मराठवाडा म्हटलं की, दुष्काळ, भीषण पाणी टंचाई, शेतकरी आत्महत्या असे विदारक चित्र डोळ्यासमोर उभे राहते. अशा परिस्थितीतही शेतकरी खचून न जाता काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकविण्याचे काम करत आहेत. याच मराठवाड्यातील शेवटच्या टोकाचा जिल्हा म्हणून हिंगोलीची ओळख आहे. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील राहुल दत्तराव कव्हर (वय 37) हे गेल्या पाच वर्षांपासून शेती व्यवसायात उतरले आहेत. परंतु, पारंपरिक शेतीला बगल देत सुधारित तंत्राद्वारे शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचे धाडस करणारा अवलिया म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
हिंगोली शहरापासून सेनगाव तालुक्यातील ताकतोडा हे गाव 36 किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या जवळपास 3 हजार आहे. ताकतोडा गावाचा मुख्य व्यवसाय शेती असून गावची आदर्श गाव योजनेत निवड झाली आहे. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे राहुल यांना 12 वी पर्यंतच शिक्षण घेता आले. शिक्षण सोडल्यानंतर काही महिने त्यांनी ट्रॅक्टरवर काम केले. त्यानंतर 10 वर्ष ऑटोमोबाईल दुकानावर काम केले.
चार एकरात हळदीमध्ये सोयाबीनचे आंतरपीक
राहुल यांनी सुरुवातीला चार एकरात हळदीमध्ये सोयाबीनचे ट्रॅक्टरचलित यंत्र व गादीवाफा (बेड) पद्धतीचा वापर करून आंतरपीक घेतले. आंतरपीक पद्धतीमुळे तणांची समस्या कमी होवून उत्पादनही चांगले झाले होते. रब्बी हंगामात कांदा बीजोत्पादन घेतात. उत्पादनानंतर शेतातच बियाण्याचे पॅकिंग व वजन करण्यात येते. प्रति क्विंटलला जवळपास 40 ते 55 हजार रुपयांचा दर मिळतो. या पिकाचे अर्थकारण फायदेशीर असल्याने गावातील अनेकांनी कांदा बीजोत्पादनास सुरूवात केली.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात गावाची निवड
दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्र व बायफ संस्था यांच्यातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत ताकतोडा या गावची निवड करण्यात आली. या गावाची सोयाबीनची हेक्टरी सरासरी उत्पादकता 10 ते 14 होती. उत्पादकता वाढविण्यासाठी गावातीलच 25 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या केडीएस 726 (फुले संगम) वाणाचे राहुल कव्हर यांच्यासह सर्व शेतकऱ्यांना प्रत्येकी 30 किलो बियाणे प्रात्यक्षिकासाठी देण्यात आले होते.
एका एकरमध्ये राजमा पिकाचे उत्पादन
राहुल यांनी ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे गादीवाफा पद्धतीने (बेड) तयार केले. बेडचा वरचा भाग 60 सेमी ठेवला. नागमोडी (झिगडॉग) टोकन पद्धतीने लागवड केली. मात्र पावसामुळे 28 गुंठ्यावरच प्रयोग घेतला. या पद्धतीने 18 ते 20 किलो बियाणे लागले. जवळपास एकरी 10 किलो बियाणाची बचत झाली. 28 गुंठ्यात दहा क्विंटल उत्पादन झाले होते. मध्यंतरीच्या काळात एका एकरमध्ये राजमा या पिकाचे उत्पादनही त्यांनी घेतले होते. यामधूनही त्यांना चांगला आर्थिक लाभ झाला. राहुल हे दरवर्षी एका एकरमध्ये सेंद्रिय पद्धतीने वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेत असतात.
संभाजीनगरमध्ये चालविली विद्यार्थी मेस
सन 2017-18 मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण गेट परिसरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेस व अभ्यासिका चालविण्याचे काम जवळपास दीड वर्षापर्यंत केले. मात्र, वडील दत्तराव गोविंदराव कव्हर यांची प्रकृती खालावल्याने राहुल यांना छत्रपती संभाजीनगर येथील मेस आणि अभ्यासिकेचे काम थांबवून ताकतोडा येथे गावी परतावे लागले. दरम्यान, सन 2018 मध्ये शेतीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली.
गांडूळ खत निर्मितीसाठी 3 बेड
राहुल कव्हर यांच्याकडे असलेल्या 12 एकर शेतीपैकी एका एकरमध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकांची लागवड करतात. यासाठी त्यांनी शेतामध्ये 30 × 20 चे पॉली हाऊस उभारणी करून गांडूळ खत निर्मितीचे 10 × 4 चे 3 बेड तयार केले आहेत. 45 ते 60 दिवसात एका बेडमधून जवळपास 6 क्विंटल खत तयार करुन शेतीसाठी वापर करतात.
समाधानी शेतकरी गटाची स्थापना
गावातील शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, यासाठी राहुल कव्हर यांनी 15 शेतकऱ्यांचा मिळून ‘समाधानी शेतकरी गट’ स्थापन केला. ते या गटामध्ये सचिव म्हणून काम करतात. तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या विविध योजनांचा लाभ गटातील सर्व शेतकऱ्यांना मिळून देण्यासाठी राहुल हे धडपड करत असतात.
चिया पिकाची लागवड
राहुल हे दरवर्षी शेतामध्ये पारंपारिक पिकाव्यतिरिक्त नवनवीन प्रयोग करण्यावर भर देत असतात. 11 डिसेंबर रोजी एका एकरमध्ये त्यांनी चिया या पिकाची लागवड केली. विशेष म्हणजे केवळ 6 हजार रुपयात चिया पिकाच्या लागवडीची किट मिळते. यामध्ये 2 किलो चियाचे बियाणे, 2 ऑर्गेनिक खताच्या बॅग आणि तीन वेळा फवारणीचे औषध येते. चिया हे पीक साधारण 100 दिवसानंतर काढणीला येते. या पिकाचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. त्यामुळे या पिकाला मोठी मागणी असल्याचे राहुल कव्हर यांनी सांगितले.
स्प्रिंकलर, ड्रीप व मोकळ्या पद्धतीने पाणी
12 एकर शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी एक विहीर व 33 बाय 33 चे 12 फूट खोलीचे एक तळे तयार केले आहे. या पाण्याद्वारे शेतातील पिकांना स्प्रिंकलर, ड्रिप व मोकळ्या अशा तीन पद्धतीने पाणी दिले जाते.
साडेतीन क्विंटल चिया उत्पादन
डिसेंबरमध्ये चिया या पिकाची लागवड करण्यात आली होती. सदर पीक 100 दिवसानंतर काढणीला येते. नुकतेच काही दिवसापूर्वी पीक काढण्यात आले. त्यात चिया पिकाचे उत्पादन 3 क्विंटल 60 किलो एवढे झाले आहे.
58 हजारांचे उत्पन्न
चिया या पिकाचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. मध्य प्रदेश राज्यातील नीमच या जिल्ह्यात चिरा या पिकाला मोठी मागणी आहे. वाशिम जिल्ह्यातील काही व्यापारी चिया या पिकाला एका क्विंटलला 14 ते 17 हजार रुपयांचा भाव देतात. राहुल यांच्या चिया या पिकाला एका क्विंटलला 16 हजार रुपयांचा भाव मिळाला. 360 किलोमधून 58 हजार रुपयांचे उत्पन्न हाती आले आहे.
30 गुंठ्यात हळद
राहुल यांनी गेल्या काही दिवसापूर्वी सेंद्रिय पद्धतीने 30 गुंठ्यात हळदीची लागवड केली होती. सद्यस्थितीत हळद गाठणीचे काम सुरू असून हळदीच्या बेण्याचे 50 कट्टे झाले आहेत. हळदीला जवळपास 14 हजार रुपयांपर्यंत भाव मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
दोन आझोलाचे बेड
राहुल यांच्याकडे असलेल्या जनावरांसाठी खाद्य निर्मिती करण्यासाठी त्यांनी 3 × 6 चे दोन आझोलाचे बेड तयार केले आहेत.
पत्नी वनिता यांची मोलाची मदत
राहुल यांना शेती कामामध्ये त्यांच्या पत्नी वनिता कव्हर यांची मोलाची साथ मिळते. वनिता यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. शेतातील 70 टक्के काम त्यांच्या पुढाकारातून पूर्ण होत असल्यामुळे सुधारित तंत्राद्वारे शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचे धाडस राहुल करीत आहेत.
2 एकरवर चियाची लागवड करणार
पारंपारिक शेतीला फाटा देत सुधारित तंत्राद्वारे शेतामध्ये नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांनी केले पाहिजे. तीन महिन्यात केवळ 6 हजार रुपये खर्च करून चिया या पिकाच्या माध्यमातून 3 क्विंटल 60 किलोचे उत्पादन घेऊन 58 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे पुढील हिवाळ्यात या पिकाची दोन एकरवर लागवड करणार असल्याचे शेतकरी राहुल कव्हर यांनी सांगितले.