भुषण वडनेरे, धुळे(प्रतिनिधी) :- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील देवजीपाडा येथील 26 वर्षीय राहुल शेवाळे या उच्चशिक्षित तरुणाने शेतीला मत्स्यशेतीची जोड देत आर्थिक प्रगती साधली आहे. मागीलवर्षी त्याने आपल्या शेतात धुळे जिल्ह्यातील पहिलाच बायोफ्लोक फिश फार्मिंगचा प्रोजेक्ट सुरु केला. केवळ चार टँकच्या माध्यमातून त्याला पहिल्याच वर्षी 2 हजार 225 किलो माशांचे उत्पादन झाले. या मासे विक्रीतून तब्बल अडीच लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले. हा प्रोजेक्ट पाहण्यासाठी आजवर अनेक मान्यवरांसह शेतकर्यांनी भेटी दिल्या असून काहींनी राहुलच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यशेती करण्यास सुरवात केली आहे. राहुलने शेतीसोबत नर्सरी देखील सुरु केली आहे. ज्याचा परिसरातील शेतकर्यांना मोठा लाभ होत आहे. विशेष म्हणजे, मत्स्य शेतीसोबतच राहुलचे वेगवेगळे प्रयोग सुरु असतात. यामुळे शेतीतूनही त्याला चांगले उत्पन्न मिळत आहे.
साक्री शहरापासून सुमारे 32 किलोमीटर अंतरावर देवजीपाडा गाव आहे. या गावात राहुल संभाजी शेवाळे (वय 26) याची वडीलोपार्जित 12 एकर शेती आहे. राहुलचे शिक्षण बी. एस्सी. व फायनान्स विषयात एम. बी. ए. झाले आहे. त्याने आपले उच्चशिक्षण नाशिक येथे पूर्ण केले. तो लहानपणी तसेच सुट्ट्यांमध्ये गावाकडे आल्यानंतर वडिलांना शेतीकामात मदत करायचा. यातूनच त्याला शेतीची आवड निर्माण झाली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने इतरांप्रमाणे नोकरीसाठी प्रयत्न केले. मात्र, मनासारखी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीत करण्याचे ठरविले. त्यानुसार शेतीतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला. शेतीमध्ये काही तरी वेगळे करायचे, हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे तो शेतीपूरक व्यवसाय म्हणून नाविन्याच्या शोधात होता. यातूनच त्याला मत्स्यशेतीची माहिती मिळाली.
प्रशिक्षण ठरले टर्निंग पॉइंट
मत्स्यशेती करायची म्हणजे त्याविषयी शास्त्रशुद्ध माहिती आवश्यक होती. त्यामुळे या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी राहुलने सुरुवातीला युट्युब व इंटरनेटचा आधार घेतला. त्यातून इगतपुरी येथे मत्स्यशेतीचा एक प्रकल्प असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानुसार, त्या ठिकाणी जाण्याचे ठरवून राहुलने प्रत्यक्ष या प्रकल्पाला भेट दिली. प्रत्यक्ष भेटीमुळे त्याच्या ज्ञानात मोलाची भर पडली. त्यानंतर कल्याण येथे एक दिवसाचे प्रशिक्षण घेतले. त्या ठिकाणी बायोफ्लॉकचा प्रोजेक्ट पाहिला. त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. आपल्या शेतीतही असाच प्रोजेक्ट सुरु करण्याचे राहुलने ठरविले. बायोफ्लॉक म्हणजेच कमी जागेत योग्य तंत्रज्ञान वापरून केलेली माश्यांची शेती.
अशी केली सुरुवात
राहुलने कल्याण येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या शेतातच 86 बाय 110 फूट आकाराचे शेड बनवून त्यावर ग्रीन नेट लावले. त्यात दीड मीटर उंची व 13.75 फूट व्यास असलेल्या टाक्या (टँक) तयार केल्या. या टँक बनविण्यासाठी पुणे येथील कंपनीकडून ऑनलाईन ताडपत्री (तार्पोलिन) कापड मागविला. टँक बनविण्यासाठी अगोदर टँकच्या आकाराचे विटांचे बांधकाम केले. स्थानिक बाजारातून जाळी आणून ती बसविली. ऑक्सिजनसाठी या टँकमध्ये एअर ब्लोअर लावले. त्यानंतर ताडपत्रीचा वापर करुन राहुलने स्वतः टँक तयार केले. त्यासाठी युट्यूबवरुनही माहिती जाणून घेतली होती. या टाक्या प्रत्येकी 12 हजार लिटर क्षमतेच्या तयार केल्या असून एक टँक बनविण्यासाठी सुमारे 35 हजार रुपये खर्च आल्याचे राहुलने सांगितले. चारही टँक तयार झाल्यानंतर त्याने कलकत्ता येथून पंगासस जातीच्या माशांचे 5 हजार मत्स्यबीज पाच रुपये प्रती दराने आणले. 1 सप्टेंबर 2020 रोजी चारही टँकमध्ये प्रत्येकी 1200 याप्रमाणे मत्स्यबीज सोडले. विशेष म्हणजे यासाठी राहुलने कोणतेही अनुदान घेतलेले नाही तर स्वखर्चातून हा प्रोजेक्ट सुरु केला आहे.
असे केले व्यवस्थापन
या चारही टँकमध्ये मत्स्यबीज सोडल्यानंतर त्यांना दिवसातून दोन वेळा खाद्य (फीड) देण्यास सुरवात केली. वातावरणानुसार पाणी बदलले. अतिउष्ण अथवा अति थंडीत माशांना अमोनिया होण्याची भीती असते. त्यामुळे जसे पाण्याचे पॅरामीटर बदलतात, त्यानुसार तेवढ्या प्रमाणात पाणी बदलावे लागते. जसे, अमोनिया 0.1 किंवा 0.2 ने वाढल्यास हजार ते दोन हजार लीटर पाणी बदलावे लागते. विशेष म्हणजे, हे पाणी वाया न घालवता त्याचा वापर शेतासाठी त्याने केला. कारण हे पाणी पिकांच्या वाढीसाठी खूपच उपयुक्त ठरते. दररोज माशांना देण्याचे खाद्य नंदुरबार येथून मागवले. दर बारा तासांनी म्हणजे सकाळी 7 ला दिल्यानंतर सायंकाळी 7 ला हे खाद्य देण्यास सुरवात केली. माशांची होणारी वाढ लक्षात घेऊन खाद्याची मात्र वाढवली. एखाद्या टँकमध्ये 2 किलो वजनाचे मासे असतील तर त्या टँकमध्ये एका वेळेला 500 ग्रॅम फिड दिले गेले. त्यानंतर जसजशी त्यांची वाढ होत गेली, तसतसे फीडचे प्रमाण वाढवले. अशा पद्धतीने सहा महिने योग्य रितीने मत्स्यबिजांचे संंगोपन केल्यानंतर 12 मार्च 2021 ला या माश्यांचे सरासरी जवन 600 ग्रॅम भरु लागले. त्यानंतर त्यांची विक्री सुरु केली.
अडीच लाखांहून अधिक उत्पन्न
सहा महिन्यात मासे पूर्णपणे तयार झाल्यानंतर व्यापार्यांनी स्वतः या ठिकाणी येऊन माशांची खरेदी केली. या चारही टँकमध्ये एकूण सुमारे 2 टन म्हणजे 250 किलो माशांचे उत्पन्न झाले. सरासरी होलसेल भाव 120 रुपये प्रती किलो मिळाला. यातून पहिल्याच सहा महिन्यात तब्बल 2 लाख 67 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. याबाबत राहुलने सांगितले, की या प्रकल्पासाठी मला एकाचवेळी चार ते साडेचार लाख खर्च आला असला तरी माझा हा प्रोजेक्ट पहिल्याच वर्षी यशस्वी झाला. माझा मत्स्यबिजावर झालेला 77 हजारांचा खर्च वजा जाता 1 लाख 90 हजार रुपये इतका निव्वळ नफा मिळाला. राहुलचा हा पहिलाच प्रयत्न होता. मत्स्यबीज दूरवरुन आणल्याने सुरुवातीला आठ ते दहा टक्के मर झाली. नवीन वातावरण व पाण्यामुळे देखील काही प्रमाणात माश्यांना फटका बसला. मात्र, ही मर होऊनही चांगले उत्पन्न झाल्याचे राहुलने सांगितले. दरम्यान, राहुलच्या आपल्या शेतात मोठे शेततळे तयार केले असून त्याचाही उपयोग मत्स्यपालनासाठी केलेला आहे. या शेततळ्यात राहुलने जीरा साईज जाळी बसवली आहे. ज्यात चार महिने मत्सबीज टाकलेले असते. ते साधारपणः दोन ते चार इंचाचे झाल्यानंतर ते बायाफ्लोक टँकमध्ये टाकले जाते. त्यानंतर पुन्हा नवीन मत्स्यबीज शेततळयात सोडले जातात. यातून आता मरही कमी झाली असून उत्पादनही लवकर निघण्यास मदत होत असल्याचे राहुलने सांगितले.
दोन जणांचा कायम रोजगार
आपल्या मत्स्यशेतीवर राहुलने दोन जणांना कायमस्वरुपी रोजगारही दिला आहे. मत्स्यशेतीसह इतर शेतीच्या देखभालीसाठी या मजुरांची चांगली मदत होते. राहुल देखील स्वतः पूर्णवेळ आपल्या या प्रकल्पावर लक्ष ठेवून असतो. पहाटे सहाला त्याचा दिवस सुरु होतो तो रात्री दहाला मावळतो. बायोफ्लॉक ही मत्स्यशेतीची फायदेशीर पद्धत असल्याची अनुभूती राहुलला येत असल्याने या पद्धतीत माशांना खाद्यही कमी लागत असल्याचे राहुलने सांगितले.
कृषी विभागाचे मार्गर्शन
कृषी विज्ञान केंद्रातील शेतकरी शास्त्रज्ञ मंचचा राहुल सदस्य आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच बायोफ्लॉक प्रकल्प सुरु करण्यासाठी धुळे येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विभागाचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे राहुल सांगतो. कृषी विज्ञान शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील व डॉ. आतिष पाटील यांनी त्याच्या प्रकल्पावर प्रत्यक्ष भेट देऊन त्याला मार्गदर्शन केले. शिवाय धुळे येथील उपविभागिय कृषी अधिकारी श्री. बैसाणे तसेच मत्स्यविभाग, धुळेचे एसीएम श्री. गताडे यांच्यासह साक्री तालुक्याचे कृषी अधिकारी श्री. ठाकरे यांनीही भेट देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाच्या जोरावर काही युवा शेतकर्यांना राहुलने तयार करुन एक खासगी कंपनी सुरू केली आहे.
मान्यवरांसह शेतकर्यांच्या भेटी
राहुल शेवाळे याचा बायोफ्लॉक मत्स्यशेतीचा हा प्रयोग पाहण्यासाठी धुळे जिल्ह्यातूनच नव्हे तर शेजारील जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातूनही अनेक शेतकरी भेटी देत असतात. विशेष म्हणजे, गुजरातमधील सोनगड येथील शेतकर्यांनीही भेट देऊन माहिती जाणून घेतली आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी देखील वेळोवळी भेट देत असतात. राहुलचा हा प्रोजेक्ट पाहून इतर दोन शेतकर्यांनी त्याच्या मार्गदर्शनाखाली एक-दोन टँकपासून बायोफ्लॉक प्रोजेक्ट सुरु केला आहे.
शेती पिकातूनही चांगले उत्पन्न
उच्च शिक्षणाच्या जोरावर राहुलने शेतीतही प्रगती साधली आहे. त्याने आपल्या बारा एकर शेतात गेल्या वर्षी 5 एकरावर मका, 3 एकरावर सोयाबीन तर 4 एकरावर मिरचीची लागवड केली होती. यात त्याला मक्याचे 12 क्विंटल उत्पादन होऊन 1 हजार 580 रुपये इतका दर मिळाल्याने सुमारे दोन लाखांचे उत्पन्न झाले. सोयाबीन 22 क्विंटल झाले. त्यास 7 हजार 200 रुपयांचा दर मिळाल्याने त्यातून सुमारे दीड लाखांचे उत्पन्न झाले. चार एकरावर लावलेल्या सितारा गोल्ड व बलराम फाफडा या मिरचीची चार वेळा तोडणी झाली. त्यातून एकूण 21 टन उत्पन्न झाले. सितारा गोल्ड मिरचीला 35 ते 40 रुपये तर बलराम फाफडा मिरचीला 27 ते 30 रुपयांचा दर मिळाल्याने त्यातून साडेसहा लाखांचा निव्वळ नफा झाल्याचे राहुलने सांगितले. हा सर्व शेतीमाल त्याने सुरत, अहमदाबाद येथील मार्केटमध्ये जावून विकला. मागीलवर्षी कोरोनाचे सावट असल्याने जागेवरच मालाची विक्री करावी लागली. विशेष म्हणजे, कंपनीअंतर्गत मशरूम उत्पादनाचा एक छोटेखानी प्रोजेक्टही त्याने सुरु केला आहे. त्यासाठी विक्रीसाखळी तयार करून मोठ्या प्रमाणात मशरूम उत्पादन घेण्याचा त्याचा मानस आहे.
भविष्यातील नियोजन
बायोफ्लोक प्रोजेक्टमध्ये आणखीन तीन टँक वाढविण्याचे राहुलचे नियोजन आहे. त्यादृष्टीनेच त्याने मोठे शेड तयार केलेले आहे. यासोबतच सुरु केलेल्या मिनी नर्सरीत मिरची व टोमॅटोच्या रोपांचे संगोपन करुन त्यांची विक्री करण्याचे नियोजन असून त्याला परिसरातील शेतकर्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आपल्या एफपीओच्या माध्यमातून जैविक शेती करण्यावर त्याचा भर आहे.
शेतकर्यांच्या शिक्षित मुलांनी नोकरीच्या मागे न धावता, आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करावा. आपल्याला काही तरी वेगळे करायचे आहे, या विचारातून मी धुळे जिल्ह्यातील पहिलाच बायोफ्लोक प्रोजेक्ट सुरु केला. पहिल्याच वर्षी अडीच लाखांहून अधिक उत्पन्न आले. हा प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी धुळ्यातील कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विभागातील अधिकार्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. चार टँकच्या प्रोजेक्टमध्ये आणखीन तीन टँक लवकरच वाढविणार आहे. अनेक शेतकरी माझ्या छोट्याशा प्रकल्पावर येऊन माहिती जाणून घेत असतात. दोन शेतकर्यांनी तर माझ्या मार्गदर्शनाखाली दोन टँकचा प्रोजेक्ट सुरु देखील केला आहे. शेतकर्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता, शेतीला जोड असे पूरक व्यवसाय करणे ही काळाची गरज आहे.
– राहुल संभाजी शेवाळे
प्रयोगशील युवा शेतकरी, देवजीपाडा, ता. साक्री, जि. धुळे मोबा. नं. 9730984816