चंदीगड : हरियाणाच्या गणौरमध्ये आशियातील सर्वात मोठी बागायती फळभाज्या बाजार समिती (हॉर्टिकल्चर मार्केट) साकारली जात आहे. ती लवकरच म्हणजे या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. देशातील 14 राज्यांतील शेतकऱ्यांना या अत्याधुनिक व सुनियोजित बाजार समितीचा फायदा होणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांना गणौर बाजार समितीत फळे, फुले, भाजीपाला, कुक्कुटपालन आणि दुग्धजन्य पदार्थांची खरेदी-विक्री करता येईल. इंडिया इंटरॅशनल हॉर्टिकल्चर मार्केट (आयआयएचएम) असे या हबचे नाव असेल.
काँग्रेस सरकारची दोन दशकांपूर्वीची योजना
एकाच छताखाली शेतकरी बागायती पिकांची विक्री आणि खरेदी करून चांगला नफा मिळवू शकतील. सध्याच्या राज्य सरकारकडून या हॉर्टिकल्चर मार्केटची अपूर्ण कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. गणौरच्या या आंतरराष्ट्रीय फलोत्पादन बाजारपेठेची पायाभरणी सन 2004 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने केली होती. त्यासाठी सुमारे 550 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. या बाजारात सर्व प्रकारची फळे, फुले, भाजीपाला आणि दुग्धजन्य पदार्थांची खरेदी-विक्री केली जाईल.
लोडिंग-अनलोडिंगसह सर्व प्रकारच्या सुविधा
दीड दशकापूर्वी सुरू झालेल्या या मार्केटच्या पहिल्या शेडचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात 196 मीटर लांब आणि 56 मीटर रुंद शेड बांधण्यात आली असून या शेडमध्ये 48 दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. या सर्व दुकानांमध्ये लोडिंग-अनलोडिंगसह सर्व प्रकारच्या सुविधा असतील. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ही बाजारपेठ पूर्णपणे सुरू होईल. 14 राज्यांमधून फळे, फुले आणि भाजीपाला खरेदी-विक्रीला आणण्यात येणार आहे.
किसान रेल्वे सेवेशी जोडणार, शेतकऱ्यांसाठी निवास व्यवस्था
किसान रेल्वे सेवेशी ही बाजार समिती जोडण्याची योजना आहे, जेणेकरून शेतकरी कमी दरात बागायती पिकांची वाहतूक करू शकतील. नवीन ट्रॅक्टर खरेदी करायला आकर्षक सुविधाही शेतकऱ्यांना या बाजारात मिळणार आहेत. शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी सर्व सुविधा असतील. सुसज्ज, अत्याधुनिक गाळे, विक्री माल घेऊन येणाऱ्यांसाठी निवास व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
537 एकर क्षेत्रातील सुसज्ज हब
537 एकरांवर पसरलेले ही आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजार समिती उत्पादकांना त्यांची फळे, भाजीपाला, फुले, पोल्ट्री आणि दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक आणि इतर सुविधा पुरवेल. हे मार्केट हब स्पोक मॉडेलवर काम करेल. या मार्केटची रचना 20 दशलक्ष टन फळ, भाजीपाला, फुले आणि दुग्धजन्य उत्पादन हाताळण्यासाठी करण्यात आली आहे. मार्केटमध्ये गोदामे, शीतगृहे, फळ पिकवण्याची दुकाने आणि साठवणूक शेड असतील.
गणौरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजार समितीची खास वैशिष्ट्ये
1. या बाजारासाठी 8 हजार कोटी रुपये खर्च होणार असून त्यापैकी 1,600 कोटी रुपये नाबार्ड देणार आहे.
2. बागायती मार्केटमध्ये 17 मोठे शेड बांधण्यात येणार असून त्यात बटाटे, कांदा, टोमॅटो, दुग्धजन्य पदार्थ, फुले, फळे, भाजीपाला यासाठी स्वतंत्र शेड असतील.
3. वातानुकूलित फुल व मासळी मार्केट करण्यात येणार आहे.
4. विविध राज्यातून येणाऱ्या वाहनांसाठी येथे पार्किंग करण्यात येत आहे.
5. या मार्केटमध्ये लॉजिस्टिक हबही उभारण्यात येणार असून त्यात रेफ्रिजरेटेड वाहने उपलब्ध असतील.
Haryana State Agricultural Marketing Board building India International Horticulture Market (IIHM) in about 537 acres of land at Ganaur in Sonipat district. It will be benificial for 14 state’s fruits, vegetables, flowers, poultry and dairy products trading.