जळगाव (प्रतिनिधी) – गिरणा नदीवरील प्रस्तावित सात बलून बंधाऱ्यांचा कामासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून तत्काळ मंजूरी मिळावी व गिरणा नदीपात्रातील बेसुमार अनधिकृत वाळू उपसासह अतिक्रमणाच्या प्रश्नांबाबत जनजागृती व्हावी यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील हे शनिवार (उद्या) पासून 300 किमीच्या गिरणा परिक्रमेला सुरुवात करणार आहेत. या परिक्रमेसोबत ‘गिरणा पुनरुज्जीवन’ अभियानही सुरु करण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात शनिवारी सकाळी ८ वाजता जळगाव तालुक्यातील कानळदा येथील महर्षी कण्व आश्रमापासून होणार आहे.
जलपुरुष राजेंद्र सिंह, बांबू मॅन माजी आमदार पाशा पटेल यांची विशेष उपस्थिती
माजी जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या अध्यक्षेत रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्र सिंह, बांबू मॅन माजी आमदार पाशा पटेल, भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सहाय्यक आयकर आयुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांच्या उपस्थितीत परिक्रमेला सुरुवात होणार असून मी स्वतः हातात तिरंगा ध्वज घेऊन मान्यवरांसह चौदा किलोमिटर पायी प्रवास करणार असल्याची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, महानगर सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे,पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी, पंचायत समितीचे सदस्य मिलिंद चौधरी, प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर, जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी यांच्यासोबत विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
कानळदा येथून परिक्रमेला सुरुवात
कानळदा येथील गिरणा नदीचे पूजन शनिवारी सकाळी ८ वाजता केले जाणार असून, कानळदापासून गिरणा परिक्रमेला सुरुवात केली जाणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी, विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहेत. या सर्व सहभागी संस्था, पदाधिकारी मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात येणार असून कानळदापासून सुरु होणारी ही परिक्रमा शनिवारी फुपनगरी, वडनगरी, खेडी व आव्हाणे, नीमखेडी या गावांलगत खासदार उन्मेश पाटील हे हातात तिरंगा ध्वज घेऊन जनजागृती करीत पायी प्रवास करणार आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दुपारी १२.०० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्र सिंह, बांबु मॅन माजी आमदार पाशा पटेल, भाजप जिल्हा अध्यक्ष आ. राजुमामा भोळे,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,सहाय्यक आयकर आयुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण, प्रांतधिकारी महेश सुदळकर, तहसीलदार नामदेव पाटील हे उपस्थित राहणार आहेत. जलपुरुष राजेंद्र सिंह, बांबू मॅन माजी आमदार पाशा पटेल व सहाय्यक आयकर आयुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण, खासदार उन्मेश पाटील आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
सात बलून बंधाऱ्यांचा प्रश्न महत्वाचा
गिरणा नदीवरील प्रस्तावित सात बलून बंधाऱ्यासाठीची मुख्य मागणी केली जाणार आहे. केंद्रिय जलआयोगाने मंजूरी दिल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून हा प्रस्ताव राज्य पर्यावरण मंत्रालयाकडे पडून असून, या प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी गिरणा परिक्रमेदरम्यान गिरणा काठच्या प्रत्येक गावातील सुमारे १ लाख नागरिकांची स्वाक्षरी घेवून मान्यतेसाठीचे निवेदन पर्यावरण मंत्र्यांना दिले जाणार आहे. यासाठी “परिक्रमा गिरणेची… शास्वत सिंचन वृद्धीची !.” या घोषवाक्य देण्यात आले असून यात असंख्य पर्यावरण प्रेमी सहभागी होणार आहेत.
३०० किमी काढण्यात येईल यात्रा
प्रत्येक शनिवारी ही परिक्रमा काढण्यात येणार असून, शनिवारी जळगाव तालुक्यातील गिरणा काठच्या गावांलगत ही परिक्रमा करण्यात येणार आहे. तर पुढच्या शनिवारी मोहाडी, दापोरा, लमांजन, म्हसावद या गावांना भेटी देण्यात येणार आहे. तर पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यातून पुन्हा एरंडोल, धरणगाव तालुक्यातून गिरणेचा संगम असलेल्या रामेश्वर येथे गिरणा परिक्रमेचा समारोप होणार असून यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार उन्मेश पाटील यांनी केले आहे.