प्रा. मयुरी देशमुख
मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ .उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव
जमिनीची सुपीकता ही चिंतेची बाब होत चालली आहे. याचे कारण म्हणजे रासायनिक खतांचा व रसायनांचा बेसुमार वापर. जमिनीची सुपीकता टिकविल्याशिवाय आपणास कुठलाही पर्याय नाही. कारण जमीन सुपीक असेल तरच आपण त्यात कुठलेही पीक घेऊ शकतो आणि जमिनी नापीक झाल्यात तर उद्या अन्नधान्य पिकविणे अशक्य होईल यासाठी यासाठी सेंद्रिय खत हा एक शाश्वत पर्याय आहे.
सेंद्रिय खतांमध्ये कंपोस्ट खताला अनन्यसाधारण असे स्थान आहे. कारण मकंपोस्ट खतफ म्हणजे जिवाणूंच्या सहाय्याने शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या टाकाऊ स्वरूपाचा काडीकचरा, पान, जनावराची मलमूत्र यापासून कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. वनस्पतीजन्य व प्राणीजन्य स्वरूपाच्या टाकाऊ पदार्थापासून निर्माण केलेले कंपोस्ट खत जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून एक महत्वाचे साधन आहे. अशा प्रकारची सेंद्रिय खते वापरली असता त्यातील अन्नद्रव्ये पिकांना सतत व हळुवारपणे उपलब्ध होतातच पण त्याशिवाय जमिनीत प्रभावी घटकांचे प्रमाण वाढून त्यातून वनस्पतीच्या वाढीस उपयुक्त अशी इतर अन्नद्रव्ये निर्माण होतात. जमिनीचा पोत सुधारून जलधारणा शक्तीत वाढ होते. हवा व पाणी यांचे योग्य संतुलन, तापमानाचे नियमन इत्यादी बाबीमुळे जमिनीच्या रासायनिक व जैविक गुणधर्मावर अनुकूल परिणाम होऊन जमिनीची एकंदर उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते.
सेंद्रिय खताचे मुख्यतः दोन प्रकार आहेत –
1). सेंद्रिय भरखते ः ही खते पिकांना सावकाश लागू पडतात. त्यामधील पोषण द्रव्यांचे प्रमाण कमी असते, त्यामुळे ती जास्त प्रमाणात द्यावी लागतात. उदा. शेणखत, कंपोस्ट खत, ऊसाच्या पाचटाचे कंपोस्ट खत, हिरवळीचे खत गांडुळ खत, इत्यादी.
2). सेंद्रिय जोरखत ः भरखतांच्या मानाने यामध्ये पोषण द्रव्यांचे प्रमाण जस्त असते. त्यामुळे ही खते भरखताच्या मानाने कमी प्रमाणात द्यावी लागतात. सर्व प्रकारच्या लेंडी, हाडांचा चुरा, मासळी खत ई.
कंपोस्ट खत म्हणजे काय?
कंपोस्ट खत तयार करणे हि एक जीवशास्त्रीय प्रक्रिया असून त्यामध्ये न कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्म जिवाणूंमार्फत विघटन होते आणि कार्बन नायट्रोजन यांचे गुणोत्तर कमी होते. अशा विघटन झालेल्या सेंद्रिय पदार्थाना कंपोस्ट खत असे म्हणतात. अशा पध्दतीच्या कंपोस्ट खतात शेणखताच्या तुलनेत अधिक प्रमाणात सेंद्रिय पदार्थ वापरले जातात. उदा पिकांचे धसकटे, तण, गवत, पिकांचे अवशेष ,काड, खळ्यावरील निरूपयोगी पदार्था, कापसाचे देठ, पिकांचा भूसा, पाने, ऊसांचे पाचट, चिपाड, गोठ्यातील मूत्र शोषून घेतलेली माती यापासून कृत्रीम पध्दतीने खत तयार केले जाते. त्याच प्रमाणे शहरातील कचरा, टाकाऊ पदार्थ, शेणखत, घराघरातुन टाकलेला कचरा, भाजी मंडई, मच्छी बाजार खाटीकखान्यातील कचरा, लोकर कापूस यांच्या टाकाऊ भागापासून उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार होते.
कंपोस्ट खत तयार करण्यासाठी महत्वाच्या बाबी
बाष्प : सूक्ष्म जिवाणूंच्या संवर्धनासाठी पाण्याची योग्य प्रमाणात आवश्यकता असते. उ घड्या हवेमध्ये पाण्याचे प्रमाण 40 टक्के पेक्षा कमी असल्यास सेंद्रिय पदार्थाचे विघटन होत असते. परंतु बाष्पाचे प्रमाण 60 टक्यांच्या वर गेल्यास सेंद्रिय पदाथांचे विघटन हवा विरहित वातावरणात होते.
तापमान : सेंद्रिय पदार्थांच्या विघटनासाठी तापमान 40 ते 70 सेल्सिअसपर्यंत असावे लागते. खताचा खड्डा भरल्यानंतर सूक्ष्म जिवाणूमुळे खड्ड्याचे तापमान वाढते. हे तापमान 70 सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास खड्ड्यातील ओलाव्याचे (आर्द्रतेचे) योग्य प्रमाण राखलेले असल्यास तापमान प्रमाणात राहते व त्यामुळे सूक्ष्म जिवाणू, बुरशी व क्टिनोमायसेटिस यांची चांगली वाढ होते. जिवाणूंच्या पुनरुत्पतीसाठी यांची भरमसाठ वाढ होण्याच्या दृष्टीने 28 अंश सेल्सिअस ते 38 अंश सेल्सिअस हे तापमापन अतिशय उत्तम असते, मात्र तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेले तर जिवाणूंची वाढ थांबते व ते सुमावस्थेत जातात.
सेंद्रिय पदार्थ : कंपोस्ट खताची निर्मिती टाकाऊ सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. सेंद्रिय पदार्थाचा वापर करताना त्यांचे लहान लहान तुकडे केल्यास हवायुक्त (अशीेलळल) पध्दतीने जलद विघटन होते
फॉस्फेटयुक्त खताचा वापर : विघटनाचा वेग वाढवण्यासाठी व उत्पादन वाढण्यासाठी तसेच त्यातील नत्राचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टिने याची मदत होते. सेंद्रिय पदार्थात असणार्या नायट्रेट नत्राचे नत्रवायूमध्ये रूपांतर होण्यास अटकाव होतो. हे टाळण्यासाठी स्फुरदचा वापर अत्यंत उपयोगी पडतो. यासाठी एक टन सेंद्रिय पदार्थासाठी एक ते दोन किलो सुपर फॉस्फेट वापरणे आवश्यक असते.
कार्बन:नायट्रोजन गुणोत्तर : पिकाच्या वाढीच्या व खताच्या गुणवत्तेच्या दृष्टीने कार्बन- नायट्रोजन गुणोत्तर 30:1 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक असते. सूक्ष्म जिवाणूच्या वाढीसाठा कार्बनची आवश्यकता असते, तर नत्राचा उपयोग प्रथिने तयार करण्यासाठी होतो.
नत्राचा वापर : सेंद्रिय पदार्थाचे जलदगतीने विघटन होण्यासाठी नत्राचे प्रमाण एक टक्का ठेवावे. यासाठी एक टन सेंद्रिय पदार्थामध्ये 1 ते 2 किलो युरिया टाकावा.
जिवाणू संवर्धकाचा वापर : कृत्रिमरित्या तयार केलेली जिवाणू संवर्धक वापरल्यास जिवाणूंची संख्या वाढते व त्यामुळे सेंद्रिय पदार्थाचे विघटन होण्यास मदत होते. त्यासाठी एक टन सेंद्रिय पदार्थामध्ये अर्धा किलो जिवाणू संवर्धक पुरेसे होते. त्यामध्ये बुरशीजन्य- ट्रायकोडर्मा, अस्परजिलस पेनिसिलियम, क्रायसोजिनम इत्यादी जिवाणू संवर्धके वापरावीत.
चाळणी : खड्ड्यामध्ये एक महिन्याच्या अंतराने 2 ते 3 वेळा चाळणी करून घेतल्यास हवा खेळती राहते प्राणवायूचा पुरवठा चांगला होतो व जिवाणूंची संख्या वाढून विघटन लवकर होते.
कंपोस्ट खत तयार करण्याच्या पद्धती
इंदौर पद्धत किंवा ढीग पद्धत : यामध्ये शेतातील काडीकचरा, मलमुत्र, इतर सेंद्रिय पदार्थ एकत्र करून एक आड एक धरात पसरून साधारणतः सहा फूट रुंद आणि सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेनुसार लांबी ठेवून जमिनीवर 5 ते 6 फुट उंचीपर्यंत थर रचला जातो. अधूनमधून पाणी शिंपडून ओलावा टिकविला जातो. एक महिन्याच्या अंतराने मजुरांच्या उपलब्धतेनुसार ढीग तीन ते चार वेळा वरखाली करून कुजणारे पदार्थ एकजीव केले जातात. कुजण्याची क्रिया उघड्यावर ऑक्सीजनयुक्त वातावरणात होत असल्याने लवकर होते, परंतु यामध्ये ओलावा लवकर कमी होती व काही प्रमाणात अन्नद्रव्ये वायुरूपात वाया जातात. ढिगावर प्लास्टिकचे आच्छादन टाकल्यास तापमानात वाढ होऊन कुजण्यास मदत होते. तसेच अन्नद्रव्यांचा र्हास थांबवता येतो. अशाप्रकारे तयार केलेल्या कंपोस्ट खतामध्ये सुमारे 0.8 ते 1.5 टक्के नत्र, 0.5 ते 1.0 टक्के स्फुरद, 0.8 ते 1.8 टक्के पालाश आणि इतर दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्येही उपलब्ध असतात.
बंगलोर पद्धत किंवा खड्डा पद्धत : यामध्ये 6 फुट रूंद, 3 फुट खोल व सोयीनुसार लांबी असलेला खड्डा तयार केला जातो. खड्ड्याचा तळ व बाजू चांगल्या प्रकारे ठोकून घेतल्या जातात. त्यानंतर प्रथम 6 इंच जाडीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन पाणी शिंपडून ओला केला जातो. अशा क्रमाने खड्डा पूर्ण भरून जमिनीच्यावर सुमारे दीड ते दोन फुट उंचीपर्यंत भरून माती व शेणकाल्याचे मिश्रण करून लिंपून घेतला जातो. खड्ड्यात ओलावा टिकविण्यासाठी अधूनमधून पाणी शिंपडले जाते. कुजण्याची क्रिया सुरुवातीस ऑक्सिजनयुक्त वातावरणात व नंतर ऑक्सिजन कंपोस्ट खत तयार करण्याच्या विविध पद्धती विरहित वातावरणात होत असल्याने कुजण्याचा वेग मंदावतो, त्यामुळे खत तयार होण्यास लागणारा कालावधी वाढतो. अर्थात ढीग पद्धतीच्या तुलनेत अन्नद्रव्यांचे वाया जाण्याचे प्रमाण कमी असते.
नॅडेप पद्धत : या पद्धतीत जमिनीवर पक्क्या विटांच्या साह्याने 10 फूट लांब, 6 फूट रुंद व 3 फूटउंच अशा आकाराचे हौदाचे बांधकाम केले जाते. विटांच्या दोन ओळींनंतर तिसर्या ओळीत खिडक्या ठेवल्या जातात. या पद्धतीमध्ये सुमारे एक ते दीड टन काडीकचरा, 100 कि. ग्रॅ. शेण, दीड टन चाळलेली माती
भरली जाते. नाडेप पद्धतीमध्ये सर्वांत खालचा थर चांगला ठोकून शेणाचा सडा टाकून घेतात. त्यानंतर 6 इंच जाडीचा काडीकचरा थर व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन, त्यावर 100 लिटर पाण्यात 4 ते 5 कि. ग्रॅ. शेण मिसळून शिंपडले जाते. यानंतर साधारणतः 1 ते 2 इंच जाडीचा चाळलेला मातीचा थर अर्धा देऊन परत पाणी शिंपडून ओलावा केला जातो.अशा प्रकारे 3 ते 4 महिन्यांत उत्कृष्ट कंपोस्ट तयार होते.या पद्धतीत कुजण्याची प्रक्रिया सर्वच थरात ऑक्सिजनयुक्त वातावरणात जलद व सारख्याच प्रमाणात होते. त्याशिवाय कंपोस्ट तयार होत असताना ओलावा अधिक प्रमाणात नष्ट होत नाही आणि अन्नद्रव्यांचा र्हास पण होत नाही. 3 ते 4 महिन्यात उत्कृष्ट कुजलेले चांगले कंपोस्ट तयार होते.
सुपर कंपोस्ट : रासायनिक खताच्या तुलनेत कंपोस्ट खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीकोनातून विशेषतः स्फुरदाचे प्रमाण वाढविण्याकरता प्रत्येक 15 किलो सुपर फॉस्फेटचा थर देणे फायदेशीर आहे. यापासून तयार झालेल्या कंपोस्ट खतालाच मसुपर कंपोस्ट खतफ असे म्हणतात. यामुळे कुजण्याची क्रिया तर लवकर होतेच पण त्याचबरोबर स्फुरद सच नत्र वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. कपोस्ट खताचा दर्जा सुधारतो.
कंपोस्ट खत तयार करताना घ्यावयाची काळजी
तयार केलेले कंपोस्ट खत चांगल्या प्रतिचे होण्यासाठी वापरण्यात येणारा काडीकचरा जनावरांच्या गोठ्यात ठेवला तर त्यात शेण व मूत्र मिसळले जाऊन खताची प्रत चांगली होते. त्याशिवाय ते जलद कुजण्यास मदत होते. पिकांचे अवशेष खड्ड्यात भरायची असतील तर ते भरण्यापूर्वी शक्य तितके लहान लहान तुकडे केले तर लवकर कुजतात. कार्बन व नत्राचे प्रमाण अधिक असणारे सेंद्रिय पदार्थ (लवकर कुजणारे) उदा. गव्हाचे, भाताचे काड, भुईमुगाची टपले इत्यादी पासून जर कंपोस्ट तयार करावयाचे असेल तर प्रत्येक थरात जनावरांच्या गोठ्यातील साठलेल्या मुत्राचा हलका शिडकावा करावा किंवा हे शक्य नसेल तर युरिया किंवा अमोनियम सल्फेटचे 1.5 ते 2.5 टक्के तीव्रतेचे द्रावण शिंपडावे, जेणेकरून त्यातील नत्राचे प्रमाण वाढून खत लवकर तयार होईल. कंपोस्ट लवकर कुजण्याकरिता त्यात सतत ओलावा राहील याची काळजी घ्यावी.
कुजण्याचा वेग चांगला राखण्यासाठी व कंपोस्ट खताची गुणवत्ता वाढविण्यासाठीच्या बाबी
सेंद्रिय पदार्थामधील दगड, विटांचे तुकडे, कचरा, खिळे, काच आणि स्लॅस्टिकचे तुकडे इत्यादी पदार्थ वेचून बाजूला करावेत. सेंद्रिय पदार्थांचे शक्यतो लहान लहान तुकडे (15 ते 20 से.मी.) करून थर द्यावा, थरावर शेणकाल्याचे मिश्रण टाकावे. शेणखतामध्ये प्रति टन उपलब्ध सेंद्रिय पदार्थात अर्धा किलो या प्रमाणात कंपोस्ट तयार करणारे जिवाणू खत मिसळावे. जनावराचे मूत्र किंवा अर्धा किलो युरिया किंवा अमोनियम सल्फेट व दोन किलो सुपर फॉस्फेट पाण्यात एकजीव मिश्रण करून प्रत्येक थरात शिंपडावे. या बरोबर जुने कुजलेले शेणखत थरात विरजण म्हणून टाकल्यास कंपोस्ट खत कुजण्यास मदत होते. खड्ड्यात सतत ओलावा राहील याची दक्षता घ्यावी. अशाप्रकारे खड्डा भरून खड्ड्यातील थर एक महिन्याच्या अंतराने शक्य असल्यास खालीवर करून एकत्रित केल्यास 4 ते 5 महिन्यात उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार होते.
कंपोस्ट खत तयार झालेले कसे ओळखावे
उत्तम कुजलेले खत हलके आणि मऊ दिसते. उत्तम कुजलेल्या सेंद्रिय पदार्थाचे वजन 40 टक्क्यांनी कमी होते तर आकारमान 60 टक्क्यांनी कमी कमी होते. खताचा रंग तपकिरी व गर्द काळा असतो. खताची विशिष्ट घनता कमी होते. खतास मातकट वास येतो. खताचे तापमान कमी होते. खतामधून कार्बन डायऑक्साईड निवाचे प्रमाण कमी होते. खतातील कार्बन आणि नायट्रोजन याचे गुणोत्तर 30:1 असे असते व नत्राचे प्रमाण 1 ते 1.5 टक्के असते.
कंपोस्ट खताचे फायदे
कंपोस्ट खत हा कोणताही शेतकरी स्वतःच्या शेतावर तयार करूशकतो. कंपोस्ट खतनिर्मितीमध्ये टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचा पुनर्वापर केला जातो. यामध्ये फारसा खर्च येत नाही. सर्वसामान्य शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे आहे. कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची
सुपीकता टिकवून सूक्ष्म जीवांची संख्या वाढते. कंपोस्ट खताच्या वापरामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. जमिनीची धूप कमी होते.