उन्हाळी हंगामात टोमॅटो, कांदा व लसून, वाटणा, कोबीवर्गीय कोबी, फुलकोबी इ. भाजीपाला पिके घेतली जातात.
टोमॅटो
टोमॅटो या पिकावर प्रामुख्याने पानावरील करपा, फलसड, भुरी, मर, देवी रोग आणि वेगवेगळे विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. लवकर येणारा करपा (अर्लीब्लाईट) : हा रोग अल्टरनेरिया सोलॅनी या बुरशीमुळे होतो.
या रोगामुळे सुरुवातीला जमिनीलगतच्या पानांवर लहान आकाराचे गोलाकार ते आकारहीन, तपकिरी ते कळपात रंगाचे ठिपके दिसून येतात. हे ठिपके वलयांकित असतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढून ठिपके एकमेकांत मिसळतात आणि मोठ्या आकाराचे तपकिरी चट्टे पानावर तयार होतात. त्यामुळे पाने करपून गळतात. पानाप्रमाणे खोडावर देखील गर्द तपकिरी डाग पडतात. त्यामुळे फांद्या कमकुवत होऊन मोडतात. हिरव्या किंवा पिकलेल्या फळांवर तपकिरी ते काळ्या रंगाचे वलयांकित डाग आढळून येतात.
उशिरा येणारा करपा (लेट ब्लाईट) : हा रोग फायटोप्थोरा इन्फेस्टन्स या बुरशीमुळे येतो. सुरुवातीला पानावर पाणथळ ते फिकट तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात. ढगाळ हवामानात रोगाचा प्रादुर्भाव वाढून खोड, पाने आणि फळांवर पसरून पाने करपून गळतात. रोगाचा प्रादुर्भाव झालेली फळे हिरवट-तपकिरी होतात आणि मलूल होऊन सडतात.
फलसड (बक आय रॉट) : हा रोग फायटोप्थोरा निकोशियाना पॅरासिटीका या बुरशीमुळे येतो.
पावसाळ्यात सतत येणारा पाउस, हवेतील आर्द्रतेचे जास्त प्रमाण आणि फळे अ फांद्या जमिनीवर टेकून पाण्याच्या संपर्कात जास्त वेळ आल्यास अशा वातावरणात बुरशीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. या बुरशीमुळे टोमॅटोच्या हिरव्या फळांवर टोकाच्या बाजूस बदकाच्या डोळ्याच्या आकारासारखे फिक्कट तपकिरी रंगाचे डाग एकमेकांत वलये असल्यासारखे दिसतात. प्रथम डाग लहान आकाराचे दिसतात, नंतर पूर्ण फळावर पसरून गर रंगहीन होतो.
उपाय :
पिकाची फेरपालट करावी.
प्रमाणित बियाणे वापरावे.
बिजप्रक्रीया थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम/किलो.
रोपवाटिकेत मँन्कोझेब २०ग्रॅम, १०लि. पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
लागवणीच्या वेळी प्रती एकरी २ किलो ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून घ्यावी.
रोपप्रक्रिया – बाविस्टीन १०ग्रॅम/१०लि. पाण्यात रोपांची मुळे १० मिनिटे बुडवावीत.
रोगाची लक्षणे दिसताच मँकोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपर ओक्सीक्लोराईड ३० ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १० मिली यांपैकी कोणतेही एक औषध प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारावे.
उशिरा येणारा करपा आणि फळसड रोगांच्या नियंत्रणासाठी वरील बुरशीनाशकांव्यतिरिक्त मेटॅलॅक्झील एम.झेड.-७२ किंवा फोसेटील अ.एल. २५ ग्रॅम प्रती १० लि. पाणी हि बुरशीनाशके आवश्यकतेनुसार आलटून पालटून फवारावीत.
विषाणूजन्य (व्हायरस रोग) : विषाणूंमुळे टोमॅटोत अनेक वेगवेगळे रोग येतात. परंतु महाराष्ट्रात प्रामुख्याने टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस, पर्नगुच्छ अथवा बोकड्या व मोझॅक हे प्रमुख विषाणुजन्य रोग मोठ्या प्रमाणात आढळतात.
टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस : शेंड्याकडील नवीन पानांवर प्रथम लहान, तांबूस – काळसर ठिपके/चट्टे दिसतात. रोगाचे प्रमाण वाढून तीन चार दिवसात कोवळी पाने करपून काळी पडतात. हा रोग पाने, देठ, कोवळ्या फांद्या आणि खोडापर्यंत पसरत जाऊन तांबूस – काळपट चट्टे पडतात. शेवटी झाड करपते व मरते. रोगाचा प्रादुर्भाव लागवडीपासून एक महिन्याच्या आत झाल्यास फळधारणा न होता संपूर्ण झाड १० -१५ दिवसात करपून मारून जाते. हा रोग फुलकिडे यामुळे येतो.
पर्णगुच्छ किंवा बोकड्या : या रोगामुळे पाने बारीक, वाकडी-तिकडी होवून सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात. पानांचा रंग फिक्कट हिरवा-पिवळसर होतो. यामुळे झाडाची वाढ खुंटते. झाड खुजे राहून पर्णगुच्छ किंवा बोकाडल्यासारखे दिसते. आलेली फळे आकाराने लहान असतात. ह्या रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला झाल्यास फळधारणा होत नाही. हा रोग पांढरी माशी यामुळे येतो.
टोमॅटो मोझॅक : या रोगामुळे पाने फिक्कट हिरवी होतात. ती बारीक राहून त्यामध्ये हिरवट, पिवळसर डाग दिसतात. झाडाची वाढ खुंटते, फुले व फळे फार कमी प्रमाणात लागतात. हा रोग मावा या किडीमुळे येतो.
उपाय: टी.एस.पी. बीजप्रक्रिया: ९० ग्रॅम ट्रायसोडीयम फोस्फेट प्रति लि. पाणी घेऊन द्रावण तयार करावे. बियाणे १५ मिनिटे बुडवावीत. नंतर ते ३-४ वेळा स्वच्छ पाण्यात धुवून सावलीत सुकवावे. पेरणीपूर्वी गादीवाफ्यावर कार्बोप्युरान ३५-५० ग्रॅम किंवा फोरेट १०-२० ग्रॅम प्रती १० चौ.मीटर या प्रमाणात मिसळावे. बियाणाची पेरणी झाल्यानंतर गादीवाफ्यावर ४०० मेश नायलॉन नेट किंवा मलमल कापड मच्छरदाणीसारखे टाकावे म्हणजे रोग प्रसार करणाऱ्या किडींपासून रोपांचे संरक्षण होईल. डायमेथोयेट १० मिली प्रति १० लि. पाण्यात मिसळून रोपावर फवारावे.
इमीडॅक्लोप्रीड १० मिली किंवा कार्बोसल्फान २० मिली + ट्रायकोडर्मा पावडर ५० ग्रॅमप्रति लि. पाणी या प्रमाणात मिसळून त्यात रोपांची मुळे १० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. लागवडीपूर्वी ५०-६० दिवस अगोदर टोमॅटो प्लॉटच्या सर्व बाजूने ५-६ ओळी मका किंवा ज्वारी पेरल्यास पांढरी माशीचे प्रमाण रोखण्यास मदत होते. लागवडीनंतर १० दिवसांनी १० किलो फोरेट प्रती हेक्टर या प्रमाणात झाडाभोवती गोलाकार टाकून झाकावे व पाणी द्यावे.
प्रमाणित बियाण्याचा वापर करावा, पिक तण विरहित ठेवावे. रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून जमिनीत गाडून टाकावी किंवा जाळून नष्ट करावीत.