मुंबई : स्वत:ची शेत जमीन नसलेल्या, परंतु शेती करु इच्छिणार्या शेतकर्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकर्यांकडे स्वतःची जमीन नाही, किंवा जे शेतकरी अल्पभूधारक आहेत अश्या शेतकर्यांसाठी राज्य सरकारकडून एक अभिनव योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत स्वत:ची शेतजमीन नसलेल्या तसेच अल्पभुधारक शेतकर्यांना शेती विकत घेण्यासाठी अनुदान मिळणार आहे. त्यामुळे आजच्या या बातमीत आपण नेमकी ही योजना आहे काय…, काय आहे योजनेचा उद्देश…, अर्जाची संपूर्ण प्रक्रिया व योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे… अशी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
शेती क्षेत्रात वाढ व्हावी, अधिकाधिक तरुण शेती क्षेत्राकडे वळावा यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविल्या जात असतात. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या शेतकर्यांकडे स्वतःची जमीन नाही, किंवा जे शेतकरी अल्पभूधारक आहेत अश्या शेतकर्यांसाठी राज्य सरकारकडून शेतजमीन खरेदी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
अशी आहे योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022 असे राज्य शासन राबवित असलेल्या या योजनेचे नाव असून या योजनेनुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकर्यांना राज्यशासनाकडून जमिन खरेदी करण्यासाठी 50 टक्के बिनव्याजी कर्ज स्वरूपात व 50 टक्के अनुदान स्वरूपात रक्कम दिली जाते. या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकरी, भुमीहीन शेतमजूर यांच्यासाठी शासनाकडून शेतजमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांतील पती अथवा पत्नीच्या नावे केली जाते. लाभार्थी विधवा किंवा परितक्त्या स्त्री असेल तर जमीन त्यांच्या नावे केली जाते. चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते.
अशा आहेत योजनेच्या अटी
दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022 चा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय किमान 18 व कमाल वय 60 वर्ष इतके असणे गरजेचे आहे. या योजनेत अर्ज करु इच्छिणार्या अर्जदाराकडे जमीन नसावी तसेच तो दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा, योजनेसाठी परित्यक्ता, विधवा स्त्री यांना प्राधान्य देण्यात येते, महसूल व वन विभागाने ज्यां शेतमजूर अथवा शेतकर्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले गेले आहे, त्या शेतकरी कुटुंबांस या योजनेचा लाभ मिळणार नाही, किंवा यापूर्वी लाभ घेतलेल्या संबंधित कुटुंबास कुठल्याही कारणास्तव जमीन इतर व्यक्तीना हस्तांतरीत अथवा विक्री करता येणार नाही.
योजनेतील लाभार्थ्यास दिले जाणारे कर्ज हे बिनव्याजी असून त्या कर्जाची मुदत 10 वर्षे असणार आहे. घेतलेल्या कर्जाच्या कर्जफेडीची सुरुवात ही कर्ज मंजुरीच्या दोन वर्षांनंतर सुरू होईल. योजनेतील लाभार्थी शेतकरी, शेत मजुरांनी जमीन स्वतः कसणे आवश्यक असून तसा करारनामा देणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यासाठी जमीन खरेदी करत असताना तीन लाख रूपये प्रती एकर एवढ्या कमाल मर्यादेत खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समितीला देण्यात आलेली आहे.
योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे
योजनेसाठी अर्ज करतांना अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याबाबतचे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, निवडणूक ओळखपत्र, तहसीलदार यांनी निर्गमित केलेला भूमिहीन असल्याबाबतचा दाखला, तहसीलदार यांनी दिलेला मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदार हा दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबतचे सत्य प्रमाणपत्र, शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्याचे 100 रूपयाच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022 साठी अर्ज करु इच्छिणार्या अर्जदारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. कारण राज्यसरकारकडून अद्यापपर्यंत या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून त्याच कार्यालयाकडे हा अर्ज विहित नमुन्यात सादर करावा लागणार आहे.