
ठिबक संचाची काळजी
- वेळोवेळी ड्रीपरची तपासणी करावी.
- दररोज ठिबक चालविण्याची गरज नाही.
- वाफसा स्थिती आल्यावरच ठिबकसंच सुरू करावा.
- क्षारयुक्त पाण्याचा वापर ठिबकसंच साठी करू नये.
मो.नं. 9422178982
(लेखक वनामकृवि अंतर्गत औरंगाबाद येथे संशोधन सहयोगी संचालक म्हणून कार्यरत आहेत.)