मुंबई : राज्यातील कृषी हवामान केंद्रांनी शेतकऱ्यांना सल्ला (Advice to Farmers) दिला आहे, की जमिनीत पुरेसा ओलावा येईपर्यंत खरीप पिकांची पेरणी थांबवावी. रायगड व ठाणे जिल्हयात मात्र पेरणीची कामे सुरु ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील विविध कृषी हवामान केंद्रे (एएमएफयू) आणि जिल्हा कृषी हवामान केंद्रे (डीएएमयू) यांनी जारी केलेला कृषी हवामान सल्ला “ॲग्रोवर्ल्ड” शेतकऱ्यांच्या हितासाठी विस्तृतरित्या सादर करत आहे. शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक हे सल्ले अभ्यासावेत आणि गांभीर्याने त्यानुसार पावले उचलावीत, असे “ॲग्रोवर्ल्ड”चे तमाम शेतकरी बांधवांना आवाहन आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
शेतकऱ्यांनी घाईत पेरणी करून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवू नये, शेतकरी संकटात सापडू नये, हीच “ॲग्रोवर्ल्ड”ची कळकळीची भावना आहे. त्यादृष्टीने गेले काही दिवस आम्ही निरंतर भारतीय हवामान खात्यासह (आयएमडी) स्कायमेट व इतर खासगी संस्थांचे हवामान अंदाज वेळोवेळी सादर करीत आहोत. तमाम माध्यमे पावसाचे आनंदीआनंद चित्र जूनच्या सुरुवातीपासून रंगवत आहेत. मात्र, “ॲग्रोवर्ल्ड”ने पावसाच्या तुटीचे वास्तवच मांडले. अर्थात पावसाचे अंदाज आणि स्थिती वेळोवेळी वाऱ्यांची बदलती दिशा किंवा अन्य घटकांमुळे बदलू शकते. ती प्रत्येक अपडेट वेळोवेळी शेतकऱ्यांना सूचित करण्याची “ॲग्रोवर्ल्ड”ची धडपड यापुढेही कायम राहील.
महाराष्ट्रातील विविध कृषी हवामान केंद्रे (एएमएफयू) आणि जिल्हा कृषी हवामान केंद्रे (डीएएमयू) यांनी जारी केलेला कृषी हवामान सल्ला
मध्य महाराष्ट्र विभाग
पुणे आणि जळगाव येथील कृषी हवामान केंद्र तसेच जिल्हा कृषी हवामान केंद्र, सोलापूर यांच्याकडून प्राप्त सल्ल्यानुसार,
1. मुख्यत: कोरडे हवामान राहिल्याने, केळी बागेमध्ये गरजेनुसार पाणी द्यावे व ऊस पिकासाठी ठिबक सिंचन व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
2. मशागतीची कामे, जसे नांगरणी करणे, जमीन समतल करणे, आणि पडीक जमिनीत बांध बांधणे यासारखी शेतजमिनीची पूर्वतयारी करावी.
राहुरी (जि. अहमदनगर) आणि धुळे येथील कृषी हवामान केंद्र तसेच जिल्हा कृषी हवामान केंद्र नंदुरबार यांच्याकडून प्राप्त सल्ल्यानुसार,
1. जमिनीत पुरेसा ओलावा येईपर्यंत खरीप पिकांची पेरणी थांबवावी.
2. नवीन लागवड केलेल्या पपईच्या रोपांवर मुळकुजव्या किंवा इतर बुरशीजन्य रोगामुळे मर आढळून आल्यास कॉपरऑक्सीक्लोराईड 2 ग्रॅम प्रति लिटर किंवा बाविस्टीन 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे आळवणी करून घ्यावी.
3. नंदुरबार जिल्हयात लागवड केलेल्या बागायती कापूस पिकात तण नियंत्रणासाठी खुरपणी करून घ्यावी.
टोळंबीचे तेल…! ऐकले आहे का..?… पहा हा खास व्हिडीओ
https://youtu.be/fyG9PJEeu1o
इगतपुरी (जि. नाशिक) येथील प्रादेशिक कृषी हवामान केंद्र यांच्याकडून प्राप्त सल्ल्यानुसार,
1. खात्रीशीर सिंचन सुविधा असेल तर भात व नाचणी पिकांच्या रोपवाटिकेच्या पेरणीची कामे सुरु ठेवावीत.
2. मका, बाजरी, भुईमुग या खरीप पिकांची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा येईपर्यंत थांबवावी.
3. मका, बाजरी, भुईमुग व सोयाबीन पिकांच्या पेरणीसाठी शेतीची खोल नांगरटीची कामे सुरु ठेवावीत.
कोल्हापूर, सांगली व सातारा
कोल्हापूर, सांगली व सातारा येथील प्रादेशिक कृषी हवामान केंद्र यांच्याकडून प्राप्त सल्ल्यानुसार,
1. सोयाबीन, मूग, भुईमुग या खरीप पिकांची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा येईपर्यंत थांबवावी.
2. खात्रीशीर सिंचनाची उपलब्धता असल्यास खरीप हंगामाकरीता भात रोपवाटिकेत पेरणी करावी.
3. खात्रीशीर सिंचन सोय असल्यास कांदा, वांगी, टोमॅटो व मिरची रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी करावी.
4. सुरु ऊस पिकास मोठ्या बांधणीच्या वेळी 100 किलो नत्र (217 किलो युरिया), 55 किलो स्फुरद (344 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 55 किलो पालाश (92 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) अशी प्रती हेक्टरी रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
कोकण विभाग
दापोली (जि. रत्नागिरी), रायगड, ठाणे व मुळदे (जि. सिंधुदुर्ग) येथील कृषी हवामान केंद्र तसेच जिल्हा कृषी हवामान केंद्र, पालघर यांच्याकडून प्राप्त सल्ल्यानुसार,
1. दिनांक 23 व 24 जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने, भात व भाजीपाला रोपवाटिकेत अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
2. तुरळक ते बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याने, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात भात व नागली रोपवाटिकेच्या पेरणीची कामे पूर्ण करावीत.
3. रायगड व ठाणे जिल्हयात पेरणीची कामे सुरु ठेवावीत,
4. पालघर जिल्हयात खात्रीशीर सिंचनाची उपलब्धता असल्यास भात रोपवाटिकेत पेरणी करावी.
मराठवाडा विभाग
प्रादेशिक कृषी हवामान केंद्र, परभणी, जालना, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड तसेच जिल्हा कृषी हवामान केंद्र, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) आणि उस्मानाबाद (धाराशिव) यांच्याकडून प्राप्त कृषी सल्ल्यानुसार,
1. दिनांक 23 व 24 जून दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, व वादळी वारा वाहण्याची शक्यता आहे. (वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 कि.मी.) त्यामुळे, फळबागांना, भाजीपाला पिकांना बांबूचा किंवा काठीचा आधार दयावा,
2. मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याच्या कालावधीत जनावराना सुरक्षित ठिकाणी बांधावे.
3. कोरडे हवामान राहिल्याने, ऊस, भाजीपाला तसेच चिकू, डाळिंब व द्राक्ष फळबागेत आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
4. लिंबू फळबागेत आंतर मशागतीची कामे करावीत व हस्तबहारातील अधिक उत्पादनासाठी जिब्रेलिक ॲसिड (जी.ए. 3) 50 पी.पी.एम दावणाची फवारणी करावी.
5. हंगामी ऊस पिकामध्ये शिफारशीनुसार 250:115:115 किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रती हेक्टरी मात्रा दयावी.
6. खात्रीशीर सिंचन सुविधेसह, आले व हळद पिकाची पेरणीची कामे करावीत.
7. कापूस, तुर व भुईमुग या खरीप पिकांच्या पेरणीसाठी जमिनीची नांगरट करून जमीन तयार करणे सुरु ठेवावे.
8. टोमॅटो व वांगी पिकावरील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी अर्कची फवारणी करावी.
विदर्भ विभाग
1. विदर्भात तुरळक काही क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने, सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशीरा भाजीपाला आणि फळाला तग धरून राहण्याइतके हलके आणि वारंवार पाणी द्यावे.
2. उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याचे छत गवत/पेंढ्याने झाकलेले असावे. शेडभोवती पडदे लटकावेत आणि शेडच्या छतावर गोण्या/ गवत लावून त्यावर पाणी शिंपडावे.
3. दिनांक 23 से 28 जून कालावधीत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने, फळबागांना व भाजीपाला पिकांना बांबू किंवा काठीचा आधार दयावा.
4. मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याच्या कालावधीत जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे.
पश्चिम विदर्भ
प्रादेशिक कृषी हवामान केंद्र, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि जिल्हा कृषी हवामान केंद्र, अमरावती, वाशीम, बुलढाणा यांच्याकडून प्राप्त सल्ल्यानुसार,
1. मुख्यतः बहुतांश भागात कोरडे हवामान राहिल्याने, खरिप पिकांच्या पेरणीसाठी योग्यप्रकारे शेतजमिनीची पूर्वतयारी करावी व पेरणीसाठी आवश्यक असलेल्या निविष्ठांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात करावी.
2. पाण्याची सोय असल्यास मिरची, टोमॅटो आणि वांगी यासारख्या भाज्यांची रोपवाटिकेत पेरणी सुरु ठेवाची
पूर्व विदर्भ
कृषी हवामान केंद्र, सिंदेवाही (जि. चंद्रपूर), गोंदिया आणि जिल्हा कृषी हवामान केंद्र, नागपूर, भंडारा, गडचिरोली यांच्याकडून प्राप्त सल्ल्यानुसार,
1. मुख्यत: कोरडे हवामान राहिल्याने, धान पीक रोपवाटीकेसाठी गादीवाफे तयार करून घ्यावेत.
2. नव्याने लागवड केलेल्या फळबागामध्ये जमिनीतील ओलावा टिकवण्याठी गवत, पिकांचे अवशेष किंवा पॉलीथीनचा मल्चिंग म्हणून वापर करावा.
3. पाण्याची उपलब्धता असेल तर, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात खरिप भात रोपवाटिकेत पेरणीची कामे सुरू ठेवावीत.
4. खरीप पिकांच्या पेरणीसाठी जमिनीची मशागत करून ठेवावी व खते-बियाणे या कृषी निविष्ठांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात करावी.