अनिल भोकरे कृषी विभागातील उत्कृष्ट अधिकारी!
आई-वडील व पाच भावंडांचे कुटुंब… आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या कुटुंबाचा अवघ्या दहा बाय दहा च्या खोलीत संसार… आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्काराच्या शिदोरीमुळे परिस्थितीची जाण… उच्च शिक्षणानंतर उच्चपदस्थ अधिकारी म्हणून सुवर्णसंधी… परंतु, समाजाचे आपण काही देणं लागतो, या भावनेतून कृषी विभागाची निवड. शेती आणि शेतकर्यांसाठी उत्कृष्ट कार्य करणारे जळगावचे कृषी उपसंचालक अनिल वसंतराव भोकरे यांचा हा प्रेरणादायी प्रवास…
नांदगाव तालुक्यातील कासारी या गावी 25 फेब्रुवारी 1965 रोजी अनिल भोकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वसंतराव शंकरराव वाणी हे जुनी मॅट्रिक तर आई इंदुबाई या चौथी पास. घरात आई-वडिलांसह मोठे भाऊ सुनील भोकरे आणि तीन बहिणी. वडील कृषी सहायक म्हणून शासकीय सेवेत होते. स्वाभिमान जपत त्यांनी कमी पगारातही संसाराचा रहाटगाडा हाकला. आईच्या माहेरी श्रीमंती होती. परंतु, त्यांनी कोणतीही तक्रार न करता जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात वडिलांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली. आपल्याला जे दिवस काढावे लागले; ते आपल्या मुलांना काढावे लागू नयेत, हीच दोघांची इच्छा असल्याने त्यांनी चांगले संस्कार करत मुलांना उच्चशिक्षित केले. वसंतराव यांनी कोकण, मराठवाडा, खान्देशातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रामाणिकपणे नोकरी केली. त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. स्वतःच्या मुलांना शिकवत असताना त्यांनी दुसर्यांच्या दोन मुलांनाही शिक्षित केले. विशेष म्हणजे, ते दोघेही आज उच्चपदस्थ अधिकारी म्हणून सेवारत आहेत. आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्काराच्या शिदोरीमुळे भोकरे भावंडांना त्यांच्या कष्टाची जाण होती. लहानपणापासून त्यांनी आपले ध्येय ठरवून प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यात ते यशस्वीही झाले. अनिल भोकरे हे आज कृषी उपसंचालक (जळगाव) म्हणून तर त्यांचे मोठे भाऊ सुनील भोकरे हे देशाच्या नौदलात व्हाईस अॅडमिरलपदी (हे पद नौदलातील दुसर्या क्रमांकाचे सर्वोच्च पद आहे) दिल्लीत कार्यरत आहेत.
माध्यमिक शिक्षण
अनिल भोकरे यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण कासारी येथेच झाले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील शिक्षणासाठी सातार्यातील निवासी सैनिकी शाळेत प्रवेश घेण्याचे ठरवले. चांगला अभ्यास करून प्रवेश परीक्षा देत तेथे पाचवीसाठी प्रवेश मिळवला. त्यांच्या आधी मोठे भाऊ याच शाळेत दाखल झाले होते. मराठी माध्यमाच्या शाळेतून थेट इंग्रजी माध्यमाच्या सैनिकी शाळेत प्रवेश घेतल्यामुळे सुरवातीचे काही दिवस त्यांच्यासाठी खूपच अवघड गेले. मन रमत नसल्याने त्यांना रडू यायचे. शाळेतून घरी पळून जावे, असेही वाटायचे. परंतु, भाऊ नेहमी जवळ घेऊन समजूत काढायचे. परिस्थितीची जाणीव करून द्यायचे. वडील पण पाठबळ द्यायचे. त्यामुळेच ते शाळेत रमले. या शाळेत त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. सांघिक भावना, नेतृत्व करणे, जबाबदारी स्वीकारणे, सकारात्मकता, जात-पात न मानणे, प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम, सेवाभाव हे गुण त्यांना या शाळेतूनच मिळाले. त्यामुळेच आतापर्यंतच्या यशात या सैनिकी शाळेचा मोलाचा वाटा असल्याचे ते मानतात.
कृषी क्षेत्राची निवड
सैनिकी शाळेतून शिक्षण घेतल्यामुळे लष्करी सेवेत जायचे असा निर्णय त्यांनी सुरवातीला घेतला. परंतु, वडील कृषी विभागात सेवेत असल्याने आपणही वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन याच क्षेत्रात करियर करण्याचे ठरवून तो निर्णय बदलला. वडिलांनी निर्णयावर खूश होऊन पाठबळ दिले. त्यामुळे धुळ्यातील कृषी महाविद्यालयात बीएस्सी. अॅग्रीसाठी प्रवेश घेतला. बीएस्सी अॅग्रीच्या अभ्यासक्रमात त्यांनी सुवर्णपदक पटकावले. बीएस्सी अॅग्रीला असताना त्यांनी एनसीसीचे ‘बी’ व सी’ प्रमाणपत्र मिळवले होते. त्यामुळेच त्यांना धुळे एनसीसी कमांडंट म्हणून महाराष्ट्र दिनाच्या परेडमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली. कृषीची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी युपीएससीची परीक्षा दिली. चार वेळा ते युपीएससीची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले. परंतु, मौखिक परीेक्षेत अपयश आले. मात्र, तरीही त्यांचे मनोधैर्य खचले नाही. कृषी विषयात पदव्युत्तर पदवी घ्यायची म्हणून त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापिठात एमएस्सी अॅग्रीसाठी प्रवेश घेतला. तेथे किटकशास्त्रात पदवी मिळवली. यावेळी त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी भाऊ सुनील भोकरे सांभाळत होते. एमएस्सीचे शिक्षण घेत असताना त्यांनी ‘वांग्यावरील पांढरी माशी’ या विषयावर नाविण्यपूर्ण संशोधन केले होते. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शक डॉ. आझरी यांनी शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ लाभावे म्हणून हेक्झामर या कंपनीकडे त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी शिफारस केली होती. त्यानुसार हेक्झामर कंपनीने त्यांना शिष्यवृत्ती देऊ केली. एमएस्सी अॅग्रीतही त्यांनी सुवर्णपदक मिळवले. त्यांच्या बाबतीतील एक बाब खूपच उल्लेखनीय आहे; ती म्हणजे प्राथमिकपासून ते पदव्युत्तरपर्यंतचे संपूर्ण शिक्षण त्यांनी विविध शिष्यवृत्तींच्या माध्यमातूनच पूर्ण केले आहे.
मोठ्या पदाच्या संधी
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठातील सकारात्मक वातावरणामुळे काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा मिळाली. कृषी विद्यापीठातून एमएस्सी अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा स्पर्धा परीक्षांकडे वळले. चांगला अभ्यास करून एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले. महसूल विभागात तहसीलदार म्हणून निवड झाली. परंतु, त्यांनी ही संधी नाकारली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उपजिल्हाधिकारी, वन विभागाची सहायक वनसंरक्षक या पदांची नोकरीही नाकारली. स्टेट बँक ऑफ इंडियात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून नोकरीची संधीही त्यांना चालून आली होती. मात्र, वडिलांप्रमाणे तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची इच्छा असल्याने त्यांना त्यात स्वारस्य वाटले नाही. सन 1987 मध्ये त्यांनी पुन्हा एमपीएससीची परीक्षा दिली. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांना कृषी विभागात विषय विशेषज्ञ म्हणून नोकरीची संधी मिळाली. मनासारखी संधी असल्याने त्यांनी रुजू होण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे त्यांची विषय विशेषज्ञ म्हणून नियुक्ती झाली. तेथून त्यांच्या आयुष्याला खर्या अर्थाने कलाटणी मिळाली. शेतकर्यांसाठीच काम करायचे ठरवून त्यांनी कामाला सुरवात केली. शासनाने ‘बेणार’ (विस्तार कार्य) ही महत्वाकांक्षी योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून ते थेट शेतकर्यांपर्यंत पोहचले. शासनाचा प्रतिनिधी म्हणून कृषी विभागात काम करत असताना देशभरातील कृषी प्रशिक्षण संस्थांमध्ये जाऊन ज्ञान मिळवता आले. त्याचा फायदा स्वतःसह शेतकर्यांच्या शाश्वत विकासासाठी करता आल्याचा मनस्वी आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.
विषय विशेषज्ञपदी नियुक्ती
सिल्लोडनंतर त्यांची धुळे येथे जिल्हा विषय विशेषज्ञ म्हणून नियुक्ती झाली. तेथे प्रमुख कृषी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे के.व्ही. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगले काम करता आले. या सकारात्मक वाटचालीमुळे आयुष्याला अधिकच बळकटी मिळाली. के.व्ही. देशमुख यांच्यामुळे विस्तार कार्य अधिक जोमाने करता आले. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी वेळोवेळी मार्गदर्शनपर मेळावे, चर्चासत्र, विविध शासकीय योजनांचे प्रशिक्षण, कार्यशाळा या माध्यमातून शासकीय योजनांबाबत प्रबोधन कार्यक्रम राबवले. अमळनेर येथे तालुका कृषी अधिकारी, धुळे जिल्हा परिषदेत जिल्हा कृषी अधिकारी, कृषी आयुक्त (पुणे) यांच्याकडे तंत्र अधिकारी, जळगाव जिल्हा परिषदेत मोहीम अधिकारी, तंत्र अधिकारी (जळगाव), उपविभागीय कृषी अधिकारी (जळगाव), जळगाव येथेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत सहायक प्रकल्प अधिकारी, वसुंधरा प्रकल्प (जळगाव) येथे अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे. सध्या ते कृषी उपसंचालक (जळगाव) या पदावर कार्यरत आहेत.
धडक मोहिम राबवली
जळगाव जिल्हा परिषदेत मोहीम अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी शेतकर्यांची फसवणूक करणार्या बोगस खते व बियाणे उत्पादक कंपन्या आणि विक्रेत्यांविरोधात धडक मोहीम राबवली होती. अनेक प्रकरणे समोर आणून त्यांनी बोगस खते व बियाणे उत्पादक कंपन्या आणि विक्रेत्यांविरुद्ध कारवाया केल्या होत्या. मोहीम अधिकारी म्हणून जोरदार काम करत असतानाही शासनाने त्यांची वर्षभरात बदली केली होती. परंतु, तरीही ते नाउमेद झाले नाहीत. बदली झाल्यानंतरही त्यांनी शेतकर्यांसाठी चांगले काम सुरूच ठेवले. चांगल्या कामाची दखल घेऊन शासनाने युरोप दौर्यासाठी त्यांची निवड केली.
—
शेतीशाळेचे प्रशिक्षण
कृषी विद्यापिठातील नवनवे संशोधन व तंत्रज्ञान त्यांनी शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकर्यांपर्यंत पोहचवले. स्ट्रॅटेजीक रिसर्च अॅण्ड एक्सटेन्शन प्लॅन (एसआरईपी) नुसार आत्मा विभागाकडून जिल्ह्याचे आराखडे तयार झाले. नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर या जिल्ह्यांमध्ये त्यांनी प्रशिक्षण दिले. संशोधन व विस्तार कार्यात त्यांनी मोठी कामगिरी बजावली. राष्ट्रीय स्तरावरील संस्था ‘मॅनेज’ हिचे ते फॅसिलेटर होते. आत्मा कार्यप्रणाली राज्यात कशी असावी, याचेही ते प्रशिक्षक होते. कृषी विभागातील अधिकारी-कर्मचार्यांना व्यवस्थापन तत्त्वे शिकवण्यासाठीही त्यांनी प्रशिक्षण दिले. आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यात त्यांनी याबाबत प्रशिक्षण दिले. जळगाव जिल्ह्याचा कृषी उत्पादन आराखडा तयार करण्यासाठी प्रशिक्षक असल्याने त्यांनी योग्य ती अंमलबजावणी केली.
सेंद्रिय शेतीतही मोठे काम
सेंद्रिय शेतीचे धोरण व अंमलबजावणीच्या समितीत ते सहभागी होते. त्यामुळे त्यांनी जिल्ह्यात निरनिराळे प्रयोग राबवले. सेंद्रिय शेतीतून उत्पादन वाढ व उत्पादित मालाची विक्री याबाबत राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. शेतकर्यांचे कृषी विज्ञान मंडळ व शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. जिल्ह्यात 650 पेक्षा अधिक कृषी विज्ञान मंडळे व 22 शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या आहेत. जिल्ह्यातील पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून शेतकर्यांनी हळद, आले यासारख्या नगदी पिकांकडे वळावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. वर्ष 2004-05 मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात जिल्ह्याचा समावेश करून संरक्षक शेती, पॉलीहाऊस, शेडनेट, सामूहिक शेततळे, कांदाचाळी, फळप्रक्रिया उद्योग, अळंबी उत्पादन, मधुमक्षिका पालनाला चालना दिली. त्याचप्रमाणे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 39 प्रकल्पांमध्ये माथा ते पायथ्यापर्यंत पाणी अडवणे, पाणी जिरवणे, पाण्याचा किफायतशीर वापर यासाठी प्रयत्न केले. वर्ष2014-15 पासून जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरीत्या राबवले.
शासनाने घेतली कामाची दखल
शासनाने त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांना सहा आगाऊ वेतनवाढ दिल्या आहेत. कृषी विभागातील पदाधिकार्यांकडूनही चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांना वेळोवेळी पाठबळ दिले जाते. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्यांमध्ये परस्पर समन्वय, आदर, सांघिक भावना वाढीस लागावी म्हणून विविध उपक्रम राबविले. कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसेच खासगी संस्थांच्या माध्यमातून कृषी स्पंदन, कृषी जल्लोष यासारखे महोत्सव आयोजित करून कृषी विभागातील अधिकारी व कर्मचार्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रयत्न केले. शासनाने या उपक्रमांची दखल घेऊन ते ‘जळगाव पॅटर्न’ म्हणून राज्यभरात राबवले.
सामाजिक उपक्रमातही सहभाग
सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी त्यांनी कृषी विभागात वेळोवेळी रक्तदान शिबिरे आयोजित करून आत्तापर्यंत 53 वेळा स्वतः रक्तदान केले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य, गणवेश स्व-खर्चातून देत असतात. आतापर्यंत 80 मुलांना त्यांनी मदत केली आहे. महिला सबलीकरणासाठी जिल्हाभरात बचतगटांची चळवळ रुजावी म्हणूनही ते प्रयत्नशील आहेत.
विविध पुरस्कारांचे मानकरी
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना शासनासह अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले आहे. सेंद्रिय शेतीतील उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना राज्यस्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ हा पुरस्कार तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘अॅग्रोवर्ल्ड’तर्फे उत्कृष्ट कृषी अधिकारी पुरस्कार, भारत कृषक समाज संस्थेतर्फे देखील उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार, पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कृषीरत्न पुरस्कार, दर्यासागर संस्थेतर्फे उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
कौटुंबीक संवादामुळे एकोपा
नोकरी आणि कौटुंबीक जबाबदारी सांभाळताना खूप तारेवरची कसरत होते. मात्र, त्यावरही त्यांनी उपाय शोधला आहे. कार्यालयात असताना पूर्णपणेझोकून देऊन काम करणे आणि घरी असल्यावर कुटुंबातील सदस्यांना वेळ देणे हे सूत्र ठरवले आहे. या सूत्रामुळे दोन्ही आघाड्या सांभाळता येतात. घरी कुटुंबातील सदस्यांना पूर्ण वेळ देता यावा, यासाठी 25 वर्षांपासून घरात टीव्ही घेतलेला नाही. घरात टीव्ही नसल्याने कौटुंबीक संवाद आणि एकोपा वाढला. त्यामुळे घरातील सदस्य टीव्ही नसल्याची कधी तक्रार करत नाहीत, असे ते म्हणाले. आपले ध्येय स्पष्ट ठेवा आणि जिथे असाल तेथे पूर्णपणे आपला सहभाग द्या, समाजाचे आपण काही देणं लागतो’ या भावनेतून काम करा, कोणतेही काम करत असताना ते चाकोरीबद्ध न करता चाकोरीच्या बाहेर येऊन करा, सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून नकारात्मक भावना ठेऊ नका, जे कराल ते समर्पणाने करा, असा यशस्वीतेचा मंत्र त्यांनी दिला.
दोन्ही मुले उच्चशिक्षित
अनिल भोकरे यांना अश्विनी व अथर्व ही दोन मुले आहेत. अश्विनी हिने एमएस्सी. (बॉटनी)चे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने एमएस्सी मध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. सध्या ती पीएचडीची पूर्वतयारी करत आहे. तर मुलगा अथर्व याची बारावीनंतर युपीएससीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) निवड झाली आहे. एनडीएच्या माध्यमातून तो पदवीचे शिक्षण घेत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी सुनीता भोकरे या देखील उच्चशिक्षित आहेत. त्या ‘एलआयसी’त उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
‘त्या’ देवदुतामुळे मृत्यूच्या दाढेतून परतलो!
आयुष्यातील अविस्मरणीय घटनांविषयी सांगताना अनिल भोकरे म्हणाले की, मी धुळ्यात कार्यरत होतो. महिको कंपनीच्या प्रशिक्षणासाठी धुळ्याहून जालन्याला जाण्यासाठी आम्ही अॅम्बेसेडर कारने निघालो होतो. जालना शहर 12 किलोमीटरवर असताना आमच्या कारपुढे चालणार्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे आमची कारच्या बोनेट ट्रकच्या मागील भागात अडकले. त्याचवेळी ट्रक चालकाने ट्रक पुढे नेली. कार अडकलेली असल्याने ट्रकसोबत ओढली गेली. आम्ही प्रचंड घाबरलो. ट्रकच्या वेगाप्रमाणे कारचाही वेग वाढला. नंतर पुढे वळण असल्याने ट्रक चालकाने जोरात ट्रक वळवला. त्यामुळे अडकलेली कार निघाली. मात्र, कारचा वेग कायम होता. वळणावर रस्त्याच्या पलीकडे मोठी दरी होती. आपली कार दरीत कोसळणार या भीतीने पोटात गोळा आला. परंतु, तोच वळणावर पांढर्या रंगाची एक गाडी कारसमोर आली. त्या गाडीवर कार जोरात आदळली. ही गाडी नसती तर आम्ही कारसह दरीत कोसळलो असतो. या अपघातात आम्हाला साधे खरचटलेही नाही. आम्ही कारच्या खाली उतरत नाही तोपर्यंत ती गाडी तेथे नव्हती. काय झाले कळालेच नाही. साक्षात परमेश्वर देवदुताच्या रूपात आम्हाला वाचवण्यासाठी आला होता, असे त्यांनी सांगितले. हा प्रसंग सांगताना ते भावूक झाले होते. कृषी विभागाच्या एका प्रशिक्षणासाठी नागपुरला असताना पत्नीला चाळीसगावी सर्पदंश झाला. ही बाब वडिलांनी फोनवरून मला कळवली. सर्पदंश झाल्यावर कोणते प्रथमोपचार करावेत, काळजी कशी घ्यावी, याचे प्रशिक्षण मी आधी घेतले होते. त्याचा फायदा यावेळी झाला. लक्षणे विचारून पत्नीला फोनवरूनच काय प्रथमोपचार करायचे याची माहिती दिली. त्यानंतर कृषी अधिकारी असलेले मित्र हितेंद्र सोनवणे व सर्पमित्र राजू ठोंबरे यांना घटना सांगितली. त्यांनी लागलीच मदतीसाठी धाव घेऊन पत्नीला रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार झाल्याने तिचा जीव वाचला. हा प्रसंगही मी आयुष्यभर विसरू शकत नाही, असे ते म्हणाले. आयुष्यात कोणत्याही प्रशिक्षणाची संधी दवडू नका. कोणत्याही प्रशिक्षणात शिकलेली माहिती कधीही उपयोगी पडेल.