मकृषी पर्यटनफ म्हणजे शेतावरील सहल, फेरफटका. आजच्या धकाधकीच्या व कृत्रिम जीवनशैलीने उबग आलेल्या शहरी लोकांनी चार दिवस एखाद्या शेतकर्याच्या घरी जाऊन रहायचे. त्या शेतकर्याने पर्यटनासाठी आलेल्या शहरी लोकांना सशुल्क पाहुणचार करायचा, अशी ही संकल्पना आहे. एका अर्थाने शहरी जीवनशैलीने ग्रामीण संस्कृतीला मारलेले घट्ट आलिंगन म्हणजेच कृषी पर्यटन… असेही म्हणता येईल.
सुट्टीमध्ये पर्यटनासाठी बाहेर पडणे हा उच्चवर्गीयांबरोबरच मध्यमवर्गीयांचाही छंद बनला आहे. त्यासाठी
देशाबरोबरच परदेशाचेही पर्याय निवडले जातात. मात्र, आपल्या कृषिप्रधान देशामध्ये शेतीच्या व निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत पर्यटनाचा आनंद लुटण्याचा ट्रेंडही आता चांगलाच जोर धरू लागला आहे. आज शहरातील धकाधकीच्या जीवनामुळे आपण निसर्गापासून कोसो दूर गेलो आहोत. शहरातील सर्वच गोष्टींमध्ये प्रदूषण आहे. हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण एवढेच नव्हे तर विचारांचेही प्रदूषण डोके वर काढत आहे. या सार्या बाबींमुळे शहरी लोकांचे स्वास्थ्य बिघडले असून ते स्वत:ला हरवून बसले आहेत. स्वाभाविकपणे निसर्गापासून, नैसर्गिक वातावरणापासून दूर गेल्याने आपण सर्वजण दु:खी झालो आहोत. या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे कृषी पर्यटन होय.
ग्लोबल टू लोकल…
कृषी पर्यटनाचा उगम जगात सुमारे 65 ते 70 वर्षांपूर्वी व्यावसायिक पातळीवर सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात झाल्याचे मानले जाते. ऑस्ट्रेलियासह ब्राझील, न्यूझीलंड, कॅनडा, इटली या देशांमध्येही कृषी पर्यटन पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात होते. युरोपीय देशांनी तर कृषी पर्यटनाला चालना देऊन त्याला शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यताही दिली आहे. जागतिकीकरणामुळे कृषी पर्यटनाचा विस्तार जगभरात होऊ लागला आहे. भारत देशात कृषी पर्यटनाची सुरुवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम बारामतीतील प्रगतशील शेतकरी स्व.आप्पासाहेब पवार हे आपल्या शेतावर नाविण्यपूर्ण कृषी संशोधन प्रयोग दाखविण्यासाठी इतर शेतकर्यांना बोलवत असत. कृषी संशोधन पाहण्यासाठी येणार्या शेतकर्यांची ते त्या ठिकाणी नि:शुल्क राहण्याची, जेवणाची सोय करत. कालांतराने शुल्क आकारून पुढे अॅग्री अॅण्ड इको टुरिझम नावाने कृषी पर्यटन केंद्र नावारूपास आले. या संकल्पनेला नेरुळ येथील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी व्यापक स्वरूप दिले. त्यांनी हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व शेतकर्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा आहे, हे सिद्ध करून दाखवले.
शेतकर्यांसाठी उत्पन्नाचा स्त्रोत
पर्यटन क्षेत्र काही वर्षांपूर्वी ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे, गड-किल्ले, निसर्गरम्य ठिकाणे तसेच परदेशवारी यापुरते मर्यादित होते. आता त्यात कृषी पर्यटन या संकल्पनेचा समावेश झाला आहे. सध्या महाराष्ट्रात 350 पेक्षा अधिक कृषी पर्यटन केंद्र विकसित झाली असून त्यांची उत्तमरीत्या वाटचाल सुरू आहे. गावाकडच्या मोकळ्या वातावरणात शेतीतील कामे पाहणे, अनुभवणे आणि ग्रामीण संस्कृतीचा आस्वाद घेणे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरते. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना ही पर्वणी सहज उपलब्ध करून देता येत आहे. कृषी पर्यटन शेतकर्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत ठरू शकतो, त्यामुळेच आज अनेक उच्चशिक्षित तरूण पुन्हा शेतीकडे वळले असून त्यांनी हा बदल स्वीकारला आहे. आपल्या शेतीत ते नवनवे पर्याय करू पाहत आहेत. त्यात कृषी पर्यटनाच्या प्रयोगाचाही समावेश आहे. ग्रामीण भागाशी नाळ तुटलेल्या शहरातील नागरिकांना कृषी पर्यटनाच्या रुपाने पुन्हा एकदा गावाकडचे जगणे अनुभवण्याची संधी मिळत आहे.
शेतीपूरक फायदेशीर व्यवसाय
ग्रामीण भागात फक्त शेतीवर अवलंबून असणार्या उपक्रमशील शेतकर्याला वर्षातून दोन ते तीन वेळा उत्पादन मिळते. दोन ते तीन महिन्यातून एकदा त्याच्या हातात पैसा येतो. खर्च मात्र रोजचाच असतो. अशा परिस्थितीत शेतीचा उपयोग रोज उत्पादन मिळवून देणार्या व्यवसायात करता येईल का? या विचारातूनच कृषी पर्यटन या शेतीपूरक व्यवसायाची संकल्पना नावारूपास आली. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात वाढलेली दरी भरून काढता येऊ शकते. शिवाय शेतीतून उत्पादित झालेला सेंद्रिय शेतमाल जागेवरच थेट पर्यटकांना विकून उत्पन्न मिळवणे सहज शक्य आहे. कमी भांडवली खर्चात कृषी पर्यटन हा शेतीपूरक व्यवसाय सुरू करता येतो. या व्यवसायाचा प्रमुख उद्देश म्हणजे पर्यटकांना ग्रामीण जीवनाची ओळख करून देणे व शहरातील पैसा ग्रामीण भागाकडे वळविणे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. कृषी पर्यटनाकडे जर आपण एक व्यावसायिक म्हणून पाहिले तर आपल्याला शेतीतून मिळणार्या उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने जास्त उत्पन्न या व्यवसायातून मिळू शकते.
पर्यटन क्षेत्राचा नवा चेहरा
कृषी पर्यटन केंद्रावर संपूर्ण नैसर्गिक वातावरण, चुलीवरचे जेवण, जेवणात शेतातील भाजीपाला, बैलगाडीवरती रपेट, शिवार फेरी इत्यादी आनंददायी गोष्टींचा समावेश असतो. शिवार फेरीमध्ये शेतकरी आपल्या शेतावरील पिकांची, विविध वनस्पतींची माहिती पर्यटकांना देत असतो. तसेच पर्यटक हातात नांगर धरून शेतीची नांगरणी, कुळवणी, भात लावणी ते काढणी अशा निरनिराळ्या शेतीकामात सहभाग घेऊन स्वत: आनंद घेत असतात. शेतावर मुक्काम करून पर्यटक निसर्गाचा अनुभव घेतात. यासाठी शेतकर्यांनी कौलारू घरे, मातीच्या भिंती अशा घरांची निर्मिती केलेली असते. आजकाल नातवंडांपासून आजी-आजोबांपर्यंत सर्व कृषी पर्यटनाचा आनंद घेऊ लागले आहेत. महाराष्ट्रात जवळपास 350 किल्ले, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेण्या आणि 720 किलोमीटर अंतराची अथांग समुद्र किनारपट्टी, निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा ही महाराष्ट्राच्या पर्यटनातील उपलब्धी आहे. आजपर्यंत या सर्व गोष्टींच्या माध्यमातून पर्यटनाचा आनंद घेतला जात आहे. परंतु, आजही अनेक लोकांचे या गोष्टींकडे दुर्लक्षच आहे. ते पर्यटनासाठी नवनव्या संकल्पनांच्या शोधात आहेत. अनेकांची पर्यटनासाठी बाहेरगावी जाण्याची प्रचंड इच्छा असते. मात्र, अडचणींमुळे त्यांचा बेत फसतो. अशा वेळी आपल्या जवळपासच निसर्गाच्या सान्निध्यात हरवून टाकणारे एखादे चांगले ठिकाण असेल तर तो एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यातूनच कृषी पर्यटनाची संकल्पना पुढे आली आहे. महाराष्ट्र राज्यातील कृषी पर्यटन हे पर्यटनातील नवीन चेहरा म्हणून उदयास आले आहे. या बाबतीत जागृती होत असून कृषी पर्यटनाच्या विकासासाठी इच्छूक शेतकर्यांसह राज्य शासनाकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.
ममार्टफ संस्थेचा उदय
महाराष्ट्रात विस्तारणारे कृषी पर्यटन, भविष्यातील गरज, पर्यटकांच्या वाढणार्या अपेक्षा या सर्व गोष्टींचा विचार करून 12 डिसेंबर 2008 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट) या संस्थेची स्थापना करण्यात आली. मार्टच्या संस्थापक अध्यक्षा म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी कृषी व ग्रामीण पर्यटन विकासाला खर्या अर्थाने गती दिली. आजपर्यंत संस्थेच्या प्रवासात वेळोवेळी अजित पवार व सुनेत्रा पवार या दोघांचे मार्गदर्शन लाभत आहे. आज राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटनात सुसूत्रता येण्यासाठी मार्ट कार्यशील आहे. आजमितीस राज्यात जवळपास 350 पेक्षा अधिक कृषी पर्यटन केंद्र मार्टच्या प्रयत्नातून उभी राहिली असून त्यांची व्यावसायिक घोडदौड सुरू आहे. तसेच राज्यातील 25 तालुक्यांमध्ये मार्ट संस्थेशी संलग्न कृषी पर्यटन सहकारी संस्था कार्यरत आहे. मागील सात ते आठ वर्षांमध्ये राज्यातील कृषी पर्यटन करणारे व नव्याने हा शेतीपूरक व्यवसाय करणारे शेतकरी हे मार्ट संस्थेच्या छत्राखाली एकत्र आले आहेत. महाराष्ट्रात कृषी पर्यटन प्रशिक्षण अभियान राबवून कृषी पर्यटनाविषयी तांत्रिक माहिती, यशोगाथा या माध्यमातून हा व्यवसाय करण्यासाठी मार्टकडून प्रोत्साहन दिले जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या मान्यतेने 16 मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मार्ट या राज्यातील शिखर संस्थेच्या वतीने कृषी पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शेतकर्यांचा या दिवशी कृषी पर्यटन गौरव पुरस्काराने गौरव करण्यात येतो.
शासनाच्या सहकार्याची अपेक्षा
कृषी पर्यटन केंद्र चालवणार्या शेतकर्यांसाठी सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे, शहरी पर्यटकांना आकर्षिक करणे होय. या समस्येवर मात करण्यासाठी मार्टने पुढाकार घेतला आहे. शहरी पर्यटकांना कृषी पर्यटन केंद्रांकडे आकर्षित करण्यासाठी मार्केटिंगचे काम हाती घेऊन राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी मार्टने प्राधान्यक्रम दिला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कृषी पर्यटन या व्यवसायात असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. राज्य शासनाने या कामी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. कृषी पर्यटन व्यवसायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मार्ट राज्य शासनस्तरावर पाठपुरावा करत आहे. कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी कर्ज योजना, कृषी पर्यटन केंद्रावर उभारण्यात येणार्या बांधकामाच्या वेगवेगळ्या परवानग्या, शासनाचे वेगवेगळे कर, कृषी पर्यटन केंद्रावर वापरण्यात येणार्या वीज बिलाबाबत दर आकारणी, गॅसचा वापर अशा अनेक बाबतीत राज्य शासनाचे धोरण निश्चित नव्हते. म्हणून मार्टने या विषयी सातत्याने पाठपुरावा केला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे कृषी तसेच पर्यटन विभागाने मागील वर्षी शेतकर्यांच्या हिताचे सकारात्मक धोरण मंजुरीसाठी शासनाकडे पाठविले आहे. अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे कृषी पर्यटनाविषयी शासन आज किमान सकारात्मक तरी झाले आहे. हे धोरण मंजूर करण्यासाठी मार्ट प्रयत्नशील आहेच. भविष्यात राज्य शासन कृषी पर्यटन व्यवसायाबाबत नक्कीच सकारात्मक धोरण अंमलात आणेल आणि या व्यवसायाला सुवर्णकाळ येईल, असा विश्वास मला वाटतो.
मोबाईल नंबर- 9422016237
(लेखक महाराष्ट्र कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी
महासंघाचे अध्यक्ष आहेत.)