महिलांना उद्योग उभारणीसाठी बँकाकडून विविध कर्ज योजनांद्वारे अर्थसहाय्य आणि काही सवलती दिल्या जातात. या योजनांचा लाभ घेऊन ग्रामीण व निमशहरी भागातील महिला उद्योजक आपला व्यवसाय करू शकतील.
अन्नपूर्णा योजना
छोटे हॉटेल, घरगुती खानावळ, केटरिंग व्यवसाय सुरू करू इच्छिणार्या महिलांना या योजनेद्वारे 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. या कर्जाची परतफेड 3 वर्षात करायची असते. भांडी, गॅस, कच्चा माल आदी खरेदी करण्यासाठी हे कर्ज दिले जाते.
स्त्री शक्ती कर्ज योजना
ज्या महिलांनी उद्योजक विकास कार्यक्रम पूर्ण केला आहे, त्यांना योजनेंंतर्गत 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. यासाठी सबंधित व्यवसायातील लाभार्थी महिलेचे भांडवल 50 टक्क्याहून अधिक असणे आवश्यक असते. व्यवसाय भागीदारीत, किंवा खाजगी कंपनी किंवा सहकारी पद्धतीने असावा. यात किरकोळ व्यवसाय, स्वयं रोजगार उदा. डॉक्टर, वकील, ब्युटी पार्लर, सनदी लेखापाल, कंपनी सचिव, आर्किटेक्ट यासारखे व्यवसाय. 10 लाख रुपयापर्यंतच्या कर्जास पूरक तारण द्यावे लागत नाही. उत्पादन अथवा सेवा व्यवसाय यासाठी पुढीलप्रमाणे टर्म लोन व वर्किंग कॅपिटल लोन मिळू शकते.
- किरकोळ व्यवसाय ः 50 हजार ते 2 लाख रुपयापर्यंत.
- बिझनेस एंटरप्रायजेस ः 50 हजार ते 2 लाख रुपयापर्यंत
- स्वयं रोजगार ः 50 हजार ते 25 लाख रुपयापर्यंत
- लघू उद्योग ः 50 हजार ते 50 लाख रुपयापर्यंत
(गरज व पात्रतेनुसार 1 कोटी रुपयांपर्यंत)
ब्यूटीपार्लर, टेलरिंग शॉप
ब्यूटीपार्लर, ब्यूटीक, सलून, टेलरिंग शॉप, सायबर कॅफे, मोबाईल शॉपी, झेरॉक्स मशीन, फ्लेक्स बोर्ड यासारखे व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना 10 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. यासाठी सबंधित महिलेस व्यवसायाचे प्रशिक्षण व अनुभव असणे आवश्यक असते. अशा व्यवसायासाठी आवश्यक असणारी मशिनरीसाठी टर्म लोन (मुदतीचे कर्ज) व खेळत्या भांडवलासाठी वर्किंग कॅपिटल स्वरूपात कर्ज दिले जाते.
अक्षय महिला आर्थिक सहाय्य
या योजनेंंतर्गत किरकोळ विक्री, कॉटेज इंडस्ट्री, शेती सबंधित व्यवसाय यासारख्या व्यवसायासाठी महिलांना कर्ज मिळू शकते.
मुद्राकर्ज योजना
15 एप्रिल 2015 पासून ही कर्ज योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यान्वित केली असून या योजनंंतर्गत सूक्ष्म व लघू उद्योगांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेंंतर्गत कर्ज देताना महिलांना त्यातही मागासवर्गीय महिलांना प्राधान्याने कर्ज मिळू शकते. मुद्रा कर्ज योजनेंतर्गत कर्ज प्रकरणासाठी प्रोसेसिंग चार्जेस द्यावे लागत नाहीत. हे कर्ज राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामीण बँका, मायक्रो फायनान्स कंपनी मार्फत दिले जाते. या योजनेत पुढील तीन प्रकारे कर्ज दिले जाते. - मुद्रा शिशू कर्ज योजना ः 50 हजार रुपयापर्यंतचे कर्ज 10 ते 12 टक्के व्याज दराने दिले जाते.
- मुद्रा किशोर योजना ः 50 हजार रुपये ते 5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज 14 ते 17 टक्के व्याज दराने दिले जाते.
- मुद्रा तरुण योजना ः आधीच्या अस्तिवात असलेल्या व नफ्यात असलेल्या व्यवसायास विस्तारासाठी 10 लाख रुपयापर्यंत 16 टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते.
कर्ज मंजूर करताना विविध बँकेच्या अटी, व्याजाचे दर, कर्ज रक्कम, तारण याबाबतचे नियम कमी अधिक असू शकतात. महिलांना 25 पैसे ते 50 पैसे इतकी व्याजात सूटही दिली जाते तसेच काही कर्ज अनुदानीत असतात याबाबत माहिती घेऊन कर्ज मागणी करावी.
मो.नं.9423002014
(लेखक पुण्यातील नामवंत वित्तीय सल्लागार आहेत.)