विक्रम पाटील
सुगरण… भारत कृषीप्रधान देश होता आणि आहे. देशात सर्वाधिक रोजगार शेतातून उभा राहतो. या शेत माऊलीने रोजगार द्यावा, अन्न द्यावे, पशुपक्षी यांना जगवावे, वनसंपदा निर्माण करावी, मनोरंजन करावे, आनंद प्रसवावा. तरीही मानवाने केवळ आणि केवळ शेतीचे शोषणच करावे. आतापर्यंत चालत आले ते ठीक होते. ते शाश्वत होते तोपर्यंत ठीक होते. आता शेती शाश्वत ठेवायची असेल तर अधिक विचारपूर्वक आणि उचित कृती करावी लागेल. सर्वाधिक रोजगार निर्माण करणारी शेती मनोरंजकही आहेच याचा कधी विचार केलाय का आपण? शेतीत सौंदर्य आहे, मनोरंजन आहे, मनशांती निर्माण करण्याचे कसब आहे. रूप, रंग, गंध, स्पर्श, चव आणि ध्वनी यांचे प्रचंड वैविध्य आहे.
संतश्रेष्ठ सावता माळी आपल्या अभंगातून व्यक्त होतात
आमुची माळियाची जात श्र शेत लावू बागायत श्रश्र
आम्हा हाती मोट नाडा श्र पाणी जाते फुल झाडा श्रश्र
चाफा शेवंती फुलली श्र प्रेमे जाई जुई व्याली श्रश्र
सावता ने केला मळा श्र विठ्ठल देखियला डोळा श्रश्र
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
म्हणजे विठ्ठलही हा श्रमाचा मळा फुललेला पाहून आनंदीत होतात. शेतातील पक्षी जगताने या सौंदर्य मळ्यात आपल्या अस्तित्वाने आणखीच बहार आणली. त्याचे काही आयाम येथे पाहू.
कबूतर/ पारवा/ होला : महाराष्ट्रातला सर्वत्र संचार असलेला आणखी एक मोठा पक्षी समूह म्हणजे कबूतर आणि होला कुटुंब. महाराष्ट्रातील राज्यपक्षी म्हणून लोकमान्यता आणि राजमान्यता प्राप्त मपिवळ्या पायाची हरोळी किंवा हरियल याच कुळातील पक्षी. हरियल पक्षाचा आकार आणि रंगरूप अप्रतिम सुंदर आहे. त्याच्या हिरवळ रंगात एक वेगळेच आकर्षण आहे.
समूहाने राहणारे पक्षी वड, पिंपळ, औदुंबर यांचे फळे खाण्यासाठी झाडाच्या शेंड्यावर बसतात तेव्हा त्यांचे निरीक्षण थोडे सोपे जाते. अतिशय लाजाळू असणारे हरियल निरीक्षकाची चाहूल लागताच भुर्र उडून जातात. दुपारच्या वेळी बेहडा, नीम, काटेसावर अशा मोठ्या वृक्षांवर खाद्य नसल्यास त्यांच्या थव्याचे गायन अतिशय मधुर असते. एखादी गवयाची टीम शीळ घालत समूह गायन करते आहे असे वाटते. शेतात हरियाल पक्षाचे गायन ऐकून कान तृप्त होतात.
महाराष्ट्रभरात पारवा आणि होला कुटुंबाच्या सुमारे पंधरा अधिक जाती आढळतात. त्यात निलगिरी रान पारवा, जांभळा रान पारवा आणि पिवळ्या पायाची हरोळी हे प्रमुख आहेत. होला परिवारात ठिपके वाला होला, पंख वाला होला, खवलेदार होला अशी मंडळी आहेत. कबुतराचा सर्वांग सुंदर आकार सार्यांनाच लाभलेला आहे. बहुतेक सारे प्रामुख्याने राखी रंगाचे अथवा करड्या रंगाचे. सारेच लाजाळू. (शहरातील कबुतरे मात्र जरा वेगळी चीज आहे तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे.)
शांततेचे प्रतीक म्हणून या कुटुंबाचा परिचय राजे राजवाडे ते आधुनिक लोकशाह्या मिरवतात. ते त्यांच्या कुटुंबाचे प्रतीक समजावे. पारवा आणि होला मंडळी शेतात धान्य तयार करण्याच्या जागी हमखास घुटमळते. गुरांच्या गोठ्याच्या आसपासही वावरते. खेडेगावात, खुली जंगले, शेती प्रदेश, कोरडवाहू शेती, मनुष्यवस्ती या त्यांच्या आढळाच्या जागा. रानटी पक्षी पर्वतीय कडांच्या ठिकाणी राहतात. सारेच प्रामुख्याने शाकाहारी, तृणधान्ये त्यांच्या आवडीचे. तरीही नुकसानीची नोंद घ्यावी असा त्रास नाही. धान्याचे दाणे नसल्यास गवताच्या बियांवर गुजराण करतात प्रसंगी फळेही खातात पण आवडते खाद्य दाणेच.
याच कुटुंबातील काही पाळीव कबुतरे आपल्याला माहिती आहेत. खेडेगाव, शहरात काही मंडळी हौसेने त्यांना पाळतात. त्यांच्यात विविध रंग आणि रूपही आढळते. त्यांना चांगले संरक्षित केल्यास प्रजनन दर मोठा असल्याने भरभर संख्या वाढते. अंगणात सतत गुटुर्र गुटुर्र सुरू असते. काही पाळीव कबुतरे बहारदार नृत्यही करतात. त्यांच्या शारीरिक हालचाली मनोवेधक असतात. मालक मंडळी हौसेने या पाळीव कबुतरांच्या पायात मंजुळ नादाची घुंगरे अडकवतात. आकाशातील त्यांचा संचार हा काही मंडळींचा आवडीचा खेळ आहे. ही पाळीव कबुतरे आपले घर शोधण्यात खूप पटाईत असतात. अशा कबुतरांनी आपली वाडी वस्ती अधिकच सुंदर होते.
शेतात आपल्या आवडीच्या विसाव्याच्या जागी यांचा संचार असल्यास थकवा जाणवत नाही आणि मनही प्रफुल्लित होते. शेतावर यांच्यासाठी थोडेसे सुरक्षित लाकडीपाट्यांचे खोके केले आणि त्यांना मांजर कुत्रा यापासून सुरक्षित उंचीवर ठेवले की पुरे. त्यांचे अन्न पाणी ते मिळवतात. कृषी पर्यटनात त्यांचा समावेश असलाच पाहिजे. गुंतवणूक आणि खर्च नाही, आकर्षण मात्र हमखास आहे. ते धीटही असतात. त्यांना हातावर खांद्यावर बसवून फोटो काढायला, सेल्फी घ्यायला पर्यटकांना आवडते. त्यांचा स्पर्श, त्यांचे रूप, नाद याच्याने मन तृप्त होते. आपण ही कबुतरे पाळताना ते अधिकाधिक मुक्त असतील आणि निरोगी असतील याची काळजी घ्यावी. गरज नसताना स्पर्श टाळावा. या प्रजाती वाढतील त्यांचे संगोपन होईल याचीही दक्षता घेतली पाहिजे.
कवड्या कबुतराची एक प्रजाती (झरीीशपसशी ळिसशेप) मानवाची सेवा करता करता नामशेष झाले याची नोंद घेतली पाहिजे. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, भारतीय स्वातंत्र्यसंग्राम यादरम्यान या कबुतरांचा वापर राजे रजवाडे आणि टपाल विभाग करत होता. संदेश वहनाचे कार्य त्यांच्याकडून करवून घेतले जात होते. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे, अति कामामुळे ही प्रजाती हळूहळू नामशेष झाली आणि मानव एका चांगल्या मित्राला कायमचा मुकला. वर्तमान पर्यावरण बदलात आता आपणास अधिक सजीव नामशेष होणे परवडणारे नाही याचे भान कृषी पर्यटनामध्ये ठेवावे लागेल.
सुगरण : सुगरण (खपवळरप इरूर थशर्रींशी इळीव) हे पक्षाचे नाव आहे हे सार्यांनाच माहिती असते. सुग्रास चविष्ट स्वयंपाक करणार्या कर्मवती महिलांना आदराने मसुगरणफ म्हटले जाते, पण या पक्षाची ओळख मात्र फारच कमी लोकांना आहे असे निरीक्षण आहे. तरीही या पक्षाचे घरटे सामान्य माणसे ओळखतात. पक्षी ओळखत नाही पण घरटे ओळखतात, आणि म्हणूनच घरट्यामुळेच हा पक्षी शेतकरीही ओळखतात. आपल्या कुशल घर बांधणी साठी सुप्रसिद्ध असलेला सुगरण हा पक्षी महाराष्ट्रात साहित्य विश्वातही सुप्रसिद्ध आहे. खानदेशच्या कवयित्री बहिणाबाई चौधरींनी सुगरणीच्या खोप्याचे वर्णन करून जीवन तत्त्वज्ञानही सांगितले आहे. त्यांनी सुगरणीला अधिकच प्रसिद्ध केले त्या कवितेची सुरुवात अशी आहे.
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला.
सुगरण हा चिमणी वर्गातील पक्षी त्यांचे सुगरण, रेषाळ सुगरण, काळ्या छातीची सुगरण अशी दोन-तीन जाती महाराष्ट्रभरात आढळतात. आकाराने चिमणी एवढाच पक्षी. रंगही चिमणी मादीसारखा. नर-मादी समान असतात. नर थोडासा मोठा वाटतो. चिमणीच्या तुलनेत पिवळसर असतात. सुगरणीचे अन्न लहान आकाराची तृणधान्ये जसे बाजरी, राई, गवताच्या बिया, काही लहान लहान फळे, प्रसंगी बारीक अळ्या आणि कीटकही खातात. विणीच्या हंगामात दोघांचा रंग अधिकच पिवळा धमक होतो. विशेषतः नराच्या डोक्यावरचा मुकुट छान पिवळा नजरेत भरतो. नेहमी थव्याने राहतात. गवताळ प्रदेश, झुडूपीवने, शेती प्रदेश आणि आता उसाची मळे अशा ठिकाणी आढळतात. विणीच्या हंगामात प्रामुख्याने श्रावणात त्यांचा चिर्रर्र, चिर्रर्र असा कलरव लक्षवेधून घेतो. इतर वेळी आवाज फारसा लक्षवेधी नसतो. पक्षी तसा बुजराच आहे.
सुगरण पेक्षा सुगरणीचा खोपा अधिक प्रसिद्ध आहे त्याचे कारणही तसेच आहे. सुगरण खोपा करताना विशिष्ट ठिकाणाची निवड केल्या जाते. त्यासाठी वृक्ष काटेरी असावा लागतो. काटेरी वृक्षांच्या फांद्यांच्या टोकास घरटं बांधण्याचा प्रघात दिसतो. मात्र हा काटेरी वृक्ष विहीर, धरण, डोह यांच्या काठावर असावा लागतो. वृक्षाच्या फांद्या खाली पाण्यामध्ये प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत. पाण्यावर तरंगणार्या फांद्यांनाच घरटं करण्यास प्राधान्य दिले जाते. म्हणजे तो काटेरी रस्ता ओलांडून साप घरट्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि घरट्यातील अंडी पिल्लं यांच्या संरक्षणाची हमी तयार होते. यदा कदाचित साप घरट्या पर्यंत पोहोचलाच तर सामना करणे सोपे होते.
अलीकडील काळात अशा जागा कमी झाल्यात त्यामुळे सुगरणींनी उसाचे मळे स्वीकारले. उसाच्या मळ्यातील ऊस पिकातील असणार्या विजेच्या खांबांच्या तारांवर आता ते घरटे करण्यास प्राधान्य देतात. अशी जागा निवडली की घरटी विणायला विशिष्ट गवताची कोवळी जिवंत पाती लागतात. ती हिरवी, मजबूत, लवचिक, लांब आणि धारदार असावी लागतात. अशी पाती जमा करणे आणि घरटी विणण्याचे काम नरपक्षास करायचे असते.
हे घरटे गवताच्या निवडक असंख्य पात्यांनी विणले जाते, त्यामुळे ते लवचिक, आकर्षक आणि मजबूत असते. घरटे जुने झाले तरी त्याची मजबुती टिकून राहते. नर घरटं विणत असताना मादी घरट्याचे निरीक्षण करते. अनेक नर घरटं विणतात त्या घरट्यांना माद्या भेट देतात. घरटं पसंत असल्यास मादी घरट्याची आणि नराची निवड करते. निवड झाल्यास प्रणयाराधन सुरू होते आणि घरटे पूर्णत्वास जाते.
निवड नाकारल्यास घरटं अर्धवट सोडून नवीन घरटं विणायला सुरुवात करावी लागते. म्हणून थव्याने असणार्या सुगरण पक्षांचे पूर्ण आणि अपूर्ण घरट्यांची एकत्र वसाहतच दृष्टीस पडते. अशा वसाहतीत अर्धवट सोडलेली बरीच घरटी असतात पूर्ण झालेले घरटे एक इंच पाईप इतके जाड आणि उलट्या टांगलेल्या बाटली सारखे लांबोळके असते. त्यात मध्यभागी एक फुगवटा असतो, त्या फुगवट्याच्या आत अंडी आणि पिलांसाठी सुरक्षित जागा असते. घरट्याचे तोंड खाली असते त्यामुळे यदा कदाचित साप तिथपर्यंत पोहोचला तर सापास घरट्यात प्रवेश करणे अशक्य होते.
आपल्या शेतात सुगरणीची वसाहत आहे का? नसावीच. कारण वसाहत करताना सुगरण आपल्या शेताची निवड कशी करणार? सुगरणीस पाण्याच्या काठावर काटेरी झाड असावे लागते. झाडाच्या फांद्यांचे प्रतिबिंब त्या पाण्यात असावे लागते. असे झाड सापडल्यास आवश्यक त्या गवताचे मुबलक कुरण जवळच असायला पाहिजे. म्हणून शेत शिवारात सुगरण दिसणे दुरापास्त झाले आहे. विकासाच्या वरवंट्याने सुगरणीचा अधिवास शेत शिवारातून आपण हद्दपार केलाय. आता सुगरणीच्या वसाहती जंगल आणि शेतीच्या संयुगावर दिसतात, आणि उसाच्या शेतात पिकाच्या मध्यावरून जाणार्या वीजतारांवर लोंबकळताना आढळतात. ऊस हे गवत वर्गीय पीक आहे हेही कारण महत्त्वाचे असावे.
शेतकरी अशी माहिती बाळगणारा, यांचे निरीक्षण करून माहिती देणारा, संदर्भ साहित्याची फोडणी घालणारा असल्यास सुगरणीची वसाहत पर्यटकांना दोन दिवस शेतावर मुक्कामास आणू शकेल इतके कौशल्य सुगरण कडे आहे. पण अधिवास संबंधी इतकी संकट असतानाही जगण्याची अदम्य चिकाटी सुगरणीकडे आहे. आपल्या जगण्याचा सुंदर आणि समृद्ध पसारा अजून ती टिकवून आहे. मग शेतकरीच कसा आयुष्याला कंटाळात असावा? आपल्या कवितेचा शेवट करताना बहिणाबाई म्हणतात …
तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ
तुला देले रे देवांन दोन हात दहा बोटं. ????
लेखक हे पक्षी अभ्यासक आहेत.
संपर्क. 9970225538.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
निसर्गाचे सफाई कर्मचारी – गिधाड
गाई-म्हशींना मीठ खाऊ घातल्याने त्यांची दूध देण्याची क्षमता खरोखरच वाढते का? जाणून घ्या याविषयी सारं काही …
Very Nice it’s a useful information. . Great👍👏