दिलीप वैद्य, रावेर
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगेत वसलेल्या केर्हाळा गावातील युवा शेतकरी अमोल गणेश पाटील यांनी कमी वयात प्रयोगशील शेतकरी म्हणून परिसरात लौकीक मिळवला आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केल्यानंतर बी. ए. बी. एड.चा अभ्यासक्रम पूर्ण करुन अमोल यांनी उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वतःच्या शेतीत किमान खर्चात अधिकाधिक उत्पादन काढण्याच्या केलेला यशस्वी प्रयत्न इतर शेतकर्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. विशेषतः केळी पिकासोबत विविध आंतर पिके घेण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला असून शेतीसोबतच गुरांच्या संगोपनातूनही त्यांनी विकास साधला आहे.
अॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेतून… 🥭
खालील व्हिडिओ पहा..
अमोल पाटील हे उच्चशिक्षित असले तरी त्यांची राहणी अत्यंत साधी आहे. शर्ट- पॅन्ट, गळ्यात मोठा रुमाल असा पोशाख परिधान करणारे अमोल हे सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतात. त्यांची घरची सुमारे 40 एकर शेती असून ते आपले ज्येष्ठ बंधू विकास पाटील यांना सोबत घेऊन शेतीत विविध नवनवीन प्रयोग करीत असतात. वास्तविक, अमोल यांनी बी. एड.ची पदवी संपादन केल्यानंतर त्यांना शिक्षकाची नोकरी करता आली असती. मात्र, त्यांनी आपल्या शेतीवरच लक्ष केंद्रीत केले असून सध्या ते शेतीत करीत असलेले वेगवेगळे प्रयोग कौतुकाचा विषय ठरले आहेत. आपल्या शेतीत प्रामुख्याने केळी आणि हळद ही दोन पिके ते घ्यायचे. मात्र, अलिकडच्या काळात पांढरा कांदा, आले, टरबूज आणि मका या पिकांचेही आलटून पालटून उत्पादन ते घेत असतात. जळगाव जिल्ह्यातील केळी फळ पीक विम्याचा विषय आला, की अमोल पाटील यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत येतेच. 2012 पासून शेतकर्यांना केळी फळ पीक विम्याचा न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी आणि विमा कंपनीकडे ते पाठपुरावा करीत असून शेतकर्यांची बाजू मांडण्यासाठी ते कायमच पुढे असतात.
केळी लागवडीचा पहिला प्रयोग
रावेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात सर्वसाधारणपणे शेतकरी जून, जुलै महिन्यात केळीची लागवड करतात. अमोल पाटील यांनी मात्र, 2014 मध्ये सप्टेंबर महिन्यात केळी लागवड करुन शेतीमधला पहिला यशस्वी प्रयोग केला. ज्यामुळे शेतकर्यांना नवीन केळी लागवडीची नवीन वेळ प्रथमच समजली. आजही ते आपल्या शेतात याच पद्धतीने केळीची लागवड करुन चांगले उत्पादन घेत आहेत. 2014 मध्ये त्यांनी केलेल्या या प्रयोगाला मोठे यश मिळाले. त्यांच्या शेतीतील केळीचा दर्जा उत्तम राखून त्याचे वजनही त्यांना चांगले मिळाले. त्यावर्षी त्यांच्या केळीला 2 हजार 171 रुपयांचा प्रती क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. त्यांच्या केळीची रास ही 22 किलो मिळाली आणि प्रत्येक घडामागे त्यांना 480 रुपयांचे भरघोस उत्पन्नही मिळाले.
बटाट्याची लागवड
बटाट्याचे उत्पादन पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात होते. बटाटा हे थंड हवामानातील पीक आहे. त्याला सरासरी 16 ते 21 सेल्सिअस तापमान लागते. बटाटे लागवड करताना उष्ण हवामान व बटाटे पोसण्याच्या वेळी थंड हवामान त्याला पोषक ठरते. जळगाव जिल्ह्यात बटाटा फारसे कोणी उत्पादीत करीत नाही. 2017 मध्ये अमोल पाटील यांनी मात्र, आपल्या शेतामध्ये बटाट्याची लागवड करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी बटाटा लागवडीची माहिती जाणून घेतली. बटाट्यांसाठी अगोदर शेत नीट नांगरून घेतले. त्यानंतर पाच फुटांचा गादी वाफा तयार केला. त्यामध्ये दोन सरी पाडल्या. एकरी 8 क्विंटल बियाणे त्यासाठी वापरले. या पिकाला पाणी फारच कमी लागते. अवघ्या 85 दिवसांचे हे पीक आहे. बटाट्यासाठी पाण्यात विद्राव्य खते वापरून त्यांनी 2017 मध्ये एकरी 80 क्विंटल उत्पादन घेतले. हा अनुभव त्यांना खूप काही शिकवून गेला. दुसर्यावर्षी पाणी, खत आणि फवारणी यांच्या नियोजनात सुधारणा करून एकरी 100 क्विंटल बटाट्याचे उत्पादन त्यांनी घेतले.
उत्पादन खर्च कमी करण्यावर भर
कुठल्याही पिकाच्या उत्पादनावर मोठा खर्च झाला तर अपेक्षित नफा मिळतोच असे नाही. त्यामुळे चांगले उत्पादन घेत असताना उत्पादन खर्च कमी कसा करता येईल, यादृष्टीने अमोल पाटील हे सातत्याने प्रयत्नशील असतात. यातून त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने हळद लागवड केली होती. हळदीचे उत्पादन घेण्याचा हा त्यांच्या शेतीतील आणखीन एक नवीन प्रयोग होता. हळदीची लागवड करण्यासाठी एकरी 1500 रुपयांपेक्षा जास्त खर्च आणि मनुष्यबळ त्यांना लागत होते. हा खर्च कमी कसा करता येईल, याचा अभ्यास करुन त्यांनी ट्रॅक्टरचा वापर करून अवघ्या 800 रुपयात हळदीची लागवड केली. विशेष म्हणजे, या लागवडीनंतर हळदीला मातीची भर फक्त एकदाच द्यावी लागली. एरव्ही हळदीला 4 ते 5 वेळा मातीची भर द्यावी लागते असे अमोल पाटील यांनी सांगितले.
मान्यवरांचे मार्गदर्शन
शेतीच्या चांगल्या उत्पादनासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतलेच पाहिजे, हे अमोल पाटील यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे आपल्या शेतीतील विविध प्रयोगात त्यांना जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व केळी तज्ज्ञ के. बी. पाटील, कृषी विभागात सध्या विभागीय सहसंचालक असलेले व त्यावेळचे जिल्हा कृषी अधिकारी किसनराव मुळे, वडील गणेश दत्तू पाटील आणि काका किशोर दत्तू पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे मोठे बंधू विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देखील त्यांनी नवनवीन प्रयोग करुन ते यशस्वी ठरवले आहेत. शेतीतील अशा विविध प्रकारच्या प्रयोगांची प्रेरणा आपल्याला मोठे भाऊ विकास पाटील यांच्यापासून मिळते, असे अमोल पाटील आवर्जुन सांगतात.
स्वतः विकसित केली ऑटोमेशन यंत्रणा
शेतीकामांसाठी मजुरांची गरज भासत असते. मात्र, बर्याचदा मजूर मिळतातच असे नाही. त्यामुळे शेतीची कामे अधिक सुलभ होण्याच्या दृष्टीने नानाविध अवजारे व यंत्रे विकसित झाली आहेत. शेतीत दिवसेंदिवस नवीनवीन क्रांती होत असून ऑटोमेशन हा त्याचाच एक भाग आहे. अमोल पाटील यांनी आपल्या शेतीत अत्यंत कमी खर्चात संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा (ऑटोमेशन) बसविण्याचे अवघड आणि किचकट काम सहजपणे आणि खूपच कमी पैशांत केलेे आहे. सुरवातीला त्यांना एका कंपनीने ऑटोमेशनसाठी सुमारे 12 ते 15 लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले होते. हा खर्च कमी होण्याच्या दृष्टीने अमोल पाटील यांनी स्वतःच संपूर्ण यंत्रणाच विकसित केली. त्यासाठी त्यांनी जळगाव आणि पुणे येथून विविध प्रकारची यंत्रे, त्यांचे सुटे भाग स्वतः जाऊन खरेदी करुन आणावे लागले. ही सर्व यंत्रसामुग्री आणल्यानंतर त्यांनी शेतात त्याची स्वतः फिटिंग केली. ऑटोमेशनसाठी लागणारा कंट्रोलर त्यांनी स्वतः विकसित केला. त्यामुळे 12 ते 15 लाखांचा खर्च निम्मा म्हणजेच 6 लाख रुपये झाला. ऑटोमेशनच्या एकूण कामात त्यांचा सुमारे 8 ते 9 लाख रुपये खर्च वाचला. त्यांच्या शेतातील ऑटोमेशनची यंत्रणा मोबाईलवरुन ऑपरेट केली जाते. आपल्या 16 एकर शेतीचे क्षेत्र या ऑटोमेशनवर नियंत्रित होत असून दरवर्षी ते आलटून पालटून केळी, हळद आणि टरबूजांचे उत्पादन घेतात.
आंतरपिके घेण्याचे यशस्वी प्रयोग
आंतरपीक पद्धतीची शेती म्हणजे काही नवीन तंत्रज्ञान नाही. आपल्या पारंपरिक शेती पद्धतीत शेतकर्यांच्या आर्थिक नफ्याला पूरक अशी ही पद्धत आहे. बरेच शेतकरी आंतरपिकातून दुहेरी उत्पन्न घेतात. असाच काहीसा प्रयोग अमोल पाटील यांनी 2019 मध्ये केला. केळीच्या शेतात आंतरपीक म्हणून त्यांनी जून महिन्यात कांद्यांची लागवड केली. लागवडीनंतर कांद्याची चांगली वाढ देखील झाली. उत्पादन हाती येण्याची चिन्हे दिसत असतानाच दिवाळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. ज्यामुळे त्यांचा सुमारे 400 क्विंटल कांदा शेतातच सडला. या आपत्तीमुळे अमोल पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र, या नुकसानीने ते डगमगले नाही. अजून काही तरी नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने त्यांनी मागीलवर्षी केळी पिकात झेंडूचे आंतरपीक घेतले. सुमारे सात एकर क्षेत्रावर त्यांनी झेंडूची लागवड जुलै महिन्यात केली. दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांना झेंडूंच्या फुलांचे जवळपास 60 क्विंटल उत्पादन झाले. त्यावेळी फुलांना बाजारात चांगली मागणी असल्याने या फुलांचे त्यांना दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न झाले. केळीच्या आधी झेंडूची लागवड केल्यामुळे केळीवर सूक्ष्मकृमींचा प्रादुर्भाव झाला नाही. शिवाय केळीवर पडणार्या सीएमव्ही या रोगाची देखील लागण झाली नाही. अर्थात, याची माहिती अमोल पाटील यांनी यापूर्वीच जाणून घेतलेली होती. केळीची लागवड त्यांनी ऑक्टोबरमध्ये केली. त्याआधी जून महिन्यात झेंडूची लागवड केल्याने त्यांना अतिरिक्त उत्पादन मिळाले. विशेष म्हणजे, त्यांनी त्यांची झेंडूंची फुले दलालामार्फत न विकता, स्वतः विकली. शेतकरी ते ग्राहक असा हा व्यवहार झाल्यान ग्राहकांना तर इतरांच्या भावापेक्षा कमी भावात फुले मिळाली. तर याचा काही प्रमाणात फायदा अमोल पाटील यांनाही झाला.
हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..
सर्व सुविधायुक्त गोठा
शेती करीत असताना गुरांचे पालन केलेच पाहिजे, हे लक्षात घेऊन अमोल पाटील यांनी गायी व म्हशींचे चांगल्या प्रकारे संगोपन केले आहे. सद्यःस्थितीत त्यांच्याकडे तीन देशी गायी, तीन संकरीत गायी व तीन म्हशी अशी नऊ दुभती गुरे आहेत. त्यांच्या योग्य संगोपनासाठी अमोल पाटील यांनी विविध सुविधांनी युक्त असा सुसज्ज गोठा ठेवला आहे. या सर्व दुभत्या जनावरांचे सुमारे 30 लिटर दूध निघते. ते दररोज जिल्हा दूध संघाच्या दूध डेअरीत नेऊन दिले जाते. गोठ्यात जनावरांसाठी रबरी मॅटिंग टाकले असून उन्हाळ्यात गोठ्याचे तापमान नियंत्रित राहावे म्हणून पाण्याचे फोगर्स देखील लावले आहेत. थंड हवेसाठी कुलर्सची देखील यंत्रणा बसवली आहे. गुरांना कुठल्याही आजाराची लागण होणार नाही यादृष्टीने त्यांचे गोठ्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष असते.
शेतकरी – अमोल गणेश पाटील
केर्हाळा बुद्रूक, ता. रावेर, जि. जळगाव
संपर्क ः 9764069411