महाभारतकालीन शेती : वेद आणि या महाकाव्यांच्या काळात चार-पाचशे वर्षाचं अंतर आहे. वेद साडेतीन हजार वर्षांपूर्वीचे तर ही महाकाव्य तिन हजार वर्षांपूर्वीची समजली जातात. म्हणजे आता आपण जी शेतीसंस्कृती पाहणार आहोत ती साधारणतः तिन हजार वर्षांपूर्वीची आहे.
भीष्मपर्वात आणि गीतेतही असं म्हटलेलं आहे की शेती ही सूर्याचीच देन आहे. शेतीत पिकणारं धान सूर्याच्या कृपेमुळेच पिकतं. देवमातृक शेती हा शब्द त्यामुळेच महाभारतात आलेला असावा. सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो तेव्हा प्रदीप्त होऊन तो पाण्याला स्वतःकडे खेचतो. नंतर दक्षिणायनात गेल्यावर सूर्य चंद्राच्या माध्यमातून आकाशातल्या पाण्याने भरलेल्या ढगांना धरणीवर बरसवतो आणि पेरलेल्या जमिनीवर अमृतसिंचन करतो. त्यामुळेच जमिनीच्या सुपीकतेचा जनक सूर्यच आहे, असं महाभारतात म्हटलेलं आहे. माणसाला जिवंत ठेवणारं अन्न हे सूर्याच्या तेजाचीच देणगी आहे. त्यामुळे जो शेतकरी हे निसर्गचक्र समजून घेत नाही आणि अथक मेहनत करत नाही, त्याला ही धरणी प्रसन्न होत नाही. तो धरणीच्या या दानापासून वंचितच राहतो. असंही महाभारत म्हणतं.
या काळात शेती बैल आणि नांगराच्या सहाय्याने केली जात होती, असा अंदाज करावा लागतो. कारण शेतीसंबंधी तसा स्पष्ट उल्लेख महाभारतात कुठेही सापडत नसला तरी वनपर्वात असा उल्लेख आहे की, वैष्णवयज्ञासाठी जी भूमी लागते ती सोन्याच्या नांगराने तयार करावी लागते. म्हणजे नांगर तेव्हा वापरात होता. महाभारतकाळात तांदूळ, जव, तीळ, मुग, उडीद आणि कोदो ही पीके घेतली जात असावीत. कारण या धान्यांचा जागोजाग उल्लेख पाहायला मिळतो. शेती ही फार काळजीनं करायची गोष्ट आहे. ती केवळ नोकरांच्या भरवशावर करणे योग्य नाही. शेतमालकाने स्वतः शेतीत लक्ष घालायला हवे. नाही तर थोड्या हलगर्जीपणामुळे शेतीत मोठं नुकसान होऊ शकतं. असं महाभारताच्या उद्योगपर्वात सांगितलेलं आहे.
महाभारताच्या आधी शेतीपेक्षा गोपालनाला जास्त महत्त्व होतं. महाभारतकाळात मात्र शेती आणि गोपालन हे समान महत्त्वाचे व्यवसाय होते. ते दोन्ही व्यवसाय शेतकऱ्यांच्याच ताब्यात होते. पण राजाने त्यांना त्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, हे राजाचं कर्तव्यच आहे, असं तो काळ मानत होता. गायीचं महात्म्य महाभारतात जागोजाग वाचायला मिळतं. वशिष्ठाची होमधेनू महाभारतात फार महत्त्वाची समजली जाते. महाभारत काळात गाय ही सगळ्यात जास्त उपयुक्त पशु समजला जात असे. याशिवाय हत्ती, घोडे, गाढवं, कुत्रे, मांजरं हे पशु त्या काळात पाळले जात असत. त्या काळात पशुपालनाची व त्यांच्या आरोग्याची विद्या सर्वांनाच अवगत असे. राजाला हस्तिसूत्र आणि अश्वसूत्र अवगत असणं आवश्यक समजलं जात असे. पांडवांपैकी सहदेव हा गोविद्येत प्रवीण होता. त्यामुळे अज्ञातवासात विराट राजाकडं असताना त्याच्याकडं याच खात्याची जबाबदारी होती. मालकानं नोकरांच्या भरवशावर न राहता गायींची काळजी स्वतः घेतली पाहिजे, यावर महाभारताचा कटाक्ष होता.
महाभारतात अनुशासन पर्वत जागोजाग गाईचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. एकदा देवराज इंद्रानेच आपल्या आजोबांना विचारलं की, देवलोकांपेक्षा गोलोक श्रेष्ठ का समजला जातो ? त्यावर आजोबांनी दिलेलं उत्तर असं, ‘गाय हीच यज्ञाचा प्रमुख भाग आहे. गाईशिवाय यज्ञ पूर्णच होऊ शकत नाही. गाईचे दूध आणि तूप हेच माणसाचं मुख्य अन्न आहे. गोवंशाशिवाय शेतीही होऊ शकत नाही. सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीचे मूळ गायच आहे. म्हणून गाय जगात सर्वश्रेष्ठ आहे. गाय मानवप्राण्यासाठी आईच्या जागी आहे. त्यामुळेच प्रगतिशील माणसाने सतत गोसेवेत मग्न राहिले पाहिजे’ या संवादात गायीची महती भौतिक आणि अध्यात्मिक अशा दोन्ही अंगाने सांगण्यात आलेली आहे.
वरील कथा काल्पनिक असली तरी तिचा निष्कर्ष मात्र खरा आहे. ज्यांना ही कथा मुळीच माहीत नव्हती असे अनेक शेतकरी मी पाहिलेले आहेत की, जे शेणाला लक्ष्मी समजत असत. माझ्या लहानपणी एक आमच्या गावात एक आजोबा तर रस्त्यात पडलेलं शेण दिसलं की धोतराच्या सोग्यात भरून घरी आणत असत. पण अर्थातच ते काही त्याची पूजा करीत नसत. तर त्या सेनाला उकिरड्यातच टाकीत. त्यांचं म्हणणं होतं की, या शेणामुळेच शेत सोन्यासारखं पिकतं. दिवाळीच्या दिवसात सेनाचेच पांडव, गायवाडा करून अजूनही शेतकरी त्याची पूजा करतात. हा कदाचित महाभारतकालीन गोमहात्म्याचाच अवशेष असावा. महाभारतकालीन समाजाच्या शेतीविषयक धारणा या अशा स्वरूपाच्या होत्या. खरं-खोटं, चूक-बरोबर हे आज आपण ठरवत असलो तरी तो काळ आणि त्या लोकांनी त्या काळाला अनुसरून धारण केलेल्या धारणा कशा होत्या त्या वस्तुनिष्ठपणे पाहणं हेच संशोधकाचं काम असतं. त्याची सामाजिक चिकित्सा वेगळ्या व्यासपीठावर आपण करतच असतो. पण संशोधनात आपण जास्तीतजास्त वस्तुनिष्ठ राहायला हवं, असं मला वाटतं.
ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव
परभणी.
(सौजन्य : इये मराठीचिये नगरी यावरून)
तुम्हाला हेही वाचायला आवडेल. 👇