मुंबई : भारतीय डाळिंब परदेशात प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांत संयुक्त अरब अमिराती, बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, बहारीन, ओमान आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये भारतीय डाळिंबाची मागणी वाढत आहे. आता अमेरिकेनेही भारतीय डाळिंबाची मागणी नोंदवली आहे. त्यानुसार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण म्हणजेच “अपेडा”ने (APEDA) 8 ऑगस्ट रोजी ताज्या डाळिंबाची पहिली खेप हवाई मार्गे अमेरिकेत निर्यात केली आहे.
परदेशी बाजारपेठेत भारतीय डाळिंबाची मागणी वाढली असून त्यामुळे भारतीय शेतकरी श्रीमंत होणार आहेत. परदेशातून “भगवा” म्हणजेच “शेंद्रा” वाणाच्या डाळिंबाला विशेष मागणी आहे. निर्यात खेप रवाना करताना “अपेडा”चे अध्यक्ष अभिषेक देव म्हणाले, की अमेरिकेत डाळिंबाची निर्यात वाढल्यास शेतकऱ्यांना अधिक भाव मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. गेल्या काही वर्षांत डाळिंब आयातदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. अमेरिकन बाजारपेठेत भारतीय आंब्याचा स्वीकार झाला, तसेच भारतीय डाळिंब देखील अमेरिकेत यशस्वी उत्पादन ठरेल, अशी उत्साही निर्यातदारांना आशा आहे.
तणांच्या नियंत्रणासाठी कृषीसम्राटचे ग्लायकिल… | Glykill |
भारतीय डाळिंबासाठी ऑस्ट्रेलिया, अमेरिका नवी बाजारपेठ
डाळिंबाची निर्यात क्षमता सुनिश्चित करण्यासाठी, APEDA राज्य सरकारांच्या सहकार्याने ‘डाळिंब-नेट’ अंतर्गत शेतांची नोंदणी करण्यासाठी नियमित जागरूकता कार्यक्रम आयोजित करते. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय डाळिंबांना परवानगी देण्याचा मार्ग मोकळा करून बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यात अपेडाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
भगवा डाळिंबाला परदेशी बाजारपेठेत जास्त मागणी
महाराष्ट्रातील ‘भगवा’ डाळिंबात उच्च अँटिऑक्सिडेंट सामग्री आणि सुपरफ्रूट वैशिष्ट्यांमुळे भरपूर निर्यात क्षमता आहे. ‘भगवा’ जातीच्या डाळिंबाला परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. देशातून होणाऱ्या एकूण डाळिंबाच्या निर्यातीत महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचा वाटा 50 टक्के आहे.
62,280 मेट्रिक टन डाळिंबाची निर्यात
संयुक्त अरब अमिराती (UAE), बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, बहरीन, ओमान या देशांना 2022-23 मध्ये 58. लाख 36 हजार अमेरिकी डॉलर्स किमतीचे 62,280 मेट्रिक टन डाळिंब निर्यात करण्यात आले. डाळिंबाच्या उत्पादनात भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो. देशात डाळींब लागवडीखालील एकूण सुमारे 2,75,500 हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही भारतातील प्रमुख डाळिंब उत्पादक राज्ये आहेत.
भगवा डाळिंबाची वैशिष्ट्ये
भगवा हे डाळिंबाचे वाण खाण्यासाठी सर्वात चविष्ट असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकरी स्वतः सांगतात. या डाळिंबाच्या बिया मऊ असतात. हे वाण राजस्थान आणि महाराष्ट्रासाठी अतिशय योग्य मानले जाते. महाराष्ट्रातील वातावरण भगव्या जातीच्या डाळिंबासाठी अतिशय अनुकूल आहे. त्यामुळेच नाशिक जिल्ह्यात, विशेषत: देवळा व बागलाण परिसरात या जातीच्या डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात नजरेस पडतात.