मुंबई : Cultivation of wheat… रब्बीच्या हंगामाला सुरुवात झाली असून शेतकर्यांकडून या हंगामातील गहू, हरभरा, मका, भुईमूगाच्या पेरणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, हे काम करीत असतांना त्याचे तसेच पेरणी नंतर तांबेरा, काजळी यांसारखे रोग पडू नये यासाठी काय काळजी घ्यावी, व्यवस्थापन कसे करावे, याबाबतची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला ही बातमी सविस्तरपणे वाचणे गरजेचे आहे.
गहू हे समशीतोष्ण प्रदेशात पिकणारे पिक असून जगभरातील निम्म्या लोकांच्या आहारात गव्हाला मुख्य स्थान आहे. त्यामुळे जगभरात गव्हाचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतले जाते. भारतात पंजाब आणि मध्यप्रदेश या राज्यात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. उन्हाळ्याच्या शेवटी कापणीसाठी वसंत गव्हाची लागवड केली जाते, तर हिवाळ्याच्या गहूची लागवड हिवाळ्याच्या सुरूवातीला तर उन्हाळ्यातील गव्हाची लागवड उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात केली जाते.
गहूच्या लागवडीसाठी (Cultivation of wheat) पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी जमिन योग्य असते. परंतु हलक्या आणि मध्यम जमिनीत भरपूर भरखते व संतुलित रासायनिक खतांचा वापर केल्यास चांगले उत्पादन घेता येते. गव्हाच्या योग्य उत्पादनासाठी जमिन भुसभुशीत असणे जरुरीचे असते. कारण अशा जमिनीमध्ये गव्हाच्या मुळांची वाढ, विस्तार व कार्यक्षमता वाढून जमिनीतील अन्नद्रव्यांचे, पाण्याचे व्यवस्थित शोषण होते.
असे करा व्यवस्थापन
रब्बीच्या हंगामात गव्हाची लागवड करण्यापूर्वी व खरीपाचे पिक निघाल्यावर लोखंडी नांगराने खोलवर (20-25 से.मी.) नांगरट करावी. नांगरट झाल्यावर हेक्टरी 25 ते 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत टाकावे. जमिनीची दोन वेळा कुळवणी करावी. बागायती गव्हाची पेरणी शक्यतो नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. पेरणी 15 नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी 2.5 क्विंटल उत्पादन कमी येते. त्यामुळे 15 डिसेंबरनंतर केलेल्या गव्हाची लागवड फायदेशीर ठरत नाही.
बागायती गहू वेळेवर पेरणीसाठी जमिनीत ओलावा नसल्यास, जमीन ओलवून घ्यावी. वापसा आल्यानंतर जमिन कुळवावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे. रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि बियाणे दोन चाद्याच्या पाभरीने 22.5 तरावर पेरावे. पाभरीने पेरणी एकेरी करावी त्यामुळे आंतरमशागत करणे सुलभ जाते. पेरणी करताना प्रति हेक्टरी 60 किलो नत्र, म्हणजेच 130 किलो युरिया, 60 किलो स्फुरद म्हणजेच 375 किलो सिंगल सुपर फॉस्पेट व 40 किलो पालाश म्हणजेच 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावे. उर्वरित नत्राचा हप्ता खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी 130 किलो युरिया प्रति हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी दयावे.
असे करा तण व्यवस्थापन
लागवडीनंतर शेतकर्यांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तण व पिकावर पडणारा रोग आहे. मात्र, त्याचेही योग्य व्यवस्थापन केल्यास त्यापासूनही आपण पिकांचा काही प्रमाणात बचाव करू शकतो. गव्हामधील तण नियंत्रणासाठी, उगवणीपूर्वी ऑक्सिफ्लोफेन हे तणनाशक 425 मिली. प्रति हेक्टरी किंवा पेडिमिथॅलीन हे तणनाशक 2.5 किलोग्रॅम प्रति हेक्टरी 750 लिटर पाण्यात मिसळून पेरणी केलेल्या क्षेत्रावर एकसमानपणे फवारावे.
तसेच या तणनाशकाची फवारणी करणे शक्य न झाल्यास विशेषतः द्विदल वर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 27 ते 35 दिवसा दरम्यान 2-4 डी (सोडीयम क्षार) हे तणनाशक 1.0 ते 1.5 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. फवारणीच्या वेळी तणे 2-4 पानांच्या अवस्थेत असावीत याची काळजी घ्यावी. तसेच 2-4 डी फवारणी करताना हे तणनाशक आजूबाजूच्या इतर विशेषतः द्विदल वर्गीय पिकांवर उडणार नाही याची काळजी घ्यावी. तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅटफॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावे.
रोग पडू नये यासाठी ही घ्या काळजी
गव्हाच्या लागवडीनंतर त्यावर तांबेरा, काळजी यासारखे रोग पडण्याची शक्यता असते. तांबेरा हा रोग हा हवेव्दारे पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे पानांवर विखुरलेले नारिंगी रंगाचे फोडे येतात, जे पुढे काळे पडतात. या फोडांमध्ये बुरशीची बीजे असतात. तांबेर्यापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक वानांचा वापर करावा. तांबेर्याची लागण दिसताच बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेउन 10 ते 15 दिवसांचे अंतराने फवारण्या कराव्यात.
काजळी या रोगाचा प्रसार बियाण्याव्दारे होते. रोगाट ओंब्यामध्ये दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत, असे केल्यास काजळी या रोगापासून आपण गहू या पिकाचे संरक्षण करू शकतो. तसेच गव्हावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचे प्रादुर्भाव दिसताच बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇