नवी दिल्ली:- सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत इथेनॉलवरील GST दर 18% वरून 5% पर्यंत कमी केला. EBP प्रोग्राम अंतर्गत, इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाते. पेट्रोल आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती दिली की केंद्र सरकारने तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल ब्लेडिंग प्रोग्राम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे.
पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या इथेनॉलवरील जीएसटी मध्ये सरकारने 13 टक्क्यांची कपात केलेली आहे. सुधारित नियमानुसार जीएसटीचा दर 18 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्र सरकारने 2018 मध्ये पहिल्यांदा इथेनॉल तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर आधारित इथेनॉलचे दर निश्चित केले होते.
साखर कारखान्यात इथेनॉलचे उत्पादन कसे घेतले जाते-
साखर कारखान्यांमध्ये उपपदार्थाच्या स्वरुपात इथेनॉलचे उत्पादन घेतले जाते. भारतात उसाचे मोठे उत्पादन आहे. उसाच्या रसापासून शिल्लक मळीवर प्रक्रिया करून इथिल व मिथिल अल्कोहोलची निर्मिती केली जाते. उत्पादित इथिल अल्कोहोलचा इथेनॉल म्हणून वापर करण्यात येतो. 2003 मध्ये केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करण्याचा निर्णय घेतला होता.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदीचे वाढते प्रमाण –
इथेनॉल पुरवठा वर्ष (ISY) 2013-14 मधील 38 कोटी लिटरवरून त्यात (ISY) वर्ष 2020-21 मध्ये 350 कोटी लिटरपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात सरकारने उसापासून काढलेल्या इथेनॉलच्या किमती पेट्रोलमध्ये 1.47 रुपयांनी वाढवल्या होत्या.
इथेनॉल निर्मितीमुळे साखर कारखान्यांना आर्थिक आधार –
इथेनॉलच्या अधिक वापरामुळे पेट्रोलवरील भार कमी होण्याची आशा आहे. पेट्रोल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा आयातखर्चा मध्ये देखील कपात करणे शक्य ठरेल. तसेच इथेनॉल निर्मितीमुळे देशातील सहकारी साखर कारखान्यांना मोठा आर्थिक आधार उपलब्ध होईल.
इथेनॉलचे होणारे फायदे
* पेट्रोलमध्ये अधिक इथेनॉल मिसळल्याने प्रदूषण कमी होते आणि पेट्रोल ची बचत होण्यास मदत होते.
* इथेनॉलची निर्मिती सुरू झाली तर याचा सर्वात जास्त फायदा शेतकरी वर्गाला होईल. शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवण्याचा मार्ग मिळतो.
* इथेनॉलचा वापर केल्याने कार्बन मोनोकसाईड सल्फर डाय ऑक्ससाईड सारख्या घातक वायूंचे उत्सर्जन कमी होते.
* साखर कारखान्यांना एक नवीन उत्पनाचे स्रोत तसेच माध्यम प्राप्त होईल.
* तसेच दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात वाढ होत असल्याने जो त्रास वाहन चालकांना होतो आहे त्या वाढत्या किंमतीच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळेल.